Wednesday, 9 October 2024

ललाटरेषा पुस्तक परिचय ( Lalatresha book review )

ललाटरेषा : महाकादंबरीची बीजे !
    शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर म्हणून सर्वदूर परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ना.सा. येवतीकर! नुकताच त्यांचा 'ललाटरेषा' हा कथासंग्रह वाचण्यात आला. शॉपिजेन डॉट इन, अहमदाबाद या प्रकाशन संस्थेने अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केलेला हा छोटेखानी संग्रह वाचनीय आहे. हे कथानक एका गरीब शेतकरी नि कष्टकरी कुटुंबाचे आहे. हे कुटुंब गरीब असले तरीही खाऊन पिऊन तसे सुखी आहे. आपल्या अपत्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांचे हे कथानक आहे. तीन भाऊ आणि दोन‌ बहिणी असे आजच्या मानाने मोठे अशा कुटुंबाची तगमग, घालमेल, ससेहोलपट, भाऊबंदकी, नात्यानात्यातील भांडणं, आशा, भ्रमनिरास असे विविध‌ कंगोरे असणारे हे कुटुंब आहे. ह्या कथानकाचा सुशांत मुख्य नायक आहे. गावातील शाळेत मिळणारे तितके शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावणारे दोन भाऊ आणि दोन्ही बहिणी यांची ही गोष्ट आहे. गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर शेंडेफळ सुशांतने शिकावे ही जशी त्याची स्वतःची इच्छा तशीच त्याच्या एका बहिणीची इच्छा! त्यापूर्वी मोठा भाऊ आणि त्याच्या पाठची बहीण या दोघांचे लग्न एकाच मांडवात लावून आर्थिक भार सुसह्य करण्याची इच्छा तडीस नेणाऱ्या कुटुंबीयाची ही कथा!
       मुलगी जाते नि सून येते इथेच कुटुंबाची ललाटरेषा रंग बदलायला सुरुवात करते. आलेली सून ही सुशांतच्या मामाची मुलगी असली तरीही ती थोड्याच दिवसात स्वतःचा रंग दाखविते आणि दोन खोल्यांमध्ये राहणारे कुटुंब विभक्त होते. एका खोलीत नवविवाहित जोडप्यांसाठी, दुसऱ्या खोलीत इतर सदस्य राहतात. लग्न झालेला मुलगा शहरात एका किराणा दुकानात काम करीत असतो त्याची होणारी कुचंबणा पाहून त्याला पत्नीसह शहरात राहण्याचा सल्ला मिळतो आणि त्या पतीपत्नीच्या मनाजोगते होते. दरम्यान बहीण आणि एका शिक्षकाच्या इच्छेनुसार सुशांत आयटीआयला प्रवेश घेतो. त्याच शहरात त्यांचे भाऊ- भावजय राहत होते. सुशांत शिक्षण आणि निवास दोन्ही प्रकारच्या सोयी झाल्यामुळे आनंदाने शिकू लागला परंतु थोड्याच दिवसात त्याच्या वहिनीला त्याची अडचण होऊ लागली. त्याचा परिणाम त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. सुशांत घरी परतला. अर्धवट शिक्षण सोडून काहीच करता येणार नाही म्हणून सुशांतने एक जुनी सायकल घेतली आणि तो शहरात जा-ये करू लागला. भावाकडे राहत असताना तो भाऊ जुआ खेळत असल्याचे आणि त्यात बराच पैसा हारत असल्याचे सुशांतला समजले होते परंतु लहान असल्यामुळे तो काही बोलला नाही. त्या भावाचे जुआ खेळण्याचे व्यसन वाढले. पगार पुरेनासा झाला तेव्हा त्याने वडिलांकडे वाटणीची मागणी केली. वडिलांनी ती ठामपणे फेटाळली.
