Saturday, 5 December 2015

पत्रलेखन




💥 विचारमंथन भाग -33 💥

🔺विषय :  स न वि वि पत्रास कारण की ..॥

🔺संयोजक व परीक्षक : सौ.अंजनाताई कर्णिक 
🔺ग्राफिक्स - उत्कर्षजी देवणीकर सर 

🔺 दिनांक : 06 डिसेंबर 2015
🔺वेळ :- सकाळी 10 ते सायं.7 पर्यत. 

कळावे . . ! लोभ असावा . . . ! 

==========**=================**====================**===============
** स न वि वि पत्रास कारण की . . . . . . . 
मला अगदी लहानपणापासून पत्राची ओळख होती. वास्तविक पाहता पत्राची ओळख शाळेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून होते मात्र यास मी अपवाद. 
माझे बंधू आकाशवाणीवर नेहमी आपली आवड किंवा आप की पसंद या कार्यक्रमात नेहमी पत्र पाठवीत असत. आणि काही रेडिओ मित्राचे पत्र त्यांना येत असत त्यामुळे हे पत्र ओळखीचा झाला होता. मात्र तेंव्हा या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटायचे की या पत्राचा प्रवास कसा होतो आणि एकाच गाण्याची आवड कशी जुळत असेल. सिलोन असो किंवा विविध भारती स्टेशन तेथे आपले नाव प्रसारित होणे फारच नशिबाचा भाग असतो हे मला फार उशीरा कळाले. आकाशवाणी नागपूर किंवा औरंगाबाद - परभणी येथे तर त्यांचे नाव ठरलेले असायचे आणि त्यांचे नाव आकाशवाणीवर ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे.
साधे कार्ड आणि आंतरदेशीय कार्ड ची ओळख घरातून झाली. बंधू परभणीच्या वेटरनरी कॉलेज मध्ये शिकायला होते त्यामुळे अधून मधून त्यांचे आंतरदेशीय पत्र येत असत तर कधी कधी पाकीटवर काही चित्र चिकटवलेले पत्र यायचे. त्यांचे पत्र वाचताना मला खूप आनंद व्हायचा. आपली खुशाली कळविण्याचा हा एकच मार्ग शिल्लक होता. ज्यांचा वापर बंधू आणि माझे वडील नेहमी करायचे.
याच अनुभवाचा वापर मला भविष्यात खूपच चांगल्या प्रकारे झाला. दहावीत असताना सर्वात पहिल्यांदाच मी या पत्राचा वापर केला ते थेट दैनिक लोकपत्र वृत्तपत्रांच्या संपादकाना " पत्रास कारण की " लिहिला ज्यात त्यांनी दहावी वर्गात आपणांस काय वाटते ? असा प्रश्न विचारले होते. मी अगदी परखडपणे त्यात तेंव्हा चालू असलेल्या मास कॉपी बद्दल राग व्यक्त केला होता आणि योगायोगाने ते माझ्या फोटो सह प्रकाशित झाले. त्यानंतर मागे कधीही वळून पाहिले नाही. या लेखामुळे मला प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळाले आणि मी वाचन केलेल्या भागावर चिंतन आणि मनन करून लिहू लागलो. पत्र आत्ता माझ्या जिवाचा एक अविभाज्य भाग बनला होता
कॉलेजच्या जीवनात माझ्या लेखनाला थोडी गती मिळाली कारण मी धर्माबाद सोडून आत्ता नांदेडला आलो होतो आणि दैनिक लोकपत्र नांदेड येथून प्रकाशित होत असल्यामूळे दर दोन - तीन दिवसाला माझे विचार दैनिक लोकपत्रच्या लोकमंच या सदराखाली प्रकाशित होऊ लागले. या सर्व घटनेत माझा नेहमीचा साथीदार म्हणजे अर्थातच पत्र. त्या 15 पैश्याच्या पत्राने मला माझ्या विचार प्रकट करायला संधी दिली. माझ्या बॅग मध्ये निदान दहा तरी पोस्ट कार्ड असायची. घरी दारी कॉलेज असो की ट्यूशन पत्र माझ्या सोबतच असायचा. यांसाठी मला माझ्या बंधूच्या बोलणी खावी लागली. 12 वीचे महत्वाचे वर्ष आहे तेंव्हा हे लिहिणे बंद कर आणि अभ्यासाकडे लक्ष दे असे त्यांचे बोलणे ऐकल्यावर मात्र तिकडे अजिबात लक्ष्य दिलं नाही. कॉलेज प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली होती परंतु मी ते रिस्क घेतली नाही मित्रांनी सुध्दा फोर्स केला होता पण मी टाळले. जवळपास 1 वर्ष पत्र माझ्यापासुन दूर होते.
योगायोगाने मला डी. एड. ला प्रवेश मिळाला. या ऐवजी मी दुसऱ्या क्षेत्रात गेलो असतो तर कदाचित माझ्या अभिव्यक्ति राहून गेली असती असे वाटते. मग काय येथे प्रवेश घेतल्यापासून पत्रलेखनाचा वेग वाढला. घरी लिहिणे पत्र आणि पेपर ला लिहिणे चालू झाले. घराकडे पत्राचा ओघ सुरू झालं महीना - दोन महिन्यानंतर गावी जाऊन आलेल्या सर्व पत्राचा मागोवा घेणे आणि जमेल त्या पत्राला उत्तर देणे एवढेच काम राहिले. अभ्यासाची काळजी होतीच त्यामुळे तिकडं दुर्लक्ष होऊ दिलं नाही.

