ये तो बस ट्रेलर है ....।
नुकतेच एमपीएससीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्यात अनेक गरीब कुटुंबातील मुलांमुलींनी यश मिळवीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासारख्या उच्च पदावर शिक्कामोर्तब केले. याच परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपयश मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना देखील वाचण्यास मिळाले. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करण्याचा पर्याय निवड करणे हे कधी ही योग्य मार्ग नाही. आजकाल स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अनेक युवक पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले की याच्या तयारीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या शहराकडे धाव घेतात. नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अश्या अकॅडमी मध्ये प्रवेश मिळविला म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळवितो असे त्यांना खात्री वाटते. पण आपल्या यशात कोणतेही अकॅडमी हे निमित्त मात्र असते त्यात खरी मेहनत ही आपलीच असते. त्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करण्याची युवकांनी तयारी ठेवायला हवी. असे म्हणतात की सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या मुलांना अभ्यासाची सोयरसुतक नसते आणि ज्यांना एक वेळचे खायला मिळत नाही असे विद्यार्थी मात्र दिवसरात्र एक करून अभ्यास करतात आणि जिद्द व चिकाटीने यश पदरात घेतात. गरिबीचे चटके खाल्लेले व दारिद्र्य जवळून पाहिलेल्या युवकांना परिस्थिती बदलण्याचा ध्यास लागतो मग त्यांना कामाचा अजिबात त्रास होत नाही. यावेळी एमपीएससीच्या परीक्षेत पास झालेले अनेक परीक्षार्थी खूप गरीब घरातले आहेत. त्यांना मिळालेले यश हेच अधोरेखित करते. ते गरीब होते, त्यांना परिस्थिती बदलायची होती आणि त्यासाठी अभ्यास केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. अशी परिस्थितीच माणसाला काही तरी करून दाखविण्याची संधी देते. म्हणून मी गरीब आहे, माझ्याने काही होत नाही ही भाषा कोणत्याच युवकांना शोभून दिसत नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ही योजना अंगीकारून जो पुढील शिक्षण घेत राहतो तो जीवनात नक्की यश मिळवू शकतो. आपल्या अंगात कोणती कौशल्ये आहेत ? आपण कोणत्या क्षेत्रात यश मिळवू शकतो ? आपल्या शिक्षणाचा कल कोणता ? या सर्व बाबी ज्याना कळते तोच योग्य मार्गाने जाऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम स्वतःला ओळखायला शिका. कल लक्षात न घेता आज असे अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना दिसतात, मग त्यांच्यात नाउमेद व निरुत्साह निर्माण होतो. लोकं काय म्हणतील ? आई-वडील काय म्हणतील ? सारे मित्र मला हसतील असे वेगवेगळे विचार मनात आणून आत्महत्येसारखा मार्ग ते स्वीकार करतात. पण त्यापूर्वी एक वेळ विचार करत नाहीत की ही स्पर्धा परीक्षा पास झालो नाही म्हणजे सर्व संपले असे मुळीच नाही. कदाचित तुम्हाला एखादे उद्योग बोलावत असेल. एखादे काम तुम्हांला खुणावत असेल याबाबीचा विचार करणे आवश्यक आहे. एका उच्चशिक्षित युवकाला कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली नाही. तो खूप हताश झाला आणि त्याने कोंबड्या पाळण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला अनेकांनी त्याच्या या उद्योगाला हसले. पण त्याने तिकडे कानाडोळा केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. काही महिन्यात त्याच्या व्यवसायाला भरभराटी आली आणि हजारो रुपयांत खेळणारा तो लाखो रुपयांचा मालक झाला. नंतर करोडपती ही झाला. बरे झाले मी प्राध्यापक झालो नाही. नसता दुसऱ्याची चाकरी करत राहिलो असतो असे तो मनाशी म्हणाला. कोणत्याही घटनेमागे काही ना काही कारण लपलेले असते म्हणून यश मिळाले नाही म्हणून लगेच नाउमेद होऊन गैरमार्ग स्वीकारणे कधीही कोणाच्याही हिताचे नाही. म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या माझ्या तमाम बेरोजगार युवक-युवतींना कळकळीची विनंती की कठोर मेहनत करत चला, आज ना उद्या यश तुमच्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहणार नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रतीक्षा या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवून वाटचाल सुरू ठेवा. जीवन खूप सुंदर आहे आणि तुमची तर जस्ट सुरुवात आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, फिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त.....!
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769
No comments:
Post a Comment