Monday, 12 March 2018

गुढीपाडवा

विकारी विचारांवर विजयाचा दिवस

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात. या मुहूर्तावर चालू केलेल्या व्यवसायात, भागीदारीत किंवा गुंतवणुकीत चांगली भरभराटी मिळते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून झाली. याबाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलांने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर मंतरलेले पाणी शिंपडून त्यांना सजीव केले. त्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला. या विजयश्रीपासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली. वास्तविक पहाता ही कथा लाक्षणिक अर्थाने सांगितले जाते. शालिवाहन राजाच्या काळातील लोक हे पूर्णतः पौरुषहीन व पराक्रमहीन बनले होते, आळशी बनले होते, शत्रूचा हल्ला परतवून लावू शकत नव्हते, त्यांना हरवु शकत नव्हते. परंतु शालिवाहन राजाने त्या चेतनाहीन, पौरुषहीन,पराक्रमहीन व आळशी अर्थातच दगड व मातीचा बनलेल्या लोकांत चैतन्य प्रकट केले. त्यांच्यात आत्मविश्‍वास व पराक्रमीपणा जागृत केले आणि शत्रूला पराभूत केले. तेव्हापासून शालिवाहन शक गणना करण्यास प्रारंभ करण्यात आली ते म्हणजे आजचा दिवस होय.
आज सुद्धा आपल्या लोकांची अवस्था शालिवाहनच्या राज्यासारखीच आहे. देशात आज बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. त्यामानाने त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचे पाय वाममार्गाकडे वळून तो व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांच्या हातून देशाची उभारणी होण्याऐवजी देश रसातळाला जात आहे. युवकांमध्ये नवीन जग निर्माण करण्याची शक्ती आहे याची जाणीव करून द्यायला पाहिजे,  त्यांचा आत्मविश्‍वास व पौरुषत्व जागी केल्यास प्रगतशील भारताचे चित्र नक्कीच पाहायला मिळेल. बजरंगबलीच्या अंगात सात समुद्र पार करण्याची शक्ती होती. परंतु त्यांच्यात आत्मविश्‍वास नव्हता म्हणून सागराकडे तोंड करून निराश होऊन बसला होता. परंतु जांबुवंतांनी त्या बजरंगबलीच्या शक्तीवर विश्वास होता म्हणून त्यांनी त्यांच्यातील आत्मविश्वास जागे केल्यानंतर पुढे बजरंगबलीने सातासमुद्रापार जाऊन सीतेचा शोध तर घेतलाच शिवाय संपूर्ण लंकेला आग लावून परत सुद्धा आला. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध प्रारंभ होण्याच्या काही क्षणापूर्वी युद्धाचा त्याग करणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मार्गदर्शन केले. अर्जुनाच्या आतील आत्मविश्वास, पौरुषत्व, पराक्रमीपणा जागा झाला आणि त्यांच्या हातून अधर्माचा नाश झाला. तसा चैतन्य आत्मविश्वास आज प्रत्येकात जागे करायचे आहे. प्रत्येकाच्या आत एक सुप्तशक्ती लपलेली असते, ते जागे करायचे आहे. त्यासाठी कधी शालिवाहन, कधी जांबूवंत तर कधी श्रीकृष्णाची भूमिका प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
या गुढीपाडव्याच्या संदर्भात रामायणातील एक कथा सांगितली जाते, दक्षिणेकडील प्रजेला वाली नावाचा वानर त्रास द्यायचा. त्याचा बंधू अंगद, त्यांना सुद्धा त्याचा त्रास होत होता. त्याच्या त्रासाला संपूर्ण जनता कंटाळली होती. सीतेच्या शोधार्थ रवाना झालेले भगवान श्रीराम तेथे गेले. त्यांने भगवान श्रीरामाला विनंती केली की, त्या दुष्ट वाली वानराचा बंदोबस्त करावा. तेव्हा भगवान श्रीरामाने जुलमी व असुरी वाली वानराचा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ तेथील लोकांनी घरोघरी गुढी उभारून हा आनंदोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. तेव्हापासून आजही घरोघरी जी गुढी उभारली जाते ते विजयाचा संदेश देते. आपल्या घरातून, दारातून, तनामनातून आसुरी संपत्तीचा व विचारांचा नाश करून भोगावर योगाचा,  वैभवावर विभूतीचा आणि विकारावर विचारांचा विजय मिळविणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गुढी उभारल्यासारखे होईल.
आजच्या दिवसाचे शेतकऱ्यांच्या जीवनात देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आजपासून शेतकरी आपल्या नव्या शेती व्यवसायाला प्रारंभ करीत असतो. गतवर्षी झालेल्या जमा-खर्चाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करतो. यावर्षी कोणकोणती पिके घ्यायची ? खरिपात कोणती व रबीमध्ये कोणते पिकं घ्यायची ?  सालगडी ठेवणे, शेती बटाव, तिजई किंवा खंडच्या हिशेबाने देणे या बाबींचा व्यवहार करणे, डोक्यावर असलेले कर्ज देणे, नवीन कर्ज घेणे इत्यादी साऱ्या बाबी आजच्या दिवशी पूर्ण केल्या जातात. अर्थात आजच्या दिवशीच शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने, उत्साहाने आणि उमेदीने कामाला लागतो. दरवर्षी तो आपल्या नशिबासोबत जुगार खेळत असतो. निराश किंवा हताश न होता पुन्हा एकदा आजच्या दिवशी शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा संकल्प करतो. शेतकरी आपल्या घरी गुढी उभारून त्याला साखरेचे व खोबऱ्याचे गाठी टाकतात. ज्याप्रकारे शाळेत झेंडावंदनाच्या दिवशी सकाळी ध्वज फडकाविला जातो आणि सायंकाळी सूर्य मावळताना ध्वज उतरवून घेतल्या जाते, अगदी त्याच पद्धतीने या दिवशी घरोघरी प्रत्येकजण आपल्या दारासमोर, अंगणात किंवा घरावर सकाळी गुढी उभारतात व सायंकाळी सूर्य मावळतीला काढून ठेवतात.
मराठवाड्यातील सीमावर्ती भागात आजच्या दिवशी नवीन आंबा, नवीन चिंच, नवीन खोबरा आणि कडुनिंबाचे फुल याचे मिश्रण तयार करून त्याचे रसपान तयार करतात. त्यास या भागात " पचडा "असे म्हटले जाते.  त्याच्या सेवनाने मनुष्यास शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य लाभते असे पूर्वज सांगतात. लिंबू कडू आहे पण त्याच्या सेवनाने आपण निरोगी राहतो. यातून लाक्षणिक अर्थ एक असाही निघतो की, कित्येक विचार आचरणात आणताना प्रथमतः खूप कष्ट सोसावे लागतात, एवढेच नाही तर नकोसे म्हणजे कटू सुद्धा वाटतात. परंतु तेच विचार आपले जीवन सुंदर बनवितात. याचाच अर्थ जीवनात प्रगतीपथावर जायचे असेल तर काहीवेळा कडू घोट प्यावे लागतात याची सूचना त्यानिमित्ताने मिळते सर्व ते हसत मुखाने स्वीकार करण्यात खरे जीवन आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
nagorao26@gmail.com

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...