Tuesday, 8 May 2018

तंत्रज्ञान दिवस

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन त्यानिमित्त प्रासंगिक लेख

*मोबाईल क्रांती आणि परिणाम*

एकविसाव्या शतकातील संगणक व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल या तंत्रज्ञानाचा शोध आणि विकासामुळे मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, यात संगणक आणि  मोबाईलचा सुद्धा आज समावेश झाला आहे. मोबाईल या तळहाताएवढ्या असलेल्या यंत्राने संपूर्ण जगाला खिशात घातले आहे. घरात एक तरी मोबाईल नाही असे एक ही घर आज शोधूनही सापडत नाही. घरात जितके सदस्य असतील तेवढ्याकडे मोबाईल नावाची वस्तू असतेच असते. पदोपदी त्याच्याशिवाय आज अनेक काम खोळंबत आहेत असे प्रत्येकाला वाटत आहे. एका क्लिकवर जगातील कुठलीही माहिती क्षणात मिळणे आणि हव्या त्या व्यक्तीशी क्षणात संपर्क साधणे ही किमया या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहज, सुलभ आणि सोपे झाले आहे. यामुळे मानवांची बरीच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास वाचणे किंवा त्रास कमी झाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पूर्वी गावात एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर गावातील आठ-दहा लोकांना पैसे देऊन त्यांच्याकरवी अंत्यविधीचा निरोप त्यांच्या नातलगापर्यंत पोहोचविल्या जात असे. दूर अंतरावर असलेले नातेवाईक अंत्यविधीचा निरोप मिळाल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी तेरवीचा दिवस सुद्धा उजाडत असे, असे काही अनुभव पूर्वीचे लोकं देतात.  दळणवळण व माहिती तंत्रज्ञान यांचा प्रचार व प्रसार या काळात झाला नव्हता त्याकाळातील वरील स्थितीचा अनुभव आजच्या काळात नक्कीच लागू पडत नाही. कारण आज दळणवळण सोबत माहिती तंत्रज्ञानात सुद्धा लक्षणीय अशी प्रगती झाली आहे. त्यामुळे आज गावात कोणी मृत्यू पावला तर त्या संबंधीचे निरोप देण्यासाठी लोकांना नातलगाकडे पाठवण्याची काही आवश्यकता नाही. करण मोबाईलमुळे हे काम खुप सोपे झाले आहे. त्याहीपुढे जाऊन फेसबुक किंवा व्हाट्सअप्पसारख्या सोशल एप्स वापर करून सुध्दा आपला निरोप पाठविता येऊ शकतो. यामुळे आज जग जवळ आल्यासारखे वाटत आहे. मोबाईल हे एक असे यंत्र आहे जे की लहान मुलांना आकर्षित करतेच याशिवाय घरातील प्रत्येक सदस्याना वेड लावते. जोपर्यंत आपण मोबाईलपासून दूर राहू आपणाला सुख, समाधान, चैन आणि आनंद या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. परंतु जसेही आपण मोबाईलधारक बनतो आपले सुख, समाधान, चैन आणि आनंद या गोष्टी हळूहळू आपणापासून दूर होण्यास सुरुवात होते. 24 तास त्या मोबाईलच्या तंद्रीत कधी फेसबुक अपडेट करण्यात तर कधी व्हाट्सआप वरील मेसेज वाचण्यात, व्हिडीओ बघण्यात आपला वेळ जात असतो. सोशलमीडियात अधून-मधून कंमेंट करावेच लागते आणि एखादी तरी पोस्ट करावेच लागते या चिंतेत सतत मोबाईलला चिकटून राहण्याची सवय कधी लागते हे कळतच नाही. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाचा वापर केला नाही तर सतत तगादा लावतात. त्यामुळे युवकांना स्मार्टफोन मोबाईलधारक बनणे गरजेचे आहे असे वाटते. 
