Friday, 18 November 2016

पैसा झाला खोटा

नोटावर बंदी ; बाजारात मंदी

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा हे लहानपणी गुणगुण करायचे गाणे आज सत्यात दिसून येत आहे. कारण यावर्षी पाऊस ही मोठा झाला आणि पैसा खोटा पण झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून इतिहास त्यांची आठवण करेल असे कार्य जरूर केले आहे. सध्या बाजारात पाचशे आणि हजाराच्या नकली नोटा भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचा वापर अतिरेकी, दहशतवादी मंडळी करीत असल्याचा तर्क लावण्यात येतो. त्याचसोबत काही श्रीमंत मंडळीकडे हा पैसा कपाटात बंद अवस्थेत असल्याची शक्यता सुद्धा धरण्यात आली, कदाचित ते सत्य ही असेल. रुपयाची घसरत चाललेली किंमत, वाढत चाललेला चलन फुगवटा आणि वाढीस लागलेले त्याचे गैरप्रकार त्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. या सर्व बाबी वर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधानानी उचललेले हे पाऊल कठोर आहे पण देशाला निश्चित अशी दिशा देणारी ठरेल की नाही हे येणारा काळ ठरवेल. आत्ताच त्याविषयी काही भविष्य वर्तवणे योग्य ठरणार नाही. 
ह्या निर्णयामुळे मात्र ज्यांच्या जवळ गडगंज संपत्ती आहे त्यांच्या कपाळावर आठ्या दिसत आहेत. पैसेवाल्यांची सर्व बाजूनी कोंडी झाल्यासारखे वाटत आहे. बाप दाखव नाही तर श्राध्द कर अशी स्थिती या लोकांची झाली. गोरगरीब लोकाजवळ पैसाच नाही तर कशाची काळजी लागली, पण पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे सर्वांची गोची मात्र झाली. रात्रीच्या वेळी घोषणा झाली त्यावेळी सर्व लोक निद्रिस्त अवस्थेत म्हणजे जागे नव्हते. ज्यांच्या जवळ शंभर, पन्नास, वीस आणि दहा च्या नोटा होत्या, त्यांचा व्यवहार सुरळीत चालत होते किंवा चालले. पण ज्यांच्याकडे फक्त पाचशे आणि हजाराच्या नोटा होत्या त्यांची विविध ठिकाणी पंचायत झाल्याचे दिसून येत आहे.
श्रीमंत लोकांना नोटा बदलायांची काळजी लागली तर सामान्य लोकांना व्यवहार करण्याची. सर्वसाधारणपणे लोकाकडे व्यवहारासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा होते. प्रत्येक जण सांभाळण्यासाठी सोपे म्हणून या नोटा ठेवत होते. त्याचा फटका मात्र सामान्य लोकांना बसला. नोटा बंद करताना लोकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी सरकारने घ्यायला हवी होती, ती घेतली नाही असे प्रथमदर्शनी वाटते. पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वापरत होत्या. त्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे ठप्प दिसत होते. कुठेही जा चिल्लर पैशाच्या समस्या जाणवत होते. बाजारात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होते. आज ना उद्या बाजार सुरळीत होईल असे म्हणता म्हणता दहा-पंधरा दिवसाच्या कालावधी संपला तरी ही बाजार सुरळीत झाला नाही. आज ही लोकांना पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याचे झळ पोहोचत आहे. नोटावार बंदी झाल्यापासून बाजारात मंदी आल्याचे व्यापारी वर्गातुन बोलले जात आहे, आणि ते सत्य आहे.
दोन हजार नोटाची समस्या -
पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करून सरकारने दोन हजाराची नोट बाजारात आणली मात्र त्यामुळे लोंकाची अवस्था अजुन बिकट झाली. बाजारात अगोदरच शंभर आणि पन्नासच्या नोटा कमी त्यात ही दोन हजार ची नोट म्हणजे असून अडचन नसून खोलंबा अशी स्थिती झाली. गरज नसताना रूपयांची भरती करण्यासाठी काही वस्तू लोकांना विकत घ्यावे लागले. काही ठिकाणी लोकांना अरेरावीपणाचा ही अनुभव घ्यावा लागला. सरकारने ज्या ठिकाणी ह्या बंद नोटा चालतील असे सूचविले ती मंडळी देखील नोटा घेण्यास नकार देत असल्यामुळे संकटात अजुन भर पडली.  सर्वच जण आपल्या जवळ असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे पूर्ण गोंधळ उडाला, या बदल झालेल्या नोटामुळे एक बँक कर्मचाऱ्यासह संपूर्ण भारतात 23 लोकांचा बळी गेले आहेत, असे वृत्त वाचण्यात आले. ज्यामुळे त्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे यात शंकाच नाही.
आपल्या सरकारची ओळख दीर्घकाळ असावी म्हणून दोन हजाराची नोट चलनात आणली की काय असे ही वाटते. कारण या दोन हजाराच्या नोटावार स्वच्छ भारतचा संदेश लिहिण्यात आला आहे. वास्तविक पाहता चलनावर असे संदेश लिहिणे संयुक्तिक आहे का ? याचा ही कुठे तरी विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.
ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. नुकतेच एका वधुपिता असलेल्यां सेवानिवृत्त शिक्षकाचा नोटाच्या रांगेत उभे राहिल्याने मृत्यू झाला असल्याची बातमी खुप वेदना देऊन गेली.  तसेच ज्याचे कुणी जवळचे नातेवाईक किंवा घरातील मंडळी दवाखाण्यात आजारी आहेत त्यांचे हालबेहाल होत आहेत. अशाची समस्या सुटली तर लोकांना हायसे वाटत होते. जे कुणी सुट्टीचा काळ एन्जॉय करण्यासाठी परगावी गेले होते त्यांना ही फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे. एवढ्या समस्याना तोंड दिल्यानंतर लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विषयी अनुकूल मत आहेत की प्रतिकूल हे येणारा काळ ठरवेल. मात्र गेल्या चाळीस वर्षात न केलेले काम हे सरकार करीत असल्याची भावना लोकामध्ये दिसत आहे. निदान शासनाने सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास जनतेला भविष्यात अजून चांगले दिवस नक्की बघायला मिळेल असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...