पाणी
पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. पशु-पक्षी, वेली, वनस्पती, झाडे, आणि मानवाना पदोपदी पाण्याची गरज भासते. अश्मयुगीन काळातील लोकं पाण्याचे ठिकाण पाहून आपली वस्ती तयार करत होते. कारण त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य होते. आज ही आपली तीच परिस्थिती आहे. शहरात किंवा खेड्यात कोठेही घर बांधण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी आहे ? याबाबी लक्षात घेतले जाते. त्यानंतरच घर बांधणीचा विचार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही म्हटल्यावर तेथे सहसा कोणी घर बांधकाम करत नाहीत, त्या भागातील जमिनीचे दर देखील खूप कमी असतात. वाढती लोकसंख्या आणि वाढते घरं यामुळे प्रत्येकजण पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जमिनीला चारशे ते पाचशे फूट खाली पर्यंत छिद्र करत आहेत. त्यामुळे जमिनीचे अक्षरशः चाळणी झाल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी पन्नास फूट खोलीवर असणारे पाणी आज दहापट खाली उतरले आहे. काहीजणांना पाणीच लागत नाही तेव्हा ते अजून एक दोन छिद्र करून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पृथ्वीवरील जमिनीचे संतुलन बिघडत चालले आहे. गावात आणि शहरात नळ योजना असताना देखील लोकं खाजगीमध्ये बोअरवेल करतात. यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. सध्या तर पाणी हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की, पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागतील तर त्याच्यावर आपण मोठ्याने हसलो असतो आणि त्याला मूर्खात काढलं असतं. पण आज परिस्थिती तीच आहे. फिल्टर पाणी पिण्यासाठी योग्य असते म्हणून गेल्या चार पाच वर्षात आपण साधे पाणी पिणेच बंद करून टाकले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जे की फुकट मिळत होते त्यास आज आपण मासिक सरासरी तीनशे रु. खर्च करत आहोत तर वार्षिक तीन हजार सहाशे रु खर्च करत आहोत. एका कुटुंबाचा वार्षिक खर्चावरून जर गाव आणि शहरातील लोकांची एकत्रित खर्च काढला तर लक्षात येईल की आपण पिण्याच्या पाण्यासाठी किती खर्च करत आहोत. परंतु ही सेवा स्थानिक प्रशासनाने दिल्यास योग्य राहील असे वाटते. पाण्याच्या दुनियेत जे काही संघर्ष चालू आहे ते थांबेल. कुणीतरी सांगून ठेवलं आहे की यापुढील तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. असेच जर चालू राहिले तर भविष्यात नक्कीच होऊ शकते, यात काही नवल नाही.
भारतात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्यामुळे त्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणावर होते. पावसाळ्यात पाण्याची दिवाळी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा असतो. ग्रामीण भागात आजही अनेक खेडी असे आहेत की ज्यांना कोस दोन कोसवरून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. अश्या लोकांना या पाण्याचे महत्व कळते. घरात बसून बटन मारले की हजार लिटरची टाकी भरून घेणाऱ्यांना या पाण्याचे महत्व कधीच कळणार नाही. आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती.
- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769
No comments:
Post a Comment