Sunday, 15 January 2023

शृंगार मनाचे काव्यसंग्रह ( Shrungar Manache )

[ मंगळवारी 17 जानेवारी रोजी थोर विचारवंत व साहित्यिक मा. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने नासा येवतीकर यांनी करून दिलेला पुस्तक परिचय ]

मानवी मनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह शृंगार मनाचे


कवी पांडुरंग आडबलवाड हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलमध्ये गेल्या 32 वर्षांपासून मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि वसतिगृहात राहून 'कमवा व शिका' या तत्वानुसार त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचे दारिद्र्य संपविण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी मिळविली. 
मराठी विषयाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती आहे. त्याच बळावर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आध्यात्मिक धार्मिक, नैसर्गिक व चालू घडामोडीवर आशयघन, यमकबद्ध , समाजाभिमुख कविता लिहिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या विविधाऺगी अनेक कविता महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या असून अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट तारा॑कित बक्षीस प्राप्त कविता " शृंगार मनाचे " काव्यसंग्रह स्वरुपात वाचकांसमोर विस्तृत स्वरूपात ठेवली आहे. 
या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना देऊन काव्यसंग्रहाची उंची वाढविली आहे तर सुप्रसिध्द काद॑बरीकार आणि साहित्यिक देवीदास फुलारी या॑नी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. या संग्रहात विजेत्या 85 उत्कृष्ट रचनेचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे असे म्हटले जाते. कवी पांडुरंग आडबलवाड यांच्या कविता वाचतांना पूज्य साने गुरुजी यांची प्रकर्षाने आठवण येते. कवी सहा महिन्यांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांना आईचे सुख-दुःख, आईची तगमग आणि मेहनत जवळून पाहता आले, आईशिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणूनच ते पहिलीच कविता माय माझी मध्ये म्हणतात,

माय माझी वृक्ष । वृक्षांची सावली
एकच माऊली । जगामधी ।।

कवींनी उभ्या आयुष्यात अनेक दुःखाचा सामना केला. अश्या कठीण प्रसंगात आपली जोडीदार भक्कमपणे सोबत उभी होती. म्हणूनच ते ही भक्कम उभे राहू शकले. त्यास्तव ते वाचकांना आयुष्याचा जोडीदार कसा असावा ? याची माहिती सांगताना म्हणतात, 

सुख दुःख आजारात
हवा साथी जोडीदार
वेळ येता आणीबाणी
जीव अर्पिण्या उदार

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने कवी खूप उदास होतो आणि अशा प्रसंगी कवीच्या मनात ' पोरका पुष्प भुंग्याचा दरबार ' ही रचना जन्मास येते. कवीच्या मनात एक शंका निर्माण होते, 

दीनदुबळ्या पामरा नाही सृष्टीत कुठेही आसरा
स्वामी होऊन कुणी हातात धरली का कासरा

तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जाण्याने देखील कवी भावूक होऊन 'हरपले सप्तसुर' कवितेत कवी म्हणतो, 

कंठेश्वर हा जिवात्मा ! जगी जनात अद्भूत!
स्वर्ग भूवरी थाटण्या ! आल्या लता देवदूत!

कवीला शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. मध्यंतरीच्या काळात कविता लिहिणे सोडले होते मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा त्यांची काव्यलेखन प्रतिभा जागी झाली. कविता लेखन करण्यासाठी कोरोना काळात खूप रिकामा वेळ मिळाला. हीच संधी समजून त्यांनी काव्यलेखनास परत एकदा सुरुवात केली आणि सोशल मीडियातील विविध समूहात सहभागी होऊन त्यांना विविध वाड्मय प्रकारात कविता सादरीकरण करण्याची संधी मिळाली. म्हणून ते पुन्हा एकदा कविता करण्याकडे वळले. म्हणूनच ते म्हणतात, 

सुख शांती समाधान
मोद साहित्यात दिसे
देह मना लेखनाचा
छंद जिवा लावी पिसे

कोरोना काळात लोकांना अनेक कडू अनुभव आले. या काळात डॉक्टर जसे देव म्हणून धावून आले तसे पोलीस देखील लोकांच्या मदतीसाठी पांडुरंग म्हणून उभे राहिले. याची प्रचिती कोरोना काळात अनेकांना आली म्हणूनच 'पोलीस' कवितेतून कवी म्हणतो, 

माय बाप लेकरे त्यागुनी
प्रजेप्रती घाळतात घाम
कर्तव्य तत्पर पांडुरंगाला
करू सर्व शतशः प्रणाम !