डी एड संपल्या नंतर एखाद्या पेपर चा प्रतिनिधी म्हणून काम करावा या उल्हास मुळे दैनिक मराठवाडा मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत असताना प्राथमिक शिक्षक च्या नौकरी चा कॉल आला आणि हे क्षेत्र सोडून शिक्षक म्हणून गावापासुन दूर किनवट तालुक्यात काम करू लागलो. येथे सुध्दा मला पत्राने मला सोबत दिली. माझ्या संपूर्ण आयुष्यात पत्राचे कार्य अमूल्य आहे. पत्र माझ्या जीवनात आला नसता तर कदाचित आज मी जे काही ते दिसू शकलो नसतो.

परंतु आज या मोबाईल मुळे पत्राचा वापर कमी झाला म्हणण्यापेक्षा नाहीच म्हटलं तरी काही चूक नाही असे वाटते. फ़ेसबुक आणि whatsapp च्या काळात पत्राचे आयुष्य संपल्यात जमा आहे. आपल्या मुलांना हे सर्व साहित्य एखाद्या म्युझियम मध्ये नेऊन दाखवावा लागेल असे वाटते. दूर शिकायला गेलेला मुलगा किंवा सासरी गेलेली मुलगी आपली खुशाली पत्राद्वारे व्यक्त करीत असे. त्यास आठवडा भरचा वेळ लागायचा. डाकिया डाक लाया म्हणत पोरं नाचायची, मामाच्या पत्राची भाचा भाची वाट पहायचे.
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
बायको आपल्या नवऱ्याच्या पत्राची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहायची आज हॅलो म्हटलं की प्रत्यक्ष बोलणं होते. परंतु पत्रांच्या प्रतिक्षेत जो गोडवा, मधुरता किंवा उत्सुकता आहे ती या मोबाईलवर बोलतांना मिळत नाही. जेंव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहितो तेंव्हा अगदी हृदयातून लिहितो त्याच्यात प्रेमाचा ओलावा असतो व्यक्ती समक्ष नसतांना ही समोरासमोर बोलते आहेत असा भास होतो. म्हणून तर एक कवी लिहितो की मेरा प्रेमपत्र पढ़ कर की तुम नाराज ना होना असे आपल्या प्रेयसीला सांगतो. विदेशी राहाणाऱ्या लोकांच्या पत्राला तर फार विषेश महत्व कारण ते पत्र विमानाचा प्रवास करून आलेली असते म्हणून तर चिट्ठी आयी है असे मन उड्या मारीत असते. आपले घरदार सोडून सीमेवर देशांच्या रक्षणासाठी गेलेल्या जवानांना एका पत्रांमुळे किती दिलासा मिळत असेल नाही का !
- नागोराव सा. येवतीकर,
  मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769
==========**=================**====================**===============
तीर्थरूप आई/बाबा
स.न.वि.वि.
पत्र लिहिण्याचे कारण की,
बरेच दिवसापासन बोलायचं राहून जात घरी आल्पयावर ! प्रत्यक्ष भेटीत जे बोलू शकत नाही.
 ते मनीचे गुज आज संवादाच्या या पुरातन माध्माने करतो आहे.
आपण माझे नाव छान ठेवले विशाल खरच उंच भरारी घेतांना एका विशाल भवसागरातला होऊन बसलो मी. 
जे सर्वांजवळ आहे तेच माझ्याही जवळ आहे या शहरात! नाव,पैसा,गाडी,बंगला,
आणि हो जे सर्वांजवळ नाही ते माझ्याही जवळ नाही !

