* खेडोपाडी एटीएम ची आवश्यकता *
बँकेत होणारी गर्दी लक्षात घेऊन एटीएम म्हणजे एनी टाइम मनी अर्थात कोणत्याही वेळी पैसा मिळेल अशी व्यवस्था सर्वच बँकांनी करावे असे रिझर्व बँकेने सर्व बॅंकांना सूचित केले त्यानुसार सर्व बॅंकांनी आपले एटीएम सुरू केले. मात्र या एटीएम बाबतीत ग्राहकांच्या असंख्य तक्रारी असल्याचे आणि देशांत फक्त 33 % एटीएम चालू असल्याचे भारतीय रिझर्व बँकेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यावर भारतीय रिझर्व बँकेने सर्व बँकेला कडक निर्देश दिल्याचे वाचून आनंद वाटले.
बँकेच्या व्यवहारात जनतेला सध्या खूपच वाईट अनुभव येत आहेत. बँकेतील काही कर्मचारी जनतेशी चांगले वर्तन ठेवत नाहीत. काही बँकेत तर निव्वळ दलालांचा सुळसुळाट आहे. शाखा व्यवस्थापक आणि दलाल हे दोघे मिळून ग्राहकास लुबाडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सर्रास दिसून येते. शेतकऱ्यांना ज्यावेळी पीक कर्ज बांधण्याची वेळ येते त्यावेळी या दलालांचा व्यापार सुरू होतो अगदी व्यवस्थापकाशी हातमिळवनी करून. साधा माणूस कर्ज मागायला गेल्यास त्यास हिडीस फिडीस शब्दांत बोलून हाकलून दिले जाते आणि या दलालांच्या माध्यमातून गेल्यावर लगेचच कर्ज मंजूर केल्या जाते या पध्दतीला काय म्हणावे ?
बँकेतील गर्दी कमी व्हावी म्हणून एटीएम ची संकल्पना निर्माण झाली. मात्र हे एटीएम मशीन असून अडचण नसून खोळंबा असल्याचे अनेक वेळा अनुभव जनतेला आले आहे. एटीएम बंद असल्याबाबत शाखा व्यवस्थापक शी संपर्क केले असता ते समाधानकारक उत्तरे न देता अर्वाच्च भाषेत संवाद केल्याचे अनेक लोकांना अनुभव आले आहे. एटीएम मध्ये पाचशे आणि हजारच्याच नोटा ठेवल्यामुळे लोकांना संकटाला तोंड द्यावे लागते. एटीएमच्या सेवेत सुधारणा होणे आवश्यक आहे. लोकाना एटीएम वर विश्वास निर्माण होईल अशी सेवा देणे काळाची गरज आहे. माणसांना ज्यावेळी काम पडेल त्यावेळी बँकेचे व्यवहार करता यावे यांसाठी एटीएम खूप चांगले माध्यम आहे. परंतु ग्राहकास एक दोन वेळा एटीएम बंद असल्याचा अनुभव आल्यास तो त्यांवर विश्वास ठेवणार नाही. याठिकाणी हमखास पैसे मिळतात याची खात्री पटली तरच लोकांचा विश्वास वाढेल. एटीएम मध्ये वातानुकूलित म्हणजे AC चालू असणे आवश्यक असून देखील ते सुध्दा बऱ्याच ठिकाणी बंद अवस्थेत दिसून येते. या एटीएम मशीन च्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुध्दा महत्वाचे आहे. बऱ्याच केंद्रावर सुरक्षा व्यवस्था राम भरोसे असते. एटीएम मधून पैसे काढल्यावर चोरी झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संरक्षणासाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्वाचे आहे असे वाटते. एटीएम मध्ये ठेवण्यात येणाऱ्या नोटा ह्या चांगल्या दर्जाचे असावे. नकली नोट या मशीनमधून मिळणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी लागते. मशीनमध्ये पैसे टाकणारी मंडळी जवळपास अर्धा कोटी म्हणजे पन्नास लाख रूपयाचा घोटाळा केला असल्याचे बातमी काही दिवसापुर्वी वाचण्यात आली होती. यांवरून कुंपणानेच शेत खाल्ली तर दाद कुणाकडे मागावी, या सगळया बाबतीत बँकेने विचार करून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. लोकांचा बँकेवर असलेला विश्वास परत मिळविण्यासाठी रिझर्व बँकेने असेच कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.
लोकसंख्याच्या बाबतीत विचार केल्यास देशांत सध्या दोन लाख एटीएम मशीन आहेत जे की फार कमी आहे. प्रत्येक खेडोपाडी गावांमध्ये एटीएम मशीन स्थापन करणे ही काळाची गरज आहे. ग्रामिण भागातील माणूस पैश्याच्या व्यवहारासाठी बँकेत येण्याची गरज भासू नये यांसाठी एटीएमची स्थापना गरजेचे आहे. एखादा व्यक्ती बँकेत येऊन व्यवहार केल्यास बँकेला साधारणपणे 65 रुपये खर्च येतो तर हाच व्यवहार जर त्या ग्राहकांने एटीएमच्या माध्यमातून केल्यास त्याच व्यवहाराकरिता 35 रुपयांच्या आसपास खर्च येतो. यांवरून बँकेचा पैसा वाचविण्यासाठी प्रत्येक खेडोपाडी एटीएम स्थापना करणे आवश्यक आहे असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
No comments:
Post a Comment