Thursday, 14 March 2019

अंधश्रद्धा

*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*

अंधश्रद्धा म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. शिकलेला व्यक्ती सुद्धा आंधळेपणाने काही गोष्टी स्वीकारत असेल तर त्याच्या शिक्षणाचा काय फायदा झाला असा प्रश्न निर्माण होतो. यात काही अंशी शिक्षण प्रणालीचा ही दोष असू शकते कारण वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावे असे शिक्षण अजूनही मुलांना मिळत नाही. म्हणून कालची मुले जे की आज भारताचे जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत आहेत ते विज्ञानवादी बनू शकले नाहीत. वाहन एक प्रकारचे यंत्र आहे आणि त्यास लिंबू, मिरची आणि बिब्या बांधले नाही तर ती गाडी चालणार नाही, प्रत्येक अमावस्येला गाडी धुवून त्याची पूजा केली तरच गाडीला काही घात अपघात होत नाही अशी लोकांची धारणा आहे. मात्र ती धारणा अंधश्रद्धेमध्ये मोडते हे जेंव्हा शिकलेल्या लोकांना कळते तेंव्हा तरी निदान असे करणे सोडून द्यायला हवे. लोकं करतात म्हणून आपण करणे म्हणजे साक्षर असून देखील निरक्षर लोकांच्या ही पलीकडचे जीवन जगणे आहे. श्रद्धा माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते तर अंधश्रद्धा माणसाच्या मनात न्यूनगंड तयार करते. आजपर्यंत तरी या अंधश्रद्धेमुळे कोणालाही फायदा झालेलं नाही. मात्र ज्यांनी लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण केली ते मात्र करोडपती झालेले पाहायला मिळाले. अंधश्रद्धेला सर्वात जास्त बळी पडणारा घटक म्हणजे महिला वर्ग. त्यांच्या मानसिक आणि भावनिक गोष्टीचा फायदा अनेक ढोंगी लोकं उचलतात. त्यांना या बाबीतून बाहेर आणण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. भारत देशाचा खरा विकास जर साधायचा असेल तर देशातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा घालविण्याचा प्रयत्न करायला हवं. घरातील मुले घरातल्या आई किंवा बाबा यांचे अजिबात ऐकत नाहीत. मात्र शिक्षकांचे एक ही शब्द खाली पडू देत नाहीत. याच बाबीचा विचार करून प्राथमिक शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करायलाच हवे. शाळा हे राष्ट्रीय शिक्षण देण्याचे केंद्र बनले पाहिजे. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना फक्त शाळेतून विकसित करता येऊ शकते. प्राथमिक शाळेत केलेले संस्कार मोठेपणी निश्चित कामाला येतात. म्हणून अगदी लहानपणापासून मुलांच्या मनात असलेली अंधश्रद्धा समूळ नष्ट केली पाहिजे. भूत-पिशाच्च असे काही नसते हे आपणास माहीत असते मात्र मूल जेंव्हा लहान असते त्यावेळी त्याला भीती घालण्यासाठी भूत ही विचारधारा पुढे आणली जाते. आम्ही लहान असताना चिंचेच्या मोठ्या झाडाजवळ कधीच जात नसू कारण त्या झाडावर भूत येऊन बसते असे सांगितले जायचे. कालांतराने तेच चिंचेचे मोठे झाड गावातील सर्वांचे बैठकीचे एक महत्वाचे ठिकाण बनते. आता येथे भूत येत नाही का ? असा प्रश्न आज ही मनात निर्माण होतो. मनामध्ये एकदा विचार जो बसला तो एकदम फिट बसतो. मन दुसरे विचार ऐकून घ्यायला तयारच होत नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे प्रमाण जरा जास्त आढळून येते. अंगात देव येणे आणि भानामतीसारखे अनिष्ट प्रथा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळतात. या प्रकाराला जास्तीत जास्त महिलांच बळीचा बकरा ठरतात. अमुक देवी अंगात येते आणि सर्वांच्या समस्या मिटविते असा प्रचार आणि प्रसार केला जातो. ठराविक एखाद्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करून त्या अंगात येणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांची भेट घेतली जाते. महिलांच्या अंधश्रद्धेमुळे अश्या ढोंगी, बाबा लोकांचे फावते आणि दरवेळी काही तरी नवीन समस्या डोळ्यासमोर दाखवून लोकांना लुबाडत असतात. म्हणून वेळीच अश्या लोकांचे पितळ उघडे पाडण्याचे काम जागरूक लोकांनी करणे आवश्यक आहे. प्रा. श्याम मानव कुठल्याही व्याख्यानात एक वाक्य नेहमी म्हणतात, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. हे चित्र सर्वत्र दिसते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे खूप मोठे कार्य केले. पण काही अविचारी लोकांनी त्यांची हत्या केली. समाजातून जर ही अंधश्रद्धा समूळ नष्ट करायचे असेल तर सर्वाना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल असे शिक्षण देणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी सर्वप्रथम शाळेतून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना याबाबतीत प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना जर याचे महत्व पटले तर ते नक्की विद्यार्थ्यांना पटवून सांगू शकतील. अंधश्रद्धा निर्मूलनची चळवळ घराघरांत पोहोचविण्यासाठी शाळेतील शिक्षकांची मदत नितांत गरजेचे आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
( लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धर्माबाद तालुका अध्यक्ष आहेत. )

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...