Saturday, 16 January 2016

एकत्रित लेख दहा

1) तस्मै श्री गुरवे नम:
                           - नागोराव सा. येवतीकर
                               मो. ९४२३६२५७६९

'गुरूब्रम्हा, गुरूविष्णू, गुरूदेवो महेश्‍वर:
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप मोठे आदराचे व मानाचे स्थान आहे. गुरूमुळे जीवनातील अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. म्हणूनच पुरातन काळ म्हणजे रामायण व महाभारताच्या काळापासून गुरूला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या काळातील राजे-महाराजे गुरूच्या सल्ल्याशिवाय पुढील मार्गक्रमण किंवा काम ठरवीत नसत. राजेमंडळी गुरूंना आदर व सन्मान देत असत त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा त्यांचा आदर करीत असत. गुरूच्या मनाविरूद्ध वागल्यास गुरू क्रोधीत होतील, त्यांना संताप येईल आणि रागाच्या भरात शाप देतील अशी भिती सुद्धा लोकांच्या मनात होती. याचाच अर्थ पूर्वीच्या काळी समाजात गुरूचा फार मोठा दबदबा होता. त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करून घेण्याची कला राजा जवळ असणे आवश्यक होती. त्याकाळात गुरूगृही जाऊन विद्या शिकण्याची पद्धत होती ज्यास 'गुरूकूल' पद्धत असे संबोधल्या जाई. परंतु या गुरूकूल मध्ये काही ठराविक लोकांनाच विद्यादान केल्या जात असे. कारण द्रोणाचार्य गुरूंनी एकलव्यास विद्या शिकविण्यास नकार दिला होता परंतु त्याच्या गुरू भक्तीमुळे त्याला ज्ञान मिळविता आले. याचा एक अर्थ आपण असा काढू शकतो की, त्याकाळी सुद्धा गुरूंना शासनाचे (राजांचे) ऐकावेच लागत असे. राजाच्या परवानगी शिवाय राजगुरूला कोणालाही शिकविता येत नव्हते.

कालाय तस्मै नम: नुसार काळ बदलत गेला आणि त्या अनुषंगाने समाज सुद्धा बदलत गेला. गुरूच्या घरी जाऊन शिकण्याच्या पद्धतीत म्हणजे गुरुकूल हळूहळू बदल होत गेला. गुरूची जागा शिक्षकाने घेतली. समाजात आज वेगवेगळया क्षेत्रात वेगवेगळे प्रकारचे गुरू आहेत. मात्र समाजाचा सर्वात जास्त विश्‍वास ज्या गुरूवर आहे तो म्हणजे शिक्षक. परिस्थितीनुसार काळ बदलत राहतो आणि काळानुरूप परिस्थिती बदलते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले, त्यांना शाळेतला गुरू लाभलाच नाही तर ते एवढे मोठे साहित्यिक कसे झाले? गुरूदेव रविंद्रनाथ टागोर एक दिवस शाळेत जाऊन एवढे महान कवी कसे बनले? कवयित्री बहिणाबाई चौधरी एकही दिवस शाळेत न जाता प्रसिद्ध साहित्यिक कसे बनू शकल्या? तर त्याचे उत्तर आहे अनुभव. त्यांचा गुरू होता अनुभव आणि विलक्षण बुद्धीमत्ता यामुळे ते शक्य झाले. परंतु आपण सामान्य असलेले व्यक्ती आपणाला पदोपदी मार्गदर्शन करणारे, दिशा देणारे आणि रस्त्यावरून चालवत नेणार्‍या गुरूची गरज भासते. गुरूविना आपले जीवन अपूर्ण आहे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अपार कष्ट सोसले. लोकांकडून फुले दाम्पत्याचा खूप छळ केला गेला पण त्यांनी शैक्षणिक कार्य थांबविले नाही. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात फुले दाम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपणास गाव तेथे शाळा बघायला मिळत आहे आणि तळागाळातील व्यक्ती सुध्दा शिक्षण घेत आहे.
आज शासनाचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे सध्या जे बोलल्या जात आहे ते महात्मा फुलेंनी सन १८८२ मध्ये हंटर कमिशनच्या समोर दिलेल्या साक्षी मध्ये म्हटले होते की " सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना  मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जावे " परंतु त्यांना त्याकाळी अनेक वाईट प्रसंग आणि अनुभवास तोंड द्यावे लागले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली परंतु त्या ठिकाणी शिकविण्यासाठी कोणीच तयार होईना. शिकविण्याचे काम बर्‍याच जणांना तुच्छतेचे वाटत असे. तसेच शिकविण्याचे काम हे येड्यागबाळ्याचे नाह, त्यासाठी खूप मोठी विद्या जवळ असावी लागते असा समज होता. परंतु जोतिबांनी आपल्या निरक्षर पत्नीला म्हणजे सावित्रीबाईला शिकविले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान दिला. समाजात गुरूला कोणत्या संकटाला, त्रासाला तोंड द्यावे लागत होते याची प्रचिती यावरून आपणाला येते. समाजात हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. शिक्षणाचे महत्व लोकांना कळू लागले. देशातील नेते आणि पुढारी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागले. शिक्षणाविषयी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.' त्याच सोबत ते लोकांना स्वत:चा समाजाचा विकास करायचा असेल तर 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र दिला. त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर श्क्षिणाचा खेडोपाडी दरी खोर्‍यात प्रसार केला. शाळा तर उघडल्या जात होत्या मात्र त्यांना शिकविण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. सन १९९0 च्या दशकापर्यंत मुलांना शिकविण्यासाठी 'शिक्षक' म्हणून नोकरी करण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या फारच कमी होती. कारण या काळात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजलं जात असे. त्यामुळे सहसा कोणी पुढे येत नव्हते. जे शिक्षक म्हणून काम करीत होते ते कधी तिकडे व्यवसाय म्हणून पाहिले नव्हते. ती त्यांची एक प्रकारे सेवा होती. असा त्यांचा स्वभाव होता.
निस्व:र्थ म्हणता येणार नाही परंतु जेवढे मिळते तेवढय़ावर समाधान मानून सेवाभावी मनाने काम करणारी शिक्षक मंडळी समाजात मानाचे स्थान मिळवून गेले.
आज शाळेतील शिक्षक मंडळी तणावाखाली वावरत आहेत असे म्हटले तर शिक्षकी पेशा सोडून जी मंडळी आहे त्यांना हसू येते आणि विनोदबुद्धी सुचते. मात्र जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना हे सत्य आहे असे वाटेल. शाळेमधून मुलांवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांनी करणे खरे तर आवश्यक आहे. मात्र किती शाळेतून मुलांवर संस्कार केले जातात. याची चाचपणी केल्या जात नाही. कारण आज त्यांना अभ्यासक्रमासमोर संस्कार काहीच वाटत नाही. दिलेला अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर त्यांना वाईट बाबीशी सामना करावा लागतो त्यामुळे ते मुलांना समजेल अश्या भाषेत न शिकविता एका पाठोपाठ एक धडे संपविण्याचा सपाटा चालवितात. अपेक्षित बदल पाहण्यापेक्षा त्याच्या गुणाकडे शिक्षकासोबत पालक ही लक्ष देत आहेत त्यामुळे मुले भावनाहीन बनत आहेत. येथूनच समाज रसातळाला जाणे प्रारंभ झाली म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजात आज सुद्धा तस्मै श्री गुरवे नम: ची खरी गरज आहे. फक्त शिक्षक दिन आले म्हणून शिक्षकांचा सन्मान किंवा सत्कार न करता या दिवसांसारखे रोजच त्यांना सन्मान देणे खरेच गरजेचे आहे असे वाटते.
============================
2) पितृदेवो भव
                       - नागोराव सा. येवतीकर
                          मु. येवती ता. धर्माबाद

मानवी जीवनात आई-वडील हे दोन्ही महत्त्वाचे आहेत; परंतु वडिलांपेक्षा आपण सर्वच जण आईला सर्वात जास्त महत्त्व देतो. कारण आई ही प्रत्येक मुलाला आपल्या उदरात नऊ महिने नऊ दिवस अतिशय काळजीपूर्वक सांभाळ करते.
गर्भात जुळलेली नाळ आयुष्यभर टिकून राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचा आणि मुलाचा जिव्हाळय़ाचा, प्रेमाचा संबंध असतो. आई ही प्रेमळ, मायाळू आणि मुलांना समजून घेणारी असते तर याउलट वडील हे कठोर, कडक, शिक्षा करणारे आणि मुलांना न समजून घेणारे असतात, असे जनमाणसात आई-वडिलांविषयी बोलल्या जाते. परंतु खरोखरच प्रत्येक वडील एवढा कठोर किंवा निष्ठूर असतो का? साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा आईवर बर्‍याच साहित्यिकांनी विपुल लेखन केलेले आढळून येते. मात्र त्या प्रमाणात वडिलांवर आधारित लिहिलेले साहित्य फार कमी म्हणण्यापेक्षा नगण्यच आहे. मराठवाड्यातील कवी इंद्रजित भालेराव यांनी 'बाप' कविता लिहून समाजातल्या वडील मंडळींना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे.

