मनोरंजनासोबत प्रबोधनही करणारे जादूची पिशवी कथासंग्रह
ना. सा. येवतीकर यांचे हे दहावे ई पुस्तक आणि तिसरे ई कथासंग्रह! मित्रांनो, बदल हा नैसर्गिक जीवनाचा भाग आहे. सातत्याने होणारे बदल मानवाला अंगीकृत करावे लागतात. त्याप्रमाणे स्वतःला बदलून घ्यावे लागते. काही वर्षांपासून सुरु असलेली डिजिटल क्रांती आपण स्वीकारली आहे. जवळपास सर्व कारभार आपण ऑनलाइनच्या माध्यमातून करीत आहोत. साहित्य क्षेत्रातही या डिजिटल क्रांतीने हळूहळू पण ठामपणे पावलं रोवायला सुरवात केली आणि पाहता पाहता हजारो पुस्तके या ऑनलाईन स्वरुपात आपल्याला वाचायला मिळत आहेत. लेखकांनाही स्वतःची पुस्तके याच माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहचविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. अनेक लेखक या माध्यमाचा सराईतपणे वापर करीत आहेत. या लेखकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ना. सा. येवतीकर ! कविता, चारोळी, कथा, पत्र, चरित्र, नाटक आणि कादंबरी असे नानाविध साहित्य प्रकार ऑनलाईन प्रकाशित करणाऱ्या अनेक संस्था आहेत. या ऑनलाईन प्रकाशन व्यवस्थेचे एक प्रमुख लेखक म्हणजे नासा ! बहुतांश ऑनलाईन साहित्य संस्थांच्या वेबसाईटवर नासा यांचे साहित्य वाचायला मिळते. नासा यांची लेखणी केवळ वाचकांचे मनोरंजन करीत नाही तर मनोरंजनासोबत वाचकांचे प्रबोधनही करते. सामाजिक विषय हा त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यांच्या लेखनीने प्रसवलेले विषय पाहिले तर आपणास याची प्रचिती येईल. बरे, नासा स्वतःचे लेखन प्रकाशित करण्यात धन्यता मानत नाहीत तर ते स्वतःसोबत अनेकांना आपापले साहित्य ऑनलाईन प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतात, व्यासपीठ उपलब्ध करुन देतात. नासा यांनी साहित्य सेवक या नावाचा एक व्हाट्सअप समूह चालविला आहे. या समूहाच्या माध्यमातून ते अनेकानेक साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी लेखकांना आणि वाचकांना देतात म्हणून जादूची पिशवी या कथासंग्रहाच्या प्रास्ताविकात ई साहित्य प्रतिष्ठानचे प्रकाशक सुनील सामंत यांनी म्हटले आहे, 'नासांच्या तळमळीने चालविलेल्या नवभारत निर्माणात आपण सामिल व्हा.'
'दिसामाजी काहीतरी लिहित जावे...' हा संत रामदास स्वामी यांचे वचन गुरुमंत्र मानून नासा साहित्य क्षेत्रात दमदार, आश्वासक अशी वाटचाल करताना एक आगळवेगळे नेतृत्वही करीत आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात बहुतांश वेळा नासा यांचा लेख हमखास असतो आणि म्हणून ते सर्वदूर स्तंभलेखक म्हणून सुपरिचित आहेत.
जादूची पिशवी या कथासंग्रहात एकूण अठरा कथांचा समावेश आहे. जादू केवळ बालकांनाच आवडते असे नाही तर जादू ही थोरांनाही भुरळ घालते, प्रेमात पाडते. म्हणून हा कथासंग्रह आबालवृद्धांना आवडेल असाच आहे. आपल्या समाजात लहान वयात मुलीचे लग्न हा मुलीसाठी शाप ठरणारा प्रकार पूर्वीपासून आजही सुरु आहे. बालविवाह कायदा करुनही या शापातून मुलींची विशेषतः ग्रामीण भागातील मुलींची सुटका झालीय का हा चर्चेचा नव्हे तर संशोधनाचा विषय आहे म्हणूनच नासा यांना कळी उमलण्याआधी...!' ही ह्रदयस्पर्शी कथा लिहावी लागली. ज्याच्याजवळ जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आहे त्याला इच्छित ते सारे मिळू शकते. हातावर हात देऊन बसणारांना या समाजात यश मिळत नाही हा महत्त्वाचा संदेश देणारी कथा म्हणजे जिद्द!
