Monday, 27 June 2016



*पालकसभा : स्‍तुत्‍य उपक्रम*

शिक्षण विकासाच्‍या प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्‍यासोबत पालक हा ही घटक अत्‍यंत महत्‍वाचा आहे.  विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक विकासात पालकांचे स्‍थान विशेष आहे.  पालकाच्‍या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटूंबिक या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगतीवर दिसून येतो. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागातील पालकांचा अभ्‍यास केल्‍यास एक बाब प्रकर्षाने दिसून येते. ते म्‍हणजे शहरी भागातील पालक विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणाबद्दल अधिक जागरूक असतात. त्‍या मानाने ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्‍यांकडे लक्ष देत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना विद्यार्थ्‍यांची प्रगती कधीच कळत नाही. ग्रामीण भागात जागरूक झालेले पालक गावातील शाळा सोडून शहरांतील मोठ्या खाजगी शाळेकडे किंवा इंग्रजी शाळेकडे वळत आहेत. त्‍यामूळे गावातील सरकारी शाळेत फक्‍त गरिबांची मुलेच शिक्षण घेत असल्‍याचे चित्र सध्‍या सर्वत्र दिसून येत आहे. आपल्‍या पाल्‍यांना खाजगी किंवा इंग्रजी शाळेत प्रवेश देतांना खिशाला कितीही चाट सहन करतात आणि सरकारी शाळेत प्रवेश दिलेल्‍या आपल्‍या मुलांवर हीच मंडळी एक रूपाया सुद्धा खर्च करीत नाहीत ही वस्‍तूस्थिती नाकारून चालणार नाही.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍ता सुधारावी यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्‍ता विकास अभियान गेल्यावर्षी प्रारंभ केले होते. समाजातून आणि पालकामधून या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाल्यामुले यावर्षी हे अभियान जशास तसे दुस-या टप्‍यात नुकतेच सुरू करण्यात आले. या अभियानातील अनेक उपक्रमांपैकी महत्‍वाचा उपक्रम म्‍हणजे पालकसभा.
शाळेतील विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍तेची सद्यस्थिती काय आहे?  या बाबत पालकांना जाणीव देऊन त्‍यांचे लक्ष विद्यार्थ्‍यांकडे असावे या दृष्‍टीकोनातुन याची निर्मीती करण्‍यात आली असावी असे प्रथम दर्शनी वाटते. खाजगी किंवा इंग्रजी शाळेतच फक्‍त अशा पालकसभा होतात असे नाही तर सरकारी शाळेतून सुद्धा प्रत्‍येक महिन्‍याच्‍या शेवटच्‍या शनिवारी प्रत्‍येक जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत पालक सभेचे आयोजन केले जाते. शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासन यांच्‍या बाबतीत पालकांमध्‍ये जाणीव जागृती तयार केली जाते. त्‍यामुळे शाळेला गावाचा आधार मिळू शकतो. याच माध्‍यमातून शाळा विविध लोकांच्‍या मदतीने समृद्ध बनविता येऊ शकते.
या पालकसभे मध्ये अभियानात समाविष्‍ट असलेल्‍या लक्षवेधी नमस्‍कार, टि.व्‍ही. न पहाणे, गुणवत्‍ता विकास चाचणी आणि अभ्‍यासक्रमांचे नियोजन या कार्यक्रमासंबंधी पालकांसोबत शिक्षकांचे संवाद होणे अपेक्षित धरले आहे.

* लक्षवेधी नमस्‍कार – भारतीय संस्‍क्‍ृतीत नमस्‍काराला अनन्‍य साधारण असे महत्‍व आहे.  घरात एखादा पाहुणा आला किंवा रस्‍त्‍यावर कोणी ओळखीचा व्‍यक्‍ती भेटला असता त्‍यांना आपण नकळत पणे नमस्‍कार करतो.  एखाद्या वेळी अनावधानाने नमस्‍कार करायचे राहून गेले तर त्‍यांच्‍या मनात आपल्‍या विषयी वाईट मत तयार होतात.  नमस्‍कार करण्‍याचे दोघांना पण आत्मिक समाधान मिळते.  शत्रुला सुद्धा प्रेमाने जिंकता येते असे जे म्‍हटले जाते ते या ठिकाणी लागु पडते.  शत्रुला वैरभाव विसरून आपण नमस्‍कार घातल्‍यास तो सुद्धा आपणाला नमस्‍कार करणार हे नक्‍की.  म्‍हणजेच वैरभाव संपून त्‍या ठिकाणी प्रेम निर्माण होते.  नमस्‍कार करण्‍याचे संस्‍कार मुलांना शालेय जीवनांपासून लागावी यासाठी लक्षवेधी नमस्‍कार उपक्रम प्रत्‍येक सरकारी शाळेत गेल्‍या दोन वर्षापासून राबविले जात आहे.  घरातुन शाळेला जाताना आपल्‍या आई-वडीलांना नमस्‍कार घालण्‍याची विसरून गेलेली संस्‍कृती पुन्‍हा सुरू करण्‍यात आली.  रस्‍त्‍याने येणा-या जाणा-या गावक-यांना नमस्‍कार केल्‍याने त्‍यांचे आशिर्वाद विद्यार्थ्‍यांना मिळत आहे.  शाळेतील शिक्षक व इतर मोठ्या व्‍यक्‍तींना नमस्‍कार करतांना विद्यार्थ्‍यांना वेगळाच आनंद मिळतो, विद्यार्थ्‍यांमध्‍ये सौजन्‍यशिलता आणि विनयशिलता निर्माण करण्‍याचे काम लक्षवेधी नमस्‍कार द्वारे केले जात आहे.  म्‍हणूनच याची माहिती पालकांना होणे अगत्‍याचे आहे.  पालकांनी आपल्‍या मुलांकडे विशेष लक्ष दिल्‍यास या उपक्रमाचे फलीत नक्‍कीच बघायला मिळेल यात शंकाच नाही.

