Sunday, 30 May 2021

chandrashekhar aasvar

कुंचल्यातून भावना प्रकट करणारा शिक्षक चंद्रशेखर आस्वार
आपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो. तो आमच्या संस्कृतीचा सहज, आवश्यक आविष्कार असतो. शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीला 58 वर्षे पूर्ण झाले की निवृत्त व्हावेच लागते. असाच एक योग धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील कला शिक्षक, प्रयोगशील शिक्षक चंद्रशेखर बाबुराव आस्वार हे आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. एकूण 33 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनमोल असे कार्य केले, सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा. 
परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील बाबुराव आणि सखुबाई यांच्या पोटी दिनांक 11 मे 1963 रोजी चंद्रशेखर यांचा जन्म झाला.   त्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ रामा दादा यांच्या प्रेरणेने ते घडले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेलू येथील नूतन महाविद्यालयात पूर्ण झाले. पदवीचे शिक्षण शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर चित्रकलेचे शिक्षण अभिनव चित्रकला महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले.
सन 1988 मधील जून महिन्यात धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून लागण्यापूर्वी ते परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात एक वर्ष तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून काम पाहिले होते.
आईने जन्म दिला पण हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेने मला घडविले म्हणून हेच माझ्या कर्माची आई आहे असे ते म्हणतात. या शाळेतून त्यांचे कार्य देशभर पोहोचले. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. कोणत्याही चित्रांची हुबेहूब चित्र काढण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काढलेल्या हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या तैलचित्राला केंद्र सरकारने पोस्ट तिकीट म्हणून 2003 मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना आजपर्यंत कलाश्री, कलारत्न आणि कलाभूषण असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
साक्षरता अभियान या कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. मनोज बुंदेले, देवीसिंग ठाकूर आणि आस्वार चंद्रशेखर यांच्या चमूने कला जथ्थेच्या माध्यमातून अंगठे बहाद्दर पथनाट्यचे सादरीकरण करून अनेक निरक्षर लोकांना साक्षरतेचे महत्व पटवून दिले होते. ते एक उत्तम कलाकार होते याची प्रचिती या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवाराला आणि जनतेला झाली.
धर्माबाद येथे 1993 मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती सुरू करण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हापासून आजतागायत ही जयंती तेवढ्याच उत्साहात आणि इतर समाजात देखील साजरी केली जात आहे. धर्माबाद येथील रमाई नगर परिसरात संत रविदास यांचे स्मृती मंदीर उभारण्यात आले आहे. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली. चर्मकार समाज बांधवांना स्टॉल मिळवून देण्यास सहकार्य केले. समाज मंदिरासाठी शासनाकडे मागणी केली. या सामाजिक कार्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव अशी कामगिरी केली.  हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील सर्व भिंती आपल्या कुंचल्यातून बोलक्या केली. कुठे ही जागा शिल्लक राहणार नाही एवढी रंगरंगोटी त्यांनी स्वतः केली. यासाठी संस्थेकडून त्यांनी एक छद्दाम देखील घेतले नाही. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. ते स्वतः एक कलाकार असल्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखण्यात ते पारंगत होते. स्काऊट गाईड आणि कब बुलबुलच्या माध्यमातून त्यांनी शाळेचे नाव देशभर गाजविले तर दोन वेळा त्यांना राज्यस्तरावर नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांचा स्वभाव बोलका आणि इतरांना हसू घालण्याचे साम्यर्थ असल्याने त्यांचा सहवास सर्वाना हवाहवासा वाटणे, यात काही नवल नाही. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी निरीक्षक म्हणून काम केले. तसेच कोरोना काळात लोकांची जनजागृती व्हावी म्हणून दोन पोस्टर देखील तयार केले. 
यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे या सर्व कामकाजात अर्धांगिनी सौ. निर्मला हिचे मोलाचे असे सहकार्य लाभले. त्याशिवाय हे यश मिळविणे अशक्य आहे. त्यांना तीन अपत्य असून सुमेद्य, सौरभ ही दोन मुले आणि सुरभी ही मुलगी असून ते सर्वजण आपापल्या ठिकाणी सुव्यवस्थित जीवन जगत आहेत. 
आज नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे ते प्राथमिक शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील भावी सुखी समृद्धी आणि यशस्वी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

शब्दांकन :- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

1 comment:

  1. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर🙏

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...