Saturday, 18 November 2017

जागतिक शौचालय दिन

जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख

*मोबाईल महत्वाचे की शौचालय*

जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे अतिसार, आमांश, कावीळ आणि विषमज्वर यासारखे अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता व आरोग्य कार्यक्रमाचे समन्वयक ब्रूस गॉर्डन यांनी म्हटले आहे. उघड्यावर शौचास बसण्याचे गंभीर प्रभाव पाच वर्षाखालील मुलांवर जास्त प्रमाणात दिसून येतो आणि ही मुले दगावण्याची शक्यता जास्त असते.
भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजमितिला देशातील जवळपास अर्धे लोक म्हणजे 60 कोटी जनता ही उघड्यावर शौचास जाते. भारत हा खेडीप्रधान देश आहे. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्याची संख्या भरमसाठ आहे. त्यापेक्षा शहरात कमी प्रमाणात आढळून येते. शहरात मोकळी जागाच उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना शौचालायाचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. याउलट ग्रामीण भागातील चित्र पहावयास मिळते. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे या भागातील लोकांना उघड्यावर शौच केल्याने काही वाटत नाही. भारत सरकार तर्फे निर्मलग्राम योजना राबवून अनेक गावात स्वच्छतेबाबत लोकांचे जनजागरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान ही चळवळच्या स्वरुपात राज्यभर राबवून लोकांच्या मनात स्वछतेविषयी जागृती करण्याचे काम केले आहे. गावागावात स्वच्छतेच्या बाबतीत स्पर्धा लावून सुंदर आणि स्वच्छ गावांना पारितोषिक सुध्दा दिल्या गेली. तरी सुध्दा ये रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील जनता आज ही उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्यात समाधान मानते. शौचालयाचा वापर करण्यास मागे पुढे पाहते.
स्वच्छता आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध असतो. याचा विचार करून प्रत्येक नागरिकांनी उघड्यावर मलमूत्र विसर्जन करून स्वतःसोबत समाजाचे आरोग्य बिघडणार नाही यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील एखादा व्यक्ती अस्वच्छतेमुळे आजारी पडला की, आपले डोळे उघडतात. आजारातून मुक्ती मिळविताना दवाखान्यात जो पैसा खर्च केल्या जातो तेवढ्या पैशात शौचालय बांधता आले असते याची जाणीव त्यावेळी होते. आजार बरा झाला की, शौचालय बांधकाम करण्याचे पुन्हा विसरून जातात. एकंदरीत आपले वागणे माकडाच्या गोष्टीतील माकड घर बांधायचे ज्याप्रकारे विसरतो त्याचप्रकारे घडत असते. शौचालय बांधणे आणि त्याचा वापर करणे या बाबीकडे लोक गंभीर्याने का लक्ष देत नाहीत, याची अनेक कारणे आहेत.
स्वच्छतेविषयी अनास्था -
आपल्या जीवनात स्वच्छतेचे किती महत्त्व आहे ? यापासून जनता कोसो दूर आहे. याउलट घराबाहेर जाऊन करावयाची क्रिया घरात केल्याने अस्वच्छता अजुन वाढते असा गैरसमज लोकांच्या मनात आज ही घर करून आहे. शौच करणे म्हणजे पोटातील सर्व घाण बाहेर टाकणे होय, मग ती क्रिया घरात करण्यापेक्षा घराबाहेर केलेलेच बरे असे लोकांना वाटते. परंतु तीच घाण विविध आजाराच्या स्वरुपात अधुनमधून घरात शिरकाव करते याची त्यांना पर्वा नसते. मोठी माणसे गावाबहेर जातील परंतु लहान मुले तर घराच्या आजूबाजूला शौच करतात. त्या घाण विष्ठेवर बसलेले माशा घरात येऊन अन्नावर बसतात याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. घराच्या आजूबाजूला लहान मुले शौचास बसण्याच्या कारणावरुन बऱ्याच ठिकाणी वाद, तंटे, भांडण सुध्दा होतात. महिला भगिनीना उघड्यावर शौचास जाताना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. घरातील महिलांना मानसन्मान मिळावे, त्यांची लाज राखली जावी याचा विचार करताना ती शौचास उघड्यावर जाऊ नये याचा मात्र कुणी विचार करीत नाहीत. वयोवृध्द लोकांना सुध्दा उघड्यावर शौचास जाताना त्रास होतो. थकलेले वय आणि चालणे होत नसल्यामुळे त्यांची सुध्दा कुचंबणा होते. विशेष करून पावसाळ्यात घरातील सर्वच सदस्याना उघड्यावार शौचास जाताना त्रास सहन करावा लागतो. तरी ही लोकांना शौचालयाचा वापर करावा असे वाटत नाही याचा अर्थ लोकांमध्ये याबाबतीत फारच अनास्था दिसून येते. त्यास्तव अजुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
