Saturday, 3 June 2017

*आर्थिक व्यवहार सुरळीत होतील ?*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा वर बंदी आणली आणि एका रात्रीत देशामध्ये अनेक लोकांच्या संकटाला सुरुवात झाली. फक्त पन्नास दिवसात सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन पंतप्रधानानी जनतेला दिले. मात्र तसे काही झाले नाही. या नोटाबंदीच्या काळात अनेक लोकांना फटका बसला तर काही लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांचे घर वाऱ्यांवर आले. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला अच्छे दिन पाहण्यास मिळेल असे वाटत होते मात्र आज दोनशे दिवसाचा काळ उलटला तरीही बँकेतील आर्थिक व्यवहार अजुनही सुरळीत झाले नाही. बँकेत पैश्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहून देखील पाहिजे तेवढी रक्कम मिळत नाही त्यामुळे जनता पुरती वैतागली आहे. काही ठिकाणी तर काउंटरला क्रमांक येईपावेतो पैसे संपून जात आहेत त्याचा मनस्ताप वेगळाच आहे. मोंढा मार्केट मध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विकल्यानंतर त्यांच्या हातात महिना दीड महिन्यानंतर तेही पाच-पाच हजार रूपयाच्या हिशोबात मिळाले त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. स्वतःच्या हक्काचे पैसे आपल्या बँक खात्यावर असून ही वेळेवर मिळत नसल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.
त्याच सोबत बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी एटीएम निर्माण करण्यात आले होते. मात्र नोट बंदीचा फटका याठिकाणी सुध्दा जाणवत आहे. पूर्वी हवी तेवढी रक्कम एटीएममधून मिळत असे मात्र नोटाबंदी जाहिर झाल्यापासून एटीएमवर निर्बंध घलण्यात आले आणि एटीएममध्ये पैश्याचा तूटवडा जाणवू लागले. सुरुवातीला फक्त अडीच हजार, त्यानंतर चार हजार आणि मग आज चाळीस हजार रुपया पर्यंत रक्कम उचलू शकत आहे मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने जनता त्रस्त होत आहे. रोज एटीएमकडे नागरिक चकरा मारत आहेत मात्र त्यांच्या पदरी निराशेच्या खेरीज काहीच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याउलट बाजुच्या तेलंगाना राज्यात एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे दिसून येते. या भागातील काही गरजू मंडळी थेट तेलंगाना मध्ये जाऊन आपल्याला हवी असेल तेवढी रक्कम आणित आहेत. मात्र विनाकारण जाण्यायेण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
ज्यांच्या घरी एखादे लग्न कार्य किंवा कार्यक्रम आहे ती मंडळी मात्र पैश्याअभावी पुरती वैतागली आहे. प्रत्येक कामाला पैसे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे शक्य नाही. विविध कारणामुळे जनतेला ऑनलाइन व्यवहार देखील अडचणीचे ठरत आहे. बहुतांश दुकानात अजुनही स्वीप मशीन उपलब्ध केल्या गेले नाहीत आणि ज्या ठिकाणी मशीन उपलब्ध केले आहेत ते शंभरामागे दोन रुपये जास्तीचे बील आकारत आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंट करा म्हणायचे आणि जनतेकडून शंभरामागे दोन रुपये जास्त घेणे हा कुठला न्याय आहे हे ही कळत नाही. आमचे पैसे असून आम्हालाच मिळत नाही ही अवस्था सध्या निर्माण झाली. येत्या एका महिन्यात शेतकरी मंडळीचे शेतातील कामे सुरु होणार आहेत. बी-बियाणे आणि औषधाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातावर पैसा असणे अत्यावश्यक आहे अन्यथा ज्यांच्या साठी एवढा खटाटोप केला तीच व्यक्ती दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कदाचित याचे परिणाम सरकारवर उलटे होऊ नये त्यापूर्वी बँकेतील आणि एटीएममधील स्थिती पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...