Wednesday, 25 October 2017

बदल्या - कही खुशी कही गम

*शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या : कही खुशी कही गम*

बदल हा संसाराचा नियम असतो. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा मग पुन्हा पावसाळा हा निसर्ग नियम जर मोडीत निघाले तर पर्यावरण चक्र सुध्दा बिघडते. अर्थातच मानवी जीवनासह पशू पक्षी वेली, वृक्ष यांचे ही जीवन संकटात पडते. त्यामूळे ज्या क्रिया जेव्हा घडायाला पाहिजे त्याच वेळेला घडत राहिले तर सर्व काही योग्य होत राहते. हे बदल आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या. तसे तर एप्रिल आणि मे महिना उजाडला की सर्वत्र कर्मचाऱ्याचा बदलीचा प्रश्न सर्वांच्या मनात चर्चिले जाते. बदल्या होणार की नाही, झाल्या तर किती टक्के होणार, प्रशासकीय होतील काय, कोणत्या नियमानुसार होतील या सारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. जिल्हा परिषद मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतात मात्र सर्वांचे लक्ष शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वात जास्त लागून असते. दरवर्षी एप्रिल महीना उजाडला की शिक्षकाच्या बदल्याच्या चर्चेला प्रारंभ होते आणि मे महीना संपेपर्यंत हे चर्चेचे गु-हाळ चालूच राहते. पण यावर्षी ऑक्टोबर महिना उजाडला तरी शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न अजुन संपला नाही. बदल्याबाबत रोज नवीन काही तरी ऐकून शिक्षक सध्या परेशान होत आहेत. बदली होईल किंवा नाही याबाबत संभ्रम अवस्था आहे.
सन 2013 या वर्षापासून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्याची बदली करणे हा काही जणांना क्लेशदायक वाटत असते तर काही जनांना आनंद देणारी वाटते. जे मूळ गावापासून खूप दूर अंतरावर काम करीत आहेत त्यांना आपल्या गावाकडे परत येण्याचे वेध लागलेले असतात. जे शिक्षक शहरापासून 20 - 25 किमी दूर अंतरावर खेड्यात, वाडी, वस्त्या, पाडी तांड्यावर काम करीत आहेत त्यांना शहरांजवळ किंवा सोईस्कर शाळा मिळावी असे वाटते त्यात त्याचे काही चूक नाही. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी भागात काम करणारे किती वर्ष अजून तेथेच खितपत पडावे ? त्यांना सुध्दा या सोप्या भागात काम करण्याची ओढ लागलेली असते. ही मंडळी दरवर्षी बदली प्रक्रियेची चातक पक्ष्यांसारखे वाट पाहत असतात. 
बदली प्रत्येकाना हवीहवीशी वाटत नाही. जे आज सुखात आहेत त्यांना बदली कधीच होऊ नये असे वाटते. कारण त्यांचे सर्व काही सुखात, मजेत आणि आनंदात चाललेले असते. मात्र जे दुःखात, कष्टात काम करीत आहेत त्यांना बदल्या हे एक सुखाचा आशेचा किरण वाटतो. बदल्या न करता नेमके त्यांच्या आनंदावर विरजन टाकल्या जाते. आदिवासी तालुक्यांत काम करणारा आमचा शिक्षक मित्र गेल्या पाच वर्षापासून मूळ तालुक्यांत बदली मिळविण्यासाठी खूप धडपड केली. पण दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने त्याची बदली काही झाली नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नौकरी केली आणि अचानक एके दिवशी आमच्या सर्वामधुन निघून गेला, त्याची मूळ तालुक्यात येऊन नौकरी करण्याचे स्वप्नं हे स्वप्नच राहिले. घरापासून दूर नौकरी करीत असलेली मंडळी कौटुंबिक सूखापासून वंचित राहतात. त्यांचे मानसिक समाधान नसते. अशी मंडळी शारीरिक बाजूने सुध्दा खचलेली असतात. मग शाळेत परिणामकारक अध्यापन करू शकतील काय ? या शैक्षणिक वर्षातील जून महिन्यापासून ज्याची बदली होते असे समजले त्या सर्व शिक्षक मंडळीचे शाळेवर अजिबात लक्ष नाही. मे महिन्याच्या पूर्ण सुट्टीचा कालावधी याच बदल्याच्या प्रक्रियेत संपला. आत्ता दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ही या बदल्यात संपतो की काय अशी शंका शिक्षकांच्या मनात आहे. एकूणच या बदल्याच्या किचकट प्रक्रियामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरत आहे. एक तर ऑनलाइन प्रक्रिया ही खर्चिक आहे आणि सामान्य शिक्षकांना न उलगडणारी आहे. यामूळे महाराष्ट्र प्रगत करण्याचे स्वप्न खरोखरच पूर्णत्वास जाईल काय ? अशी शंका सुध्दा राहून राहून मनात येत राहते. 
वेगवेगळ्या कारणाने बदल्या रद्द होत आहेत. कधी समायोजन झाले नाही म्हणून बदल्या रद्द होतात तर कधी पदोन्नती झाली नाही म्हणून बदल्या रद्द केल्या जातात. बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. मात्र दरवर्षी या हक्कांवर या ना त्या कारणांमुळे गदा आणली जाते आणि बदल्याची प्रक्रिया रेंगाळते. यावर्षी शिक्षकांच्या बदल्या व्ह्ययल्याच पाहिजे. आज कित्येक शिक्षक मंडळी या बदल्याच्या प्रक्रियेवर आपली पुढील आशा स्वप्नं रंगवून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याना त्यांच्या सोइच्या जागी बदली होणे, त्यांच्या कार्याची गती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. मनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी, शिक्षकामध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या आवश्यक आहेत. या बदल्याचा कर्मचाऱ्यात कही खुशी कही गम असे दिसून येईल यांत शंका नाही. मात्र बदल्या झाल्याच पाहिजे, बदल्या झाल्या तरच महाराष्ट्र पूर्णपणे प्रगत होण्यास मदतच होईल असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...