मुलांवर संस्कार टाकण्याचे महत्वाचे कार्य आई-बाबा करत असतात. लहानपणी त्यांचे बोट धरून चालणारे मूल त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालतात. खाण तशी माती या म्हणीनुसार जसे आई-वडील असतात तसेच मुले तयार होतात. अश्याच अर्थाचा जन्मदाता कवितेतून गर्भित असा संदेश देतात.

आई बाबा खरे दाते
शील संस्कार नीतिचे
बोट धरुनी सामर्थ्य
देती संसार मतीचे

त्याहीपुढे चालून संस्कार म्हणजे काय असते ? याचे महत्व सांगताना कवी म्हणतो, 

संस्काराची धनलक्ष्मी
नित्य नांदते ज्या घरी
जन्मा येती हिरे मोती
माता भगीनी  उदरी

बहिणाबाई चौधरी यांची अरे संसार संसार ह्या कवितेची जराशी झलक त्यांच्या कवितेत जाणवते. कवी देखील संसाराची गाऱ्हाणे सांगताना म्हणतो,

अरे संसार संसार
जना द्यावा आधार
होवो किती दुःख पर
दुजा वंदावे साभार

श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जीवनात जिवाभावाचे मित्र खूप महत्वाचे आहे. दुःखांच्या प्रसंगी फक्त मित्रच धीर देऊ शकतो, 'भाव मैत्रीचा' या कवितेत कवी म्हणतो,

सुख दुःखी प्रसंगात
मित्र देती जिवाजीव
भाव मैत्रीचा अपार
नसे कशाची उणीव

माणसाचे मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे. वाऱ्याप्रमाणे तो सैरभैर धावत असतो. याविषयी कवी म्हणतो,

मन उधाण वाऱ्याचे
स्तब्ध बसेना घरात
सदा धावे बाहेरच
जणू खगांची वरात

काव्यसंग्रहाचे शीर्षक रचना "शृंगार मनाचे" या कवितेतून कवी मानवी मनाचा वेध घेताना आपणांस मुक्ती मिळवायची असेल तर कर्णासारखे दानशूर होण्याचा सल्ला देतात. 

लाभो मुक्ती स्वर्गस्थान
हेच शृंगार मनाचे
कर्ण बळी परी दाता
व्हावे उदात्त गुणांचे

आंतरजातीय विवाह पद्धतीला आजही समाजात मानाचे स्थान नाही. कवीची स्वतःची एकुलती एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घराबाहेर पडल्यावर कवी मनाला काय दुःख झाले असेल याची प्रचिती 'सुख लाभो तुला' ही कविता वाचतांना येते सोबतच आपल्या लेकीला आशीर्वाद देऊन संकटात सोबत असल्याची देखील ते ग्वाही देतात. 
काव्यसंग्रहातील सर्वच कविता वाचनीय आणि चिंतनीय आहेत. जास्तीत जास्त कविता अष्टाक्षरी काव्यप्रकारात लिहिलेल्या असून आशयघन आणि चिंतनीय आहेत. काव्यसंग्रहातील विठोबा, कौलारू घर, विश्वकर्मा, गुढीपाडवा, शेतकरी, महिला, भ्रूण हत्या, जन्म-मृत्यू, सैनिक,  मराठी राजभाषा, प्रतीकात्मक कविता घड्याळ, बैलगाडी, रेल्वे, पुस्तक, धावते निवास, काठी असे अनमोल, प्रेम काव्य वेड्या मनाचा फकिर, सखे तुझ्या हसण्याने व कोरोना या विषयासह राजे शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, हुतात्मा पानसरे यांच्यावर आधारित प्रासंगिक कविता देखील उत्तम आहेत. संगत प्रकाशनने संग्रहाची बांधणी उत्तम केली असून उच्च दर्जाचे कागद वापरले आहे. संतोष घोंगडे यांनी नावाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ सजविले आहे. कवीच्या मनातील काव्य शृंगार अजून असेच फुलत राहो आणि अनेक चांगल्या चांगल्या कविता वाचकांना वाचण्यास मिळो अशी यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......!

काव्यसंग्रहाचे नाव - शृंगार मनाचे
कवी - पांडुरंग आडबलवाड
प्रकाशक - संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे - 136
किंमत 220 ₹

पुस्तक परिचय - 
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...