Wednesday, 25 September 2019

सुपरस्टार अमिताभ बच्चन

सुपरस्टार अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन सुपरस्टार म्हणून लहाना पासून थोरापर्यंत सर्वानाच परिचयाचे आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे ऐकून खूप आनंद वाटला. त्यांचा सर्वात पहिला चित्रपट म्हणजे सात हिंदुस्थानी, या चित्रपटापासून त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्यांना सहायक अभिनेता म्हणून अनेक चित्रपटात काम करावे लागले. सत्तर ते ऐंशीच्या दशकात राजेश खन्ना हे सुपरस्टार होते. त्यांच्या सोबत आनंद या चित्रपटात अमिताभ यांनी भूमिका केली. पडत्या काळात त्यांना मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळालीच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचा आवाज आणि उंची याचा प्रश्न निर्माण होत असे. पण प्रकाश मेहरा यांच्या जंजीर चित्रपटाने अमिताभ यांना अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत जनतेसमोर आणून ठेवले. ही भूमिका लोकांनी डोक्यावर उचलून धरले. या चित्रपटात त्यांची धर्मपत्नी जया भादुरी देखील होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच बघितले नाही. अश्या या अभिनेत्याचा 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्म झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय होत. वडील प्रसिद्ध कवी असल्यामुळे आपणांस त्याचा फायदा घेता येऊ शकते याचा कधीच विचार न करता, स्वतः अनेक त्रास आणि संकटे पार करत अमिताभ यांनी हा पल्ला गाठला आहे. जंजीरच्या नंतर नमक हराम, रोटी कपडा मकान, कुंवारा बाप, अमर अकबर अँथॉनी सारख्या विविध चित्रपटात सह कलाकारांची भूमिका केली. मजबूर चित्रपट जास्त चाललं नाही मात्र त्यांच्या अभिनयाची दखल घेणे भाग पाडले. याच दरम्यान यश चोपडा यांचा दिवार चित्रपटाने अजून एकदा त्यांना स्टार करण्यास मदत केली. या चित्रपटात शशीकपूर सोबत अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाले. सन 1975 मध्ये रमेश सिप्पीच्या शोले या चित्रपटाने हिंदी सिने सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलाकारांना एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यात अमिताभ बच्चन यांची जय मधील भूमिका संस्मरणीय. या चित्रपटातील अनेक प्रसंग आज ही चित्रपटात संदर्भ म्हणून वापरले जाते. शोले या चित्रपटाने एक नवे विक्रम निर्माण केले. मध्यंतरच्या काळात अमिताभ यांनी काही विशिष्ट भूमिका करण्याकडे असे त्यांच्या चित्रपटातून लक्षात येते. कभी कभी आणि कसमे वादे या चित्रपटाने एक प्रेमळ व्यक्ती दाखविण्यात आला. डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है हा डायलॉग डॉन चित्रपटातून मिळाला जो की आज ही गाजतो. शाहरुख खान यांनी तोच चित्रपट पुन्हा केला. त्रिशूल, मि. नटवरलाल, मुकद्दर का सिंकदार, दोस्ताना, सिलसिला, लावारिस, शान, राम बलराम, शक्ती, शहेनशहा, आखरी रास्ता, ही काही उल्लेखनीय चित्रपट आहेत ज्यामुळे अमिताभ बच्चन हे नाव कायम लोकांच्या लक्षात राहीले. राजेश खन्ना, शशीकपूर, संजीव कुमार, दिलीप कुमार, विनोद खन्ना, ऋषिकपूर या अभिनेत्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. तसेच अनेक नटीसोबत देखील त्यांनी अभिनय केले आहे. सन 1982 च्या कुली चित्रपट चालू असताना अमिताभ यांच्या सोबत जीवावर बेतणारा प्रसंग घडला. सुदैवाने ते त्या अपघातातून बचावले आणि कुली हिट देखील झाला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी  हे त्यांचे निकटचे मित्र होते. सन 1984 ते 1987 च्या काळात ते भारतीय राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. अमिताभ बच्चनचा चित्रपट म्हटले की थिएटर हाऊस फुल्ल व्हायचे. त्यांच्या नावावर बरेच चित्रपट चालायचे. देवाने त्यांना सर्वांपेक्षा वेगळा आवाज दिला होता त्यामुळे त्याचा फायदा त्यांनी बरोबर उचलला. त्यांच्या आवाजात गायलेले रंग बरसे असो वा मेरे अंगने मे हे गीत खूप प्रसिद्ध झाले होते. ए बी सी एल नावाची कंपनी निर्माण केली आणि त्याद्वारे त्यांनी चित्रपट निर्मिती मध्ये प्रवेश केला. त्यांचे चित्रपट सपशेल आपटले गेले आणि काही काळातच ते कर्जबाजारी झाल्याचे बातम्या झळकू लागले. अश्या विपरीत परिस्थितीमध्ये सोनी टीव्ही वरील कौन बनेगा करोडपती या क्वीज मालिकेने परत एकदा त्यांना स्टार बनवले आणि पैसा ही मिळवून दिला. त्यांनी पोलियोची जाहिरात करून राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचे नोंद घेण्यासारखे आहे. दो बुंद जिंदगी के हे स्लोगन प्रत्येकांच्या ओठावर येण्यामागे एकच व्यक्ती ती म्हणजे अमिताभ होय. अग्निपथ या चित्रपटातील विजयच्या भूमिकेने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. यापूर्वी त्यांना चित्रपट क्षेत्रातील फिल्मफेअर पुरस्कार अनेक वेळा मिळाले. त्यांचा भारदस्त आवाज, जोरकस अभिनय, त्यांची हेअर स्टाईल, बेल बॉटम पॅन्ट यासर्व बाबी त्याकाळात खूपच प्रसिद्ध झाले होते. एवढं वाय वाढलं तरी पूर्वीसारखेच काम करण्याचा उत्साह खरोखरच उल्लेखनीय आहे. तिशीतल्या युवकांना लाजवेल असे काम आज ही ते करतात. त्यांना दोन अपत्य असून मुलीचे नाव नंदा तर मुलाचे नाव अभिनेता अभिषेक असे आहे. ऐश्वर्या रॉय ही त्यांची सून आहे. गेल्या पन्नास वर्षीच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणजे हा दादासाहेब फाळके पुरस्कार होय. ऐंशी ते नव्वदच्या दशकातील जे युवक आहेत त्यांनी कित्येक वेळा तरी भल्या मोठ्या रांगेत उभे राहून अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहिल्याचे आज ही लक्षात येते. पुनश्च एकदा हार्दीक अभिनंदन ....!
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...