लॉकडाऊन ! नाव उच्चारताच अंगावर काटे यावेत अशी स्थिती ! सारे काही बंद ! त्यामुळे 'हातावर पोट' असणारांचे अतोनात हाल झाले. अक्षरशः उपाशी पोटी झोपायची वेळ आलेली असताना काही देवमाणसं अशा कुटुंबाच्या मदतीला धावून आली आणि काही कुटुंबाची भूक त्यांनी काही दिवसांसाठी का होईना शमविली. या कथासंग्रहातील डोळे पाणवणारी कथा म्हणजे
लॉकडाऊन ! या कथासंग्रहातील एक आगळीवेगळी कथा म्हणजे 'निरागस नामा' सर्वसाधारणपणे मुलगा व्हावा या आशेने पाच-सहा मुली झाल्या तरीही कुटुंब नियोजनाचा मार्ग न स्वीकारणारी अनेक कुटुंबं समाजात आहेत परंतु नासाच्या लेखनीला असे एक कुटुंब सापडते की, ज्या कुटुंबात मुलीची वाट पाहता पाहता सातवा मुलगा जन्म घेतो. कथा वाचनीय आहे. ऑनलाईन व्यवस्था चांगली की वाईट हा एखाद्या वादविवाद स्पर्धेचा विषय होऊ शकतो परंतु प्रत्येक व्यवस्थेला दोन बाजू असतात. त्यातील चांगली बाब घ्यायची की वाईट गोष्टीच्या मागे जायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. ऑनलाईन देवाणघेवाण या चांगल्या प्रक्रियेला फसवणूक हे ग्रहण लागले असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. या फसवणुकीच्या मागे लालच, मोह हा दुर्गण नक्कीच आहे. अशाच आशयाची लालच बुरी बला है। कथा या संग्रहात असून ती ऑनलाईन व्यवहार करणारांना जागे करते.
शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना, पालकांना प्रोत्साहन देतात अशाच एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीला प्रोत्साहन दिल्यानंतर ती मुलगी कसा इतिहास घडवते आणि त्यामुळे त्या शिक्षकांना जीवन कसे कृतार्थ झाल्याची जाणीव होते हे कृतार्थ जीवन या कथेत वाचायला मिळते. संशय ही कथा अत्यंत उत्कृष्ट आहे. खेळासोबत अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे मुलांच्या मनावर बिंबवणारी कथा म्हणजे गोट्या ! व्यसन हे आपल्या समाजासाठी एक शाप ठरतेय. या शापामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते हे नासा यांनी चूक या कथेत तळमळीने सांगितले आहे. रेल्वे प्रवासात सुरज नावाचा चौथ्या वर्गात शिकणारा बालक रेल्वेत चोरी करणारास कसा पकडून देतो हा प्रसंग लेखकाने धाडसी सुरज या कथेत तन्मयतेने लिहिला आहे. भावा- बहिणीच्या प्रेमाचे अनेक कंगोरे उजागर करणारी, काळजाचा ठाव घेणारी कथा म्हणजे बहिणीची शपथ
काही वर्षांपूर्वी मुलीचे शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होता पण आता मुलीच्या शिक्षणाच्या आधी मुलीला जन्म द्या, मुलीचा गर्भ पाडू नका, तिला गर्भात मारु नका यासाठी जनजागृती करावी लागत आहे, कायदा करून असे दुष्कृत्य करणारांना शिक्षा द्यावी लागत आहे. हा दैवदुर्विलास ना. सा. येवतीकर यांनी लेक वाचवा, लेक शिकवा! या मनाला भिडणाऱ्या कथेत समर्थपणे लिहिला आहे. आपला देश विविध भाषांचा देश आहे. देशातील प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर भाषेच्या अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. अशावेळी एकमेकांना भाषा समजत नसल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. परंतु अशावेळी आपल्या राज्यातील, आपली भाषा बोलणारा एखादा इसम भेटला की, अनेक प्रश्न कसे चुटकीसरशी सुटतात याचे वर्णन लेखकाने भाषेचा प्रश्न! या कथेत अत्यंत मार्मिकपणे केले आहे. रेल्वे प्रवास हा आजकाल अत्यंत आवश्यक असाच आहे परंतु अशा युगातही रेल्वेचा प्रवास प्रथम करताना गणू नावाच्या पंधरा वर्षे वयाच्या मुलाचा गमतीदार अनुभव नासा यांनी रेल्वेतील पहिला प्रवास मोठ्या मनोरंजनात्मक रीतीने साकारला आहे.
