Sunday, 6 October 2019

दसरा सण मोठा

*दसरा सण मोठा*

दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.
दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशित केली जातात.
ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की 
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी ! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी ? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा ! ” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला, मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं.
रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक सुंदर दिवसाचा सण म्हणजे दसरा. या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला दहन केले जाते. एक प्रतिकात्मक क्रिया होय, ज्यातून संदेश दिला जातो की, आपल्या मनातील वाईट प्रवृत्तीला जाळून टाका किंवा नष्ट करा. ग्रामीण भागात ह्या दिवशी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी ढोल ताशे वाजवत गावाच्या सीमेवर जाऊन त्याठिकाणी शमीच्या झाडाचे पूजन करतात. त्याच ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. गावात येऊन प्रत्येक देवतेला ते लुटलेले सोने अर्पण केले जाते मग स्वतःच्या घरी आल्यावर घरात त्यांचे कुंकू लावून स्वागत केले जाते आणि घरातल्या देवाला ते सोने अर्पण केले जाते. एकमेकांना प्रेम वाटण्याची एक सुंदर कल्पना या दसरा सणाच्या माध्यमातून दिला आहे. काही लोकं आपल्या पूर्वजांना आठवण करीत दसरा सणाच्या अगोदर मानाई नावाचा सण करतात. ज्यात वाड वडिलांना नवे कपडे चढविले जातात तर दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांना नवे कपडे दिले जातात. एकूणच कुटुंबात सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे वातावरण तयार करण्यासाठी हा सण येतो. म्हणून म्हणावेसे वाटते.

दसरा सण मोठा
नाही आनंदाला तोटा
आला आला दसरा
आता दुःख सारे विसरा

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...