Wednesday, 15 November 2017

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सरकारी शाळा

*शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षक*

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेची शाळा प्रत्येक गावातआढळून येते. कारण ‘गाव तेथे शाळा” या संकल्पनेत प्रत्येक गावात, वाडी-तांडयात, डोंगर, कपा-यात, दरीखो-यात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वेगवेगळया योजना राबवून जसे की महात्मा फुले शिक्षण हमी योजना, साखर शाळा, राजीव गांधी निवासी व अनिवासी सेतू शाळा, वस्ती शाळा, हंगामी स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी वसतीगृह इत्यादी योजनेतून शासनाने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केला. भारत प्रजासत्ताक होतांना भारतात मोठ्या प्रमाणात निरक्षर लोकांची संख्या होती, ती भारत सरकार समोर एक फार मोठे आव्हान होते. स्वत: निरक्षर असल्यामूळे त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे ही लक्ष दिले नाही. त्यामूळे दुसरी पिढीसुध्दा निरक्षरतेच्या खाईत लोटली गेली. त्यानंतरची पिढी मात्र शिकून सवरून साक्षर झाली, नोकरी लागली आणि समृध्द बनली. त्यामुळे आज शाळेत दाखल होणा-या मुलांचे पालक जवळपास नव्वद टक्के साक्षर, समजूतदार सजग व शिक्षणाला महत्व देणारे आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यासरकारी शाळेशिवाय पर्यायच नसतो. काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्या पैशाच्या बळावर शेजारच्या इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना पाठवितात. सरकारी शाळेत काहीच शिकविले जात नाही, असे टोमणे या सरकारी शाळांसाठी वशिला पुजेलेले आहे. त्यात या पालकांना दोष देऊन चालणार नाही. कारण तसे वास्तव त्यांना कुठेनकुठे दिसते. गव्हासोबत किडे रगडण्याच्या प्रकारामूळे चांगल्या असलेल्या शाळा आणि विद्यार्थी सुध्दा या चूकीच्या रांगेत नेऊन बसविले जाते. वास्तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? याप्रश्नांच्या उत्तरांतून कळेल की, ते सर्व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.ज्याकाळी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसार म्हणावा तेवढा झाला नव्हता त्या काळात शाळेतून शिकवायला गुरूजीमिळत नसायचे, हा एक गंभीर प्रश्न होता. असाच प्रसंग महात्मा ज्योतिबा फुले यांना सन 1848 मध्ये जेंव्हा पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली होती, त्यावेळी त्यांच्या समोर हा प्रश्न राहिला होता. मात्र त्यांनी स्वत:ची पत्नी सावित्राबाई फुले यांना यासाठी तयार केले आणि देशातीलपहिली महिला शिक्षिका बनण्याचा मान त्यांना मिळाला परंतू शासन इथे तसे करू शकत नाही. त्यांच्यावर काही बंधन असतात, नियम असतात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, आणि कनिष्ठ नोकरी या त्रिसुत्रीच्याविचारधारेत असलेल्या मंडळीनी त्यांकाळी शिक्षकांची नोकरी करण्यास तयार नव्हती. त्या मंडळीना आजही या घटनेचा पश्चात्ताप होत असे आढंळून येते. कारण त्यांच्या सोबतची मंडळी शिक्षकाची नोकरी करीत आज सुखात आहेत. पंचवीस - तीस वर्षापूर्वी प्रत्येक गावात रस्ता आणि वीज पोहोचली नव्हती त्यामूळे शिक्षक सुध्दा पोहोचलेनव्हतेच किंवा त्यांचे प्रमाण कमी होते. चिखलाचा रस्ता तुडवित, एका हातात धोतराचा सोगा अन दुस-या हातातचपलांचा जोडा आणि मानेवर लांब छत्री अडकवुन आठवडयातल्या पहिल्या दिवशी सोमवारी गुरूजी शाळेत यायचे. हात-पाय स्वच्छ धुऊन झाले की, शाळेकडे म्हणजे एकच वर्गखोली त्यात प्रवेश करायचे. आपली शबनम बाजूला ठेवून साफसफाई केल्या जायची. मग सुरु व्हायचा शाळेचा दिनक्रम. गुरूजीचा एक ही शब्द खाली पडू द्यायचे नाही, गुरूजींनी आपणाला काही तरी काम सांगावे असे प्रत्येकांना वाटायचे. परंतु गुरुजी ठराविक मुलांनाच काम सांगायचे, याचा इतर मुलांना राग यायचा. गुरूजीचा गावातील सर्व लोकांशी संपर्क असायचा. चांगला असो, भांडकुदळ असो, बेवडा असो वा नालायक, गुरूजींना सर्वच जण नमस्कार करायचे आणि गुरूजी सुद्धा सर्वांना. आठवडाभर मुक्कमी राहणारे गुरूजी स्वत:ची कामे कधी स्वत: करीत तर कधी इतरांकडून करवून घेत. शाळेत तुटका फळा, एकच