Wednesday, 24 June 2020

पावसाळा आणि शेतकरी

पावसाळा आणि शेतकरी
- नागोराव येवतीकर
भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नागोराव सा. येवतीकर

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...