सर्वगुणसंपन्न माझा महाराष्ट्र
आजपासून एक्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे एक मे एकोणिशे साठ रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. बहुसंख्य मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूर ही उपराजधानी झाली. तसे मुंबई आणि नागपूर हे दोन्ही शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात गणले जातात. मुंबई ही राज्याचीच नव्हे तर देशातील देखील महत्वाचे शहर आहे. गेटवे ऑफ इंडिया, बॉलीवूडची चंदेरी दुनिया, वानखेडे स्टेडियम, सीएसटी, यासारख्या अनेक स्थळामुळे मुंबई सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. संत्र्याच्या उत्पादनासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहेच त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे दीक्षाभूमीवर लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून देखील हे शहर प्रसिद्ध झाले आहे. त्याखालोखाल ज्या शहराचे नाव घेतले जाते ते म्हणजे पुणे होय. पुणे तिथे काय उणे असे या शहराच्या बाबतीत बोलल्या जाते. पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. अनेक सारस्वत मंडळी पुण्यातून निर्माण झाले. आज ही पुणे शहर आपल्या संस्कृतीला नावाप्रमाणे टिकवून ठेवले आहे. राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हाळ्यात पर्यटकांनी भरून जातात. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची समाधी गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे जे की नांदेड येथे आहे. शीख धर्मातील लोकांसाठी हे स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमधून लाखो भाविक दरवर्षी नांदेड येथे ये-जा करतात.
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे राज्यात प्रशासकीय कामासाठी एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक कामांची विभागणी होऊन काम सुरळीत पार पडण्यास मदत मिळते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळ्खले जाते. येथील भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यासारखे अनेक संत होऊन गेले. त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या सारख्या समाजसुधारक संतांनी देखील येथील भूमी पवित्र झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या थोर महापुरुषांनी आपल्या कार्याने आणि विचाराने महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील जनता या महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला कदापिच विसरू शकणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महाराष्ट्राच्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, आदी क्रांतिकारकाविषयी आमच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना तेवत असते. साहित्याच्या क्षेत्रात देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, गदिमा, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, भा. रा. तांबे, सुरेश भट, बालकवी, केशवसुत इत्यादी साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण करून ठेवले आहे, ज्याच्या बळावर आज नवीन साहित्यिक नवे साहित्य निर्माण करत आहेत. खेळाच्या बाबतीत देखील महाराष्ट्रातील खेळाडूचे अनन्यसाधारण महत्व आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, खाशाबा जाधव यासारख्या खेळाडूंनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरून ठेवले आहे. तर चित्रपट क्षेत्रातील भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दादा कोंडके, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे माधुरी दीक्षित, उषा नाडकर्णी, लता मंगेशकर, आशा भोसले, पंडीत भीमसेन जोशी यासारखे अनेक कलाकारांनी आपल्या कला कौशल्याने महाराष्ट्राचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाईचे शिखर अनेक गिर्यारोहकाना नेहमी खुणावत असते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, ताडोबाचे व्याघ्रप्रकल्प, स्व. बाबा आमटे यांचे आनंदवन, यासारखे अनेक स्थळ महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करत असतात. राज्याला सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे राज्याला अनेक बाबतीत समृद्धता मिळाले आहे. कोयना, जायकवाडी, भंडारदरा यासारख्या धरणामुळे राज्य सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळाली आहे. उद्योगधंद्यात देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, औरंगाबाद या शहरातील उद्योगाने अनेक कामगारांच्या हाताला काम देऊन उद्योगाच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे. औरंगाबाद येथील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात. त्याचसोबत राज्यात असलेले अनेक किल्ले आणि गड हे देखील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच भुरळ घालत असतात. तिरुपती बालाजी नंतर दुसरे देवस्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा यांचे मंदीर होय. सबका मलिक एक असा संदेश देणारे साईबाबा हे सर्व