घरकाम करणारी व सतत मुलांच्या सहवासात राहणारी ती म्हणजे आई. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण होते आणि ते आईसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतात. तर वडील मात्र कामाच्या निमित्ताने नेहमी घराबाहेरच राहतात. त्यांचा सहवास मुलांना फार कमी मिळतो.

त्यास्तव मुले आणि वडील यांच्यात जवळीकता निर्माण होत नाही. त्यामुळे मुले वडिलांना थोडशे घाबरतात. वडील हे घराचे कर्ते, सवरते, त्यास्तव घरातील विविध जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमी विचार प्रक्रिया चालूच ठेवावी लागते. कधी कधी बाहेरील कामाचा ताण किंवा आर्थिक बाबींची समस्या त्यांच्या डोक्यावर नेहमीच जाणवत असते. त्यास्तव वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे प्रकार वडिलांकडून प्रत्येक घरात होऊ शकते यात शंका नाही. त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात. बालपणापासून रागात वा संतापात पाहिलेल्या वडिलांची प्रतिमा नेहमीसाठी त्यांच्या स्मरणात राहते. त्यामुळे ती मुले वडिलांसमोर बोलण्यासाठी घाबरतात, भितात किंवा कचरतात.

भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथे घरातील सर्व लहान-मोठे काम स्त्रियांनी करायचे आणि घराबाहेरील कामे पुरुषांनी करायची अशी प्रथा आहे. (सध्याच्या काळात यात हळूहळू बदल होत आहे ते चांगले आहे की वाईट ते येणारा काळच ठरवेल.) पुरुषांची सर्व कामे फारच जबाबदारीची, त्यामुळे ती पेलताना पुरुष म्हणजे घरातील वडील नेहमीच तणावात दिसून येतो. त्याचाच परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर होत असतो. म्हणूनच आज समाजात आईला जेवढे मोठे स्थान मिळाले तेवढे मोठे स्थान वडिलांना मिळत नाही. मात्र ते स्थान प्राप्त करणे फार जिकरीचे वा कठीण काम नाही. त्यासाठी प्रत्येक वडिलांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आईकडून मुलांना कौटुंबिक संस्कार मिळतात तर सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात. प्रत्येक मुलावर वडिलांचे अनुवंषिक गुणधर्म फार मोठय़ा प्रमाणात संक्रमित होतात. प्रत्येकजण आपल्या वडिलांसारखा नाव कमावण्याची इच्छा बाळगतो. समाजात वडिलांची प्रतिमा चांगली किंवा वाईट अशी असेल त्याच पद्धतीवर मूल चालते. तेव्हा समाज सहज बोलून जातो की, हा तर आपल्या बापाच्या चालीवर गेला आहे. आपल्या मुलांना समाजात चांगली जागा मिळावी, इज्जत मिळावी, लोक त्यांना मान द्यावे असे वाटत असेल तर प्रत्येक वडिलांनी समाजात चांगले वागण्याचे ध्यानात घ्यावे.

आपली इतरांशी वागणूक चांगली ठेवावी. खोटे बोलून कोणाला फसवू नये, प्रत्येकाशी प्रेमाने व सौजन्याने वागावे. वाईट व्यसनांची सवय ठेवू नये. आपल्या वाईट सवयी हळूहळू आपले मूल विशेषकरून मुलगा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. दारू पिणे, तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, विडी वा सिगारेट पिणे, रिकामटेकडे राहून गप्पा मारणे इत्यादी वाईट सवयी लहानपणापासून बघत आल्याने त्याच्या मनात त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अजून एक नुकसान संभवू शकते. घरात व्यसनी लोकांचे काहीच स्थान नसते, बोलणे कोणी ऐकत नाही आणि स्वाभिमान संपतो. दुसर्‍याला उपदेश करूच शकत नाही. 'मी सांगतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला' उक्तीप्रमाणे वागणे निश्‍चित जमणार नाही.

मुलांवर योग्य संस्कार टाकण्याची फार मोठी जबाबदारी वडिलांवर आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्या वेळापर्यंत वडिलांच्या सर्वच वागणुकीची आणि वर्तणुकीची मुले अगदी बारकाईने निरीक्षण करतात. एखाद्या टीप कागदाप्रमाणे आपल्या वर्तनाचे ते अनुकरण करतात. हे प्रत्येक वडिलांनी ध्यानात घेऊन पाऊल टाकल्यास आपले नावसुद्धा नक्कीच उज्ज्वल होईल. माझे घरात कोणीच ऐकत नाही, मानीत नाही अशी तक्रार करणार्‍या वडिलांनी सर्वप्रथम स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्या अंगी असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानाचे स्थान मिळू शकेल.

वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी आणि समाजात वडिलांचे असलेले प्रतिबिंब बदलावयाला हवे म्हणून संपूर्ण जगात जून महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'पितृदिन' म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने सार्‍याच वडिलांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागे करून जीवन जगल्यास आणि मुलांसमोर चांगले वर्तन ठेवल्यास आईला जसे प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधू ही उपाधी मिळाली तशीच उपाधी वडिलांनाही मिळू शकते. प्रत्येक अपत्याने वडिलांच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असे जीवन जगणे म्हणजे खर्‍या अर्थाने 'पितृदिन' साजरा केल्यासारखे होईल.
 - - - - - - - - *********- - - - - - - - - - - - - - -
3) शिक्षकांच्या हातात खडू द्या . . . . . !
                          नागोराव सा. येवतीकर
                          मु. येवती ता. धर्माबाद
                           9423625769

दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्र विजय नकाशे सरांच्या आत्महत्येच्या बातमीने हादरून गेला.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सेमाडोह येथील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक जे की मुख्याध्यापकपदाचे अतिरिक्त कारभार पाहत होते ते विजय नकाशे यांनी पंचायतराज कमिटी अर्थात पीआरसीच्या दौर्‍यानंतर शाळेतच आत्महत्या केली. फारच क्षुल्लक करणावरून त्यांनी आत्महत्या केली. ते कारण म्हणजे तांदळाच्या हिशेबात ३० किलो तांदूळ कमी दिसून आले आणि तारीख संपलेली मिरची पावडर पाकीट आढळून आले, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची खात्री झाली. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष गुरुजींचा बळी गेला. शाळेतील मुलांना शिकवले नाही, तिथे हलगर्जीपणा केला, हयगय केली यामुळे जर शिक्षकांना निलंबित करण्यात आले असते तर कदाचित योग्य झाले असते. कारण ज्या कामासाठी नेमणूक करण्यात आली ते काम जर केले नाही तर कोणीही यात चूक दाखवणार नाही. मात्र इथे शाळेतून सध्या शिकवणे फारच कमी म्हणण्यापेक्षा नाही म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. कधी कधी तर असे वाटते की, शिक्षकांची नेमणूक ही अध्यापनापेक्षा इतर अवांतर कामांसाठीच जास्त प्रमाणात उपयोगी पडते. शासनाच्या काही योजनांतून शिक्षक जर वजा केले तर त्यांच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नाहीत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे संपवली जातील, त्यांना निवडणुका किंवा जनगणना याशिवाय इतर कामे लावण्यात येणार नाहीत असे फक्त म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र काही होत नाही. या लोकांचे बोलायचे दात आणि खायचे दात पूर्णत: वेगळे आहेत. यांना ‘बोलावे तैसे चालावे’ ही संतांची वचने माहीत आहेत. कळतंय, पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.
प्राथमिक शिक्षकांची नेमणूक ही शाळेतील ६ ते १४ वयोगटातील बालकांना अध्यापन करण्यासाठी होते. नव्यानेच रुजू झालेला शिक्षक मोठ्या उत्साहाने आणि जोमाने शिकवायला प्रारंभ करतो. उद्याचा हिंदुस्थान सक्षम असावा आणि तो मी घडविणार या प्रेरणेने तो काम करीत असतो. सुरुवातीचे काही दिवस त्याच्या मतानुसार घडतेसुद्धा. अध्यापनात त्याला बहुतांश वेळा अडथळा येतो. ज्यावेळी त्याच्या हातात खडू यायचे त्याच नेमक्या वेळी नाइलाजास्तव पेन घेऊन बसावे लागायचे. वारंवार असेच घडत राहिल्यामुळे तो पूर्णत: खडू बाजूला ठेवून हातात फक्त पेनच धरायला लागला. त्याच्या मनात कधीच असे आले नाही, मात्र ते जर पेन हातात घेतले नाही तर वरिष्ठ कार्यालयातून हातात कागद यायला वेळ लागत नाही याची भीती त्याच्या मनात नेहमीच असते. त्यामुळे तो कागदी घोडे (अहवाल) पूर्ण करण्यात असा काही रुततो की शाळेत विद्यार्थी अध्ययनासाठी आले आहेत याचे जरासुद्धा भान नसते. शिक्षकांच्या हातात खडूशिवाय काहीच राहू नये अशी परिस्थिती कधी तयार होईल देव जाणे! ज्या दिवशी अशी परिस्थिती तयार होईल त्याच दिवसापासून ‘प्रगत महाराष्ट्र’ दिसायला लागेल.
शिक्षकांच्या हातात खडूऐवजी पेन घ्यायला कोणी लावले? विजय नकाशे या शिक्षकाचा बळी या अशैक्षणिक कामाने घेतला नाही काय? असे नाना प्रकारचे प्रश्‍न मनामध्ये निर्माण होतात. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका याविषयी शिक्षक संघटनासुद्धा विरोध करीत असते, मात्र येथे ‘आले सरकारच्या मना तेथे कुणाचे चालेना’ अशी परिस्थिती आहे. सरकारी कर्मचारी म्हणजे गप्प गुमानपणे, खाली मान घालून, सांगेल ते काम करणारी व्यक्ती अशी स्थिती निर्माण केली. कुणालाही वर तोंड करून बोलण्याची मुभा नाही. जर एखाद्या कर्मचार्‍याने तशी हरकत केली तर त्याची मुस्कटदाबी केली जाते. त्याचा आवाज बंद केला जातो. निलंबनाची धमकी तर कर्मचार्‍यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यास्तव त्या कर्मचार्‍यांच्या मानेवर नेहमी टांगती तलवार असते.
गावातील शाळेचा विकास गावातील लोक आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. शाळेतील कमतरता शिक्षकांना ग्रामपंचायतीकडे मागणी करता यावी अशी परिस्थिती असावी. सध्या उलट परिस्थिती आहे. ग्रामपंचायतच शाळेची, मुख्याध्यापक व शिक्षक यांची तक्रार करते. शाळेत पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी उलट्या बोंबा मारते. हे कुठे तरी थांबले पाहिजे. शिक्षकाच्या हातात फक्त खडूच द्या. शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल यात शंका नाही.

शिक्षक बनला बांधकाम मजूर
शिक्षक आज अध्यापनाऐवजी काय काय कामे करतो. शिक्षकांच्या हातात आज खडूऐवजी काय काय आहे? सर्वात पहिल्यांदा शिक्षकांना शाळा व वर्गखोली बांधकामात गुंतवून अभियंता व मिस्त्री बनवले आणि त्यांच्या हातात थापी, वीट, वाळू, सिमेंट आणि गजाळी दिली. शासनाचा बांधिलकी असलेला कर्मचारी असल्यामुळे बांधकामाबाबतचा दर्जा चांगला मिळत गेला म्हणून शासनाने सन २००१ पासून सर्व बांधकामे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापकांच्या माध्यमातून करण्यास प्रारंभ केला. यातसुद्धा आतापर्यंत अनेक ‘विजय’ पराजित होऊन आत्महत्या केली आहे. खडूऐवजी त्यांच्या हातात झाडू देण्यात आली. शालेय साफसफाई आणि स्वच्छतागृहाच्या नियमित वापरासाठी मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येऊ लागले. शालेय पोषण आहार योजनेमधून आचारी बनविण्यात आले. भाजीपाला घेऊन येणे आणि स्वयंपाक तयार होईपर्यंत त्याकडे लक्ष देणे ही नित्याचीच बाब झाली आहे. जेवणात काही कमी जास्त झाले की निलंबनाची टांगती तलवार तर नेहमीच तयार राहते. निवडणूका आणि जनगणना करणे हे तर राष्ट्रीय कार्य असल्यामूळे ते टाळता येत नाही. शिक्षक आत्ता हायटेक झाला आहे. सर्वच शिक्षक स्मार्टफोन धारक झाले आहेत. मोबाईल मुळे माहिती तंत्रज्ञानात सुध्दा आमूलाग्र बदल झाले आहेत. याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा व्हावे म्हणून शालेय शिक्षण विभागाने राज्यांतील सर्व शाळा ऑनलाइन करण्याच्या हेतूने सरल प्रणाली विकसित केली. मात्र यात परत एकदा शिक्षकानाच वेठीस धरण्यात आले. अल्पसंख्यकांचे शिष्यवृत्ती असो की मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती त्यांची माहिती सुध्दा ऑनलाइन भरावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक आत्ता सॉफ्टवेअर इंजिनीयर सुध्दा बनला आहे. शाळेत विद्युत सुविधा नाही, संगणक नाही ना त्याला इंटरनेट नाही तरी ऑनलाइन काम करण्याच्या सूचना वरच्या पातळीवरून दिल्या जातात आणि शिक्षक मुकी  बिचारी कुणी ही हाका प्रमाणे सर्वांचेच बोलणे ऐकून काम करीत असतो. कधी कधी हे सरकारी काम पूर्ण करीत असताना शाळा वाऱ्यावर असल्याचे वृत्त सुध्दा वाचण्यास येतात. तेंव्हा यांस खरोखरच शिक्षक जबाबदार असतो का ? याचा सारासार विचार ही कोणी करीत नाहीत. शिक्षकाच्या डोक्यावर खापर फोडून सर्वजण मोकळे होतात. म्हणून राज्यांतील तमाम शिक्षक बांधवाची करुण हाक आहे की " शिक्षकाच्या हातात खडू द्या "
============================
4) लेख :  जनतेचा आधार **
                    - नागोराव सा. येवतीकर

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली या गावापासून भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत २९ सप्टेंबर २०१० रोजी आधार कार्ड योजनेला सुरुवात करण्यात आली. याच गावातील रंजना सोनवणे हिला देशातील पहिले आधार कार्ड समारंभपूर्वक कार्यक्रमात वाटप करून आधार योजनेची मुहूर्तमेढ साधण्यात आले. आधार कार्डची निर्मिती कशी झाली ? ही माहिती खूपच रंजक आहे.

सन १९९९ च्या कारगील युद्धानंतर के.  सुब्रह्मण्यम यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ७ जानेवारी २००० रोजी एक अहवाल सादर केला. ज्यात म्हटले होते की, सीमावर्ती भागात राहणार्या लोकांना विशेष ओळखपत्र देण्यात आल्यास भारतात वाढत चाललेली घुसखोरी थांबविता येऊ शकेल. त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या अहवालाचा अभ्यास करून " बहुउद्देशीय भारतीय ओळखपत्र " या नावाने ओळखपत्र वाटप सुरू करण्याची घोषणा केली. सर्वात पहिल्यांदा सीमावर्ती भागातील लोकांना या ओळखपत्राचे वाटप करून त्यानंतर देशात सर्वत्र वाटप केला जावा असे ठरविण्यात आले. अर्थात आधार कार्डची बीजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पडली होती असे दिसून येते. कदाचित याच घटकाचा विचार करून डॉ. मनमोहन सिंग सरकारने आपल्या कारकिर्दीत आधार संकल्पना पूर्णत्वास नेली असावी असे वाटते. देशातील संपूर्ण नागरिकांना एकच क्रमांक देण्यात यावा आणि देशात कुठेही त्याला स्वत:ची ओळख देता यावी म्हणून शासनाने फेब्रुवारी २००९ मध्ये आधार कार्ड योजनेची संकल्पना तयार केली. या योजनेवर काम करण्यासाठी व याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नंदन निलकेनी यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. ही जबाबदारी त्यांच्यावर जून २००९ मध्ये सोपविण्यात आली होती. याचाच अर्थ आधार कार्डचे प्रणेते म्हणून आज आपण त्यांचेच नाव घेतो. खरोखरच त्यांनी अथक परिश्रम घेऊन आधारकार्ड लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. या आधार कार्डावर व्यक्तीला बारा अंकी कोड दिल्या जातो. ज्या आधारावर त्याची संपूर्ण माहिती जसे की, संपूर्ण नाव, रहिवाशी पत्ता, डोळ्याची प्रतिमा, दहा बोटांचे ठसे, इतर काही माहितीचा यात समावेश करण्यात आलेला आहे. सदरील योजना प्रत्यक्षात राबविण्यापूर्वी श्रीकांत नथामुने, सलिल प्रभाकर, आर. एस. शर्मा, प्रमोद वर्मा, व्हॅले वाडे इत्यादी तज्ज्ञ लोकांनी यात अथक परिश्रम घेऊन त्या आधार कार्डाला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले आहे. या योजनेचा लोगो अतुल सुधाकरराव पांडे यांनी तयार केला असून ज्यावरून निरक्षर व्यक्तीलाही प्रथम दर्शनी पाहिल्याबरोबर त्याची ओळख होते. सन २०१७ पर्यंत भारतातील सर्व जनतेची स्वत:ची ओळख होण्यासाठी व १८० लक्ष कोटी रुपये अंदाजीत खर्च अपेक्षित धरून आधार योजना तयार करण्यात आली. त्या अनुषंगाने सन २००९-१० या वर्षात २६.२१ कोटी, २०१० - ११ मध्ये २६८.४१ कोटी, २०११-१२ मध्ये११८७.५० कोटी, सन २०१२-१३ मध्ये १३३८.७२ कोटी, २०१३-१४ मध्ये १५४४.४४ कोटी आणि २०१४-१५ मध्ये १६१५.३४ असे एकूण ५९८०.६२ कोटी रु. गेल्या पाच-सहा वर्षांत खर्च झाल्याची आकडेवारी प्रसिध्द झाली आहे.२१ ऑगस्ट २०१५ रोजी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील ९० कोटी लोकांना या आधार कार्डाचे वाटप करण्यात आले. जे की, एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के आहे. म्हणजे अजून ३० टक्के लोकांना विविध कारणांमुळे आधार कार्ड प्राप्त झाले नाही. महाराष्ट्राचा विचार करता येथील एकूण लोकसंख्या ११ कोटी २३ लाख आहे. त्यापैकी ९ कोटी ७८ लाख लोकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले म्हणजे ८१ टक्के लोकांना आधार कार्ड मिळाले असून अजून १९ टक्के लोक या आधार कार्डपासून वंचित आहेत. आंध्रप्रदेश व केरळमध्ये आधारकार्ड सर्वात जास्त वाटप करण्यात आले. त्या खालोखाल तेलंगणा, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, पाँडेचरी, चंदीगड, सिक्कीम, लक्षद्वीप या प्रदेशाचा क्रमांक लागतो. मेघालय व आसाम या प्रदेशात आधार कार्ड खूप कमी प्रमाणात वाटप करण्यात आले. आधार कार्ड लोकांना वाटप न होण्यामागे विविध कारणे आहेत.आधार कार्ड काढणार्या केंद्राची संख्या कमी असणे हे एक प्रमुख कारण त्यात समाविष्ट आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तींना ३-४ महिने आधार कार्ड न मिळणे हे ही एक कारण आहे. ज्यावर्षी टेंभली गावात आधार कार्ड वाटपाचे उद््घाटन करण्यात आले. त्यावर्षी ग्रामीण भागात ही हे केंद्र जोमाने चालू करण्यात आले होते. मात्र नंतर माशी कुठे शिंकली माहित नाही. या केंद्राने आपला गाशा गुंडाळला तो आजतागायत. ग्रामीण भागात आधार कार्ड केंद्र उघडले नाही. त्यामुळे बरीचशी मंडळी ईच्छा असून सुद्धा आधारकार्ड काढू शकले नाहीत. शिक्षण विभागाने शाळातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्याचा कार्यक्रम आखला होता. परंतु कोणत्याच शाळेत आधार केंद्र चालू झाले नाही. त्यामुळे सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहित भरता आले नाही. मुलांचे आधार कार्ड काढताना पालक व शिक्षकांची एकच तारांबळ झाली. तसेच शासनाने या कार्डाला अती महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून स्थान देत गेल्यामुळे काही आधार केंद्र संचालक मंडळी आधार कार्डची नोंदणीसाठी ५० ते १०० रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रारी आता समोर येत आहेत. आपल्याजवळ आधार कार्ड नसेल तर शासनाच्या कोणत्याच योजनेतील अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशी साशंकता लोकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे प्रत्येक जण आधारकार्ड मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. शासनाने ही योजना सुरूवातीला जनकल्याणासाठीच तयार केली होती; परंतु काही जिल्ह्यातील अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या अधिकार्यांनी या आधार कार्डचा वापर करून गरीब लाभार्थ्यांना विविध योजनेचे थेट अनुदान त्यांच्या खात्यावर देण्याचा यशस्वी उपक्रम राबविला. यातून दलाली बंद झाली आणि सामान्य जनता सुखावली. ज्याद्वारे सरकारने सुद्धा त्याच अनुषंगाने विचार करण्यास सुरूवातकेली. १ जानेवारी २०१३ रोजी सर्व योजनांचे अनुदान आधार कार्डशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे मोदी शासनाने सुद्धा ही योजना कसल्याच प्रकारचा विचार न करता चालू ठेवण्याचा जे पाऊल उचलले आहे ते खरोखरच अभिनंदनीय आहे. बायोमेट्रीक प्रणालीचा वापर शाळा, विद्यालय, कार्यालय अशा विविध ठिकाणी करून कर्मचारी वर्गात सुद्धा सुसंगतपणा आणता येईल. गावोगावी फिरते बँका तयार करून त्या द्वारे आर्थिक व्यवहार करणे सहज, सोपे आणि सुलभ होईल. पोलिसांना सुद्धा या प्रणालीचा खूप मोठा फायदा होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील घुसखोरी थांबविता येईल. आधार कार्ड भविष्यात जनतेचा नक्कीच आधार बनेल यात मुळी शंकाच नाही.
============================
5) जीवनातील अनमोल मित्र
                                - नागोराव सा. येवतीकर
मित्र जीवनात हवेहवेसे वाटतात कारण प्रत्येक सुख दुःखमध्ये फक्त आणि फक्त मित्राची साथ आपणाला मिळते. बालपणीचे मित्र, शाळेतलले मित्र, महाविद्यालय मित्र आणि नौकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असे मित्राचे वर्गीकरण करता येईल.

बालपणीचे मित्र जेंव्हा खूप वर्षानंतर मिळतात तेंव्हा खूप आनंद होतो. काय बोलावे ? हे ही सुचत नाही. खूप गप्प होतील, चहा-पाणी होईल, त्या॑नी ज्या ठिकाणी खाल्ले, झोपले उठले, बसले अभ्यास केल, रुसले, मारामारी केले आणि खेळले त्या जागेत काय काय बदलले यावर विचार होईल आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन जाईल. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे म्हटल्या जाते ते यामुळेच याची प्रचिती यनिमित्ताने पुन्हा एकदा होतो. दिवसभर उन्हात खेळण्याचा ठिकाण आज मात्र ओसाड दिसून येईल. आज त्या ठिकाणी कोणीच खेळत नाही. मुलांची खेळ खेळण्याची आवड कमी झाली की आई-बाबा त्यांना खेळू देत नाहीत हे न उलगडनारे कोडे पडले आहे. काही असो पण आम्ही लहान असताना जे काही उद्योग केले, खेळ खेळले ते आजची मुले नक्कीच करत असताना आढळून येत नाहीत. टीव्ही वरील कार्टून आणि मोबाईल वरील गेमने या मुलांना पुरते वेडं केले आहे. जुने मित्र भेटले की या विषयावर हमखास चर्चा होणारच.

शाळेत गेल्या वर जे आपल्या शेजारी बसतील त्याच्या सोबत मैत्री होते. त्यास आपण पाटी मित्र म्हणतो. LKG, UKG सारखे वर्ग त्यावेळी नव्हते त्यामूळे पेंसिल वही हे पाचव्या वर्गात जाईपर्यंत माहीत व्हायचे नाहीत. कलम-पाटी एवढेच काय आमच्या दफ्तर मध्ये असायचे. बरे दफ्तर भी कसले ती पिशवीच असायची. शुद्धलेखन असो वा बेरीज-वजाबाकी सर्व काही त्या पाटीवरच. कलम उधार देणारे मित्र फार कमी मिळायचे. शाळा संपल्यावर आम्ही कलम जिंकण्याचा खेळ खेळायचे आणि डब्यात सर्व कलम जमा करून ठेवायचे. काही मित्र कलम ने लिहायचे नाही किंवा आमच्या सोबत खेळायचे सुध्दा नाही तरी त्याची कलम कशी काय संपायच्या याचा शोध लावायला वेळ लागला नाही. शाळेच्या पाठीमागे बसून तो संपूर्ण कलम खाऊन टाकायचा आणि कलम नाही म्हणून लिहिणे टाळयाचा मात्र गुरुजी काय त्याला सोडणार. ते काही ऐकुन घ्यायचे नाही आणि शेवटी मदत करणारा तो मित्रच. गृहपाठ पूर्ण करणे असो वा एखादे चित्र काढायचे असो त्यावेळी फक्त मित्रच मदतीला धावून येतात. शालेय मित्राची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. या लहान वयात हेच तर आपणाला चांगले वळण लावतात. या वयात ज्यांना चांगले मित्र लाभले त्याचे आयुष्य सफल झाल्या सारखे आहे. कारण मित्र हे जीवनाला वळण लावणारे तट आहेत. एकमेकांची खोड काढायची आणि गुरुजींचा मार इतरांना मिळवून देण्यात धन्यता मानण्यत येणाऱ्या या वयात आपल्या मित्रांसोबत केलेल्या लहानमोठ्या चेष्टा मस्करी आज आठवले की हसावे की रडावे हेच कळत नाही. शालेय जीवन असेच हसत खेळत कधी संपले हेच कळत नाही आणि सर्व मित्रांची ताटातूट होते. शाळेतील काही स्वप्नं घेऊन महाविद्यालयात जाऊन पोहोचतो. आजपर्यंत विहिरीत पोहनारे मासे जेंव्हा मोठ्या समुद्रात किंवा नदीत जाऊन पडतात तेंव्हा त्या माश्यांची जी अवस्था होते जवळपास तीच अवस्था या ठिकाणी होते. आपल्या विचारांशी सहमत असणारे मित्र मिळणे खूपच कठीण असते. या वयातील मित्र अगदी सहज पणे जोडल्या जात नाही. यांची वय समझदारी मध्ये असते. काय चांगले वाईट आहे कोण कसा आहे या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करूनच ते मित्र बनवितात. या ठिकाणी मिळालेले मित्र आजीवन सोबत राहतात. म्हणून यांच्यासोबत कधीही गद्दारी करू नये. अन्यथा जीवनात कोणी मित्र होतच नाहीत. मित्राशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय मासोळीचे जीवन ज्याप्रमाणे काहीच नाही अगदी तसेच आहे. मैत्री मध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच अश्या प्रकारचा कुठली ही दरी नसते. मैत्री ही पैसा बघून जर केली गेली असती तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीला काही अर्थही राहिला नसता. सुदाम्याचे पोहे आजही मैत्रीची आठवण ताजी करते.
============================
6) *** रुपयाला अच्छे दिन येतील ?  ***
                             -   नागोराव सा. येवतीकर
                                 मु.येवती ता.धर्माबाद
                                 मो.न.9423625769

