Saturday, 28 October 2017

परावलंबी जीवन

परावलंबी जीवन

समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परावलंबी जीवनात कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही. व्यक्ती आळशी बनतो, त्याला काही करावे असे मुळीच वाटत नाही. म्हणून स्वावलंबी जीवन जगण्याचा नेहमी प्रयत्न करावा. त्यामुळे मानसिक समाधान तर मिळतेच शिवाय उत्तरोत्तर प्रगती देखील होत राहते. मला हे जमत नाही म्हणून मदतीसाठी कुणाकडे हात पसरणे एक किंवा दोन वेळा ठीक आहे मात्र वारंवार जर आपण त्या बाबतीत मदत घेऊ लागलो तर त्याविषयी आपले काम नेहमीच अडखळून राहते. काही गोष्टी कधी ना कधी शिकावेच लागते तर त्यास मला जमत नाही असे म्हणून मागे सारण्यात अर्थ नाही. उलट ते काम शिकण्याची तयारी ठेवल्यास एक दिवस नक्की त्या कामात यश मिळू शकते. शालेय जीवनात अनेक मुले वर्गातील हुशार मुलांवर अवलंबून असतात. गृहपाठ किंवा स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी वर्गातील हुशार मुलांच्या वह्या वापरले जातात. परीक्षा जवळ येऊ लागले की त्यांचेच नोटस मागितले जातात. त्यामुळे ही मुले स्वयंपूर्ण होऊच शकत नाहीत. अर्थात याच कारणामुळे हुशार मुले सदैव पुढेच असतात तर स्व अभ्यास न करणारी मुले मागेच राहतात. त्यासाठी शालेय जीवनापासून आपण स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न केल्यास आपण चांगली झेप घेऊ शकतो. काही गोष्टी समजून घेण्यासाठी इतरांची मदत आवश्यक असते मात्र ती मदत घेताना त्याच्या अधीन होऊ नये याची काळजी घ्यावी. कुटुंबात मुले जेंव्हा लहान असतात तेंव्हा ती परावलंबी जीवन जगतात. त्यांना कुटुंबातील प्रत्येकजण मदत करीत असतो. कमावते वय झाल्यावर देखील तुम्ही कुटुंबात परावलंबी जीवन जगत असाल तर कोणी तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. ठराविक काळापुरते सर्वजण मदत करतात. मात्र त्यानंतर ऐतखाऊ आहे म्हणून दुर्लक्षित करतात. आपल्या स्वतःचे एक कुटुंब तयार झाल्यावर तर दुसऱ्यांवर विसंबुन राहणे कसे जमेल ? जमणार नाही. कुठे ना कुठे काही ना काही काम करून पैसे कमवावे लागते तेंव्हाच कुठे घर चालते. म्हणून कोणतीही व्यक्ती परावलंबी जीवन दीर्घकाळ जगू शकत नाही. ज्याचे हात, पाय आणि मेंदू नेहमी सक्रीय कार्यरत असते त्याचे जीवन स्वावलंबी तर असेच शिवाय प्रगतीशील राहते. इतरांकडे नोकरी करणे म्हणजे एकप्रकारे परावलंबी जीवन होय कारण याठिकाणी आपल्या मनानुसार जीवन जगता येत नाही. आपणास जेंव्हा सुट्टी हवी असते त्यावेळी सुट्टी मिळत नसेल तर आपल्या या परावलंबी जीवनाचा खुप राग येतो. त्यासाठी स्वतःचे काही उद्योग किंवा रोजगार निर्माण करणारे मंडळी आपले जीवन आनंदात जगू शकतात. प्रसिध्द उद्योजक नेहमी म्हणतात की, कुणाकडे रोजगारासाठी हात पसरण्यापेक्षा दुसऱ्यांच्या हाताला काम देता येईल असे काही तरी काम करावे. हे सर्वाना जमणार नाही पण ज्याना जमते त्यांनी असे प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील सर्व खेडी स्वयंपूर्ण होती म्हणजे स्वदेशी वस्तू वापरुन स्वावलंबी होते. मात्र इंग्रजानी त्यांच्या वस्तू भारतात आणल्या आणि येथील लोक परावलंबी होऊ लागले. पूर्वी कामाच्या मोबदल्यात धान्य दिले जात असे त्यामुळे पैश्याची कुठे गरज पडत नव्हती. मात्र कालांतराने कामाच्या मोबदल्यात पैसा आला तेंव्हापासून प्रत्येक वस्तू विकत मिळू लागली. याच वेळी लोकांच्या परावलंबी जीवनाला सुरुवात झाली. पूर्वी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती तेंव्हा लोक कोसो मैल पायी जात असत. कोणावर अवलंबून राहत नसत. आज त्या उलट आहे दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे स्वतःचे हात-पाय कशाला हलवायचे असे विचार आपण करतो. पूर्वी गावात अनेक विहीरी आणि हातपंप असायचे पाण्यासाठी. आज विहीरी बुजल्या आणि हातपंप बंद पडले. एक बटन मारले की बोअरवेलद्वारे पाणी वर येते. हे आपले तंत्रज्ञानामधील विकास आहे मात्र एक-दोन दिवस काही कारणाने गावात लाईट नसेल तर चूळ भरण्यास ही पाणी मिळत नाही, ही वाईट अवस्था खेड्यात बघायला मिळते. यास कोणते जीवन म्हणाल ? स्वावलंबी की परावलंबी..! आपण एक पाऊल देखील पायी चलण्यासाठी तयार नाही. जवळच्या अंतरावर देखील गाडीचा वापर करतो. प्रत्येक काम करताना आपण दुसऱ्यां कश्यावर तरी अवलंबून असतो म्हणून आपले सर्व काम बिघडत जातात. तेंव्हा आत्ताच सर्वानी आत्मपरीक्षण करून ठरवा की आपले स्वतःचे जीवन स्वावलंबी आहे की परावलंबी.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...