Thursday, 9 August 2018

अतिथी देवो भव

अतिथी देवो भव
अतिथी सत्काराचा मूळ हेतू म्हणजे माणसांमध्ये देण्याची वृत्ती फुलविणे हा आहे. आज माणसांमध्ये देण्याची वृत्ती संपुष्टात आली आहे म्हणून नीतिशास्त्र कार म्हणतात " दाता भवती वा न वा".  दाता कोणी होईल की नाही शंकाच आहे. भारतीय संस्कृतीला फार प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपण " अतिथी देवो भव " अतिथीला देव माना असे म्हटले जाते. त्यानुसार आजपर्यंत अतिथी मंडळीचा यथायोग्य सन्मान व व्यवस्था केल्या जात असे. परंतु आज समाजात असे चित्र फार कमी बघायला मिळत आहे. असे का ? त्याला अनंत कारणेही आहेत, नाहीत असे नाही. अतिथी म्हणजे वेळ-काळ सांगून न येणारा पाहुणा. सहा महिने ठाण मांडून बसतो त्यास अतिथी म्हणत नाहीत. जो पाहूणा त्या घरात दुसरा दिवस राहत नाही तो अतिथी. याविषयी संस्कृत मधील ओळी लक्षात घ्यावे
" न विद्यते द्वितीया तिथी : यस्य स : अतिथी "
तेव्हा अतिथी घरात आल्यानंतर त्याला देण्याची, त्याची समाधान करण्याची वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस आपली देण्याची वृत्ती कमी होत आहे. दुसऱ्यांना काहीच न देता घेण्याची वृत्ती माणसाकडे वाढतच जात आहे, ज्यामुळे समाजातील नैतिकता घसरत आहे. इतरांना काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे. आपण बाजारातून येताना घरात खाऊ आणतो. घरी आल्याबरोबर घरातील लहान मुले हातातील पिशवी घेतात आणि त्यातील खाऊ काढून घेतात. तो इतरांचा विचार न करता ताबडतोब खाण्यास सुरुवात करतात. घेण्यासाठी त्याच्यावर काही संस्कार करण्याची गरज नाही. पण त्याचाच हाताने इतरांना वाटण्याची क्रिया करताना नकळत संस्कार होऊन जातात. काही पालक आपल्या मुलांवर अति लाड करतात त्यामुळे ते बिघडतात म्हणजेच त्यांच्यावर संस्कार होत नाहीत. पालक त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती निर्माण करू शकत नाहीत कारण अति लाड आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात संस्कार नावाची वस्तू शोधूनही सापडत नाही. घरातील सदस्यांची संख्या जेवढी जास्त तेवढा जास्त प्रमाणात त्यांच्यावर संस्कार होतात हा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये लोकांना अनुभवास येतो.
घरातील संस्कार लोप पावत चालल्यामुळे आज प्रत्येक जण खाण्याच्या मागे लागून खानसाहेब झाले आहेत. देण्याची अथवा दानाची भावना आज लुप्त झाली आहे. आपली जुनी परंपरा आहे की माणूस एकटा कधीच जेवत नाही. जेवण्यापूर्वी ताटाजवळ पहिला घास ठेवण्याची प्रथा आजही बघायला मिळते. कोणी म्हणतात पहिला घास देवाचा तर शास्त्र म्हणते " स्वचंडालभूतपतितवायसे " याचा अर्थ कुत्रा,चांडाळ, भूत, पतित कावळा सर्वांसाठी माणूस पहिल्या घासाचा अन्न बाजूला ठेवतो. आजच्या बुफे किंवा डायनिंग टेबलावरच्या जेवणाच्या पद्धतीत माणूस आपले संस्कार पार विसरून जात आहे. पहिला घास बाजूला ठेवत नाहीत ते अतिथीचा आवभगत कसे करतील ?
ग्रामीण भागात आजही संस्काराचे काही चांगले अनुभव बघायला मिळतात. गावात एखादा अतिथी व्यक्ती आल्यास त्याची योग्यप्रकारे विचारपूस करून त्याची सोय करतात. तर इकडे शहरांमध्ये अतिथी दिसला की संधी साधून त्याची फसवणूक केली जाते. त्याची सर्वप्रकारे गैरसोय केल्या जाते. माणसाची नीती पूर्णपणे बदलून जाते कारण येथे अशाच प्रकारचे संस्कार केले जातात. घरात, गल्लीत, परिसरात शहरात सर्वच जण विवेकहीन वागतात. मग ते अतिथीला योग्य सन्मान देऊ शकतील काय ? याचे उत्तर अर्थातच नाही. तेथे त्यांना सुद्धा असंख्य समस्या असतात. साधे ते प्रेमाने चौकशी सुद्धा करत नाहीत. जर केलेच आणि तो अतिथी आपणास चिकटला तर त्याची सोय कुठे करू याची भीतीसुद्धा मनात असते.
प्राचीन काळात अतिथींना देव माना असे संस्कार होत असत. परंतु आज काळ वेगळा आहे. आज लोकांच्या अनेक समस्या आहेत त्यातुन त्यांची सुटका होणे अशक्य आहे. त्यामुळे अतिथीला देव मानणाऱ्याची संख्या फार कमी झाली आहे. याउलट अतिथीला दूर करा म्हणणार्‍या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढीस लागली ही चिंताजनक बाब आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
   

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...