Monday, 15 January 2018

प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत

*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*

प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र हळूहळू हे चित्र बदलत गेले. आज प्रत्येक गावात शाळेसाठी किमान दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक आहेत. गावाला या शाळेचा खूप आधार असतो. अडी अडचणी ला गावातील लोक याच शाळेचा आधार घेतात. गावातील एखादे छोटे मोठे लग्न असो किंवा इतर काही कार्यक्रम प्रत्येकजण शाळेच्या मैदानाचा आणि वर्गखोलीचा हमखास वापर करतात. सरकारी शाळा ही सार्वजनिक मालमत्ता असते त्यामुळे शिक्षक मंडळी देखील कोणाला काही बोलू शकत नाहीत. मात्र ज्या शाळेला संरक्षण भिंत आहे त्या शाळेची सुरक्षितता जास्त प्रमाणात आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतल्याशिवाय येथे काही करता येत नाही. त्यामुळे शाळेत बाहेरच्या बाजूला असलेली रंगरंगोटी टिकून राहते. शाळेचे मैदान कोणी खराब करू शकत नाही. मैदानातील बाग विविध फुलझाडांनी बहरून आणता येते. मनात जे काही आणले ते सिद्धीस नेता येते. शाळेचे सौदर्य देखील।खुलून दिसते. याउलट संरक्षण भिंत नसेल तर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. शिक्षक आणि विद्यार्थी दिवसभर शाळेत स्वच्छता करून ठेवतात. शाळा सुटल्यानंतर काही क्षणात गावातील उनाड मुले शाळेत विविध खेळ खेळून शाळेचा परिसर अस्वच्छ करतात. काही तरुण मुले तंबाखू आणि गुटखा खाऊन शाळेच्या दारात थुंकतात. त्यामुळे सकाळी त्याचा उग्र वास दरवळत असतो. काही मद्यपी मंडळी शाळेच्या आवारात दारू पितात आणि दारूची बाटली मैदानात फोडून काचा पसरवितात. याहीपुढे जाऊन काही महाभाग वर्गात दारूची बाटली फोडतात आणि सकाळी गुरुजीला काम लागावे असे करतात. शाळेतील शौचालय तर कधी ही पहा तेथे घाण केल्या जाते. शिक्षक मुलांच्या मदतीने स्वच्छ करून घेतात तर काही विघ्नसंतोषी लोक शौचालय विद्रुप करून ठेवतात. शाळेचा बाह्य भिंतीवरील अनेक चित्रे आणि नकाशे विद्रुप केली जातात. वृक्षारोपण किती ही वेळा करू द्या तेथे एक ही वृक्ष लागवड होऊ शकत नाही. गावातील लोकं जाण्याचा रस्ता शाळेतूनच, जनावरे जाण्याचा रस्ता शाळेतूनच, गाड्या आणि वाहने जाण्याचा रस्ता देखील शाळेतूनच त्यामुळे शाळेतील मुलांना शिक्षक कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकत नाही. काही शाळेतील अत्यंत महत्त्वपूर्ण साहित्य चोरीला गेल्याची बातमी जेंव्हा वाचण्यात येते तेंव्हा खूप दुःख वाटते. आज गावोगावी च्या शाळा डिजिटल मध्ये रूपांतरित होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेत एक लाखांच्या आसपास डिजिटल साहित्य असते. मात्र त्याची सुरक्षितता रामभरोसे आहे. शाळेतील काही खेळ किंवा कृतीयुक्त बाबी घेण्यासाठी शाळेचे मैदान काहीच कामी येत नाही. ततेच जर संरक्षण भिंत असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार यांनी शासनाला याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याविषयी निवेदने देऊन प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी खास तरतूद करण्याची सूचना केल्यास शाळेची सुरक्षितता वाढेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

6 comments:

  1. खुप छान लेख आहे सर आणि जिल्हा परिषद शाळाची हिच सत्य परिस्थिती आहे यासाठी सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  2. खूप छान सर सुरक्षिततेकडून समृद्धी कडे

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  4. खूप छान लेख आहे सर, एका चांगल्या विषयाला हात घालून सविस्तर मांडल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !

    ReplyDelete
  5. याची नितांत गरज आहे

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...