मेहंदी ही कथा एक अत्यंत ह्रदयद्रावक अशी कथा आहे. हातावरील मेहंदी वाळण्यापूर्वीच आणि मधुचंद्राच्या रात्री नवविवाहित प्रणिताला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते हे वाचताना डोळे पाझरल्याशिवाय राहत नाहीत. कोणताही कथासंग्रह एक शीर्षकथा घेऊन येतो. ही कथा त्या कथासंग्रहाचा आत्मा असतो त्यामुळे वाचक अशी शीर्षक कथा वाचण्यासाठी उत्सुक असतो. ना. सा. येवतीकर लिखित जादूची कथा वाचण्याचीही एक उत्कंठता होती. आत्महत्त्या करणाऱ्या एका युवकाला एक परी जादूची पिशवी देते आणि त्याला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त करते. काय असते त्या पिशवीत ? ती पिशवी त्या युवकाला काय काय मिळवून देते ही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली कथा वाचकांना भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही.
आपण लोकशाही मार्गाने चालणारे नागरिक ! या देशात एकेक मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक मताची किंमत ही या संग्रहातील एक वाचनीय कथा ! एक मताने सरकार पडल्याची घटना आपण विसरलेलो नाहीत याच आशयाची ही कथा वाचताना वाचक अंतर्मुख होतो. कुस्ती ही या कथासंग्रहातील शेवटची कथा ! कुस्ती या खेळात शारीरिक शक्तीचा तर कस लागतोच पण बुद्धीचातुर्य, चपळता, लवचिकता याचीही परीक्षा होते. कधीकधी कुस्ती हा खेळ जीवावरही बेततो. असा विषय घेऊन आलेली कथा काळजाला भिडते.
जादूची पिशवी हा कथासंग्रह वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन वाचकाला भेटीसाठी आला आहे. साध्या, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दात, ओघवत्या भाषेत सर्व कथा असल्याने त्या कथा वाचकाला आकर्षित करतात आणि एका बैठकीत वाचून काढायला प्रवृत्त करतात. सदरील ई बुक ई साहित्य डॉट ईन च्या संकतेस्थळावर ऑनलाइन मोफत उपलब्ध आहे. तसेच लेखकांच्या 9423625769 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे देखील हे ई बुक प्राप्त करून घेता येईल.
लेखक नासा येवतीकर यांना आगामी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! एक इच्छा मात्र जरुर आहे, ती म्हणजे लेखकाचा अभ्यास, आवाका पाहता, त्यांची शैली पाहता कादंबरी या विषयाकडे लेखकाने गांभीर्याने वळावे. अभिनंदन! शुभेच्छा!!
नागेश सू. शेवाळकर, पुणे ९४२३१३९०७१
No comments:
Post a Comment