Tuesday, 16 April 2019

निवडणूक विशेष लेख


चलो बुथ चले हम

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्यात महाराष्ट्रात सहा ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणूक विभागाने यासाठी पूर्ण तयारी करून आपली टीम प्रत्येक गावात पाठविली आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रशिक्षित टीम त्या गावी पोहोचली असून सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होऊन सायंकाळी सहा वाजता बंद होणार आहे. मतदारांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून यावर्षी शासनाकडून अनेक प्रकारचे उपक्रम चुनावी पाठशाळा कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आले. निवडणूक यंत्रणा मतदारांना समजावे म्हणून शाळा ते अन्य कार्यालय यांच्या मार्फत जाणीव जागृती करण्यात आली. यावर्षी प्रथमच evm मशीन सोबत vvpt जोडण्यात आलेली आहे. त्याची माहिती देखील मतदारांना देण्यात आली आहे. मतदार यादीतील नाव पाहण्यासाठी ऑनलाईन लिंक दिलेली आहे. याउपर शासनाने BLO म्हणजे बुथ लेवल वर शासकीय अधिकारीची नेमणूक केली आहे. जे की प्रत्येक मतदारांना त्यांची मतदानाची पोल चिट्ठी एक-दोन दिवस अगोदर वाटप केले आहेत. मतदान करतांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व प्रकारची मदत मतदाराला केली जाते गरज आहे ती फक्त मतदारांनी बुथ वर जाऊन आपली मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची. निवडणूक आयोगाला वाटते की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे. पण एवढा खटाटोप करून देखील मतदानाची टक्केवारी वाढत नाही किंवा 50-60 टक्केच्या दरम्यान मतदान होते. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आलेला हा आजवरचा अनुभव आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हेच मतदान वाढलेले दिसून येते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत असे दिसत नाही. वास्तविक पाहता याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी कारण ह्या दोन्ही निवडणुकीमधून सरकार तयार होत असते. लोकसभेतून देशाचे सरकार तर विधानसभेतुन राज्याचे सरकार निर्माण होते याची जाणीव मतदारात होणे आवश्यक आहे. आपल्या लोकशाही देशात मतदाराच्या एका मताला खूप महत्व आहे, याची जाणीव अजून देखील लोकांमध्ये झालेली दिसत नाही. ज्याप्रकारे एक गुण कमी मिळाले तर नोकरी हुकण्याची शक्यता असते, एक गुण कमी असेल तर नापास होऊ शकते, एकाच धावेमुळे सामना हरू शकतो, एका एका थेंबानेच तलाव तयार होऊ शकते तसे आपल्या एका मताने निवडणुकीतील उमेदवार विजयी किंवा पराजित होऊ शकतो. म्हणून प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत आजच्या दिवशी देणे आवश्यक आहे. बहुतांश मतदार या प्रक्रियेकडे कानाडोळा करतात. कोणी शेताला निघून जातो, कोणी गावाला निघून जातो तर कोणी गावात राहून देखील ' मला काय मिळते ?' या प्रश्नार्थक विचाराने मतदान करण्यास जात नाहीत. यासाठी गावातील काही युवकांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रत्येक मतदार बुथवर आणण्याचा प्रयत्न करावा. विशेष करून वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तीना मतदान करण्यासाठी सहकार्य करावे. गावापासून दूर असलेल्या मतदारांनी मतदान करण्यासाठी आपल्या गावी यावे. ज्याप्रकारे आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर आपण सर्व काही सोडून येतो अगदी तसेच या मतदानासाठी यायला हवे. यानिमित्ताने अनेक बालमित्राची भेट होते, नातलगांना भेटता येते, गप्पा होतात आणि एक विशेष आनंद मिळतो. निवडणूक विभागाने ओळखपत्र साठी जे काही कागदपत्रे जाहीर केले आहे त्यातील एक तरी ओळखपत्र जवळ ठेवावे अन्यथा बुथवर जाऊन परत येण्याची वेळ आपणावर येऊ नये. मतदार प्रतिनिधी जे या दिवशी नेमले जातात त्यांनी मतदारांना तशी जाणीव करून दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ होणार नाही. मतदान कोणाला करता येते ? ज्याचे नाव मतदार यादीत असेल त्यालाच मतदान करता येते. मात्र ग्रामीण भागात असे पाहायला मिळते की, त्यांचे नाव मतदार यादीत नसते आणि त्यांच्या जवळ निवडणूक ओळखपत्र असते. ती व्यक्ती मतदान करण्यासाठी अट्टहास करीत असते. अश्या लोकांना ऐनवेळी कोणी समजावून सांगू शकत नाही. म्हणून गावातील मतदान प्रतिनिधी किंवा जेष्ठ मतदारांनी त्यांना समजावून सांगावे. बहुतेक वेळा मतदार दारू पिऊन मतदान करण्यासाठी येतात. आपण काय करीत आहोत याची त्याला भान नसते. म्हणून या दिवशी शक्यतो फुकटची दारू पिऊन मतदान करू नका असे म्हणण्याऐवजी या दिवशी दारूपासून दूर राहावे. आपले मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास प्रत्येक मतदारांनी थोडी काळजी घेतली तर संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होते. जे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत काम करीत आहेत त्यांनी आपल्या edc द्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करावी. सक्षम लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे हे त्याचे कर्तव्य आहे. आपल्या मतदानामुळे बळकट लोकशाही निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तेंव्हा चला तर मग आपण सर्वजण आपल्या परिवारातील सर्व मतदारासह मतदान करण्यासाठी बुथवर जाऊ या. ' चलो बुथ चले हम '.

मतदान देशासाठी

शाई लागेल बोटाला
मत मिळेल देशाला
वाचवू लोकशाहीला
चला जाऊ मतदानाला

असेल किती घाई
मनाला सांग काही 
मतदान केल्याबिगर
आता राहायचं नाही

एका गुणाने नोकरी हुकते
एका गुणाने नापास होते
एकाच धावेने सामना हरते
मात्र ..........
एकाच मताने सक्षम देश बनते

जाणून घे मताचे मोल
मत आहे तुझे अनमोल
विसरू नको मतदानाला
जागव तुझ्या अधिकाराला

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...