लॉकडाऊन नंतरचे जीवन
कोरोना व्हायरसमुळे देशात मार्चच्या शेवटच्या सप्ताहापासून देशात संचारबंदी करण्यात आली आणि त्यानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, उद्योगधंदे आणि कारखाने बंद करून सर्वचजण घरात कैद झाले. सुमारे सत्तर दिवस सारेचजण लॉकडाऊन झाले होते. यामुळे अनेकांचे हालबेहाल झाले. हातावर काम करून जगणाऱ्या लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला म्हणून जून महिन्यात अनलॉक जाहीर करण्यात आले. हळूहळू आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येतांना दिसू लागली मात्र कोरोना बाधितांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढणे काही थांबले नाही. हजारोच्या संख्येने रुग्ण वाढू लागली ही चिंतेची बाब आहे. म्हणून लॉकडाऊन उठवल्यानंतर प्रत्येकाचे जगणे समजदारपूर्वक असणे गरजेचे आहे. जे की सध्या दिसत नाही. आजमितीला भारतात साडे पाच लाख नागरिक कोरोना रोगाने बाधित झाले आहेत तर महाराष्ट्रात जवळपास दीड लाखच्यावर रुग्णसंख्या झालेली आहे. दरदिवशी जवळपास पाच हजाराच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत. म्हणून प्रत्येक नागरिकांनी कोरोना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, यावर विचार करणे आवश्यक आहे.
अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. आपल्या कामाचे महत्व आपणच जाणून घ्यावे लागेल. बिनकामाचे बाहेर फिरणे शक्यतो टाळलेच पाहिजे. बाहेर जाणे गरजेचे असेल तर तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये याची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत ज्याठिकाणी आपण जात आहोत त्याठिकाणी शारीरिक अंतर ठेवून आपले काम पूर्ण करावे. कोणालाही हस्तांदोलन करणे टाळावे. दुरूनच नमस्कार करावा. सॅनिटायझरचा वापर करावा ज्यामुळे हातावर कोणतेही किटाणू राहणार नाहीत. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावे. त्याचसोबत होईल तेवढे गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये. लग्न किंवा इतर कौटुंबिक प्रसंगात जाणे टाळावे. आजपर्यंत जे काही संसर्ग वाढले यात या सोहळ्याचा मोठा वाटा दिसून येत आहे. या सर्व बाबीची काळजी स्वतः घेऊन वागलो तर आपल्या सोबत इतरांचा जीव देखील आपण वाचवू शकतो. त्याचसोबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मन नेहमी सकारात्मक दिशेने विचार करण्यात गुंतवून ठेवावे. रोज सकाळी हलकासा व्यायाम आणि मेडिटेशन केल्याने मन प्रसन्न असते. पालकांनी मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय अशी भीती मनात न बाळगता शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा अट्टाहास करू नये. कोरोना आटोक्यात येण्यापूर्वी शाळा व महाविद्यालये सुरू झाली तर खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या परिस्थितीत विचार केल्यास जोपर्यंत लस किंवा औषध मिळणार नाही तोपर्यंत आपली मुले शाळा व महाविद्यालयात पाठविणे म्हणजे मुलांना संकटाच्या खाईत ओढल्यासारखे होईल. एखाद्या वर्षाने विद्यार्थ्यांचे काही जास्त प्रमाणात नुकसान होणार नाही, त्यामुळे मनात कसलाही किंतु परंतु भावना आणू नये. आज ना उद्या हे संकट टळेल असा विश्वास मनात निर्माण करून आपले रोजचे जीवन जगत राहिले पाहिजे. लॉकडाऊन नंतर आपण जरासे दुर्लक्ष करून वागलो तर त्याची शिक्षा आपल्यासह अनेकांना भोगावे लागेल एवढं मात्र खरे आहे.
- नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment