होळीचा रंग
होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली
मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
सर्वाना आपल्यात सामावून घे
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली
- नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769
🌳 चला मित्रांनो होळी साजरा करु या 🌳
दुर्गुणाची, दुराचाराची होळी करु या
सद्गुण आणि सदाचाराने झोळी भरू या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
वाईट विचारांच्या टोळी सोडून देऊ या
चांगल्या विचारांच्या आळीत फिरू या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
निराशा अन् दारिद्र्याचे दहन करु या
निरोगी अन् सुखी जीवनाची आशा करु या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
होळी करू या ......
लघुकथा - (बे) रंगपंचमी
होळीचा सण आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडणारा सण. सायंकाळी होळी करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदन म्हणजे एकमेकांना रंग लावणे, त्यालाच रंगपंचमी असे देखील म्हटले जाते. हा रंगाचा खेळ विशेष करून लहान मुलांना खूपच आवडते. मराठी व हिंदी चित्रपटात देखील या सणाला विशेष असे महत्व आहे. शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या भारदस्त आवाजातील " कब है होली ? " हे डॉयलॉग रसिक अजूनही विसरू शकत नाही. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे हे गाणे होळीच्या दिवशी हमखास ऐकायला मिळते. प्रत्येकांच्या घरात या दिवशी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येकजण निळ्या, पिवळ्या, लाल गुलाबी रंगाने रंगून गेलेला असतो. घरातील व्यक्तीच ओळखणार नाही अशी अवस्था घरातल्या बालकांची होत असते. अश्या या आनंदीमय वातावरणात रमेशच्या घरात मात्र नीरव शांतता होती. घरात कोणी कोणाला बोलत नव्हते. पीन ड्रॉप सायलेंट होतं. टीव्हीचा आवाज नव्हता की मोबाईलचा आवाज. रमेश पलंगावर आडवा पडला होता आणि त्याची नजर खिडकीतून बाहेर रंग खेळणाऱ्या मुलांवर स्थिरावली होती. मी देखील आज त्यांच्यासोबत रंग खेळू शकलो असतो अशी खंत त्याच्या मनात चालू होतं. मनात असून देखील तो बाहेर मित्रांसोबत रंग खेळायला जाऊ शकत नव्हता कारणही तसेच होतं .........
रमेश नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या मार्कने उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात अकरावीला गेलेला तरुण धडधाकट व गुणी मुलगा. नुकतेच त्याला मिसरूड फुटू लागले होते. पहिली ते दहावीपर्यंतची शाळा जवळ होती म्हणून त्याला ये-जा करण्यासाठी काही त्रास झाला नाही. मात्र अकरावी शिकण्यासाठी त्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ते घरापासून खूप अंतरावर होते. सायकलवर शाळेला जाण्याची त्याला लाज वाटत होती म्हणून त्याने स्कुटी घेऊन देण्याचा हट्ट लावून धरला. त्याची गरज लक्षात घेऊन त्याच्या बाबाने त्याला स्कुटी घेऊन दिली. तसा त्याचा महाविद्यालयात जाण्याचा प्रश्न सुटला. स्कुटी म्हटल्यावर त्यात पेट्रोल भरावेच लागते, ती काय सायकल सारखी हवेवर चालणारी वस्तू नाही. त्यामुळे बाबाकडून पॉकेटमनी मिळू लागली. खिशात पैसा आणि फिरायला गाडी मिळाल्यामुळे रमेश वेगळ्याच ट्रॅकवर गेला. आवारा गर्दी करणाऱ्या मित्रांची त्याला संगत मिळाली. कॉलेजच्या नावाखाली तो सिनेमा बघणे, बागेत फिरणे असे काम