Saturday, 19 November 2016

सुंदरता महत्वाची की गुणवत्ता

*सुंदरता महत्वाची की गुणवत्ता*

शिक्षण आज गरिबासाठी नाही, असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. मुळात गरीब लोकांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण करायचे आहे ते ही खिशातील एक ही रूपया खर्च न करता. मग शासन ही शिक्षणावर तरतूद करायचे तेवढेच एवढे सोडून त्यासाठी वेगळा खर्च कशाला करेल. शिक्षक ही त्यासाठी वेगळा खर्च का करावा म्हणून शाळा जसे असेल तसे त्याचा स्वीकार करून आपले शिकवण्याचे काम करतात. शिक्षक आपल्या पगारातील पैसा आपल्या घराला लावतील शाळेला पैसा लावून त्यांना काय मिळतो ? याचा विचार ते करणारच. एक ना एक दिवस शिक्षकांची बदली होते मग शिक्षक कसा विचार करेल ? स्वतः च्या खिशाला चाट लावून शाळा सुधारणा करावी, शाळेला रंगरंगोटी करायची, शाळा स्वच्छ आणि सुंदर करावे आणि लगेच पुढील वर्षी बदलीचा आदेश येऊन धड़कतो मग आपले बस्तान उचलून दुसऱ्या गावी जावे. पुन्हा त्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करावे. या सर्व बाबीचा विचार करून सरकारी शाळा दिवसेंदिवस घाणीच्या विळख्यात सापडल्यासारखे वाटत आहे. त्यास फक्त सरकार हा एकच वाली आहे. गावात एखादा कार्यक्रम आहे तर घ्या शाळेच्या खोल्या आणि करा कार्यक्रम साजरा. शासनाचा कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आले की सर्वप्रथम दृष्टीस पड़ते ती म्हणजे शाळा. या व अश्या विविध कारणामुळे सरकारी शाळा नेहमी घाण होत राहतात आणि त्याची साफसफाई करण्याचे काम सेवक नसलेल्या शाळाप्रमुख म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक यांना करावे लागते. मैदानाच्या स्वच्छतेपासून तर शौचालयाच्या स्वच्छतेपर्यन्तची कामे एकट्या शिक्षक कम मुख्याध्यापकाना करावे लागते. शाळा कितीही स्वच्छ ठेवावे असे जरी म्हटले तरी स्वच्छ राहुच शकत नाही. सरकारी शाळेतील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर होतात. पगार होताना त्यांना कसलीच अडचण निर्माण होत नाही म्हणून यांची शाळा जरी घाण दिसत असेल तरी यांची स्वतः ची घरे मात्र अगदी पॉश असतात. त्यांना तसा राहण्याचा हक्क आहे मात्र जेव्हा पॉश घरातून घाणीच्या साम्राज्य मध्ये असलेल्या शाळेत त्यांचे जीव कसे रमत असेल हा एक मोठा प्रश्न आहे ? याची सोडवणूक कोण करावी शिक्षक, गावकरी की शासन यात ती शाळा मात्र आपले रूप बदलण्याच्या प्रतिक्षेत वाट पाहत उभी असते.
चित्राची एक बाजू अशी दिसत असेल तर चित्राची दूसरी बाजू सर्वाना आकर्षित करणारी आणि आखिव रेखीव असते.
