Monday, 23 April 2018

पोलीस

पोलीस : जनतेचा रक्षक

अगदी लहान असल्यापासून प्रत्येकांना पोलीसांविषयी आकर्षण असते. न कळत्या वयात त्या पोलिसांची भीती वाटत नाही मात्र मोठा झाल्यावर पोलीस होईन असे प्रत्येकाचे स्वप्न असते. शाळेत शिकतांना शिक्षक मुलांना प्रश्न विचारत असे, मोठे होऊन तुम्हाला काय व्हायला आवडेल ? बहुतांश मुले या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर, इंजिनियर म्हणत. त्यानंतरची मुलांची पसंद पोलीसावर येऊन थांबत असे. लहान मुलांसाठी ड्रेस खरेदी करायला दुकानात गेल्यानंतर मुलांची पहिली पसंद पोलिसांच्या ड्रेसला असत, आज ती क्रेज कमी झाल्यासारखे वाटते. पण पोलिसांच्या ड्रेस विषयीचे आकर्षण अजून ही कायम आहे. पोलिसांच्या वर्दीतील माणूस पाहिला की, समोरचा व्यक्ती जरा दचकून वागतो. तीच व्यक्ती जर साध्या ड्रेसमध्ये समोर आल्यास तेवढे काही वाटत नाही. पोलिसांना पाहिल्यावर चोरांना तर भीती वाटतेच शिवाय सामान्य माणसाला देखील जरासी भीती वाटते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन काम करत असते. सैनिक देशाचे संरक्षण करतात तर पोलीस देशांतील लोकांचे. म्हणूनच पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे आहे, याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुष्टाचा संहार. पोलीस विभागात पोलीस महासंचालक ते हवालदारपर्यंत वेगवेगळी पदे असतात आणि सर्वांना वेगवेगळी काम विभागून दिली जातात. त्यात पोलीस हे एकच पद सर्वाना ओळखीचे आहे. पोलीस याविषयी सर्वाना आकर्षण असते आणि प्रत्येकजण म्हणतो पोलिसांची खूप मजा असते. पण खरोखरच त्यांची मजा असते का ? याचा थोडा खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येईल की, त्यांना किती त्रास सहन करावा लागतो. जनतेच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी यांनाच घ्यावी लागते. गावात किंवा शहरात कुठे छोटी-मोठी घटना घडली की, आपण सहज म्हणतो, यावर पोलिसांचे काही लक्ष नाही. चोरांच्या घटना वाढल्या की, चोरांचे आणि पोलिसांचे सूत जुळलेले आहे अश्या बातम्या वाचण्यात येतात. अवैध धंदे किंवा काही अवैध बाबी घडू लागले की पोलिसांवर ओरड निश्चितपणे केल्या जाते. म्हणजे आपण समजू शकतो की, पोलिसांवर किती मोठ्या जबाबदारी असतात. एवढे मात्र खरे आहे सामान्य माणूस किती ही ओरडला तरी काही लोक त्यास दाद देत नाहीत मात्र पोलीस नुसते लाठी जरी जमिनीवर आदळली तरी त्यांना लगेच प्रतिसाद मिळतो. पोलिसांनी याच बाबींचा फायदा घेऊन समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. समाजाने सुद्धा त्यांना साथ देणे आवश्यक आहे. मात्र जनता अजिबात विचार न करता वागतात त्यामुळे पोलिसांना वेगळ्या पद्धतीने वागावे लागते. पोलीस जनतेच्या मदतीसाठी आहेत, त्यांच्या विषयी मनात अजिबात भीती न राहता प्रेम असायला हवे पण सध्या समाजात तसे चित्र पाहायला मिळत नाही. यामागे काय कारण असू शकेल याचा शोध घेतल्यास एक बाब लक्षात येते की, पोलीस याविषयी समाजात फार पूर्वीपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून भीती पसरविण्यात आली. पोलीस हे भ्रष्टाचारी आणि वेगळ्या प्रवृत्तीचे असतात असे चित्र निर्माण करण्यात चित्रपटाचा सिंहाचा वाटा आहे. अजय देवगणने सिंघम चित्रपटात पोलिसांची खूप छान भूमिका दाखविली त्यामुळे पोलिसांची छाती फुगली असे म्हणणे चुकीचे नाही. मात्र प्रत्यक्षात पोलीस देखील एक माणूस असतो, त्याला देखील एक कुटुंब असते, लेकरं असतात याचा जेंव्हा विचार करतो त्यावेळी मनात वादळ निर्माण होते. प्रत्येकांना आपले सण, उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत व्यथित करता येतात मात्र त्याच वेळी।जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांना ड्युटी करावी लागते. त्यांना बहुतांश सण बंदोबस्तमध्येच साजरी करावी लागतात, हे सत्य त्यांच्या कुटुंबाकडे पाहिल्यावर लक्षात येते. काही वेळा घरात अत्यंत महत्वाचे कार्य किंवा अडचण निर्माण होते मात्र त्यांना सुट्टी मिळत नाही. त्यावेळी त्यांचा किती मनस्ताप होत असेल याचा आपण विचार करू शकतो. रात्रीच्या वेळी सर्व जनता झोपेत असते त्यावेळी आपल्या सुरक्षेसाठी पोलिस आपले घर सोडून आपल्या संरक्षणासाठी गस्त घालीत असतात. कधी कधी कुटुंबाकडे वेळ देऊ न शकल्यामुळे नवरा-बायको यांच्यात खटके देखील उडतात. पोलिसांची बायको म्हणून समाजात त्या महिलांना विशेष मान देखील मिळतो मात्र आतून ते विविध समस्यांनी त्रस्त असतात. सामान्य महिलांना जे सुख मिळते ते या महिलांना मिळत नाही. काही ठिकाणी असे ही ऐकायला मिळते जेंव्हा वधू संशोधन चालू असते त्यावेळी पोलीस असलेल्या उपवरास अनेक संकटाना तोंड द्यावे लागतात. पोलीसवाला नवरा नको असे म्हटले की, त्या पोलीसवाल्या उपवराना कसे तरी वाटते. लोकसंख्येच्या ज्या प्रमाणात पोलीस असायला हवे त्या प्रमाणात पोलीस सध्या कार्यरत नसल्यामुळे आजच्या पोलिसांवर कामाचा तणाव दिसून येत आहे. वास्तविक पाहता आठ घंटे ड्युटी करून ते मोकळे होतात मात्र काही वेळा इमर्जन्सी असते की, ओव्हर टाइम ड्युटी करावी लागते. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि समाजातील लोकांना मानसिक समाधानासाठी पोलीस खूप आवश्यक आहेत. साधा एक पोलीस वर्दीतील व्यक्ती जरी सोबत असेल तरी लोकांना अजिबात भीती वाटत नाही. शहरातील लोकांना शांतता व सुव्यस्था साठी पोलीस स्टेशन आणि पोलीस असतात मात्र ग्रामीण भागात पोलीस पाटील वगळता कोणी ही नसतो. बहुतांश वेळा पोलीस पाटील यांच्याविषयी लोकांमध्ये आदर असते मात्र पोलिसांप्रमाणे आदरयुक्त भीती नसते. त्यामुळे ग्रामीण भागात, खेड्यात वाद, तंटे याचे प्रमाण वाढीस लागतात. यावर उपाय म्हणून तत्कालीन गृहमंत्री कै. आर आर पाटील यांनी महात्मा गांधी तंटा मुक्ती योजना तयार केली ज्याद्वारे गावातील वाद, तंटे गावातच मिटवले जावे. यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. जनतेनी आपली समस्या पोलिसांना सविस्तर सांगायला हवे आणि पोलिसांनी त्यांची समस्या ऐकून त्यावर काही कार्य करायला हवे. पूर्वी पोलीस खात्यात महिलांची संख्या नगण्य होती. मात्र भारतात पहिली महिला आय पी एस किरण बेदी यांनी जेंव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेंव्हापासून या क्षेत्रांत महिलांची काम करण्याची संख्या वाढू लागली. आज अनेक महिला या क्षेत्रात विविध पदावर राहून आपले काम पूर्ण करीत आहेत. काही बहुरूपी मंडळी पोलिसांच्या ड्रेसमध्ये लोकांचे मनोरंजन करतात तर काही वेळा लोकांची अश्या बहुरूपी पोलिसांकडून फसवणूक देखील होऊ शकते. पोलीस आज ही समाजासाठी कार्य करतात. पोलीस लोकांचा संबंध जास्तीत जास्त वेळा चोर, गुंड किंवा फसवेगिरी करणाऱ्या व्यक्तीसोबत येते. त्यामुळे त्यांना वेगळ्या भाषेत बोलावे लागते. तीच सवय प्रत्यक्ष जीवन जगताना ही अंगवळणी पडते. म्हणूनच ते सहज जीवन जगतांना देखील पोलीस म्हणून बोलल्यासारखे वाटते. फक्त आपण त्यांना समजून घ्यायला हवे. चित्रपटात दाखविण्यात येणारी कहाणी ही खोटी असते मात्र आपणास तेच सत्य वाटत असते. म्हणून पोलीस यांच्याविषयी आपल्या मनात असलेली भीती आणि इतर गोष्टी दूर करून त्यांना समजून घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू या. जय हिंद

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. नमस्कार,
    चित्रपटात दाखविण्यात येणारी कहानी खोटी नसते. तर समाजातील घडणाऱ्या गोष्टींवर चित्रपटांतील कहानीचा फोकस असतो. म्हणूनच प्रत्येक टि.व्ही चॅनल वाल्यांना एक पट्टी टाकून वास्तवाशी संबंध आल्यास योगायोग समजावा असे वाक्य टाकणे भाग पडते.असो सहज सुचले म्हणून भाष्य केले. एकंदरीत लेखन चांगले झाले.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...