करू लागला. हळूहळू त्याला पॉकेटमनी कमी पडू लागली तसे तो आपल्या आईजवळ हट्ट करू लागला. लाडक्या लेकांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याची आई लपून छपून त्याला पॉकेटमनी देऊ लागली. त्यामुळे तो अजून सैराट झाला होता. मित्रांसोबत हॉटेल शेअर करण्याचे प्रकार वाढू लागले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तो मित्रांसोबत पार्टी केला आणि दारू पिऊन रात्री बारानंतर घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाने त्याला खूप खडे बोल ऐकू घातले. तो गप्प गुमान ऐकत होता. काही दिवस शांततेत गेले पण त्याचे मित्र त्याला शांत बसू देत नव्हते. काही दिवसांनी होळीचा सण येणार होता म्हणून साऱ्या मित्रांनी शेतात जाऊन हा सण साजरा करण्याचा प्लॅन तयार केला. त्यात रमेशचा ही सहभाग होताच. पण त्याच्याजवळ पैसे नव्हते त्यामुळे तो एक पाऊल मागे सरकला होता. मात्र त्याचा जिवलग मित्र सुरेशने त्याच्या वाट्याचे पैसे भरले आणि होळी सण आनंदात व रंगात साजरी करण्याचा प्लॅन तयार केले.घरी काही ही न सांगता मित्रांसोबत रंग खेळून येतो असे सांगून रमेश आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. " अरे, सावकाश जा, आज बाहेर वातावरण खराब असते, सांभाळून चालवं " रमेशच्या आईने त्याला जाताना बोलले. तो आपली मान हलवत निघून गेला.
शेतात दहा ते बारा मित्रांची पार्टीची जय्यत तयारी चालू होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. पाच-सहा किलो मटणाची भाजी शिजत होती. सोबत दारूच्या दोन तीन बाटल्या देखील आणले होते. शिजत असलेल्या मटणाचा वास सर्वत्र पसरला होता. तेवढ्यात बाटलीचे झाकण उघडले गेले, ग्लासात भरले, त्यात कोणी पाणी टाकले, कोणी सोडा टाकले, तर कोणी कोक टाकले एकदाच चिअर्स झालं आणि हॅपी होली म्हणून ग्लास खाली झाले. रमेश देखील त्या पार्टीत सामील झाला. बघता बघता त्यांची दारूची पार्टी वाढू लागली. आता साऱ्यांना चढू लागली. सारेच झिंगु लागले. गाण्यावर नाचू लागले. एकामेकांना रंग लावू लागले. या साऱ्या धुंदीत खाण्याचे त्यांना भान राहिलेच नाही. रंग खेळून खेळून रमेश घरी जाण्यासाठी आपली स्कुटी घेऊन बाहेर पडला. त्याला जागेवरून स्कुटी काढता येत नव्हती, त्याचा तोल जात होता, दारू जरा जास्त झाली होती. तरी ही तो स्कुटी बाहेर काढला आणि मुख्य रस्त्यावर चालवू लागला. त्याचे घर दोन किमी दूर अंतरावर होते. त्या रस्त्यावर अनेक वाहने वेगात जात येत होती. एका चौकात रमेशला कुठं जावे कळलेच नाही त्याने सरळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिला आणि बाजूला पडला. ते ट्रक देखील वेगात होते, रमेशचा स्कुटी अचानक त्याच्या पुढे आली, ब्रेक मारेपर्यंत धडक लागली, रमेश स्कुटीवरून खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेले. तो जागेवरच बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळाने त्याचे आई बाबा तेथे आले. पाय गेले तर गेले जीव वाचला म्हणत सारे रडत होते. रमेश दोन्ही पाय नसलेला दिव्यांग व्यक्ती झाला होता. पलंग हेच त्याचे विश्व झाले होते. त्याची रंगपंचमी दारुमुळे बेरंग झाली होती. आज होळीच्या निमित्ताने त्याला त्याची चूक जाणवत होती. प्रायश्चित करण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.
- नासा येवतीकर, धर्माबाद
जि. नांदेड 9423625769
No comments:
Post a Comment