Monday, 30 December 2024

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 )

मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता जाता त्यांच्या संस्कृतीमधील काही गोष्टी भारतात सोडून गेले. एक जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम हा पाश्चिमात्य पद्धतीचा असल्यामुळे बहुतांश जण यास विरोध दर्शवितात, ते खरेही आहे. कारण भारतातील हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होतो. त्यास आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच दिवसापासून ते आपल्या शेतातील जमा-खर्चाचा हिशोब मांडतात. व्यापारी मंडळी आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून त्यानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला आपल्या नवीन व्यवहाराला सुरुवात करतात. दिवाळीच्या पाडव्याला व्यापारी नववर्ष मानतात. शासन किंवा सरकारी कार्यालयात आर्थिक लेखाजोखा व्यवस्थित राहण्यासाठी एक एप्रिल हा दिवस त्यांच्यासाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात असते. बालगोपाळांची शाळा जून महिन्यात प्रारंभ होतो. या महिन्यात नव्या वर्गात, नव्या मित्रांसोबत आणि नव्या करकरीत पुस्तकांच्या भेटीसाठी उत्सुक असतो. त्यास्तव आपल्यासाठी जून महिना हा नववर्षाचा भासतो. असो, आपण सुद्धा या सर्वांसोबत नवीन वर्ष साजरा करीत असतो. नवीन वर्ष साजरा करताना केशव नाईक यांचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे, जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. तेव्हा आपणा सर्वांचे जीवन सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे सुंदर घडत जावो, परमेश्वर चांगली विचार करणारी बुद्धी आणि उत्तम पाहण्याची दृष्टी प्रदान करो हिच या नववर्षानिमित्त शुभेच्छा.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~

खालील लेख देखील जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया whatsapp द्वारे द्यायला विसरू नका.

हर कॅलेंडर कुछ कहता है ।


 31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले  कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते. त्यानुसार त्याचा वापर करायला हवे. कॅलेंडरवर लिहिण्यासाठी थोडी फार तरी जागा राहते. तेंव्हा त्या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यात किंवा एखाद्या महिन्यात काही विशेष घटना घडली असेल तर त्यावर नमूद करून ठेवावे. अगदी सहजपणे ते डोळ्याला दिसत राहते. अश्या नोंदी आपल्या कॅलेंडर वर केल्यास वर्ष संपल्यावर ते फेकावे वाटत नाही तेंव्हा त्याच्या बाजूला नवीन वर्षाचे कॅलेंडर ठेवावे म्हणजे दोन्ही कॅलेंडरवर लक्ष जाते आणि गेल्यावर्षी या तारखेला काय घडले याची भूतकाळातील आठवण होते. त्यानिमित्ताने परत एकदा साऱ्या बाबी आठवणीमध्ये येतात. अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणीचे वाढदिवस या कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्यास त्या त्या तारखेला आठवण करून शुभेच्छा देता येतील. कधी कधी वाढदिवसाची आगाऊ तारीख लक्षात राहिल्याने नियोजन देखील करता येईल. विम्याचा हप्ता किंवा आर डी चा हप्ता भरण्याची तारीख नोंद करून घेतल्यास आपण विसरणार नाही. आज काल लेट फी मध्ये खूप मोठी रक्कम भरावी लागते. कॅलेंडरवर नोंद करून ठेवल्यास लेट फी टाळता येऊ शकेल. काही महत्वाचे फोन क्रमांक या कॅलेंडरवर लिहिले तर शोधण्याची गरज राहत नाही. घरात रोज मिळणाऱ्या वरव्याच्या दुधाचे किती पैसे झाले याची माहिती या कॅलेंडरवरूनच मिळते, हे तर आपल्या घरातील गृहिणीमुळे आपणा सर्वाना ज्ञात आहेच. 1990 च्या दशकात क्रिकेटच्या विश्वकपचे घराघरात वारे वाहत होते. त्यावेळी क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक कॅलेंडरवर लिहिलेले बऱ्याच जाणाला आज ही आठवत असेल.  कॅलेंडरचे असे विविध उपयोग आपणास घेता येऊ शकते. शालेय मुलांनी देखील आपल्या अभ्यासाचे नियोजन व परीक्षेचे वेळापत्रक लिहून ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. बाजारात अनेक प्रकारचे कॅलेंडर विकत मिळतात. आजकाल विविध प्रकारच्या कंपन्या आणि बँकेकडून देखील कॅलेंडरअगदी मोफत वितरित केल्या जाते. काही समाजातील मंडळी आपापल्या समाजाची कॅलेंडर काढून वाटप करतात. जेवढं काही वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहेत ते देखील आपले कॅलेंडर काढतात आणि वाचकापर्यंत पोहोचकरतात. घरात असे तीन-चार प्रकारचे कॅलेंडर जमा झाले तरी घरातील गृहिणीचे मन कालनिर्णय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तिची इच्छा असते की, " भिंतीवरी कालनिर्णय असावे. " बरेचजण डायरी वापरत नाहीत पण घरातील कॅलेंडरचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक घरातील कॅलेंडर काही ना काही सांगत असते, असे सांगावेसे वाटते. हर कॅलेंडर कुछ कहता है । चला पुन्हा भेटू या काही नव्या विचारासह. 

आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा .....!


- नासा येवतीकर, स्तंभलेखक

मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...