धर्मियांचे दैवत आहे. येथे अनेक लोकं दरवर्षी दर्शनासाठी गर्दी करतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तश्रृंगी देवी हे साडे तीन पीठ स्थळ अनेक महिलांसाठी प्रेरणेचे स्थान आहेत. वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेला पंढरपूर येथे पायी वारी करण्यासाठी येतात. शेगावचे गजानन महाराजाचे मंदीर स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाना एक मार्गदर्शक ठरेल असे ठिकाण आहे. तेथे गेल्यानंतर जे आत्मिक व मानसिक समाधान मिळते ते कदाचित कुठे ही मिळत नसेल. कोकणची किनारपट्टी, तेथील हापूस आंबा, नारळ आणि इतर वृक्ष पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील अजून घटना घडली, देशातील सर्वप्रथम रेल्वे ठाणे - मुंबई दरम्यान धावली होती, ज्यामुळे इतिहासात याची ठळक नोंद घेतली आहे. कारण आज देशातील रेल्वेचे जाळे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी दिसून येते. महाराष्ट्रात दर कोसावर भाषा बदलत जाते. मुंबईची भाषा वेगळी तर पुण्याची भाषा वेगळी. मराठवाड्याची भाषा अनेकांना अवघडल्यासारखे वाटते तर विदर्भाची भाषा प्रेमळ वाटते. खानदेशाची अहिराणी भाषा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुबाबदार भाषा आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसे महाराष्ट्रात गोदावरी, कोयना, कावेरी, चंद्रभागा, भीमा अश्या अनेक नद्यांनी समृद्ध केले आहे तर अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलाने विविध प्राणी, पशु-पक्षी यांना खरा आधार दिले आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोकं या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरात शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ विद्यार्जनासाठी निर्माण करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार यासारखे व्यक्तींच्या आदर्शावर आज महाराष्ट्रातील ग्रामीण जनता पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी इत्यादी लक्षात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यास अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित देखील केले. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धव ठाकरे साहेब जे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ते काम पाहत आहेत. त्यांच्या हाती सत्ता आल्यापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह महाराष्ट्र देखील पादांक्रांत केले आहे. मा. उद्धव ठाकरे साहेबांची खरी कसोटी या क्षणी पाहायला मिळत आहे. या कोव्हीड-19 काळातील एक कणखर मुख्यमंत्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेईल इतके सुंदर कार्य चालू आहे. महाराष्ट्र दर्शन करायला निघालं तर आयुष्य देखील कमी पडू शकते, एवढं समृद्धता राज्यात आढळून येते. मी महाराष्ट्रयीन असल्याचा मला नेहमीच अभिमान आहे. असा माझा हा महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न असून देशात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करून ठेवले आहे. आज महाराष्ट्र दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा ....!
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769
महाराष्ट्र माझा
देशात उंचावलेली आहे मान
देशाचे हृदय महाराष्ट्र माझा
संपूर्ण देशात गाजावाजा
जय जय महाराष्ट्र माझा
आपली भाषा आपले लोक
आपला प्रांत आपले राष्ट्र
चालावा आपला व्यवहार
असा हा आपला महाराष्ट्र
येथील लोकं बोलती मराठी
येथे व्यवहार होतो मराठी
पुस्तकाची भाषा ही मराठी
महाराष्ट्राची राजभाषा मराठी
मुंबई आहे राज्याची राजधानी
येथे घडते आर्थिक कहाणी
नागपूर राज्याची उपराजधानी
संत्री खाऊन गाती गोड गाणी
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे
आहेत अनेक गड आणि किल्ले
राष्ट्रावर झाले आहेत अनेक हल्ले
घाबरणार कसे महाराष्ट्राची पिल्ले
सोनियाचा मे महिन्याचा एक
राज्यात नांदती लोकं अनेक
गुण-गौरव गातसे माय लेक
माझा महाराष्ट्र सर्वात नेक
- नासा येवतीकर, विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
।। माझा महाराष्ट्र ।।
महात्मा फुले शाहू आंबेडकर
लाभले टिळक नि आगरकर
देशासाठी केली अपार सेवा
राज्याचे नाव पोहोचले जगभर
या थोर समाजसुधारकासह
होती महाराष्ट्र संतांची भूमी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आले
राज्यातील अनेक वीर कामी
छत्रपती शिवाजी राजे यांनी
निर्मिले मराठ्यांचे स्वराज्य
त्यांची प्रेरणा घेऊनच झालं
मराठी भाषिक लोकांचे राज्य
देशाच्या प्रगतीमध्ये हातभार
मुंबई शहर असतो अग्रेसर
देशाच्या विकासात महाराष्ट्र पुढे
प्रत्येक शहराची दिशा विकासाकडे
एक्याऐंशी वर्षांपूर्वी झाली होती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
मुंबई बनली राज्याची राजधानी
तर नागपूर ठरले उपराजधानी
महाराष्ट्राला आहे एक इतिहास
प्रत्येक जिल्ह्याचे स्थान वेगळं
प्रत्येक जिल्हा वैशिष्टयपूर्ण
पर्वत डोंगर जंगल हे सगळं
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
खूप छान, माहितीपूर्ण लेख!
ReplyDelete