।। हरी ॐ विठ्ठला ।।
चारोळी
01)
चंद्रभागेच्या तिरावर त्या
उभा आहे विठ्ठल सावळा
यंदा ही नाही पायी वारी
घरीच जमलंय भक्तांचा मेळा
02)
हरी ओम विठ्ठला
नाम तुझे मुखी
एकच प्रार्थना देवा
ठेव सर्वाना सुखी
नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - विठ्ठल नाम
विठ्ठलाचे नाम आहे मुखावरी
भजन भूवरी चालतसे
भेटाचिये आस लागलिया मनी
लावुनिया ध्यानी पांडुरंग
आषाढीला निघे पायी दिंडी वारी
भेटी वारकरी एकमेकां
ओळख नाही ना पाळख ही नाही
प्रेम देत राही भजनात
थकवा नाही ना कोणता आळस
घेऊन तुळस पायी चाले
पांडुरंग भेटी लाखो लोकं येई
गडबड नाही कसलेही
वारकरी शिस्त जगाला शिकवी
प्रेम हे करवी आपसात
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - ध्यास विठ्ठलाचा
मनी लागे आस । भेटावया खास ।
लागला तो ध्यास । विठ्ठलाचा ।।
दूर ती पंढरी । मुखी नाम हरी ।
पायी चाले वारी । दरवर्षी ।।
ऊन वारा पाणी । कुणी अनवाणी ।
संग अन्नपाणी । ठेवुनिया ।।
ओढ पंढरीची । पर्वा ना जीवाची ।
नाम जपायची । बा विठ्ठला ।।
सोडुनिया घर । चालला तो दूर ।
लागे हूर हूर । या मनाला ।।
यंदा वारी नाही । पायी जाणे नाही ।
घरूनच पाही । विठुराया ।।
एकच प्रार्थना । करतो याचना ।
संपू दे कोरोना । पांडुरंग ।।
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - चुकलेली वारी
बसलाय पंढरीत माझा तारणहार
गळ्यात घालुनी तुळशीचा हार
रंग त्याचा सावळा कर ठेवुनी कटेवरी
मंदिर आहे त्याचे चंद्रभागेच्या तिरी
पायी दिंडी चाले शिस्तीत वारकरी
पाऊले चालताना मुखात फक्त हरी
थंडी ऊन पाऊस वारा झेलतो अंगावर
देहभान विसरून सारे प्रेम पांडुरंगावर
यंदा रुखरुख लागली भेट नाही माऊलीची
असा दिवस नको पुन्हा हीच विनंती भक्तांची
- नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - वारकरी दिंडी
डोईवर शोभून दिसे पांढऱ्या टोपीचा
पोशाख पांढरा छान वारकऱ्यांचा
गळ्यात असे त्याच्या तुळशीची माळ
दोन्ही हाताने वाजवित राही टाळ
मुखी चाले नामस्मरण विठ्ठलाचे
दोन्ही पाऊल वाट धरी पंढरपुराचे
हरी ओम विठ्ठलाचे घेता ध्यान
ना लागे भूक ना लागे तहान
पायी दिंडी वारी ही शिस्तीत चाले
प्रत्येकजण एकमेकां प्रेमाने बोले
जय हरी विठ्ठल हरी ओम विठ्ठल
सर्वांचा लाडका सावळा विठ्ठल
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - आषाढ वारी
लोकांच्या येण्या जाण्यावर संचारबंदी
कोरोनाने सर्वाना घरातच केली बंदी
आली पहा जवळ आषाढी एकादशी
विठ्ठलाच्या भेटीसाठी जीव वेडा होई
वर्षातून एकदा सर्वाना लागते ही आस
पांडुरंगाच्या भेटीचा मनी लागे ध्यास
कोरोनामुळे यंदा ही होणार नाही भेट
घरातूनच मनाने माऊलीला दंडवत थेट
तरीही माझे मन काही मानतच नाही
दर्शनाशिवाय काही चैन पडतच नाही
म्हणून मनाने नक्की ठरवलं यावेळी
कुणी ही जागी होण्याअगोदर सकाळी
पक्षासारखी आकाशात मारावी भरारी
करावे म्हणतो यंदा हवेतून आषाढ वारी
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - विठुराया
आली आषाढी एकादशी
दिंडी चाले विठुरायापाशी
मुखात चाले विठ्ठल नाम
हातात घेऊन त्याचेच काम
मनात उत्सुकता असे वारीची
इच्छा असते पंढरी पाहण्याची
चला जाऊ या पंढरपुराला
माझ्या विठूरायाच्या दर्शनाला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
कविता - ओढ वारीची
आला हा आषाढ । घेऊन पाऊस ।
मनात उल्हास । भेटाचिये ।।
शेतातील कामे । त्वरा उरकुनी ।
पाहतो बसुनी । वाट तुझी ।।
एकादशी रोजी । नाम जप करी ।
विठ्ठल भूवरी । अवतरे ।।
कोरोना संकट । बसलोय घरी ।
मना ओढ वारी । चालतसे ।।
हे देवा विठ्ठला । एकच प्रार्थना ।
संपू दे कोरोना । जगातूनी ।।
- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~
*🚩 ।। विठ्ठल भजन ।। 🚩*
मनात विठ्ठल । तनात विठ्ठल ।
जनात विठ्ठल । हरी हरी ।।
ओठात विठ्ठल । पोटात विठ्ठल ।
तोंडात विठ्ठल । जप नाम ।।
चालावा विठ्ठल । बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल । मनोमनी ।।
सांगावा विठ्ठल । ऐकावा विठ्ठल
भजावा विठ्ठल । घरोघरी ।।
सुखात विठ्ठल । दुःखात विठ्ठल ।
सर्वत्र विठ्ठल । मज दिसे ।।
घरात विठ्ठल । दारात विठ्ठल ।
अंगणी विठ्ठल । खेळतसे ।।
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~
सर्व कविता वाचन केल्याबद्दल आपले मनस्वी आभार.
सर्व वाचकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा ......!
Nice kaka
ReplyDeleteThanks sirij
ReplyDelete