पैसा बोलता है असे एक गीत लहानपणी ऐकू यायचे आणि तेंव्हा अचंबा वाटायचे की, पैसा कसा बोलतो. त्या बोलबोध वयात त्या गीताचा अर्थ कळाला नाही. मात्र आज भारतीय चलनाची जी दशा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. आणि देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. तेंव्हा खरोखरच पैसा कसा बोलतो? हे कळायला लागले आहे. भारतीय चलन हे सत्तरी ओलांडते की काय? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात धडकी भरुन जात आहे. मूळातच आपली अर्थव्यवस्था ही विदेशावरच अवलंबून आहे याची प्रचिती सुध्दा यानिमित्ताने झाली असे वाटते.  लहानपणी दुकानातुन काही खाऊ घ्यायचे म्हटले तर घरातील वडील मंडळी आमच्या हातात 5 पैशाचे नाणे टेकवत आणि यदाकदाचित 10 पैसे अर्थात मोठा पैसा (25 वर्षापूर्वी 10 पैशाची मोठी नाणी प्रचलित होती) जर हातात पडला तर आम्ही जाम खुश व्हायचो. त्या पैश्यात मन भरेल एवढ खाऊ विकत घेता येत असे मात्र आज त्याउलट परिस्थिती बघायला मिळते. आज आमच्या मुलांना पैसे नाही तर रुपये द्यावे लागतात. 10 पैशांच्या ऐवजी 10 रु. जरी दिले तरी त्याचे समाधान होत नाही. यावरुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, भारतीय चलनाचे अवमूल्यन दरवर्षी भौमितिक पध्दतीने होत आहे. या अवमूल्यानास जबाबदार कोण कोण आहेत? हा वादातीत मुद्दा आहे. देशाचे कारभार पाहणारी विद्वान मंडळी जे की संसदेत देशाचे धोरण आखतात व नियोजन करतात, ते दुरगामी विचार करुन आखणी करतात त्यांचे नियोजन भविष्यात चुकीचे निघाले  तर देश रसातळाला जाण्यास वेळ लागत नाही. त्यांचे काम म्हणजे वृक्षारोपण करुन त्या वृक्षाचे संवर्धन, वाढ, सरंक्षण करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरुन आपली समस्या पूर्णपणे संपत नाही. कुठे तरी आपले ही काही तरी नक्कीच चुकत आहे. ज्या मूळे आज आपणाला विपरीत परिस्थितीतून जावे लागत आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या काळात भारतातील खेडी स्वंयपूर्ण होती. बारा बलुतेदार पध्दतीने त्यांचा व्यवहार चालू होता. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची प्रथा होती. जेव्हा पासून कामाच्या मोबदल्यात धान्य ऐवजी पैश्याचा शिरकाव झाला तेंव्हा पासून रुपयाचे अवमूल्यन व्हायला सुरुवात  झाली असे म्हणने चूकीचे ठरणार नाही !
* इंधनाचा भरमसाठ वापर -  मोटार गाडयासाठी लागणारे इंधन भारताताला आयात करावे लागते. ही एक मोठी समस्या आपणांसमोर उभी आहे. 25-30 वर्षापूर्वी जेवढया मोटार गाडया भारतात होत्या. त्यापेक्षा कितीतरी पटीने आज वाहनांची संख्या वाढली. त्यास्तव इंधन आयातीचे प्रमाणसुध्दा तेवढयाच पटीने वाढले. दुसर्‍यावर अवलंबून असलेल्या कामाची स्थिती कशी असते? हे आपण सर्वचजण जाणतो ज्या घरात पूर्वी एक सायकलसुध्दा फार मोठया मुश्कीलीने असायचे त्याच्या घरात आज चार चाकी व दोन चाकी वाहनांची रांग लागलेली दिसून येते. आपण मागे पुढे कशाचाही विचार न करता एखादी कृती करतो आणि त्याचा त्रास आपणालाच सोसावे लागते. म्हणूनच आज 10-15 वर्षापूर्वी असलेले इंधनाचे भाव तिप्पटीने वाढली आहे आणि पुढील पाच वर्षात ते पाच पट सुध्दा होईल यात शंकाच नाही म्हणजेच भविष्यात रुपयाचे अवमूल्यन यापेक्षा जास्त असेल यात वाद नाही.
* सोन्याची झळाळी - भारतीय परंपरेत सोन्याला अन्यन्यसाधारण असे महत्व दिले जाते. विशेषकरुन महिलांना सोने विषयी फारच अप्रुप असते. प्रत्येक महिलांच्या अंगावर कमीतकमी 2 तोळे म्हणजे 20 ग्रॅम सोने असतेच असते त्याशिवाय ती महिला शोभून दिसत नाही असे त्या महिलेला वाटते आणि इतरांना सुध्दा. महिला प्रमाणे पुरुष सुध्दा सोने वापरात मागे नाहीत. प्रत्येक पुरुषांच्या अंगावर निदान अर्धा तोळा (5ग्रॅम) सोने असायलाच पाहिजे अशी प्रथा येथे सांगितले जाते. त्यामुळे देशाची लोकसंख्या जशी वाढीस लागली तशी सोने वापरणार्‍यांची संख्या वाढीस लागली. लग्न आणि सोने यांचा जणू जन्मोजन्मोत्तरीचा संबंध आहे असे दिसून येते लग्नात नववधूवर किमान दोन तोळे सोने तरी वधूपित्याला टाकावे लागते अन्यथा जनता त्याच्यावर छी थु करते, ही आपली परंपरा आहे.
आज भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यातील अर्धी लोकसंख्या बालक व इतर यातून  वगळली 65 कोटी लोक सोन्याचा वापर आभूषण म्हणून करतात. त्यात 30 कोटी महिला व 35 कोटी पुरुष धरल्यास त्या दोघांकडून मिळून 80 कोटी  ग्रॅम सोने अंगावर आभूषण म्हणून सध्या वापरात आहेत तसेच देशात 10 कोटी जनता अशी सापडेल ज्यांच्याकडे तीन तोळयापेक्षा जास्त सोने आहेत. या सर्वांची गोळा बेरीज केली तर किती सोने सध्या भारतात आहे? याचं गणित आपण लावु शकतो. यात अत्यंत महत्वाचे म्हणजे सोने सुध्दा आपणाला आयातच करावे लागते. याबाबतीत अर्थ विषयावर लेखन करणारे श्री यमाजी मालकर यांनी आपल्या स्तंभलेखात म्हणतात की, “जनतेनी सोने खरेदी करुन आपली संपती जमा करण्यापेक्षा तेच जर इतर कामात गुंतवले तर देशाला तो एक प्रकारे आर्थिक हातभार असेल आपण सोने खरेदीत पैसे गुतंवतो म्हणजेच एक प्रकारे भारतीय चलनाला लॉकर मध्ये बांधून ठेवतो” खरोखरच असा विचार आपण कधी करणार आहोत काय? 90 वर्षापूर्वी सोन्याचा दर प्रति तोळा 18 रु. असा होता आणि आज त्याचा दर प्रति तोळा 26 हजाराच्यावर गेला आहे यावरुन सुध्दा आपण या सोन्याचे भारतीय पंरपरेत किती महत्व आहे समजु शकतो.
* स्वदेशीचा वापर - भारतीस स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात स्वदेशी मालाचा वापर करावा म्हणून अनेक क्रांतीकारकांनी आंदोलने, चळवळी केली, परदेशी मालाच्या ट्रक समोर बाबू गेनू आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वदेशी मालाचा वापर करण्याचा संदेश दिला. या हुतात्माच्या बलिदानातून देशातील जनतेनी काय शिकवण घेतली? हा फार मोठा प्रश्न पडतो विदेशी मालाचा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आपले चलन दिवसेंदिवस घसरत आहे. स्वदेशी मालाचा वापर सर्वांनी करावा यासाठी 10 वर्षापर्वूी राजीव दीक्षित नावाचा व्यक्ती गावोगावी प्रचार करुन जनजागृती केली होती. मात्र त्यांचे तीन वर्षा पूर्वी निधन झाल्यामुळे त्यांचे कार्य थांबल्यासारखे वाटते. आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा कळते पण वळत नाही असे अवस्था होते. स्वदेशी मालाचे उदाहरण म्हणून खादी वापराचा जर विचार केला तर खादी ग्रामोद्योगाला आज कशी घरघर लागली आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. भारतातील एकूण लोकसंख्यपैकी किती टक्के लोक खादी कपडयाचा वापर करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. जी माणसे कापसाला भाव द्या म्हणून ओरड करतात त्यापेकी किती लोक आपल्या अंगावर खादीचा वापर करतात. आपण आपल्या देशातील उद्योगाला चालना देण्यासाठी त्याचा वापर करीत नाहीत. मात्र आपल्या कच्चा मालाला वाढीव भाव मिळावे म्हणून आंदोलने करतोत हे कितपत आपणाला रुचते?
* भारतीय चलनाचे अवमूल्यन कधी थांबणार? विविध प्रसिध्दी माध्यमातून चर्चा, परिसंवाद, सभा आयोजित केल्या जातात. त्याने निश्चितपणे चलनाचे अवमूलन थांबणार नाही त्यासाठी जनतेनीच काही तरी उपाय योजना करुन आपल्या पैसा विदेशात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
इतर कोणत्या व्यवसायात पैसे गुंतवण्यापेक्षा शेती मध्ये जर पैसा गुंतविला तर देशातील शेतीचा विकास होईल, अन्नधान्याचे उत्पादन वाढले देशाची आर्थिक क्षमता वाढीस लागेल आयातीला निर्यातीचा पर्यायाची जोड मिळाली तर चलन स्थिर राहण्यास नक्कीच मदत मिळेल.
============================
7) ** दारूबंदी महत्वाचे की दारूमुक्ती  **
                            -  नागोराव सा. येवतीकर
                                मु. येवती ता. धर्माबाद
                                9423625769

