Friday, 16 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 19


तोडणे सोपे पण जोडणे अवघड

मुलांनो, आपणाला माहीतच आहे की, एखाद्या झाडाचे पान, फुल किंवा फळ एका झटक्यासरशी तोडून वेगळे करतो. परंतु तेच तोडलेले पान, फुल किंवा फळ  झाडाला परत जोडता येते का ?  नाही. आपले जीवनसुध्दा तसेच नाही काय ? परमेश्वराने आपणाला जे आयुष्य दिले त्या आयुष्यात, बालपण, तरूणपण आणि म्हातारपण या तीन अवस्थांतून जीवन जगत असतो. मनुष्य समाजाशिवाय जिवंत राहूच शकत नाही. समाजात राहण्यासाठी आपणाला माणसे जोडावी लागतात. ज्या व्यक्ती माणसे जोडण्यात यशस्वी होतात त्यांचे नाव समाजात आदरपूर्वक घेतले जाते. माणसे जोडणे म्हणजे काय ? असा छोटासा प्रश्न मनात निर्माण होणे सहाजिकच आहे. समाजातील सर्वच लोकांना अधिक सहकार्य करणे, संकटकाळात मदतीला धावणे, शेजारी लोकांच्या सुखदुःखांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन कामात हातभार लावणे, समारंभ सण वा उत्सवाच्या वेळी एकमेकांना शुभेच्छा देणे, इतरांच्या गुणांचा गौरव करणे इत्यादी कामे करून आपण माणसे जोडू शकतो. एक काळा ठिपका असलेल्या पांढऱ्या कोऱ्या कागदावर प्रत्येकाला काळा ठिपकाच दिसत असतो आणि पांढर्‍या कोऱ्या कागदाकडे कोणाचेही लक्षच जात नाही. माणसाचा स्वभाव सुद्धा असाच आहे. प्रत्येक व्यक्तीत चांगले व वाईट हे दोन्ही गुण असतात. परंतु आपण चांगल्या गुणांपेक्षा वाईट गुणाकडे जास्त लक्ष ठेवतो. इतरांचे दोष दाखविण्यातच धन्यता मानतो. स्वतःला श्रेष्ठ समजताना इतरांना कनिष्ठ करतो. या अशा वागण्यामुळे आपण माणसे जोडत नसून तोडत असतो याची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. प्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर म्हणतात की, प्रेम सर्वावर करा, विश्वास थोड्यावर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका. या जगात भगवंताशिवाय कोणीच परिपूर्ण नाही. त्यास्तव व्यक्तीमधील दोषाकडे कानाडोळा करून त्यांच्यातील सद्गुण तेवढे विचारात घ्यावेत. आपली दीर्घकालीन असलेली मैत्री एका क्षणात, एका शब्दाने, शुल्लक कृत्यामुळे तोडणे सोपे आहे मात्र नवी मैत्री जमवायला किती काळ लागतो. त्यामुळे बोलताना शंभर वेळा विचार करून बोललेले बरे. जन्माला येताना सोबत काही आणले नाही मेल्यानंतर सुद्धा रिकाम्या हातानेच जावे लागते. पृथ्वीतलावर राहते काय तर आपण जोडलेली माणसे तेवढी शिल्लक राहतात याचे भान असू द्यावे.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...