Saturday, 2 June 2018

अभ्यास

अभ्यासाशिवाय पर्याय नाही

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर नुकतेच शाळेला सुरूवात झालेली आहे. घरात बसून बसून कंटाळून गेलेली बच्चेकंपनी कधी एकदा शाळेला प्रारंभ होते याची वाटच पाहत होती. नवा वर्ग, नवे पुस्तक, मित्रही नव्हे आणि यावर्षी शिक्षक सुद्धा नवे मिळाले आहेत. त्यामुळे शाळेला जाण्याची उत्सुकता मुलांमध्ये होती. ते वास्तव चित्र विविध ठिकाणी संपन्न झालेल्या प्रवेशोत्सव बातमीच्या आधारावर कळून आले. काही ठिकाणी नवागत मुलांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले तर काही ठिकाणी प्रभातफेरीच्या माध्यमातून नवागतांचे स्वागत करण्यात आले. काही शाळेत गुलाबाचे फुल देऊन आणि मोफत पुस्तके वाटप करीत नवीन विद्यार्थ्यांचे उल्हासात स्वागत करण्यात आले. राज्यातील एका शाळेने तर नवीन विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीमधून गावात मिरवणूक काढली. या सर्व घटनेमागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे मुलांना शाळा म्हणजे तुरुंग वाटता कामा नये. त्यांनी शाळेत दररोज आनंदात यावे आणि आनंदात जावे. त्यांच्या मनावर कसल्याच प्रकारचे दडपण राहू नये. बहुतांश वेळा पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थीच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न डोकावतात. आई-वडिल आणि घर सोडून राहणे त्यांना अवघड वाटते. दिवसभर कुटुंबाचा सहभाग व मोकळ्या जागेत विविध खेळ खेळलेले मूल जर सहा तास शाळेत राहू लागले तर त्यास कठीण वाटणारच, यात शंका नाही. त्यास्तव नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांवर दडपण येऊ नये यासाठी शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार होण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा केला जातो. ज्यात सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केल्या जाते. मुलांना सर्व काही नवीन मिळाले जसे की पुस्तक, वह्या, पेन, वर्गमित्र, पिशवी, शिक्षक परंतु एक जुना मित्र मात्र जशास तसा मिळाला ते म्हणजे अभ्यास.
अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. शाळेत शिकविलेला भाग घरी गेल्यानंतर उजळणी करणे आवश्यक आहे. अशी जी मुले घरी जाऊन अभ्यास करत असतात त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात, म्हणजेच त्यांना ज्ञान मिळते. परंतु बहुतेक वेळा शाळा सुटल्यानंतर मुले घरी जातात, दप्तर घरात भिरकावून फेकतात आणि मित्रांसोबत खेळायला बाहेर पडतात. दिवे लागणीची वेळ होते तरी घरात परतण्याचा नाव घेत नाहीत. तुळशीसमोर दिवा लागल्यानंतर खेळून खेळून थकूनभागून मुले घरात येतात. स्वयंपाक तयार असतोच, त्यामुळे गरमागरम जेवतात तोपर्यंत त्यांची  झोपण्याची वेळ होते आणि शाळेत काय काय शिकविले याचा मागोवा न घेता म्हणजे अभ्यास न करता झोपी जातात. पुन्हा सकाळी उशिरा उठणे व शाळेची तयारी, त्यात अभ्यासाला वेळच नसतो. त्यामुळे अभ्यास नावाचा मित्र त्यांच्यापासून दुरावल्या जातो. संकट काळात मदत करणारा तोच खरा मित्र असे म्हटले जाते आणि अभ्यास या व्यवस्थेत तंतोतंत बसतो असे वाटते. जी मुले अभ्यासाला मित्र बनविली आहेत त्यांना जीवनात आलेली संकटे काही वाटत नाहीत आणि याउलट अभ्यासाला मित्र न मानणारे मंडळी लहान-लहान संकटात सुद्धा घाबरून जातात. संकटाना तोंड द्यायची त्यांच्यात शक्तीच नसते. त्यासाठी अभ्यास सर्वात महत्त्वाचे आहे. पहिल्या वर्गापासून ते पीजीपर्यंतच्या शिक्षणात अभ्यास अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभ्यास म्हणजे सराव, त्यास सवय असेसुद्धा म्हटले जाते. सवयीचे दोन प्रकार आहेत, एक चांगली आणि दुसरी वाईट.  तर अभ्यास हे एक क्रमांकाच्या प्रकारात म्हणजे चांगल्या सवयीमध्ये मोडणारी आहे. अभ्यासाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी आजीवन विद्यार्थी तर होतेच शिवाय वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याचा त्यांना विलक्षण छंद होता. म्हणूनच त्यांच्या जयंतीच्या दिवशी सलग अठरा तास अभ्यास करून त्या महामानवाला अभिवादन केले जाते. अश्या उपक्रमातून आपण सर्वांनी एकच बोध घ्यावा, ते म्हणजे सदोदित व नियमित अभ्यास करणे. अभ्यास करण्यात आळस किंवा कंटाळा केला तर कितीही चांगली शाळा, शिक्षक व शिकवणी असूनही त्याचा विद्यार्थ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
अभ्यासात नियमितपणा व सातत्यपणा या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यार्थी शालेय वेळापत्रकाचा ज्याप्रकारे तंतोतंत पालन करतो त्याच धर्तीवर स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ठराविक ठिकाणी ठराविक वेळी ती क्रिया अगदी सहज घडते. आपले मन देखील ते ठरविलेले कार्य करण्यासाठी तयार असते. त्यासाठी रोजचा अभ्यासाची वेळ सर्वप्रथम ठरविणे आवश्यक आहे. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करण्याची पद्धत भविष्यात घातक ठरू शकते. त्यामुळे ठरवून अभ्यास करण्याची सवय आपल्या मनाला चांगली सवय लावून जाते. सवयीचे रूपांतर शिस्तीत झाली की मग अभ्यासासाठी वेळ राखून ठेवण्याची गरजच राहत नाही. आपण खेळण्यासाठी वेळ काढतो. चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढतो. मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढतो. टीव्हीवरील सिरीयल बघण्यासाठी वेळ काढतो. या सर्व क्रिया अर्थातच आपण आपल्या मित्रांसोबत करत असतो. त्यामुळे घरातील सर्वच मंडळी आपणाला दोष देतात. हे पोरगा काही चांगला नाही, त्याच्यामुळे माझं लेकरू वाया जात आहे, एवढेच नाही तर अशा मुलासोबत न राहण्याची तंबी सुद्धा देतात. यांऐवजी आपण सर्व मित्र आपल्या ठराविक वेळानुसार अभ्यासासाठी एका मित्राच्या घरी एकत्र येऊन गटात अभ्यास केल्यास कुटुंबातील मंडळी आपणास चांगले म्हणतील की वाईट, अर्थातच चांगले म्हणतील. चार-पाच मुलांचा गट करून अभ्यास करण्याची सवय आपण लावून घ्यावी. आजपर्यंत जेवढे ही यशस्वी व्यक्ती झाले आहेत त्यांच्या जीवनात अभ्यासाचा सिंहाचा वाटा आहे, हे कळते. तेव्हा चला तर मग यावर्षी आपण आपल्या अभ्यासाचा वेळापत्रक तयार करूया आणि त्या अनुषंगाने मित्रांच्या गटातून दररोज न चुकता नियमितपणे अभ्यास करण्याचा संकल्प करु या. गटात अभ्यास करण्याचा फायदा काय झाला ? अभ्यासाशिवाय कोणताही पर्याय नाही हे आपल्या मित्रांना सांगण्यास विसरू नका. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...