     सुशांत इंजिनिअर झाला. त्याला नोकरीही मिळाली. परंतु कर्मभोग पिच्छा सोडत नव्हते. गावी राहणाऱ्या भावाला बिडी पिण्याचे व्यसन जडले. त्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याला खोकल्याचे आणि निदानानंतर टि.बी. सारख्या आजाराने कवेत घेतले असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी बिडी किंवा आयुष्य या दोहोंपैकी एक निवडावे लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला परंतु दुर्दैवाने त्याला बिडीने घातलेल्या मगरमिठीने घात केला आणि संसारातून उठवले. काही दिवस जाताच सुनेच्या माहेरचे लोक आले. त्यांनी मुलीला सोबत नेताना घराच्या वाटणीचा डाव खेळला आणि निघाले. म्हणतात ना संकटाची मालिका सुरू झाली की मग भल्याभल्यांची वाताहत होते, घर फिरले की घराचे वासेही फिरतात याप्रमाणे सुशांतच्या कुटुंबाला चोहोबाजूंनी घेरले. 
     सुशांतच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला दारुने स्वतःच्या जाळ्यात ओढले. जावई दारू पितोय, बायकोला शिवीगाळ करतोय, प्रसंगी मारहाणही करतोय हे सुशांतच्या आईवडिलांच्या कानावर येत होते. अधूनमधून माहेरपणाला आलेली मुलगी आईच्या गळ्यात पडून सांगत होती. परंतु यांची का परिस्थिती वेगळी होती? 'एकादशीच्या घरी शिवरात्र आली' अशी परिस्थिती! जावयाचे पिणे खूपचं वाढले. एका सायंकाळी तो भरपूर दारू पिऊन आला आणि बायकोला मारायला तिच्या अंगावर धावला. परंतु पहिला फटका चुकवून ती घराबाहेर पडली तसा संतापाने तो मागे फिरला नि बायकोच्या मागे धावत असताना नशेत चूर असल्याने एका दगडावर पडला. मार इतका जोरदार होता की, क्षणापूर्वी सधवा असणारी त्याची पत्नी दुसऱ्या क्षणी विधवा झाली.
    कधीकधी नशिबाचे भोग संपता संपत नाहीत, ते अविचितपणे वार करतात नि होत्याचं नव्हतं करून टाकतात. सुशांतच्या कुटुंबाच्या बाबतीत ते वारंवार घडत होते. ललाटरेषा सारख्या दोलायमान होत होत्या. भावाच्या पाठोपाठ मेहुणा गेला आणि बहीण माहेरवाशीण म्हणून आली ती कायमचीच! सूनबाई माहेरी गेल्यानंतर रिकामी झालेली खोली बहिणीला नि तिच्या मुलाला देण्यात आली. सुशांतची एक बहीण उपवर होती. तिच्यासाठी मुलगा पाहत असताना सुशांतच्या मित्राने एक स्थळ सुचविले. मुलगा चांगला होता. परंतु कुणालाही स्वप्नात वाटले नसेल अशी अट मुलाकडून पुढे आली ती म्हणजे सुशांतच्या बहिणीला तो वरमाला घालत असताना सुशांतने त्याच्या बहिणीशी लग्न करावे. ध्यानीमनी नसताना आलेल्या प्रस्तावामुळे सारेच हादरले. परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, बहिणीने त्याच्या शिक्षणासाठी दिलेला पाठिंबा हे सारे लक्षात घेऊन सुशांतने स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत तो प्रस्ताव स्वीकारला. काही वर्षांपूर्वी जे घडले तेच पुन्हा घडले. मुलगी दिली सून आणली. लग्नासाठी पाहुण्याप्रमाणे शहरातील भावाचे कुटुंब गावी आले होते. लग्नाचे सारे सोपस्कार आणि विधी आटोपल्यानंतर वाटणीचा विषय काढला आणि खऱ्या अर्थाने कुटुंब विभक्त झाले. सुशांतही पत्नीला घेऊन नोकरीच्या गावी राहायला गेला.
