* रस्त्याना अच्छे दिन येतील ? *
- नागोराव सा. येवतीकर
राज्यांतील रस्ते मजबूत आणि दर्जेदार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून राज्यांतील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळच्या ९० हजार ५३२ किलोमीटरचे रस्ते येत्या ३१ मे पर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली, असल्याचे वृत्त वाचून खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना नक्कीच दिलासा मिळाला असेलच यांत शंकाच नाही. रस्त्यावर अगदी सुखरूपपणे प्रवास करण्याचे स्वप्न यानिमित्ताने जनतेला दाखविण्यात आले. पण खरोखरंच 31 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल काय ? याबाबत सर्व जनतेच्या मनात साशंकता आहे. राज्यात 6 हजार 357 किलोमीटरचे प्रमुख रस्ते आहेत जे की निश्चितच चांगल्या स्थितीत असेल, थोडी फार दुरुस्तीची गरज असेल. 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत तर 33 हजार 963 किलोमीटरचे राज्यमार्ग आहेत. या राज्यमार्गाची मात्र गेल्या दोन वर्षात बरीच दुरावस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील रस्ते आणि महाराष्टातील रस्ते यांत जमीन आसमानचा फरक आहे. शेजारच्या राज्यात प्रवास करतांना विमानात बसल्याचा भास होतो . रस्त्यांवर अजिबात एकही खड्डा दिसून येत नाही. याउलट आपल्या महाराष्ट्रात गाडी चालविताना वाहन चालकास विविध प्रकारच्या कसरती कराव्या लागतात. प्रवास करणारे व्यक्ती सुध्दा या खड्डातून प्रवास करतांना त्याच्या नाकी नऊ येते. खराब रस्त्यामुळे बरेच नुकसान होते, यागोष्टीकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर चांगल्या रस्त्यांचे महत्व नक्कीच जाणवेल.
देशाच्या विकासाची खरी सुरुवात ही खेड्यातून होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी खेड्याचे महत्व ओळखून होते त्यामूळे खेड्याकडे चला असा संदेश दिला होता जनतेनी मात्र बापूजीच्या या संदेशाचा दुसराच अर्थ काढला खेड्याकडे चला ऐवजी खेड्यातून चला असॆ म्हणत लोकांचा शहराकडे जाणारा लोंढा दिवसेंदिवस वाढतच आहे. खेड्यातून ही जनता शहराकडे का धाव घेत आहे ? या समस्येचा कोणी विचार करीत नाहीत की त्या समस्येवर काही उपाययोजना सुध्दा करीत नाहीत. प्रत्येक पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी मंडळी खेड्यातील भोळ्या भाबड्या जनतेला वेगवेगळी आश्वासन, वचन देऊन मतदान प्रक्रियेपुरते मतदारांना राजा म्हटले जाते आणि एकदा निवडणूक प्रक्रिया संपली की विजयी झालेले लोकप्रतिनिधी पुढील पाच वर्ष आपल्या मतदारसंघाकडे ढुंकून सुध्दा पहात नाही. प्रत्येक गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीनी जाणिवपूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक आहे. विशेष करून प्रत्येक छोट्या गावात जाण्यासाठी चांगला पक्का रस्ता असणे अत्यंत महत्वाचे आहे.
चांगल्या रस्त्यावरून प्रवास करतांना वाहन चालक आणि प्रवासी यांना खूपच छान वाटते. दूरवरचा प्रवास सुध्दा सुखदायक वाटते. नियोजित स्थळी कधी पोहोचलो हे कळतच नाही. मात्र याउलट खराब रस्त्यावरून प्रवास करतांना खड्ड्यामुळे शरीराचा बुकणा होतो. थोड्याच प्रवासानंतर चालक थकून जातो. वाहने खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच सोबत जनतेला सुध्दा विविध शारीरिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खराब रस्त्यामुळे किंवा खड्डा चूकविताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. ज्यात लोकाना आपले अमूल्य जीव गमवावे लागले . म्हणूनच शक्यतो वाहन चालक आणि प्रवासी त्या खराब रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. दुसरा एखादा मार्ग निवडतात जरी तो मार्ग 10 - 15 किलोमीटर दूर पडत असेल. वाहनाच्या ये - जा वर्दळ असल्यामुळे अनेक उद्योगधंद्याना प्रोत्साहन मिळते. लोकांच्या हाताला रोजगार मिळते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो. त्याच्या कुटुंबांमुळे गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा पर्यायाने राज्य आणि देशाचा विकास होतो, त्यांची प्रगती होते. गावाच्या विकासासाठी रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो. गाव ते शहर जोडणाऱ्या रस्त्यांवर सुरुवातीस लक्ष देऊन त्यांची दुरुस्ती करावी. दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता भासते. रस्त्याशिवाय गावाचा विकास आणि प्रगती अशक्य आहे. गावापासून तालुक्याला किंवा मोठ्या शहराला जोडणारी रस्ते हे अप्रत्यक्षरीत्या विकासासाठी हातभार लावतात. चांगल्या रस्त्यामुळे माणूस सहजरित्या त्यांना हवे असेल त्याठिकाणी तत्काळ पोहोचू शकतो. शेतकरी आपल्या शेतातील उत्पादन मोठ्या बाजारात सहजरित्या नेऊ शकतात. गावात कोणी आजारी किंवा अचानक बीमार पडल्यास रुग्णाना दवाखान्यात ने - आण करण्यासाठी रस्ता तो ही चांगला असणे गरजेचे आहे. शाळकरी मुलांसाठी जे स्कूल बस किंवा ऑटो चालविली जाते त्यांना सुध्दा या चांगल्या व खड्डेमुक्त रस्त्याचा फायदा होतो. एकूणच काय तर सर्वांनाच या खड्डेमुक्त चांगल्या रस्त्यांची आवश्यकता आहे. त्यशिवाय नागरिकांचे जीवन सुसह्य आणि आनंदी होणार नाही.
आज राज्यांतील ग्रामीण भागातील गावाच्या रस्त्यांची स्थिती फारच बिकट आणि वाईट आहे. गावापासून तालुका किंवा जवळील शहराचा रस्ता जेमतेम दहा ते पंधरा किमी लांबीचा रस्ता असतो. मात्र एवढ्या कमी लांबीचा रस्ता सुध्दा नीट नसतो त्यामूळे अनेक अडचणीना तोंड द्यावे लगते. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुध्दा वाढते. त्याचबरोबर वाहनाच्या आयुष्यासोबत वाहन चालविणाऱ्यां व्यक्तीचे आयुष्य सुध्दा कमी होते. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ताबडतोब दुरुस्त केल्या जाते मात्र जे लहान मार्ग आहेत त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. एकदा रस्ता बांधले की त्याकडे 15 - 20 वर्ष ढुंकून सुध्दा पाहिले जात नाही. खरे तर रस्ता पूर्ण झाल्यावर कमीत कमी चार पाच वर्ष त्या रस्त्यांची सुधारणा करण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीकडे द्यायला हवे. घेण्याचे आदेश देण्यात येणार आहेत
गावाला जाणाऱ्या एकाही रस्त्यांवर खड्डा नसेल तर येत्या तीन चार वर्षात महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 31 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा नुसती घोषणा न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास पुढील काळ नक्कीच चांगला व्यतीत होईल असे वाटते. भविष्यात रस्त्याना अच्छे दिन मिळाल्यास जनतेला ही त्याचा फायदा होईल.
No comments:
Post a Comment