केरळ पाठोपाठ बिहार राज्यात दारूबंदी होत आहे आणि महाराष्ट्रात मात्र तसे होऊ शकत नाही (अपवाद वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्हे वगळून ) असे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे दारूप्रेमी लोकांना हायसे वाटले असेल यात शंका नाही. आज शासनाला या दारू विक्री वर कोट्यावधी रूपयाचा महसूल मिळतो ज्यावर सरकार आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळत आहे. सरकार समोर आज भरपूर प्रश्न तोंड वासुन उभे आहेत आणि सर्व समस्याची सोडवणूक अर्थातच पैश्यानेच करावी लागते. सगळ्या प्रकारची सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. वास्तविक पाहता बंदी करुच नये. कोणत्याही गोष्टीवर बंदी टाकली की जनता त्याच गोष्टी वापरण्यावर जास्त भर टाकतात. आपल्या लोकांची एक वाईट सवय आहे जेथे मनाई किंवा बंदी असते नेमके त्याच ठिकाणी घाई करतात. गेल्या दोन वर्षापासून गुटखा विक्री वर बंदी टाकण्यात आली पण खरोखरच गुटखा विक्री बंद आहे का ? तर नाही उलट फार मोठ्या प्रमाणावर या गुटख्याची तस्करी चालू आहे. या बंदीमुळे काही लोकांची चांदी होत आहे. याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विक्री करणाऱ्या लोकांना होतो. असंच काही या दारूबंदी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा एक वर्षापूर्वी  महाराष्ट्र लगतच्या आंध्रप्रदेश सरकारने दारूवर बंदी आणली होती तेव्हा सीमावर्ती भागात दारूचा महापूर पसरला होता. जागोजागी परमीट रूम उघडण्यात आले होते. बऱ्याच लोकांची चांदी झाली या बंदीमुळे मात्र दारू पिणे आवश्यक असलेल्या लोकांचे  खूपच हाल झाले. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. दारू बंदी करण्याऐवजी त्यांची विक्री आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी केल्यास याचे चांगले परिणाम बघायला मिळतील असे वाटते.
जसे की दारू विक्री च्या वेळेचे तंतोतंत पालन करण्याकडे लक्ष ठेवावे. दारू विक्री ज्या दिवशी बंद असते त्यादिवशी विशेष पथक ठेवण्यात यावे. कारण याच दिवशी रोजच्या पेक्षा जास्त दारू विक्री होते आणि भरपूर पैसा कमविला जातो. सर्व प्रकारच्या दारूच्या किमतींचे फलक दुकानात  दर्शनी भागावर लावण्यात यावे. बऱ्याच वेळा शीशीमागे 10 ते 20 रू जादा आकारणी केली जाते अशी तक्रार मात्र ते कुठे करू शकत नाहीत आणि ज्या व्यक्ती जवळ दारू पिण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीलाच दारू विकण्यात यावी. परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री होत असेल तर त्या दुकानांस तत्काळ सील ठोकण्यात यावे. प्रत्येक नागरिक ज्यांना दारू पिण्याची हौस आहे त्यांनी परवाना घेणे बंधनकारक केल्यास या दारू चे सध्या जे दुष्परिणाम दिसत आहेत ते नक्कीच कमी होतील. आजची परिस्थिती अशी आहे की दारू विक्री वर कोणाचे बंधन नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीवर सुध्दा नाही.  दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्या व्यक्तींना एकदा तुरुंगवास भोगायला लावले की अश्या लोकांची संख्या आपोआप कमी होते. दारू पिऊन घरात गोंधळ घालणे, कुटुंबातील सदस्याना मारझोड करणे, रस्त्याने मोठ्याने ओरडत फिरणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यपूर्वक घेतल्यास या दारूचा त्रास नक्कीच कमी होतो. शासनाने दारूविक्री बंदी करण्यापेक्षा यावर कडक अंमलबजावणी केल्यास जनता सुखात राहू शकेल अन्यथा दारू बंदी करून ही त्याचा काही फायदा होणार नाही.
मुझे पीने का शौक नहीँ, पिता हूँ गम भूलाने को चित्रपटातील या गीताप्रमाणे बऱ्याच लोकांची अवस्था असते. दारू पिल्यामुळे थोडीशी झिंग येते आणि काही काळासाठी तो वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. यामूळे सर्व दुःख, वेदना आणि त्रास विस्मृतीत जाते मात्र कायमचे नष्ट होत नाही. जेंव्हा नशा संपते आणि माणूस पूर्व पदावर येतो त्यावेळी पुन्हा तोच त्रास जाणवतो आणि त्यासाठी परत दारूची मदत घेतली जाते. काही लोक आनंदात दारू पितात. असे करता करता दारू कधी त्याच्या घरात प्रवेश केला हे त्याला देखील समजत नाही. काही लोक डॉक्टर लोकांचा हवाला देऊन म्हणतात की  दारू शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे. परंतु काही मर्यादेत कदाचित ते शरीरासाठी आवश्यक आणि चांगला घटक असेल ही. आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. आज त्याचे दुष्परिणाम जास्त झाले आहेत. जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जे रॅली काढली जाते त्यात नाचणारे बहुतांश जण दारुने झिंगलेले असतात. त्यांना त्या कार्यक्रमाशी काही देणे-घेणे नसते. यामूळे कित्येक लोकांच्या रोजच्या राहणीमानावर परिणाम पडतो, याचे जरासुध्दा भान ठेवत नाहीत.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकांतून सुधाकर चे चित्र समाजासमोर खूपच चांगल्या पध्दतीने मांडले होते त्याचा किती परिणाम झाला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. दारूमुळे आज कित्येक संसार उघड्यावर आलेली आहेत. काही लोकांना दारू पिऊन गाडी चालविण्याची सवय आहे. मात्र दारू पिऊन गाडी चालविणे अत्यंत धोकादायक आहे. रोज सरासरी दोन तरी अपघात दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात आणि चार - पाच जिवांना हकनाक मुकावे लागते. या अपघातात मरण पावलेल्याचे कुटुंब वाऱ्यावर पडते. त्याच्या कुटुंबातील सदस्याचे खूपच हाल होतात. संपूर्ण कुटुंबच भेदरलेले आणि विस्कळीत असते.
कधी कधी शाळेतील चिमुकल्या मुलांच्या तोंडून काल शाळेत का आला नाहीस ? या प्रश्नाचे उत्तर  ऐकण्यात आलं की " काल माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलं आणि शिव्या दिलं म्हणून माझ्या आईसोबत मी गावी गेलो होतो. " तेवढ्यात बाजूची पोरं जोरात ओरडून सांगतात " सर याचे बाबा रोज दारू पिऊन घरात भांडण करतात आणि ह्याच्या आई सोबत ह्याला सुध्दा मारतात " तेंव्हा त्या मुलाचा चेहरा उदास आणि काहीसा गडबडलेल्या अवस्थेत असतो. शाळेतून त्याच्यावर खूप काही चांगले संस्कार होत असतील, तो शाळेत कदाचित हुशार ही असेल परंतु कुटुंबाची वाताहत त्याला त्या असंस्कृत वातावरणात परफटत घेऊन जाते. अश्या प्रकारांवर कुठे तरी आळा बसायला हवे
दारूचे दुष्परिणाम सांगून लोकांवर काही फरक पडत नाही. शंभरातून एखादा व्यक्तीच हे समजून घेवू शकतो. बाकीच्या लोकांना कायद्याच्या भाषेतूनच सांगावे लागते. देशात शांतता व सुव्यवस्था रहावी यांसाठी कायद्याची निर्मीती आहे म्हणून त्याचा योग्य वापर होणे हे पुढील काळाची खरी गरज आहे. आज समाजात एक चांगला संदेश पाठविले तर त्याचे चित्रे पुढील काळात नक्कीच चांगले पहायला मिळेल. तेंव्हा आपण एक जागरूक नागरिक असाल तर याविषयी नक्की लढा उभारू या.
============================
8)  ** . . हसा आणि हसवा . . **
                            -  नागोराव सा. येवतीकर
                                मु. येवती ता. धर्माबाद
                                9423625769
माणसाचे जीवन निरोगी राखायचे असेल तर जीवनात हास्याला मोलाचे स्थान आहे. गंभीर चेहऱ्याचा आणि कधीच न हसणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुध्दा मानसिकरित्या आजारी पडते. तर विनोदी हसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीला सुध्दा थोडा वेळ का होईना बरे वाटते. राजेश खन्ना अभिनीत आनंद चित्रपट पाहिल्यावर असे वाटते की, खरोखरच आपल्या जीवनात हास्य राहिले नसते तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकलो नसतो.  हसण्यामुळे मनावरचा ताण क्षणभर नाहीसा होतो आणि मनाला, मेंदूला ताजेतवाने वाटते अन् मोठ्या जोमाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेता येते.
कोणतेही काम आत्मिक आनंदाने केले नाही तर त्या केलेल्या कामात काही रुची, चव राहत नाही. मग ते स्वयंपाक असो की, घरकाम असो वा कार्यालयीन काम. विनोदाच्या चार ओळीच  दिवसभरातील शीण दूर करतात. समर्थ रामदास स्वामी " टवाळा आवडे विनोद " असे म्हणतात. कारण आज आपण आत्मिक पध्दतीने न हसता इतरांच्या फजितीवर किंवा त्यांची फसवणूक झाल्यावर हसतो. वास्तविक पाहता असे हसणे क्षणिक असावे. आपल्या हसण्याने इतरांना त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून विनोद करणे केंव्हाही चांगले. विनोदात शब्द हे खूप मोठे कार्य करतात. शाब्दिक कोट्यावरून भरपूर विनोद तयार केले जातात आणि कधी कधी सहजच विनोद तयार होतात. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे शब्द हे शस्त्र आहेत जरा जपून वापरा. शब्दाचे घाव इतर घावापेक्षा खोल असतात. त्यामूळे योग्य शब्दाचा योग्य वापर करून विनोद निर्माण करणे आपल्यासाठी आणि समाजांसाठी सुध्दा चांगले असते.  जीवनात हसण्याचे  प्रसंग बहुतेक वेळा येतात. साध्या साध्या घटनेतून आपण विनोद निर्माण करीत राहिलो तर कुटुंबातील वातावरण हसरे व निकोप राहील. सब टी व्ही वरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रत्येक कुटुंबातील लहान मोठ्या सर्व प्रकारच्या प्रसंगाना विनोदबुध्दीने संकटाना कसे तोंड द्यायचे याचे नमुनेदार प्रसंग दाखवून सर्वांना नेहमी खळखळून हसविण्याचे काम करीत असते. आपण ही त्या पात्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न का करू नये !
आचार्य अत्रे यांना विनोदाचा बादशहा असे म्हणतात त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला विनोदबुध्दीने तोंड दिले चार्ली चप्लीन या जगप्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण जगाला हसविले म्हणून आपण आज ही त्यांना विसरू शकत नाही चित्रपटात असे भरपूर कलाकार झाले आहेत ज्याना फक्त आपणाला हसविण्याचे काम केले म्हणून आपण त्यांना आठवण करतो. जसे की जुन्या काळातील  जॉनी वॉकर, असराणी, महेमुद, जगदीप, जॉनी लिव्हर, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे इत्यादी. आज टी व्ही वर श्रोत्यांना हसविण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाची रेलचेल आहे. ज्याद्वारे आपण खूप हसू शकतो.  जगज्जेता सिकंदर सर्व जग जिंकला, पण रिकाम्या हाताने परतला. आपण सुध्दा असेच एके दिवशी रिकाम्या हाताने परत जाणार आहोत. तत्पूर्वी काही चांगले काम म्हणजे सर्वांना हसत खेळत ठेवण्याचे काम केलेले बरे ! आपण सर्वजण विदूषकाच्या गमती जमती पाहण्यासाठी सर्कशीला जातो सर्कस पाहुन आपण खूप हसतो त्याला पोट धरून हसणे असे म्हणतात हे कदाचित तिथे कळते. या हसण्यामुळे मनाला आनंद मिळतो. हसण्यामुळे आपल्या शरीरातील सर्वांगाचा व्यायाम होतो. त्यामूळे हसण्याचे जीवनात फारच महत्वाचे आहे. म्हणून कोठेही आणि कसेही हसता येत नाही. आपण मोठमोठ्याने हसलो तर आजूबाजूचे सर्वांचे लक्ष आपल्याकडे जाते त्यामुळे हसताना वेळ आणि जागा याचेही भान असू द्यावे. मुलींनी आणि महिलांनी फारच सांभाळून हसावे लागते. आपल्या हसण्यात सुध्दा सौंदर्य लपलेले असते. खूपच गंभीर वातावरणात थोडसं विनोद सुध्दा संपूर्ण वातावरण बदलवुन टाकू शकते.
मोठ्या शहरात रोजची धावपळ आणि धकाधकीमुळे त्याचे हास्य लोप पावत आहे असे वाटते. त्यामूळे लॉफिंग क्लब उघडण्याची नामुश्की आली आहे. हसनारे बाळ आणि हसरे व्यक्ती आपणा सर्वांना हवेहवेसे वाटतात. पण नुसतेच लटके हसणे, तोंडावरच उसने हसू इतरांच्या मनाला समाधान देवू शकत नाही. त्यासाठी मनातून हसले तरच कोणीतरी आपणाला खरी दाद देतील.
हजरजवाबीपणा आणि चातुर्य विनोद अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तर भारतातील बादशहाच्या दरबारातील बिरबल आणि दक्षिण राज्यातील चतुर तेनालीराम यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. त्यातून आपणांस त्यांची विनोदबुध्दी स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर पुढील काळात मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव विनोदाच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतला जातो. त्यांचीच परंपरा पुढे पु ल देशपांडे यांनी चालविली. त्याचे साहित्य आज ही वाचकांना खळखळून हसविते. चला तर मग असेच काही मजेशीर विनोद वाचू या आणि दिवसाची सुरुवात हसण्याने करू या
**
बंड्याला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये
नोकरी मिळाली, पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,

