कोरोना आणि स्वयंशिस्त
घरात धिंगाणा करणाऱ्या मुलांविषयी आईबाबा एक वाक्य नेहमी म्हणतात, याचे शाळेत जाण्याचे दिवस कधी पूर्ण होतात की ? तसं तर आई बाबांना देखील माहीत असतं की वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की मूल शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेशित होतो. तरी देखील मुलांचे आईबाबा तसे का म्हणत असतील ? तर याचे उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे. मूल शाळेत प्रवेश घेतला की त्याची घरात धिंगाणा करण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होते आणि शहाण्या लेकरसारखं तो वागायला लागतो. काय शिकवलं जातं त्या पहिली दुसरी वर्गाच्या शाळेत ? तेथे मुलांना वाचायला शिकवलं जातं, लिहायला शिकवलं जातं, बोलायला शिकवलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्याला स्वयंशिस्त शिकविली जाते. होय, प्राथमिक शाळेतून मुलांना स्वयंशिस्त प्रामुख्याने शिकवली जाते. मात्र ती जशी जशी अंगाने व शरीराने मोठी होत जातात तसे तसे स्वयंशिस्त विसरून जातात, ही फार मोठी शोकांतिका आहे. तसं तर पहिल्या वर्गात येणार सहा वर्षाचे मूल घाबरत घाबरत येते. त्याच्या मनात शाळेची आणि शिक्षकांची भीती असते. वरच्या वर्गातील मुलांकडे पाहत पाहत ही मुले शाळेतील वातावरणाशी समरस होत असतात. शिक्षकांची एक रणनीती असते. संपूर्ण वर्गाला किंवा शाळेला शांत करायचे असेल आपल्या नियंत्रणाखाली आणायचे असेल तर कुण्या तरी एकावर खूप राग आणि मोठी शिक्षा करावी लागते. हे बघून बाकीचे सारे चिडीचूप होतात. सर्कसमध्ये रिंगमास्टर जसे काम करतो तसे काम प्राथमिक वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक करतात. ( आज तसे शिक्षण नसून आनंददायी शिक्षण आहे, हा भाग वेगळा ) आपल्या वर्गातील वा शाळेतील मुलांना वाचायला किंवा लिहायला नाही आले तरी चालेल पण त्यांच्यात स्वयंशिस्त असायलाच पाहिजे अशी धारणा शिक्षकांमध्ये असते. सकाळी घंटी वाजले की विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, शिक्षकांनी शिट्टी वाजवली की सारे विद्यार्थी एका रांगेत उभे राहिले पाहिजे, सावधान-विश्राम झाले की आदेशानुसार राष्ट्रगीत म्हटले पाहिजे विद्यार्थी हे सर्व आपल्या शरीराला लावलेल्या स्वयंशिस्त सवयीमुळे करत असतो. शाळेत अभ्यासासोबत स्वयंशिस्त प्रत्येक शाळेतून शिकवल्या जाते. पुढील भावी जीवनावर या स्वयंशिस्तीचा परिणाम दिसायला लागते. जे विद्यार्थी शाळेत स्वयंशिस्त पाळलेली असतात ते मोठेपणी देखील स्वयंशिस्त पाळून देशाचे, राज्याचे आणि समाजाचे नियम पाळतात.
गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेत लोकांनी खूप जबाबदारी पूर्वक राहिले किंवा सुरुवातीला या कोरोनाची मनात खूप भीती होती. म्हणून शासनासह जनतेनी देखील स्वतःला घरात बंदीस्त केले होते. पण कोरोना आजार म्हणजे सर्दी, पडसं आणि खोकला आहे. त्याला काही जास्त मनावर घ्यायचं नाही असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे लोकं निष्काळजीपणाने वागण्यास सुरुवात केली. म्हणूनच दुसऱ्या लाटेत देशभरात लाखो लोक कोरोना पॉजिटिव्ह निघत आहेत. हजारो लोकं मृत्युमुखी पडत आहेत. मरण पावलेल्या लोकांना सरण लावण्यासाठी देखील रांगेत जावे लागत आहे. किती कठीण काळ आला आहे, याची जाणीव आपणा सर्वांना आहे. मात्र तरीदेखील अजूनही जनता सरकारच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. शाळेत शिकविण्यात आलेली स्वयंशिस्त आता प्रत्येकांनी उपयोगात आणली पाहिजे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखायाचा असेल तर त्याची साखळी तोडावी लागते. ती साखळी तोडण्यासाठी स्वतःला घरात कैद करावे लागेल. शासनाला नाईलाजास्तव संचारबंदी आणि लॉकडाऊन करावे लागत आहे कारण आपण नागरिकांनी स्वयंशिस्तीने वागणे विसरून गेलो आहोत. घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क वापरावे, पोलिसांना घाबरून असे करू नका तर ती एक स्वयंशिस्त आहे. आपल्या शरीराला तशी सवय लागलीच पाहिजे. घराच्या बाहेर पडताना तोंडावर मास्क वापरणे. काही कामासाठी जर आपण बाहेर गेलोच तर सुरक्षित अंतर ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आपले हात-पाय स्वच्छ धुणे आणि सोबत मास्क देखील धुतले पाहिजे. बरेचजण हात-पाय धुतात आणि मास्क तसेच घरात नेतात त्यामुळे हा विषाणू घरात पसरत आहे. घरात वावरताना देखील थोडे जागरूक होणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातले जरी असाल तरी एकमेकांचे उष्टे अन्न खाऊ नका. पाणी पिण्यासाठी दररोज एकच ग्लास वापरावे. शक्यतो आपले जेवलेले ताट आपण स्वतः धुवून बाजूला ठेवलं तर अजून चांगलं. या काळात टीव्हीवरील बातम्या पाहून काळजाची धडधड वाढविण्यापेक्षा कानाला सुमधुर वाटणारे गाणे ऐका, चांगले चित्रपट पहा, पुस्तके वाचा, मनपसंद खेळ खेळावे यामुळे आपल्या मनाला विरंगुळा मिळेल. कोरोना रोग हा साधा आजार आहे मात्र ते अंगावर काढणे वाईट आहे तसेच कोरोना आजाराची धसकी घेतल्यामुळे अनेकजण आपल्या जीवाला मुकत आहेत. म्हणून मित्रांनो या कोरोना विषम काळात आपल्या शरीराला स्वयंशिस्त लावून घ्यावे म्हणजे देशात वाढणारी ही समस्या काही प्रमाणात कमी करता येईल. घरी राहा सुरक्षित राहा, आवश्यक काम असेल तर बाहेर जावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, बोलताना सुरक्षित अंतर ठेवावे, तोंडावर मास्क वापरावे अश्या साध्या साध्या गोष्टीच्या सवयीचे स्वयंशिस्त लावून तसे वागले पाहिजे तरच या कोरोनाला आपण हरवू शकतो. आपली एक जरी चूक झाली तर आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला, नातलगांना, समाजाला, गावाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला धोका निर्माण होऊ शकते.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment