Sunday, 8 January 2017

पोशाख

पोशाख म्हणजे व्यक्तीची ओळख

व्यक्तीच्या अंगावर असलेले पोशाख म्हणजे पेहराव त्या व्यक्ती विषयी बरीच माहिती सांगते. साधी राहणी अन उच्च विचारसरणीमध्ये राहणारे लोक आपल्या पोशाखाकडे कधी लक्ष देत नाहीत. कारण त्यांना आपल्या पोशाखापेक्षा त्यांना त्यांचे विचार फार महत्वाचे वाटतात. महात्मा गांधी संपूर्ण आयुष्य एका पंचा वरच व्यथित केले होते हे आपण जाणतो. त्यानंतर दुसरे काही व्यक्ती दिसतात जे की आपल्या पोशाखाकडे विशेष लक्ष देतात. एक निरिक्षण असेही दिसते की जी व्यक्ती आपल्या पोशाखाकडे जास्त लक्ष देते ती आपल्या विचाराकडे तेवढे लक्ष देत नाही. आपल्या कपड्याला एक ही डाग लागू नये याची काळजी ते हमखास घेतात. एकवेळ आपल्या विचाराना डाग लागलेले यांना चालते. असे लोक खुप खालच्या स्तरावर जाऊन विचार करतात. काही लोकांना सेवा शर्तीच्या अधीन राहून पोशाख करावा लागतो. एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना कंपनीने ठरवून दिलेला पोशाख टाकणे बंधनकारक असते. शाळेत शिकणाऱ्या मुलांना शाळेने ठरवून दिलेला गणवेष म्हणजे पोशाख टाकून शाळेला जावेच लागते. शाळेची शिस्त मोडायला जमत नाही. एकसारखा गणवेष परिधान केल्यामुळे मुलांमध्ये एक समानता दिसून येते. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदभाव दिसू नये यासाठी गणवेषाची सक्ती केली जाते. काही शाळेत याचे वेगळे स्वरुप दिसते त्यामुळे त्यास वेगळेच वळण लागते. मात्र या एकसारखा पोशाख टाकण्यामागे स्पष्ट उद्देश्य म्हणजे मुलांमध्ये एकसूत्रता दिसून यावी. परिवहन मंडळ म्हणजे बस मधील चालक आणि वाहक यांचा पोशाख पाहिल्या बरोबर लक्षात येते की हे बसचे संबंधित व्यक्ती आहेत. त्यांना पाहून आपण सरळ त्यांच्याशी संवाद करतो. तेच जर त्यांच्या अंगावर पोशाख नसेल तर प्रवाशी देखील गोंधळामध्ये पडतो. विद्युत मंडळात देखील असे कर्मचारी दिसून येतात ज्यांच्या अंगावर पोशाख असतो. काही ठिकाणी चौकीदार असतात त्यांचा ही पोशाख ठरलेला असतो. पोशाखावरुन निरक्षर, अडाणी व्यक्ती देखील त्यांना ओळखू शकतो की सदरील व्यक्ती कोण आहे ? एवढे त्या पोशाखाचे महत्त्व आहे. अंगावर पांढरा पोशाख दिसला की आपणास आठवतो तो म्हणजे शाळा मास्तर. जुन्या काळी पांढरा सदरा आणि पांढरी धोती हा पोशाख म्हणजे शाळा मास्तर अशी ओळख असायची मात्र काळ बदलला आज शाळेत शिकवित असलेले मास्तर अश्या पोशाखात दिसून येत नाहीत. मात्र काही राष्ट्रीय सण आणि उत्सवाच्या वेळी आवर्जून पांढऱ्या पोशाखात दिसून येतात. विविध कार्यालयातून परिचर पदावर काम करणाऱ्या लोकांना मात्र पांढरा पोशाख मात्र सक्तीचे आहे. या पांढऱ्या पोशाखाचा वापर खास करून राजकारणी लोक फार मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येतात. पांढरा पोशाख सर्वानाच शोभुन दिसतो म्हणून प्रत्येक जण या पोशाखाचा वापर करताना दिसून येतो. नेपाळी  किंवा गुरखा व्यक्ती देखील आपल्या पोशाखामुळे पटकन ओळखता येऊ शकतो. अजुन एका पोशाखाची ओळख आवर्जून द्यावीसी वाटते ते म्हणजे पोलिसांच्या खाकी वर्दीची. आबालापासून तर वृध्दापर्यंत सर्वाना या पोशाखाचे नेहमीच आकर्षण राहते. पोलिसाची वर्दी पाहिल्याबरोबर अनेक लोकांच्या भुवया उंचावतात. त्यातल्या त्यात डोक्यावर त्याच रंगाची अधिकारी वर्गाची टोपी असल्यास त्यांच्या पासून जरा दूरच राहत असल्याचे दिसून येते. तीच व्यक्ती जर साध्या पोशाखात कुठे बाजारात किंवा इतरत्र दिसली तर त्यांच्याकडे कुणी पाहत देखील नाही. म्हणजे हा पोशाखाचाच कमाल म्हणावे लागेल ! देशाच्या सैनिकांचा पोशाख बघितला की छाती गर्वने फुलून येते. त्या सैनिकांचा सर्वाना अभिमान वाटतो. कधी कुठे दिसला तर त्यांच्याशी हस्तांदोलन करावेसे वाटते. मुलींचा पोशाख वेगळा तर महिलाचा पोशाख वेगळा. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात परिधान करण्यात येणारे पोशाख अंत्यविधीमध्ये परिधान करता येणार नाही. 