आज या मोबाईलमुळे घरात अनेक गोष्टी सहज घडून येत आहेत. पूर्वी प्रत्येक घरात आलार्मची एक घड्याळ रहात असे. ज्यामुळे पहाटे अभ्यासासाठी उठणे सोपे बनत होते. आज मात्र त्या आलार्मच्या घड्याळाची काहीएक गरज उरली नाही. कारण मोबाईल मध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. आलार्म सोबत पूर्वी प्रत्येकाच्या घरी रेडिओ नावाची करमणूक करणारी वस्तु हमखास आढळून येत असे. ज्या काळात वृत्तपत्र सहज उपलब्ध होत नसत त्याकाळात रेडिओवरील सकाळ व सायंकाळच्या बातम्या ऐकल्याशिवाय चैन पडत नसे. परंतु आज घराघरातील रेडिओ धूळखात पडलेला असून मोबाईल वरील रेडिओने सर्वांना कानसेन बनवून टाकले आहे. सकाळी सहा वाजता दारावर वृत्तपत्र येण्याची आज व्यवस्था आहे तरी त्याच्याअगोदर मोबाईल द्वारे विविध वृत्तपत्र वाचन करून वाचक मोकळा होत आहे. त्यासाठी त्याला वाचनालयात जाण्याची गरज नाही. हाताच्या मनगटावर घड्याळ बांधल्याशिवाय घराबाहेर कोणी बाहेर पडत नसे.  किती वाजले ? असे कोणी विचारले असता लगेच डोळ्यासमोर डावा हात आणून वेळ सांगण्याचे दिवस आज राहिले नाहीत. आज जो तो किती वाजले ? असे विचारले असता मोबाईल काढून वेळ सांगतात. घड्याळयाला पूर्वी चावी द्यावी लागायची किंवा त्यात सेल टाकावी लागायची. या दोन्ही गोष्टी मोबाईलने मोडीत काढली आहे. प्रवासात जाताना उच्चभ्रू मंडळी कानात काहीतरी ठेवून गाणे ऐकायचे आणि त्यास वॉकमन असे म्हटले जायचे. सामान्य व्यक्तीला तेव्हा वाटायचं की मीसुद्धा वॉकमन घेईन. कारण चालता-फिरता गाणे ऐकण्याची मजा काही औरच. परंतु हे वॉकमन सामान्य लोकांना काही परवडण्यासारखे नव्हते. कारण वॉकमनला चालविण्यासाठी कॅसेट आणि मसाला म्हणजे सेलची गरज भासत असे. आठ-दहा गाणे ऐकले की ते सेल समाप्त व्हायचे. त्यामुळे हे वॉकमन फारच खर्चिक होते त्यामुळे गरीबांची हौस मात्र पूर्ण होत नसे. मात्र या मोबाईलने गरिबांची हिच हौस अशी काही दूर केली वॉकमन नावाचे यंत्र आज शोधूनही सापडत नाही. मोबाईलमध्ये भरपूर गाणे साठवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी यासारखे अनेक यंत्र मागे पडले. त्यामुळे आज घरातील वरील वस्तू काही प्रमाणात दिसून येतात असे म्हणण्यापेक्षा दिसतच नाहीत. या छोट्याशा मोबाईलने अशी क्रांती केली की, बाजारपेठेतील अनेक वस्तूंना हद्दपारच केले नाही तर त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आणले. याहीपुढे जाऊन मोबाईल अजून कुणाला हद्दपार करणार हे येणारा काळच ठरवेल. 