पैशाची कमतरता -
दोन वेळेसचे खायाला पोटभर मिळत नाही तेंव्हा शौचालय कुठून बांधणार ? असा सवाल ग्रामीण भागातील लोक सहजतेने बोलून जातात. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व कठीण असल्यामुळे ते स्वतःसाठी चांगला निवारा बांधू शकत नाही तेंव्हा शौचालयाचा विचार त्यांच्या डोक्यात तरी कसा येईल ? ग्रामीण भागातील बहुतांश जनता दारिद्रयरेषेखालील जीवन जगतात. त्यांचे पोट रोजच्या मोलमजुरीवर अवलंबून असते. त्याचसोबत त्यांच्या घरात खाणाऱ्याची तोंडे जास्त आणि कमाविणाऱ्याचे हात कमी यामुळे नेहमीच आर्थिक चणचण त्यांना सतावित असते. शौचालयापेक्षा त्यांना पोट भरण्याची काळजी जास्त असते. म्हणूनच ते या विषयाकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.याउपर ही अशा गरीब आणि दारिद्रयाच्या खाईत असलेल्या लोकांनी मनात आणले तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे पैशाची नियमित बचत करून शौचालय बांधू शकतात. आज ग्रामीण भागात ज्याच्या हातात मोबाईल नाही असे एक ही घर शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या घरी शौचालय नाही मात्र मोबाईल नक्कीच सापडेल. कारण आज लोकांना त्याची जास्त गरज वाटू लागली आहे. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नीरा यांनी म्हटले होते की, ग्रामीण भागात एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात लोटा असे विदारक चित्र दिसून येते. लोकांना शौचालयापेक्षा मोबाईल खुप महत्वाचे वाटते, त्यामुळे आपण निर्णय घ्यायचे आहे  मोबाईल महत्वाचे आहे की शौचालय !
भारतातील हे चित्र बदलण्यासाठी सरकार दरवर्षी नवनवीन योजना तयार करते. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही किंवा लोकांचा प्रतिसाद कमी असतो त्यामुळे ह्या योजना सपशेल आपटतात. यापूर्वी शौचालय नसणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीतून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रावर लाल शिक्का मारले जायचे. त्यामुळे त्यांचे कोणतेच सरकारी काम पूर्णत्वास जात नव्हते. पण मध्यंतरी ते बंद पडले आहे, पुनश्च ते चालू केल्यास लोक शौचालयाचा वापर करण्याकडे लक्ष देतील.शौचालय असणाऱ्या लोकांनाच शासनाच्या सर्व सुविधा मिळतील, निवडणुकीत सहभागी होता येईल, सरकारी नोकरी मिळेल अशा प्रकारच्या अटी टाकल्यास जनता याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देतील. त्याचसोबत शासनाने प्रत्येक गावात निदान एक तरी मोबाईल शौचालयाची निर्मिती करावी. त्याचा नियमित वापर करीत राहिल्यास लोकांच्या मानसिकतेत हळूहळू तरी बदल होईल असे वाटते. लोकांच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी अक्षयकुमार अभिनय केलेला शौचालय - एक प्रेमकथा प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून पहावे. गावागावात आणि शाळाशाळामध्ये हा चित्रपट अवश्य दाखवायलाच हवे. आज जागतिक शौचालय दिन त्यानिमित्ताने प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर करण्याचा संकल्प करावे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गृहभेटी घेणे, कोपरा बैठका, समूह चर्चा, स्वयंसहाय्यता बचतगटासोबत बैठका, तरुण-तरुणी मंडळासोबत खुली चर्चा, तसेच भजनी मंडळ सोबत गावस्तरावरील चर्चा करून स्वच्छ भारत ; समृद्ध भारत बनविण्याचे स्वप्न पूर्ण करू या.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...