Monday, 28 January 2019

ऑफरचा भुलभुलैय्या


ऑफरचा भुलभुलैय्या

कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची. रस्त्याने जाता येता मनुष्य दुकानाच्या पाट्या वाचत असतो, त्याचसोबत कोणत्या दुकानात कोणती ऑफर आहे ? याकडे देखील लक्ष देतो. ऑफर म्हणजे व्यापाराचे चातुर्य आणि ग्राहकांचा मूर्खपणा होय, हे कळतंय पण मनाला ते पटत नाही. आपले डोळे नेहमी या ऑफरच्या शोधात फिरत असतात. बहुतांश वेळा ऑफरमध्ये मनुष्य फसतोच फसतो. ज्या वस्तूची विक्री होत नाहीत अश्या वस्तू ऑफर मध्ये काढून विकण्याची शक्कल व्यापारी आणि कारखानदार लोकांची असते. त्याला जनता नक्की भुलते आणि नको असलेल्या वस्तू देखील खरेदी करत सुटते. खास करून सण आणि उत्सवाच्या निमित्ताने हे ऑफर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. लोकांना खरेदी करण्यास उद्युक्त करणे म्हणजे ऑफर. काही लोकं याच ऑफरच्या मोहापायी फसलेले आढळून येतात तेंव्हा त्यांची खूप।कीव वाटते. लाख रुपयांच्या मोहापायी एकास वीस हजार रुपयास फसविले अश्या आशयाच्या बातम्या जेंव्हा वाचनात येतात. तेंव्हा एक गोष्ट लक्षात येते की, माणसाच्या मनाचा खूप अभ्यास करून हे लोकं फसवितात. त्याची सुरुवात फार थोड्या पैशाने होते. सुरुवातीला फक्त पाचशे ते हजार रुपये लागतील असे सांगितले जाते आणि एकदा मासा गळाला लागला की, त्यांची मागणी वाढत जाते..आपले गेलेलं पैसा परत मिळावा म्हणून मनुष्य पैसा टाकत जातो. वीस पंचवीस हजार रुपये गेल्यावर उशिरा जाग येते. आपण फसलो आहोत याची जाणीव झाल्यावर मनाला खूप त्रास होतो. म्हणून ऑफरच्या भानगडीत न पडता योग्य किमंत देऊन योग्य वस्तू खरेदी करणे केंव्हाही चांगले असते. सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून ऑफरची संख्या वाढली तसे फसणाऱ्याची संख्या देखील वाढली आहे. काही हुशार मंडळी या ऑनलाईन नेटवर्कचा हुशारीने वापर करून अनेक लोकांना फसवित आले आहेत आणि लोकं सुद्धा काही तरी चांगला ऑफर आहे म्हणून त्यात फसत आहेत. मोठमोठ्या मॉल मध्ये ऑफरची संख्या भरमसाठ असते. काही बाबी ऑफर मध्ये देऊन दुसऱ्या बाबीवर बरोबर पैसा वसूल करतात हे लोकांना कळतच नाही. मानवी मनाचा मोह लक्षात घेऊन व्यापार करणारे मंडळी मात्र काही दिवसांत मालामाल होऊन जातात. आपले उत्पन्न लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून देखील ऑफरचा वापर केला जातो. ऑनलाईन शॉपिंगवर ऑफरचा नुसता धुमाकूळ असतो. काही पैसे किंवा रुपये वाचविण्याच्या मोहापायी हजारो रुपये टाकले जातात. नशीब चांगले असेल तर काही गोष्टी मनासारखे मिळतील ही मात्र दरवेळी आपले नशीब फळफळेल यात शंकाच आहे. याबाबतीत समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या मनाचे श्लोक मध्ये म्हटले आहे

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दु:ख मोठे   
 
अर्थात दुसऱ्याच्या संपत्तीचा हव्यास नको. अति स्वार्थबुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते. ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते. त्या कर्मातून आपल्या मनासारखे काही घडले नाही तर ते खूपच मोठे दु:ख ठरते आणि ते क्लेशदायक देखील असते. त्यामुळे मनाचे खच्चीकरण होते. म्हणून सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट हे सुवचन नेहमी लक्षात ठेवून कार्य करीत राहावे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...