Tuesday, 9 August 2016



*मरावे परी कीर्तिरूपे उरावे *

          - नागोराव सा. येवतीकर 
            मु. येवती ता. धर्माबाद
            जि. नांदेड 
            09423625769

आज भारताचा 69 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 15 आॅगस्ट, अर्थात स्वातंत्र्य दिन ! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटविणारे मंगल पांडेे, सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही आम्हाला स्वराज्य पाहिजे असे इंग्रज सरकारला ठासुन सांगणारे पितामह दादाभाई नोरोजी, स्वातंत्र्यसाठी अगदी तरुण वयात सर्वस्व पणाला लावणारे सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग, सायमन कमिशन ला विरोध करणारे प्रथम भारतीय लाला लजपतराय, प्रार्थना समाजाची निर्मिति करून समाजाला व्यपक धर्म तत्वाची ओळख करून देणारे न्यायमूर्ती रानडे,  आपल्या कुशाग्र बुद्धिमतेच्या जोरावर ज्यानी वयाच्या आठरव्या वर्षी पदवी मिळविली आणि देशातील सर्व प्रश्नाना प्राधान्य देऊन त्याची सोडवणूक केली असे ना. गोपाळ कृष्ण गोखले, तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाजाच्या ऐक्यसाठी आणि जागृतीसाठी ज्यानी लेखणीला तलवार केले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यलढा चे प्रमुख ,अहिंसा व सत्याग्रहाचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी, महाराष्ट्रात प्रती सरकार स्थापन करणारे क्रांतीसिंह नाना पाटील ,तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा असे देशातील लोकांना आवाहन करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, भारताचे पोलादी पुरुष म्हणून ज्याची ख्याती अजरामर आहे असे थोर  सरदार वल्लभभाई पटेल , मौलाना अबुल कलाम आझाद, अस्पृश्यता समूळ नष्ट करणारे व दलिताच्या उध्दारासाठी अविरत धडपडणाऱ्या झुंजार व्यक्तिमत्व असलेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरच्या वैभवापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या वैभववर लक्ष ठेवलले लहान मुलांचे आवडते चाचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादीसह अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. भारतीय स्वातंत्र्य युध्दात ज्या महान स्त्रियांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवला वाहले त्यात सरोजिनी नायडू यांचे नाव प्रथम घ्यावे लागते. भारत छोडो आंदोलनात भूमिगत राहून महत्वाचे काम करणाऱ्या अरुणा असफअली, सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाईचे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 

आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. कविवर्य भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, ' जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? ' असा प्रश्न त्या॑नी सर्वांना विचारला  परंतु आपल्या मृत्यूनंतर या जगात काय उरते तर ते फक्त नाव आणि कीर्ती. म्हणून आपल्या माघारी आपले नाव सर्वांनी घ्यावे असे वाटत असेल तर काही जगापेक्षा वेगळे करू या. स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. 








No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...