असा छंद असा ध्यास
तब्बल तीस देशातील दुर्मिळ नाणी, नोटाचा संग्रह
छंद मग कोणताही असो, तो पुर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम जि. नांदेड येथे कार्यरत असलेले राजेश जेटेवाड बरबडेकर यांनाही अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा संग्रह करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.
'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा' मानून अतिशय नम्र असलेला एक आरोग्य सेवक आपल्या सेवकपदाची जबाबदारी सांभाळत स्वत:चा छंद जोपासण्यासाठी मिळेल त्या वेळेत, जमेल त्यांच्याकडून, वाटेल तेवढे पैसे देऊन देशी, विदेशी नाणी व नोटांचे संकलन करतो.
अमेरिका, आस्ट्रेलिया, अरब, ओमान, बेल्जियम, बेंकाॅक, बांग्लादेश, कॅनडा, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, इराक, केनिया, कुवैत, मलेशिया, मेक्सिकोस, माॅरिचश, मालदीव, नेपाळ, पिलिपिन्स, पाकिस्तान, श्रीलंका, सिंगापुर, सौदी अरेबिया, आदी देशासह १९१९ पासूनची भारतीय नाणीही त्यांनी संकलित केली आहेत.
विशेष बाब म्हणजे एवढ्यावरच न थांबता आपल्या दर्जेदार लेखणीतून कवी मन देखील जागविले आहे. सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांना एक दुर्मिळ नोट सापडली अन् तेव्हापासून दुर्मिळ नाणे, नोटा संकलित करण्याचा छंद लागला. तो आजतागायत कायम आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगतांना त्यांनी अनेक संकटांवर मात करित सेवेत अतिशय नम्रपणा जपला आहे. त्यांच्या बालपणातच आई अपघाती मृत्यूने त्यांना सोडून गेल्या. प्रत्येक रुग्णात आई शोधणा-या जेटेवाड यांनी या सेवेला सर्वोच्च स्थानी मानले आहे.
एक आना, दो आना, एक पैसा, एक नया पैसा, दो पैसे, दो नये पैसे, तीन पैसे, पाच पैसे, पाच नये पैसे, दहा पैसे, विस पैसे, पाव रुपया, चार आना, पच्चीस पैसे, आधा रुपया, एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, आदी एक आण्यापासून ते दहा रुपयाच्या नाण्यापर्यंत. जुन्या नवीन एक रुपयाच्या नोटा पासून ते नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या संग्रही आहेत.
विशेष म्हणजे शेवटच्या तीन क्रमांकात १११, ३५८, ७८६, या नोटासह ०००००१ या क्रमांकाची नोट सर्वांचे लक्ष वेधून घेते. पुर्वीच्या जुन्या एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, व शंभर रुपयांच्या नोटांवर 'अशोक स्तंभ' आहे. त्या नोटासह आताच्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची फोटो असलेल्या सर्व नोटा संग्रही आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ पासून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने चलनात आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांवर समोरील बाजूला 'महात्मा गांधी' यांचा फोटो तसेच पाठीमागील बाजूला 'स्वच्छ भारत. एक कदम स्वच्छता की ओर' असा संदेश पहावयास मिळतो. जुन्या व नवीन एक रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव यांची स्वाक्षरी तर त्या पुढील मुल्याच्या नोटांवर गव्हर्नर यांची स्वाक्षरी पहावयास मिळते. जेटेवाड यांच्या संग्रहात आय. जी. पटेल, रा. ना. मल्होत्रा, एस वेंकटरमणन, सी. रंगराजन, बिमल जालान, या. वे. रेड्डी, दु. सुब्दाराव, रघुराम जी राजन, रतन पी वातल, उर्जित आर पटेल, आदी गव्हर्नर यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या वेगवेगळ्या मुल्याच्या नोटा संग्रहात जपून ठेवल्या आहेत.
ऑगस्ट २०१७ मध्ये प्रथमच स्वातंत्र्यानंतर २०० रुपयाची नोट अस्तित्वात आली. दोनशे रुपयाच्या तेजस्वी पिवळ्या रंगाच्या नोटेसह ५० रुपयाची नवीन नोट चलनात आली. त्याही नोटा संग्रही आहेत.
विदेशी नाणी, नोटासह आपल्या देशातील एक, दोन, पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे, हजार आणि दोन हजार रुपये अशी जवळपास अकरा वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटाही त्यांच्या संग्रहात जपून ठेवल्याचे पहावयास मिळते.