अंगण नाही, मुलांना आजी,आजोबांची गाणी एैकता येत नाही, सण होतो आंबिल नाही, 
पाय दाबायला बाबा इथे पायही नाही हो !
मंदिर असून दीप नसल्यागत जीवन वाहते आहे. 
आई ए आई एैक परत कडेवर बसून वट वृक्षा जवळ जावं म्हणतो सुरपारंब्याचा खेळ खेळण्यासाठी नेशील का ? 
अन् तो बाबल्याचा रंज्या तो काय म्हणतो गं
माये मला घर आठवतं गाव आठवतं पारावरचा बागलबुवाही अजूनही मनात ठासून भरलाय 

हे धकाधकीच जीवन अन् पै पैसा आता थकलो हो बा !
मला माझी माणस , गावाची पायधूळ, चुलीवरच रांधन मिळत नसेल तर आता एक वाटत नाही आता ठरवलचं मी 
नाही मनानचं माझ्या वाटत अनाथ एखाद्या राणाला दंत्तक घ्याव.
 त्याचाच एक भाग होऊन त्याच्या मधोमध जाऊन बसाव. मनातल मळभ त्याच्याजवळ व्यक्त कराव! 
वाटल तर तिथेच थांबाव थडग बांधून जरा निवांतपणा तरी मिळेल ना 
असो खुप बडबड केली थांबतो
तुम्हा उभयंताच्या पाऊलावर डोक ठेवतो . थोड पाठिवर हात ठेवा !
आई तू कपाळी ओठ टेकव ना गं
बाबा गालगुंच्चा घेतला तरि चालेल 
                        तुमचा लाडका
                              विश्या
                          ३/१२/१५
✏______ अजय धोटे पाटील,अमरावती.
==========**=================**====================**==============

