Wednesday, 7 February 2018

जगाला प्रेम अर्पावे .....!

जगाला प्रेम अर्पावे

प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. त्याशिवाय संबंध टिकूच शकत नाही. क्रोधी,  रागीट किंवा तापट स्वभावाचा व्यक्तीला सुद्धा प्रेमाने जिंकता येते शत्रुचे मन प्रेमाने वितळवितात येते. प्रेमात एवढी प्रचंड शक्ती आहे की, त्याच्या स्फोटाने संपूर्ण जग हादरून जाईल. संपूर्ण मानव जातीचे आस्तित्व ह्या प्रेमामुळेच टिकून आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जीवनातून प्रेमाला वजा केल्यास उरते काय तर फक्त भकासपणा. प्रेमामुळे काही गोष्टी आपणास शिकण्यास मिळतात. त्यातून काही बोध घेतल्यास नक्कीच आनंद मिळेल.

प्रेम हे खरेदी किंवा विक्री करून मिळणारी वस्तू नाही, हे सर्व प्रथम लक्षात घ्यावे. प्रेमात कसल्याच प्रकारची देवाण-घेवाण नसते अर्थात प्रेमात काही मोबदला मिळेल अशी अपेक्षा करणे साफ चुकीचे आहे. ज्या ठिकाणी प्रेमाच्या मोबदल्यात काही तरी मिळणे, परतफेडीची आकांक्षा असेल त्याठिकाणी खरे प्रेम बघायला मिळेल काय ? ते प्रेमाचे एक सोंग असते. आई आपल्या मुलावर प्रेम करताना कसल्याच प्रकारच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही. अपेक्षा ठेवून केलेले प्रेम म्हणजे निव्वळ दुकानदारीच होय. जिथे पैसा घ्यायचा माल द्यायचा एवढीच क्रिया होते. शुद्ध व पवित्र प्रेम कोणत्याच वासनेने गढूळ होत नाही. खऱ्या प्रेमाला लाभाच्या कल्पनेचा लवलेशही नसतो. साधी कल्पना ही त्यांच्या मनात येत नाही.  त्यास्तव प्रेम केल्याने एक बाब प्रकर्षाने शिकायला मिळते ती म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी प्राण गेले तरी बेहत्तर परंतु त्यांचे रक्षण करतोच.  बाजीप्रभु देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमामुळेच शत्रूला रोखून धरले म्हणूनच ती खिंड पावन झाली.

यावरून प्रेम करणाऱ्याच्या जीवनात भय नावाची कोणतीच चीज राहत नाही. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला निर्भयपणे तोंड देण्याची शक्ती ह्या प्रेमामुळेच निर्माण होते. " जब प्यार किया तो डरना" क्या ही धाडसी भावना तयार होते. त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रीती आहे ज्यांचाविषयी आपल्या मनात प्रीती आहे, त्यांच्या विषयीची सारी भीती क्षणात नाहीसे होते. खरे प्रेम सर्व प्रकारच्या भयावर मात करीत असते. प्रेमाचा स्वभावच मुळी असा आहे की, मनातील संपूर्ण भीती नष्ट करण्यास मदत करते. एकमेकांच्या उत्कटतेमुळे प्रेमाची उत्कटता लक्षात येते. आपल्या पत्नीच्या प्रेमाचा उत्कटतेमुळे एका संताने सापाला दोर समजून त्याचा आधार घेतला. त्यांना त्या प्रेमात काहीही दिसत नव्हते. असे बोलल्या जाते की, याच प्रसंगातून ते पुढे संत झाले. 

आपल्या मनात भय केव्हा निर्माण होते ? आपण जितके संकुचित, स्वार्थी आणि क्षुद्र बनत जातो तितके आपल्या मनात भय वाढत जाते. चोराच्या मनात चांदण्याप्रमाणे मनात किंचितही जरी भय शिल्लक असेल तर आपण दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. कारण प्रेम आणि भय एकाच हृदयात एकत्र नांदू शकत नाहीत. भक्त प्रल्हाद यांचे भगवंतावर निस्सीम प्रेम होते त्यामुळे वडील हिरण्यकश्यप यांनी  दिलेल्या कठीणातल्या कठीण शिक्षेला सुद्धा ते न डगमगता, न घाबरता हसतमुखाने सामना केला.

कुणी आपल्या जीवनात अजुन एक बाब घडते ती म्हणजे एकमेकांत असलेली स्वच्छ व निर्मळ एकनिष्ठता. आपले प्रेम हे सर्वोच्च आहे अशी भावना जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत खरे प्रेम निर्माण होणे शक्य नाही. प्रेमामध्ये असलेली विश्वासहर्ता अन्य कुठेच बघायला मिळत नाही. याच विश्वासाच्या बळावर जीवनातील अनेक संकटांना निर्भयपणे तोंड देता येऊ शकेल. परंतु जे प्रेमी प्रेमात विफल झाल्याने आत्महत्या करतात, आपल्या अमुल्य जीवांचे बळी देतात, ते कसले आले प्रेमीयुगल ? यांचे एकमेकांवर खरोखर प्रेम नसतेच मुळी, ते वरवरचे असते. संसाराचा गाडा चालविताना उभयंताचे एकमेकावर प्रेम म्हणजेच एकनिष्ठता. एकमेकांवर विश्वास नसेल तर घरात चालत असलेली धुसफूस चव्हाट्यावर यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच प्रेमामुळे इतरांचा विश्वास संपादन करणे सोपे आहे.

आपण आपल्या स्वकियावर, नातलगांवर, मित्रांवर प्रेम करीत असतो.परंतु असेच प्रेम दीन-दुबळ्या, दिव्यांग, असहाय्य लोकांवर केल्यास त्यांच्या जीवन जगण्याची आस निर्माण होते. दिव्यागांना मिळालेल्या प्रेमाच्या आधारावरच ते जीवनात ताठपणे उभे राहू शकतात.  असहाय किंवा पंगू लोकांना प्रेमाने हाक दिल्यास ते तनाने नाही परंतु मनाने निश्चित पळू शकतात. याबाबतीत संस्कृतमधील श्लोक म्हणजे मुकं करोती वाचालम् पंगूम लंगयते गिरीम बरेच काही सांगून जाते. आंधळ्या माणसाची पांढरी काठी आणि लंगड्या माणसाचे पाय बनून त्याला योग्य रस्ता दाखवून दिशा देण्याचा एकदा तरी प्रयत्न जरूर करावे.सव्वाशे कोटी लोकांच्या देशात  आपले सारे लक्ष तरुण व तरुणीच्या प्रेमाकडेच जास्त जाते. यापेक्षा समाजातील गोरगरीब, पीडित, असहाय्य, दिव्यांग आणि अनाथाना प्रेमाचा आधार देणे हाच खरा मानव जातीचा धर्म आहे.  सिंधुताई सपकाळ हे नाव आता जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झाले ते फक्त अनाथांवर केलेल्या प्रेमामुळेच. परम पूज्य साने गुरुजी आपल्या कवितेत हाच संदेश सांगितला आहे की 

"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे "

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

4 comments:

  1. खूप छान लेख । प्रेमाची विस्तृत व्याप्ती अशीच असते ।

    ReplyDelete
  2. एक चांगला सुविचार पण द्यायला पाहिजे याच्या बरोबर

    ReplyDelete
  3. खूप छान प्रेमाचा खरा अर्थ आहे

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...