त्याच राज्यात त्याच गावात दूसरे चित्र पाहिले की शाळेचा हवा वाटावे असे चित्र बघायला मिळते. आकर्षक ईमारत, रंगरंगोटी केलेल्या भिंती हे सर्व पाहून मन हरखून जाते. म्हणूनच प्रत्येक पालक या बाहेरून सुंदर दिसनाऱ्या शाळेकडे आकर्षित होतात. मात्र या शाळेची तुलना सरकारी शाळेसोबत करता येत नाही. त्याला कारणे भरपूर आहेत, जसे की, ही ईमारत म्हणजे स्वतः ची खाजगी मालमत्ता असते. त्यास मालक त्याच्या मनाला वाटेल तसे आकर्षक करू शकतो. आज शिक्षण हे एक व्यावसायिक रूप घेतले आहे आणि स्पर्धेत टिकून राहयचे असेल तर परिस्थिती पाहून काम करावेच लागते. नेमका हाच फरक सरकारी शाळेला लागू पडतो. सध्या लोक दुकान उघडल्यासारखे शाळा उघडत आहेत आणि दुकानदार जैसे गिरहाइक लोकांना आकर्षित करण्यासाठी रोशनाई करतो तसे रोशनाई करून पालकाना आकर्षित करत आहेत. मात्र यांना  शिकविणारे शिक्षक कोणत्या दर्जाचे आणि पातळीचे असतात याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की अध्यापन करण्याची पदवी किंवा पदविका नसणारे म्हणजे दहावी - बारावी पास-नापास मंडळी शिकविण्याचे काम करतात. यात त्या शाळा प्रमुखाची खूपच अक्कल हुशारी असते. ते म्हणजे ही मंडळी कमी पैशात उपलब्ध होतात त्यासाठी पात्र शिक्षक कशाला लागतात ? पहिलीच्या पोराला शिकवायला किती ज्ञान लागते ? असा विचार केल्या जातो म्हणून त्यांना कोणताही शिक्षक चालतो तो ही मजूरी प्रमाणे.  बेरोजगारने होरपळून निघलेले तरुण मिळालेल्या मानधन वर काम करण्यास तयार होतात. कारण त्यांना काम हवे असते. कामाच्या शोधात असलेल्या अनेक युवकांना ही मंडळी आयते वापरून घेतात. तंत्रशुद्ध पध्दतीने यांना शिकविता येईल काय ? याची खात्री नसते. शाळा प्रमुखाची मात्र या शाळेत उत्तरोत्तर प्रगती होते कारण मुले भरपूर पैसा देऊन शिक्षण घेतात त्याबदल्यात येथील शिक्षकांना तूटपुंजी पगार दिल्या जातो आणि त्यामुळे येथील शिक्षक जो झोपडीत होता तो आपल्या झोपडीतच राहतो. त्याची आर्थिक प्रगती काही होत नाही. कधी कधी तर घरची भाकर खाऊन त्यांची शाळा सांभाळण्याची वेळ सुध्दा येते हे सत्य नाकारुन चालणार नाही. शाळेला मिळत चाललेल्या यशात येथील शिक्षक मंडळीचा सिंहाचा वाटा असतो मात्र त्याचे फळ त्याला कधीच मिळत नाही हे ही खास आहे. येथील शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून काम करतो, शाळेला यशाच्या उच्च शिखरावर नेतो पण त्यांच्या पदरात काही पडत नाही, याची नेहमीच खंत त्यांच्या मनाला लागून राहते. ते बोलून दाखवू शकत नाही. कारण आजकाल शाळाप्रमुखाच्या विरोधात काही बोलले तर अंतर्गत त्रास दिला जातो किंवा लगेच बाहेरचा रस्ता दाखविले जाते. सरकारी व खाजगी शाळेचे चित्र जरी असे विसंगत दिसत असले तरी खाजगी शाळा बाहरसे सुंदर बदबू पूरा अंदर असण्याची शक्यता नकारता येत नाही आणि याउलट सर्वत्र घाण दिसनाऱ्या सरकारी शाळेतून सुध्दा चांगले विद्यार्थी घडू शकतात. जसे चिखलात कमळ उगवावे तसे एखादे कमळ येथे उगवते आणि त्याचा झगमगाट सर्वत्र पसरतो. म्हणून शाळेच्या बाह्य भागावरुन त्याचे गणित न मांडता खरोखर शाळेत किती चांगले शिकविले जाते आणि मुलांना किती चांगल्या प्रकारे संस्कार टाकल्या जातात ? या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 
   09423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...