निलेश सु.आळंदे
                                        गडहिंग्लज.
प्रिय सर्वांस,
स.न.वि.वि.
"पत्र लिहिण्यास कारण कि,कालच तुमचे पत्र मिळाले,मी ईथे खुशल आहे..."
असा मायना व सुरवात वाचुन बरेच दिवस झाले,नाहीका???
आजकल पत्रच कोण लिहित नाही त्यामुळे 'कालच तुमचे पत्र मिळले'  याचा संबंधच नाही येत...!!!असेल आपण खुशल..पण पुर्वी पत्र मिळाल्यानंतर जितके खुश असायचो तशी खुशी/आनंद कशात धुंडळावा...!
        खरच,टेक्नाॅलाॅजी मध्ये वाढ झाली,माणसाचे आवाज जवळ जवळ आले,माणुस थोड्या वेळासाठीका होईना,पण स्क्रीन वरुन समोर येऊ लागला...मिनीटा मिनीटाला खुशाली विचारु लागला..आणि मिनीटातच 'बाय' ही म्हणु लागला....खरच माणुस माणसाच्या जवळ आला का हो??की जरा जास्तच दुरावला...??पत्र लिहिणं तर सोडाच,आजकल 'मामाचं पत्र हरवलं,ते मला सापडल' हे खेळगीत पण डायनासोर व शहाम्रुग सारखे कालबाह्य होत चाल्लय राव...पुढच्या काही पिढ्याही विचारतील,काय असतं हे 'पत्र'??
मुलाने बाबांना लिहिलेलं,तरुणाने प्रेयसीला लिहिलेलं,नातवाने आजी-आजोबांना लिहिलेलं...प्रेमाच गठोडं..पत्र...आत्तासारख्या सोईसुवीधा नसताना केली जाणीरी प्रेमळ विचारपुस..पत्र..
आत्ता काय!,दोन सेकंदात text message जातो,एक-दोन मिनीटात seen ही होतो..धत्त्त आतुरता काहीच नाही!!पण पत्र?? अचानक न सांगता यायचं...seen झाल्यावर तर भरुन यायचं...मग आपलं प्रतीउत्तर व आतुरता...किती छान आहे सगळं...रोज chat करणार्या मित्राला कधीतर अचानक तुमच पत्र मिळु द्या,खरच खुप likes मिळतील...comments तर लाजवाब येतील  ;)
   आजचा पत्र लिहिण्याचा हेतु विचारपुस करणे हा नव्हताच मुळात...पण या पत्रलेखनाची आठवण करुन देण्याचा होता...
ज्यात हजारोंच्या भावना गुंतुन असतात...लांब असणार्यांचे लाखो आशिर्वाद असतात..
                लग्न समारंभात अडकुन असेलेने "type करुन का असेना,पण 'पत्र' लिहितो आहे,पण जास्त काही लिहिणं जमेना..शब्द बरेच आहेत,पण लेखनीत उतरेनात..पण सर्वांनी एकमात्र करा,'जरा typing सोडुन writing करुन बघा,खरी "feeling" त्यातच आहे'...
धन्यवाद: -)

                                          आपला लाडका
                                              (शब्दवेडा)
==========**=================**====================**===============
तिर्थरुप वडील(दादा)यांचे सेवेशी,
कृतानेक शिरसाष्टांग दंडवत.
विनंती विषेश,
    पत्रास कारण कीं, 
आपले सविस्तर पत्र आत्ताच मिळाले.  तिकडे सर्व सुखरुप आहांत हे समजुन बरे वाटले. 
भावकित लग्नकार्य असल्याचेही समजले परंतु  इकडे सध्या कार्यभार जास्त असल्याने व माझेवर महत्त्वाची जबाबदारी असल्याने सध्या मला तिकडे येता येणार नाही.क्षमस्व. 
माझे इकडे  बरे चालले आहे. तुम्हाला पाठवलेली मनीऑर्डर मिळाली कां नाही  हे कळले नाही कारण अजुन पोच मिळाली नाही. 
आपण प्रकृतीची काळजी घ्या. माझी काळजी करू नका. 
शेतीला सध्या बरे दिसत नाहीत.तेंव्हा शक्य तेव्हडे पैसे पाठवित राहीन. आपले समाजकार्य चालू असले तरी प्रकृतीची हेळसांड करु नये ही विनंती. 
आपल्या तालुक्याच्या समस्या मुख्यमंत्री यांचे समोर माडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात तुमचाही समावेश होता असे वृत्तपत्रात वाचले, आनंद वाटला.
बाकी सर्व ठीक आहे, तिकडील क्षेमकुशल कळवावे. 
ति. आईस दंडवत व बाकी सर्व लहाण थोरांना मापाप्रमाणे नमस्कार व आशिर्वाद. 
कळावे ही विनंती. 
                        आपला आज्ञाधारक. 
                                  रामराव 
ता.क.
मी येणार नसल्याचे लग्नघरी जरुर सांगा म्हणजे वाट पाहणार नाहीत. 

 (टिप. पत्र 1972 समजावे.)
==========**=================**====================**===============
विचारमंथन --स्पर्धेसाठी
===============
विषय --स.न.वि.वि.पत्रास कारण
=====================
प्रेषक -कुंदा पित्रे 🌺
=====================
सासुबाई सुभद्राबाई पित्रे यांना शि.सा.न.वि.वि.
पत्रास कारण की,
कशी ,कोठून सुरूवात करू कळत नाही.!पण आता इतकी वर्षे साचलेले आपल्याला माझे मत,व प्रेम कळलेच पाहिजे.आपल्याला इथला निरोप घेऊनच मुळी 30 वर्षे झाली,तरीदेखील तुम्ही माझ्या मनांत अजुनही रेंगाळत आहात.आठवणींचे बुरूज कघीच ढासळले नाहीत व पुढेही ढासळणार नाही.ते संचीत मी माझ्या मनात जपुन ठेवले आहे.
मी  सून म्हणून आले ती तुम्हाला पसंत नव्हते .कारणे दोन होती -मला आईवडील नव्हते शिवाय जावेची भाची (भावाची मुलगी),दुसरे कारण मी फक्त सातवी पास म्हणजे मॅट्रीक नाही.पण मुलाच्या प्रेमाच्या हट्टापायी तुम्ही प्रथम झुकलात त्याला दोन कारणे असू शकतात एक तुमचं सौभाग्य तुमच्याजवळ नव्हते. दुसरे मुलांवरील अतोनात प्रेम.!
मी घरी आल्यावर गोड आवाजात म्हणालात तुला शिक्षण पुर्ण करायला हवे हो आपल्या पित्र्यात सारी शिकलेली आहेत. (पण त्यांना माहित नव्हते की मी मुंबईत आल्यावर जे जे शिक्षण  घेण्याजोगे ते घ्यायचेच हा माझा निर्धार होता.मला खुप बरे वाटले.त्यावेळी इंग्रजी पाचवीपासुन सरू झाले होते तयामुळे आठवीतील मुली पुढे होत्या म्हणुन मी तर्डखकर माला व डिक्शनरी पालथी घालत असे शिवाय चार वर्षाची गॅप होती तेव्हा बाकीचे विषय पिंजून काढणे क्रमप्राप्त झाले .त्यावेळी सासुबाई मला कधीही घर कामाची   जबरदस्ती केली नाहीत.मी कितीही वेळ अभ्यासात घालवला तरी कधी टोचून बोलणे नाही ,माहेर नाही म्हणून उणेदुणे काढले नाहीत.सदा हसत मुखाने मुलगी मानून करीत राहिलात. खरे सांगू सासूबाई मला सासरी आल्यासारखे वाटलेच नाही.
पुढे जुळी मुले झाली तेव्हा तुम्ही मला घरकामाला न जुंपता फक्त मुलांचे कर असे सांगितलेत व मुलांना आंघोळ घालता येत नाही म्हणून एक दिवस प्रयत्न केलात व मुलाला बाथरूममधून आणताना पाय घसरला तुमचे वय 70 च्यापुढे होते.आंघोळ घालू नका म्हणायची माझी टाप नव्हती .मला कल्पना होती म्हणून मी तिथेच उभी होते मी सावरले.तुम्हाला घाम फुटला व म्हणालात तुच कर सारे पण बाहेर जाताना किंवा लग्नाला जाताना नेऊ नकोस कारण सांभाळणे कठीण जाईल मी सांभाळेन.सासूबाई गोष्टी छोट्या छोट्या होत्या आज पाहिले तर त्या किती मोठ्या होत्या हे आज जाणवते. आणखी वरची कडी म्हणजे मुले चार वर्षाची झाली व मी बाहेरून एस .एन .डी .टी.काॅलेज करायचे ठरविले. सकाळ संध्याकाळ मुलांचे करायचे दुपारी अभ्यास करायचा. त्यावेळी तोंडवाकडे न करता इतकी साथ दिलीत की,मला इथे सांगायलाच पाहिजे की,परीक्षेला जाण्याअगोदर सकाळी थोडी मी उजळणी करताना भान नसायचे तर ही माऊली गुडघे दुखत असुनसुध्दा एक खोली सोडून मी बसलेली असे तिथे येऊन मला गोड साखरभरल्या आवाजात म्हणायची की,कुंदा अग पेपरला जायचे आहे ना तुला जेऊन निघायची  वेळ झाली चल पान वाढलंय मी उठायची व छानपैकी पेपरला जायची.!