श्री माता वैष्णोदेवी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर, जगतगुरु श्री नारायणा, गुरुदेव, बृहदीश्वर मंदिर, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद, स्वामी चिन्मयानंद, जन्म शताब्दी निमित्त काढण्यात आलेली विशेष नाणी त्यानी जतन करून ठेवली आहेत.
छत्रपती शिवाजी, महाराणा प्रतापसिंह, वीर दुर्गादास या वीर महापुरुषांचीही नाणी त्यांनी जपून ठेवले आहेत. यासह महात्मा गांधी, शहीद भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, यांच्या जन्मशताब्दी निमित्त काढण्यात आलेली नाणी विशेष लक्ष वेधून घेतात.
प्रथम स्वतंत्रता संग्राम १५० वर्ष, कुका आन्दोलन के १५० वर्ष, दांडी यात्रा के ७५ वर्ष, स्वतंत्रता का ५० वा वर्ष, १९६५ वीरता और बलिदान सामारिक अभियान का स्वर्ण जयंती वर्ष २०१५, ही नाणी पहातांना अंगावर शहारे येतात.
भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, कु कामराज, मदर तेरेसा, डॉ. बी. आर. आंबेडकर, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकनायक जयप्रकाश नारायण, मदनमोहन मालवीय की १५० वी जयंती निमित्त काढण्यात आलेली विशेष नाणी जेटेवाड यांनी जीवापाड जपून ठेवली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ दादाभाई नवरोजी, देशबंधु चित्तरंजन दास, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अरविंद, लुई ब्रेल, रवींद्रनाथ टागोर, मोतीलाल नेहरू, सी. सुब्रमणियम, पेररिज्ञर अन्ना, संत अलफोन्सा, बेगम अख्तर, आचार्य तुलसी, होमी भाभा जन्म शताब्दी निमित्त विशेष नाणी काढण्यात आली होती. ती नाणीही त्यांच्या संग्रहात आहेत.
येवढेच नाही तर त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ५० व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली नाणी सुध्दा जपून ठेवली आहे. यासह आंतरराष्ट्रीय परिवार वर्ष, स्वास्थ मां से स्वास्थ्य शिशु, खुशहाल बालिका भविष्य देश का, छोटा परिवार खुशियाँ अपार, ही नाणी परिवाराबद्दल बरीच प्रेरणा देणारी आहेत.
श्रम जगत, मत्स्य उद्योग, इलाहाबाद उच्च न्यायालय का १५० वां वार्षिकोत्सव, भारतीय स्टेट बैंक, भारतीय रिजर्व बैंक प्लैटिनम जयंती, छोटे किसान, जैविक विविधता विश्व खाद्य दिवस, भविष्य के लिए भोजन, जल जीवन का आधार विश्व खाद्य दिवस, भारतीय कृषि का विश्व व्यापीकरण एग्री एक्सपो ९५, नवम एशियाई खेल दिल्ली १९८२, ८९ वा अंतर संसदीय संघ सम्मेलन १८८९-१९९३,भारत की संसद के ६० वर्ष १९५२-२०१२, दक्षिण अफ्रीका से वापसी शताब्दी स्मरणोत्सव १९१५-२०१५,अंतरराष्ट्रीय योग दिवस २०१५, रेल्वे १५० गौरवपूर्ण वर्षे २००३, या निमित्ताने काढण्यात आलेली विशेष नाणी काळजीपूर्वक जपून ठेवली आहेत.
यासह पोस्टाची तिकिटेही त्यांच्या संग्रहात आहेत. त्यांनी सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. त्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना फळे - खिचडी वाटप, 'दारु नको, दुध प्या व्यसनमुक्त व्हा' आदी उपक्रम हाती घेतले आहेत. 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' समजून अनेक वेळा रक्तदान केले आहेत.
दुर्मिळ नाणी, नोटाचे व पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस. ध्येयवेडया जेटेवाड यांच्या या लाखमोलाच्या छंदाला घरच्यासह नातेवाईक व मित्र परिवारांनी मोठी साथ असल्याचे त्यांचे मित्र परिवार सांगतात.
गरिबी, दु:ख, संकटे अनुभवलेल्या जेटेवाड यांना सामाजिक दायित्व पार पाडण्याची तळमळ आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो कविता लिहिल्या असून त्यांचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या असून त्यांच्या अनेक काव्यरचना विविध दैनिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत.
दुर्मिळ नाणी, नोटाचे प्रदर्शन भरवून त्याद्वारे मिळालेल्या पैशातून सामाजिक कार्यासाठी तो उपयोगात आणावा असा त्यांचा मानस आहे.
शब्दांकन : ना. सा. येवतीकर,
स्तंभलेखक, नांदेड
No comments:
Post a Comment