लग्न कार्यात बैंडबाजा वाजविणारे एका पोशाखात दिसतात आणि त्यामुळे त्यांची यूनिट लक्षात राहते. खेळात एका संघाला एक सारखा पोशाख असल्या मुळे दोन विरुद्ध गट स्पष्ट कळतात. हॉटेल मध्ये काम करणारे वेटर एका पोशाखात असल्यामुळे होणारा गोंधळ कमी होतो. आपली आर्डर कोणाला द्यायची हे पटकन लक्षात येते. दवाखान्यात गेल्यानंतर पांढऱ्या पोशाखातील महिला बघितले की तोंडातून सिस्टर असे सहज बाहेर पडते. मग सुरु होतो आपला संवाद. आपल्या समस्या त्यांना सांगू शकतो. पांढऱ्या रंगाच्या पोशाखात गळ्यात स्टेथोस्कोप असेल की लगेच ते डॉक्टर आहेत अशी ओळख आपल्या मनाला होते. डाकिया डाक लाया म्हणत गाव भर फिरणारा पोस्टमन त्याच्या खाकी पोशाखा वरुन दूर असलातरी लगेच ओळखता येतो. रेल्वे स्टेशनवर देखील आपणास विविध पोशाखातील व्यक्ती आढळून येतात. रेल्वेतुन खाली उत्तरल्या बरोबर आपले डोळे लाल रंगातील पोशाख असलेल्या व्यक्तीच्या शोधात फिरत असतात ज्यास कुली म्हणतात. निळ्या रंगाच्या पोशाखातील व्यक्ती रेल्वे स्टेशनची संपूर्ण देखभाल करतात तर पांढऱ्या रंगातील पोशाख घातलेले व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेवर नियंत्रण ठेवतात आणि प्रवाश्याना तिकीट देतात. काळा कोट अंगावर असलेले व्यक्ती टी. सी. म्हणून रेल्वेत तपासणी करतात. असाच काळा कोट अंगावर असलेले व्यक्ती न्यायालयात दिसून येतात त्यांना न्यायाधीश आणि वकील असे संबोधले जाते. डोक्यावर पांढऱ्या रंगाची गांधी टोपी, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर गंध, हातात टाळ बघितले की आपल्या समोर वारकरी माणसाचे चित्र आपसुक उभे राहते. जो दर पंढरपुर यात्रा वारी न चुकता करतो. मानवी जीवनात पोशाखाचे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात असे अनेक पोशाखाचे उदाहारण दिसून येतात. ज्यामुळे आपणास आपल्या समोरील व्यक्ती आणि त्यांचे कार्य स्पष्ट होतात.

- नागोराव सा. येवतीकर

  स्तंभलेखक

मु. येवती ता. धर्माबाद

9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...