परत आल्यावर पेपर कसा गेला याची चौकशी करायच्यात ! तुम्ही शिकलेल्या नसूनसुथ्दा ! घरात माझी  जाऊ दिर इतर माणसे असुन कोणाच्या माझे शिक्षण खिजगणतीत नसायचे ! मी आजही कबुल करते की,सासुबाई तुम्ही होतात म्हणून मी नि:शंक,निर्धास्तपणे एम.ए.झाले. सासुबाई विवाहाला विरोध करणा-या तुम्ही ,मला माझ्या गुणदोषासह स्विकार केलात.!खरंच सासूबाई केव्हढं आभाळा एव्हढ तुमचे मन होते.कधी कंटाळा ,आळस हा शब्द तुमच्या कोषात नव्हता.
मुले पाचवीत गेली  मला अचानक नोकरी मिळाली. आता माझी कसरत होती पुर्ण दिवस नोकरी व मुलांचे अभ्यास ! सासुबाई तुम्ही सुथ्दा थकला होतात.परंतु मुलाना व सा-याना जेवण करून जातीने वाढण्याचे काम नेटाने केलेत .मी दादरला शिफ्ट झाल्यावर मुलांच्या सुट्टीत रहायला येत होतात पाणी सतत असूनही आम्ही ऑफिसला जायच्या आधी स्नान उरकायच्यात तुम्ही तूमचे 84 वय चावु होते गात्र थकली होती.परंतु बाई काम आटपोन जाईल म्हणून तुम्ही आवरून घ्यायच्याथ तुम्हाला मी सावकाश आटपा हे सांगुन सुध्दा !! दुस-याना आपल्यापासुन त्रास नको ही वृत्ती !!
सासुबाई माझे वडिल  गावातील नावाजलेले खोत होते. प्रतिष्ठित म्हणून मान होता.वडिलांच्या घरी माणसांचा राबता होता.ते कुठेही न शिकता तबला पेटी वाजवत,चित्रकला,मुर्तिकला अवगत होती.गावातील सुधारणांचे  जनक होते. खुपच लोभस नावाजलेले व्यक्तिमत्व होते.सासुबाई आपल्याला हे सारे माहित होते. म्हणून तर आपण मला अशी स्निग्ध,गाभुळलेली वागणूक देत होतात कां ?असा माझ्या मनी प्रश्न पडे !पण तसे नव्हते कारण देवाज्ञा व्हायच्या आधी आठ दिवस उठवत नव्हते तरी ऊठून हातात घेऊन मला म्हणालात कुंदा तुझे हे घर आहे तुम्हाला कोण नको येऊ म्हणते ते मी पहाते.मला वाटते सासुबाई नियती हसत असावी.सासुबाई आपल्याला चाहुल लागली होती कां ? की,आम्हाला जागेतून हुसकावुन लावले जाईल ? आपण गेलात व वीस वर्षानंतर जागेचा प्रश्न उद्भवला .आज बारा वर्ष केस कोर्टात आहे. सुखाने जागा देण्याचे नांव नाही .सासुबाई तुम्हाला काय वाटत असेल ?किती यातना होत असतील ?मला कल्पना करवत नाही.ज्या आपल्या मुलांकरिता नातवांकरिता आयुष्य वेचलेत तिथ काय घडतेय ते तुम्हाला कळतय कां ?
 सासुबाई तुम्ही तरी काय करणार म्हणा जिवंतपणी नेटाने कर्तव्य पार पाडलंत ! खरंच मी तुमची आजन्म ऋणी राहिन .!
माफ करा आपला आत्मा कुठे असेल त्याला त्रास द्यायचा हेतु नव्हता.पण मनातल ओठावर आणण्याची संधी साहित्य मंथन दिली म्हणून तुमच्यावरील प्रेमामुळे लिहले इतकेच!!
आज माझ्या वयाच्या सत्तराव्या वर्षी कलत्या तिन्हीसांजेला तुमचे मधाळ ,मऊमुलामय,प्रेम आणि आभाळात मावणार नाही एव्हढ्या  मनाचा जागर माझ्या मनांत कायम राहिल सासुबाई
आता इथेच थांबते !!
तुमचीच सदैव असणारी
धाकटी सून
कुंदा
( हे  लिहलेले सारे सत्य आहे. कुंदा पित्रे )
==========**=================**====================**===============