लाकडी पेटी ज्यात शाळेचा संपूर्ण दप्तर, एक टेबल, एक खुर्ची एवढेच काय ते साहित्य. एकाच वेळी सर्व वर्गांना शिकवायचे. काही काम असले की, वरच्या वर्गातील अंगाने लठ्ठ, धष्टपुष्ट असलेल्या मुलाला मॉनिटर म्हणून उभे करायचे आणि आपले काम पूर्ण करायचे. एखाद्या मुलाला वाचता आले नाही किंवा गणित सोडविता आले नाही की, गुरुजींची शिक्षा कडक राहत असे. गुरूजींची शिक्षा मिळू नये यासाठी प्रत्येक मूल धडपड करी, प्रयत्न करी, आणि शिक्षा मिळाली नाही याचा मनातून आनंद व्हायचा. याच प्रसंगातून मुले शिकली, मोठी झाली. काहींना सरकारी नौकरी मिळाली, काहींना खाजगी तर काही व्यापारी झाले अन उरले सुरले सर्व शेतकरी आणि शेतमजूर बनले. परंतू त्या गुरूजींला ते अजूनही विसरले नाहीत आणि विसरणार ही नाहीत. कारण गुरूजी आणि मुलांमध्ये जिव्हाळा निर्माण झालेला असतो.पूर्वीच्या शाळेचा इतिहास पाहता सध्याच्या सरकारी शाळा त्या मानाने खूप चांगल्या आहेत. खडू - फळा मोहिमआणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्वत: च्या इमारतीत भरू लागल्या आज गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्त ( तांत्रिक कारणामूळे सुविधा बंद अवस्थेत असेल ती गोष्ट वेगळी ) शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्यासाठी रस्ते चांगले झाले आहेत. त्यास्तव त्या गावातराहण्याचा त्यांना प्रश्नच येत नाही. तसेच स्वत:कडे वाहन असल्यामुळे तर ये - जा करण्याचा प्रश्नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला शिक्षक हा स्वत: हुशार असल्यामूळे स्वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्यांतपाहणार, यात आश्चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकतंय असे म्हणणे चूकीचे अन अतिशयोक्तीचे ठरणार नाही. संगणक युगाच्या काळात आज प्रत्येकांच्या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्तू असल्यामूळे त्याचा वापर शालेय मुले सुध्दा करू लागली. जमाने के साथ चलो प्रथेनूसार शिक्षक मंडळींना सुध्दा याच प्रवाहात सामिल होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोक सहभागातून जमा करण्यात येऊ लागला. पाहता पाहता राज्यातल्या अनेक शाळा डिजिटल क्लासरूम मध्ये रुपांतर होऊन विद्यार्थ्यांना ई-लर्निंग चे धडे द्यायला सुरूवात झाली आहे. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणिशिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना दिलेल्या प्रोत्साहनामूळेच आज राज्यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. सध्या अजून एक बाब प्रकर्षाने लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे कुमठे बीट येथील ज्ञानरचनावाद. दररोज किती तरी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारीवर्ग या कुमठे बीटला भेट देऊन ज्ञानरचनावाद समजून घेत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना देत आहेत. चांगली बाब दृष्टीस पडल्या शिवाय आपली दृष्टी देखील बदलत नाही हे ही तेवढेच खरे आहे. आज राज्यात किती तरी शाळा डिजिटल झाली आहेत. आय एस ओ मानांकनाच्या शाळा आहेत. ज्ञानरचनावाद युक्त शाळा आहेत. इंग्रजी शाळेला लाजवेल अशा ही सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्याआधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरि मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही.शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात अश्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार, शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. नेमके याचठिकाणी चुका होतात आणि शाळा फक्त नावालाच शाळा राहते. जेथे वरील पध्दतीने शाळा चालविली जाते, तेथील शाळा खरोखरच सुंदर होतात. इंग्रजी शाळेचे खूळ मनातून काढून टाकून पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश देणे गरजेचे आहे. पूर्वी सारख्या शाळा आणि शिक्षक आज राहिले नाहीत म्हणून आता लोकांनी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे कारण सरकारी शाळा ह्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शाळा आहेत, हे सत्य विसरून चालणार नाही.

नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...