" बंड्या, रात्रभर जागून एवढं कसलं काम करत
होतास ?''
बंड्या म्हणाला ''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर
'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता. सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या...( हसा )
============================
** मरावे परी कीर्तिरूपे उरावे **
                               - नागोराव सा. येवतीकर
                                 मु. येवती ता. धर्माबाद
                                 जि. नांदेड
आज भारताचा 68 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाई चे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात.
या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामाच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे.

आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्यचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. कवी भा. रा. तांबे आपल्या कवितेत म्हणतात की, ' जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? ' असा प्रश्न त्या॑नी सर्वांना विचारला  परंतु आपल्या मृत्यूनंतर या जगात काय उरते तर ते फक्त नाव आणि कीर्ती. म्हणून आपल्या माघारी आपले नाव सर्वांनी घ्यावे असे वाटत असेल तर काही जगापेक्षा वेगळे करू या. स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.
================================
** आधी वंदू तुज मोरया . . .
                          - नागोराव सा. येवतीकर
                            मु. येवती ता. धर्माबाद
                            जि. नांदेड
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा

आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला आपण तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यामुळे गणेशोत्सव कधी एकदा येतो याची आपणाला उत्सुकता लागलेली असते. प्रत्येक शुभ कार्यात मग तो लग्न समारंभ असो वा  लक्ष्मीपूजन असो, कोनशिला समारंभ असो वा  वास्तू शांती असो की सत्यनारायणाची पूजा असो त्यात सर्वसाधारपणे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच श्री गणेशाला आद्य दैवत म्हटले जाते. हिंदू धर्मातील लोकांच्या उंबरठय़ाकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे घराच्या  चौकटीतील वरच्या आडव्या लाकडी फटीवर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. त्याशिवाय घराला घरपण येत नाही. ज्यांच्या घराच्या चौकटींवर श्री गणेशाची मूर्ती नाही असे घर शोधून सुध्दा सापडणार नाही. घरातून बाहेर पडताना आपण कोणत्या कामांसाठी बाहेर जात आहोत ?  स्वार्थासाठी की निस्वार्थ कामांसाठी जात आहोत यांची नोंद चौकटींवर विराजमान असलेले श्री गणेशा करतात, असे पुराणात सांगितले आहे. त्याचमुळे घराबाहेर पडताना वडील मंडळी विशेष करून महिला नेहमीच चौकटीचे दर्शन घेतांना आढळून येतात व ठरविलेले काम वेळेत पूर्ण होवो अशी प्रार्थना श्री गणेशाजवळ करतात.
तसे पाहिले तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला घरात श्री गणेशाची पूजा केली जाते. मात्र भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा केली जाते. याच दिवसाची आबाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात.  हत्तीचे सोंड असलेले तोंड, सुपासारखे मोठे कान, बारीक डोळे, अगडबंब पोट आणि त्याचा लहानसा वाहन मुषकराज या सर्वाविषयी आपल्या मनात कमालीची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जात असे असा उल्लेख इतिहासात आढळते. भारतीय असंतोषाचे जनक आणि जहाल नेते लोकमान्य टिळकांनी इंग्रजाच्या जुलमी राजवटीविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, लोकांत एकता आणि एकात्मतेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सन 1890 च्या दशकात श्री गणेशाच्या घराघरातील उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची सन 1894 मध्ये स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केली.  तेंव्हापासून आजतागायत आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू लागलोत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली तो उद्देश आज सफल होत आहे काय ? यांचा विचार करण्याची वेळ आपणावर आलेली आहे. या दिवसांत " गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया " या गीतांने सर्वत्र चैतन्यमय वातावरण होऊन जाते. तेंव्हा बोला एकदाचे गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$.
nagorao26@gmail.com
================================









1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...