💥💥साहित्य मंथन 💥💥
                  आयोजित
📚📚विचारमंथन📚📚
==================
📩📩📩📩📩📩📩📩
विषय :-स. न .वि. वि. पत्रास कारण की.....
📨📨📩📩📩✉✉✉✉
तिर्थस्वरूप आई बाबास,
   शिरसाष्टांग दंडवत.....
         विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की,आई मला घेऊन तू आत्ता फिरत आहेस याची मला चाहूल नव्हे खात्री होत आहे.आई मला तुझ्या उदरी जन्म घ्यायचा आहे. तुझी "सोनपरी" म्हणून मिरवायचे आहे. तुझ्या विश्वातील वेल व्हायचे आहे;आणि वेली वरील सुंदरशा पानां-कळ्यांना- फूलांना तुला डोळे भरून पहायचे नाही का ? मला तुझ्या अथांग सागरातील प्रेमरूपी' मीनपरी' व्हायचय.! आणि म्हणून मी नम्र विनवणी करतेय की, तुम्ही मला परळी, लातूर, नांदेड, सातारा, बेळगांव या स्त्रीभ्रूण हत्ये
                  ========
 सारख्या क्रूरकरमाने गाजलेल्या शहरात तर नेउन तपासणी करत तर नाहीत ना ? नेऊ ही नका ? हा माझा हट्ट धरतेय समजा!!!!
        मला या भयावह असणाऱ्या स्वर्गवत वाटणाऱ्या जगात येऊन तुमचा बोज न होता किंवा अंधार न होता आधार आधार गं आई व्हायचं आहे. मला आई या ही अवस्थेत दररोज नित्य नियमाने नवनवी स्वप्ने पडत आहेत. मला कल्पना चावला ,सुनीता विल्यम्स, इंदिरा गांधी नव्हे तर सामाजिक ,राजकीय, आर्थिक ,साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज महिलांचे चरित्र अगदी जवळून अनुभवयास मिळते आहे. अगं हो गं आई मी ही अशीच सर्व सामान्यतुन अद्वितीय सामान्य होण्याचा माझ्या परीने अटोकाट प्रयत्न करणार नव्हे यश नक्कीच मिळवणारच !!!
      आई मग तू काय अशा गर्भ संस्कारी पुस्तकांचे वाचन करतेस काय गं! आई -बाबा माझी मनोमन आपणास एक विनंती आहे की, या मानवजातीत जन्माला येऊ दया ;आणि मग पहा -पहा मी कशी आपले नाव कसे सार्थकी लावेल ते ? तुम्हालाही गर्व वाटला पाहिजे की आपण हिला जन्म देऊन चूक नाही तर एक मोठे पूण्य महत भाग्य प्राप्त केले आहे..  
          मी इतरांप्रमाणे केंव्हाही आणि कधीही त्रास देणार नाही. मला तुम्ही कधीही काहीही घेऊन देऊ नका . फक्त पुरोगामी विचारांचे अन्न नव्हे बाळकडू संस्कार तेवढ़याच प्रगलब्धतेने पुरवा म्हणजे झालं.... म्हणजे मग मी एक  तुमच्या नावाचे जळजळीत ज्वलंत अजब रसायन म्हणून नावरूपास येईल ;पण आई नि बाबा खरोखरच मला तुमच्या कुशीत झोपु - हिंडू-  बागडू फिरण्याचे महत भाग्य लाभू दया.
        मोठी दिदी रागावत तर नाही ना माझ्यावर ? माझे लाड़ न पुरविता तुम्ही तीचेच लाड पुरविलात तरी माझी काही एक तक्रार असणार नाही असे मी आज या पत्राच्या निमित्ताने 'वचन' देतेय फक्त आणि फक्त मला जन्म घेऊ दयात ...
  माझ्या कोवळ्या नरडीचा घोट किंवा मग नख जन्मा आगोदरच न लावता एक जीवभावाचा  आईच्या ममतेचा वात्सलतेचा नि त्याच बरोबर बाबांच्या प्रंचड लेक नांदायला सासरी जाताना मोरासारख्या सुंदर रडणाऱ्या पण तसेच अथांग अशा सागराच्या मायेचा स्पर्श आणि ऊब मिळावी ही एवढीच माफक माफकच अपेक्षा