* टि.व्‍ही. न पाहणे –
आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या टी.व्‍ही. ने वेड लावले आहे.  घरात टी.व्‍ही. नाही असे एक ही घर शोधून ही सापडणार नाही. आज प्रत्‍येकाच्‍या घरात कोप-यातील जागा टी.व्‍ही.ने बळकाविले आहे. सध्‍या कृष्‍णधवल संपून रंगीत टी.व्‍ही. चा जमाना असल्‍यामूळे घरांतील प्रत्‍येक आई, बाबा, बहिण, भाऊ सर्वच जण टी.व्‍ही. चे चाहते झाले आहेत. सायंकाळच्या वेळी जर घरात टी.व्‍ही. चालू नसेल तर काही तरी हरवल्‍यासारखे वाटते.  मात्र या टी.व्‍ही. पाहण्‍याचा फटका घरातील लहान मुलांना होत असतो. त्‍यांच्‍या अभ्‍यासाची वेळ सायंकाळी ०७ ते ०९ या वेळात असते आणि नेमके त्‍याच वेळी अत्‍यंत महत्‍वाचे सिरियल किंवा मालिका चालू असतात. त्‍याचा विपरीत परिणाम शाळेमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांवर होतो याचा मात्र बरेच पालक विचारच करीत नाहीत. या टी. व्‍ही. पाहण्‍याच्‍या वेडामूळे दिवसेंदिवस मुलांची गुणवत्‍ता कमी कमी होत चालले आहे. एका जागी बसून मुले लठ्ठ होत आहेत असे ही काही ठिकाणी बघायला मिळत आहे. विचार करण्‍याची शक्‍ती कमी कमी होत चालली आहे. या सर्व बाबींचा विचार करून पालकांनी सायंकाळी सात ते नऊ या वेळांत टी.व्‍ही.बंद ठेवावा आणि मुलांच्‍या अभ्‍यासाला प्रोत्‍साहन द्यावे, ही बाब पालक सभेतून सर्व पालकांना समजावून सांगण्‍याचा हेतू आहे, जो की खूपच चांगला आहे.  वास्‍तविक पाहता सायंकाळी सात ते नऊ याच वेळात नाही तर शाळा सुरू असतांना टी.व्‍ही. रिचार्जच केल्‍या जाऊ नये आणि सुट्याच्‍या काळात फक्‍त  टी.व्‍ही. पाहणे केल्‍यास अजून उत्‍तम राहील.  यासाठी पालक वर्गांनी आपल्‍या मनावर ताबा ठेवायला हवा.

* गुणवत्‍ता विकास चाचणी –
पंधरवड्यात शिकलेल्‍या भागावर आधारित इयत्‍ता दुसरी ते आठवी वर्गातील सर्वच विषयांना स्‍पर्श करणारी गुणवत्‍ता विकास चाचणी म्‍हणजे मुलांच्‍या गुणवत्‍तेची चाचपणी होय. अशा पद्धतीने एका महिन्‍यात दोन चाचण्‍या घेऊन त्‍याची योग्‍य तपासणी केल्‍यानंतर पालकांना हे विद्यार्थ्‍यांच्‍या उत्‍तरपत्रिका या पालकसभेतून त्‍यांच्‍या निदर्शनास आणावयाचे आहे.  अभ्‍यासात पुढे असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांचा सर्वांसमोर यथोचित सत्‍कार करून अभ्‍यासात मागे असलेल्‍या किंवा अप्रगत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांना याद्वारे प्रोत्‍साहित करायचे आहे. फक्‍त खाजगी किंवा इंग्रजी शाळेतूनच अशा चाचणीचे आयोजन होत नसून सरकारी शाळेत सुद्धा होतात याची जाणिव पालकांना या निमित्‍ताने करून द्यायचे आहे.  सरकारी शाळांबाबत समाजातील लोकांचा दृष्‍टीकोन बदलला जावा आणि या शाळांना परत अच्‍छे दिन यावे यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेचा पालक-सभा हा एक स्‍तुत्‍य उपक्रम भविष्‍यात नक्‍कीच नवी दिशा मिळवेल यात शंका नाही

नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद
९४२३६२५७६९

1 comment:

  1. हरीश बुटले27 June 2016 at 19:15

    नासा स्तुत्य उपक्रम.
    या पालकसभांमधून पालकांसाठी असलेले आपलं
    तुम्ही आम्ही पालक मासिक एक मध्यम म्हणूं काम करू शकेल का ? याचा विचार करावा

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...