    घडलेल्या घटनांमुळे सुशांतच्या वडिलांचे नैराश्य वाढले परंतु त्यांनी आगळावेगळा निर्णय घेतला नाहीतर सरळ पंढरीच्या वारीला जाऊन विठुरायाच्या चरणी लीन होण्याचे ठरविले. आईबाबांसोबत त्यांची मुलगी नि नातू हेही वारीला निघाले. तिकडे ते वारीत रमलेले असताना नियतीने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून जणू डाव टाकला. मुलाला जुआ खेळण्याचे जडलेले व्यसन विकृतीत बदले. गावी घरी कुणी नाही ही संधी साधून तो गावी आला. स्वतःच्या हिश्याचा जमिनीचा तुकडा एका दलालाच्या मध्यस्थीने विकून लाखो रुपये घेऊन शहरात परतला. जाताना बायकोला काही दागिने घेऊन घरी गेला. बायकोला मिळालेल्या पैशाबाबत काहीही न सांगता बाहेर पडला. तो सरळ जुव्याच्या अड्ड्यावर गेला. लक्ष्मीकडे लक्ष्मी येते हा प्रत्यय आपणास येईल, आयुष्यभर या नादात गमावलेले सारे मिळेल या हेतूने तो खेळत राहिला. दोन दिवस झाले नवरा परतला नाही म्हणून बायको काळजीने पोलीस स्थानकात गेली आणि तिला मोठा धक्का बसला कारण तिचा नवरा लॉकअपमध्ये बंद होता. जुगार खेळताना कुणीतरी डाव साधला होता. तक्रार केली होती आणि हा पकडला गेला. नवऱ्याला सोडविण्यासाठी तिने दोन दिवसांपूर्वी घेतलेले दागिने विकून पतीची सुटका केली.‌ परंतु तो धक्का सहन न झाल्याने त्याने रात्रीच्या अंधारात एक दोरी घेऊन झाडाला जवळ केले. पंढरपुरी आशीर्वाद घ्यायला गेलेले आईवडील गावी परतले. घडलेली घटना समजताच टाहो फोडणाऱ्या आईने विठ्ठलाला जणू विचारले, 'हीच का तुझी कृपा?'
      सुशांतच्या लग्नाला अनेक वर्षे झाली परंतु त्याच्या पत्नीची कुस उजवत नव्हती. तशात गावी राहणाऱ्या राजू नावाच्या बहिणीच्या मुलाला सुशांतने ठेवून घ्यावे असा प्रस्ताव पुढे आला. सुशांतच्या पत्नीला तो प्रस्ताव मान्य नव्हता परंतु सुशांतपुढे तिचे काही चालले नाही. राजू राहावयास आला आणि त्यांच्या संसारात वेगळेच वादळ आले. राजूमुळे पतीपत्नीमध्ये वाद होतो का? सुशांतला मूल होते का?सुशांतची आई त्याला दुसरे लग्न करण्यासाठी तगादा लावते. सुशांत दुसरे लग्न करतो का?त्याच्या पत्नीला वेगळाच संशय येतो. साधा सरळ स्वभाव असणाऱ्या सुशांतच्या स्वभावात काय बदल होतो? बदललेल्या परिस्थितीत त्याची ललाटरेषा अजून कायकाय संकटं निर्माण करतात. सुशांत आई आणि त्याची पत्नी पंढरपूरची वारी का करतात ? या अजून बऱ्याच घटनांचे मूळ येवतीकर लिखित 'ललाटरेषा' या संग्रहात वाचायला मिळेल. लेखकाची भाषा साधी सरळ आहे, कुठल्याही प्रतिकाचा विनाकारण उपयोग केला नाही. घटनाक्रम वेगवान असला तरीही आटोपशीर असल्याने कंटाळवाणे होत नाही. लेखक येवतीकरांचे अनुभव विश्व दांडगे असून समृद्ध भाषा संपत्ती असल्याचे या कथानकात वारंवार जाणवते. हे कथानक भविष्यात महाकादंबरीच्या स्वरूपात वाचकांपुढे यायला हवे इतके ते सखोल आहे. लेखक नासा. येवतीकर यांना आगामी लेखनासाठी भरघोस शुभेच्छा!
              ००००
ललाटरेषा: दीर्घ कथासंग्रह 
लेखक : ना.सा.येवतीकर
             {९४२३६२५७६९}
प्रकाशक : शॉपिजेन डॉट इन
               अहमदाबाद 
पृष्ठ संख्या : ५४ 
मूल्य : ₹२५०/-
परिचय: नागेश शेवाळकर, पुणे 
                 {९४२३१३९०७१}

1 comment:

  1. खूप छान कथानक आहे. जरुर वाचावे.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...