            तुमचीच लाडकी

          अनामिका /निर्भया

     आईच्या उदरातुन नव्हे
       गर्भाशयातून.........

  ✏🎯🎯🎯✒
आप्पासाहेब सुरवसे सर 
      लाखनगांवकर 
    ता :-वाशी 
  जि :-उस्मानाबाद
📱-9130093301
📱-9403725973

==========**=================**====================**===============
परीक्षक मनोगत : 
सर्वांची एकाहून एक सरस, कल्पक, अत:करणापासू लिहलेली, एकदा लिहूनही अपुर वाटलं म्हणून , मनात नवी कल्पना सुचली म्हणून , भाव ऊचंबळून आले म्हणूनही दुसरून तिसरूनही पत्ररूप सुंदर कविताही अवतरल्यात.
या या वेळी आधीच अस ठरलय की एक् स्पर्धकाच एकच व  पहिल पाठवलेल लिखाण स्पर्धैसाठी धरायच.

माझ्याकडे परिक्षणाची जबाबदारी होती त्या प्रमाणे जसजशा post येत गेल्या तसं तसं त्याचं माझ्या कुवतीप्रमाणे परिक्षण केल आहेच. तरूण आणि अनुभवी, या पिढीचे व ज्येष्ठ , विविध ऊद्योव व व्यवसाय क्षेत्रातल्या सर्वांनी  अत्यंत कळकळीने, कधी लेखणीला धार चढवत, कधी डोळ्यात अश्रृ दाटून आलेल्या अवस्थेत, सामाजिक जाणीवेच्या, प्रश्नांच्या  समस्यांची जाणीव ठेवून पत्र लिहली आहेत.
आनंदी मुड, अन्याय झाल्याने वाटणारी घुसमट, आईवडीलांबद्दलची काळजी, जवळच्या सखीची आठवण जागी झाल्याने लागलेली हुरहूर, भेटीची ओढ सार सार या 
'पत्र लिहीण्यास कारण की', मधून भरभरून व्यक्त झालय.
खरोखर डावं ऊजवं करत क्रमांक देण म्हणजे अन्यायच वाटतोय खर तर!
पण स्पर्धैच्या नियमाप्रमाणे हे कर्तव्य पार पाडायला हवय.
आरंभीच कुलकर्णी काकांनी अल्प शब्दातहीकाळजाला हात घातला. ते स्पर्धेत सहभागी नसले तरीही मी आज श्री. अरविंद कुलकर्णी यांच नावं प्रथम क्रमांकात घालणार आहे . आपणा सर्वाना हे पटेल असा विश्वास वाटतो.

सुलभाताई, शरयुताई जागृतीताई ,जयश्रीताई सुजाताताई , कुंदाताई, 
श्री. रामराव, श्री. अप्पासाहेब,ना सा सर ,श्री. नागोराव ,अजयभाऊ धोटेंचे श्री. पवारांनी पाठवलेले पत्र,
पत्र ,श्री.निलेश , अशी अनेक सुंदर पत्रे ,आॅडीओ , कविता याने आजचा विषय फुलवला आहे. लेखनात वैवीध्यपुर्णताही आहे.
आता निकाल कळवते  तो आपल्या ग्राफीक कारांकडे! फार सुंदर ग्राफीक त्यांनी केलय. 
अंजना कर्णिक

==========**=================**====================**===============


9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...