तंत्रज्ञानाचा परिणाम :- 
मानवाचा उत्तरोत्तर विकास व्हावा म्हणून विज्ञानाने विविध प्रकारचे संशोधन करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्याचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी केला जातो तेवढाच वाईट कामासाठी सुद्धा केला जातो. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची सामाजिक स्थिती यात तफावत आढळून येते त्याचे एकमेव कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा उत्तरोत्तर होत असलेला विकास. पूर्वी 25 पैश्यातील जे की आज पन्नास पैसे झाले आहे अशा पोस्टकार्डावर कळविलेली खुशाली आठवड्यानंतर पोस्टमनचा मदतीमुळे कळत असे. आज मात्र त्या कार्डला कोणी विचारतही नाही. कारण आज मोबाईलच्या संदेशाच्या माध्यमातून क्षणात आपली खुशाली किंवा माहिती स्वकीय मंडळींना दिला जातो. याचा वापर चांगला होत असेल तर खरंच हे उत्तम आहे. परंतु काही मंडळी याचा गैरवापर करून मुलींचा छळ काढण्यासाठी, अश्लील व घाणेरडे संदेश पाठवून या माध्यमाला खराब करण्याचा प्रयत्न करीत असतात. यावर कुठे तरी नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सण-उत्सव किंवा समारंभानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी, वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो त्यांच्याही शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हा प्रकार अगदी चांगला वाटतो. आजकाल तर काही मंडळी लग्नाच्या असो वा वास्तुशांती यासारख्या मोठ्या किंवा छोट्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका म्हणून याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपला वेळ आणि शारीरिक श्रम दोन्ही वाचवीत आहेत. ज्या लोकांना या माध्यमाचे महत्व किंवा किंमत अजून पर्यंत कळालेले नाही अशा अज्ञानी, अडाणी,  निरक्षर लोकांकडून याचा गैरवापर वाढत आहे. मोबाईलमध्ये असलेल्या कॅमेराचा वापर चांगला  होण्याऐवजी त्याचे गैरवापरच जास्त होताना दिसून येत आहेत. फेसबुक आणि व्हाट्सअप्प जगात खूपच लोकप्रिय आहे मात्र याठिकाणी कोणतेही फोटो किंवा संदेश पोस्ट करून त्यांचे नाव बदनाम केले जात आहे तसेच समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही महाभाग मंडळी पॉर्न फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करीत आहेत ज्यामुळे पाहणाऱ्याच्या मनात उत्तेजित भावना निर्माण होणे साहजिकच आहे.
पूर्वी चित्रपट पाहायचे म्हटले तर थिएटरमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे थिएटर सुद्धा हाऊसफुल्ल राहात होती. आज मात्र त्याच्याविरुद्ध बघायला मिळत आहे. विविध वाहिन्या, डीव्हीडी, सीडी या माध्यमातून प्रत्येक जण घरी हवे ते चित्रपट पाहू शकत होते. याहीपुढे जाऊन संगणक आणि इंटरनेटमुळे एका क्लिकवर कोणतेही चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्यातल्या त्यात मोबाईलने तर कहरच केला आहे. संगणकाला काही मर्यादा तर होत्या परंतु स्मार्टफोनमुळे सर्वच मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. कुठेही आणि कोणत्याही वेळी इंटरनेटचे पूर्ण नेटवर्क मिळत असल्यामुळे याचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. पूर्वी लोकं ब्लू चित्रपट पाहताना अमुक लोकांना अटक करण्यात आली अशा मथळ्याचे बातम्या वाचण्यात येत होते. आज मात्र ते वाचन करण्यात येत नाहीत कारण ब्लू चित्रपट असो किंवा इतर चित्रपट सर्व प्रकारची सेवा स्मार्टफोनच्या स्वरूपात खिशात असल्यावर कोण कशाला थिएटरमध्ये चोरून चित्रपट पाहिल. मात्र अश्या बातम्या ऐवजी आज दररोज विनयभंग आणि बलात्काराच्या घटना वाढीस लागले आहेत. दिल्लीत धावत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता. शासनाने त्यावर कायदाही तयार केला परंतु बलात्कार थांबण्याऐवजी वाढू लागले आहेत. वास्तविक शासनाने मोबाईलच्या नेट वापरावर बंदी आणायला पाहिजे. आजच्या मोबाईल नेट वापरणाऱ्या व्यक्तींच्या मनात वारंवार अश्लील व बीभत्स चित्र आणि उत्तेजना निर्माण होत आहे. या उत्तेजित मनाला शांत करण्यासाठी हे लोक बलात्कारासारखे उपाय शोधत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. देशातील बलात्कार किंवा विनयभंग सारखे अनैतिक गोष्टी रोखायचे असेल तर सर्वात प्रथम मोबाईल वरील इंटरनेट बंद करणे गरजेचे आहे. हे होत नसेल तर निदान सर्वच पॉर्न साईटवर बंदी आणावी. जर कोणी तसे अश्लील व बीभत्स चित्रपट पोस्ट केल्यास त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करावी. जर हे असेच चालू असेल तर भविष्यकाळ अवघड राहणार आहे. अश्या साईटवर बंदी घातली गेली तरच भविष्यात  संस्कारित पिढी बाहेर पडू शकते अन्यथा कुसंस्कारी पिढीच बाहेर पडणार यात शंका नाही. तंत्रज्ञानाचे संशोधन विकासासाठी व्हावा, त्यातून वाईट असे घडू घडू नये आणि अन्यथा त्याचा शोध न लागलेला बरा असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...