Thursday, 24 December 2020

Atmanirbhar ( आत्मनिर्भर )


कथा - आत्मनिर्भर
आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने स्वतः च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भरपणे जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पहिला
सुधाचे बालपण
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हरिपूर नावाच्या गावात माधव आणि सविता मोलमजुरी करून सुखी जीवन जगत होते. त्यांना सुधा नावाची चुणचुणीत मुलगी होती. सुधा दिसायला सुंदर, बोलायला चतुर आणि अभ्यासात हुशार मुलगी होती. माधव हा विठ्ठलाचा परमभक्त होता. सकाळ - सायंकाळ नित्यनेमाने हरिपाठ करायचा. त्याची पत्नी सविता ही देखील सोज्वळ आणि भाविक होती. तो पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला तो पंढरपूरला जात असे. घरात असे भक्तिमय वातावरण होते आणि या मंगलमय वातावरणात सुधा चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. मुलगी जशी मोठी होत जाते तशी आई-बाबांची काळजी वाढत राहते. सुधाचे वय वाढू लागले तशी ती अजून सुंदर दिसू लागली. तिची सुंदरता वाढू लागली आणि इकडे माधवची काळजी वाढू लागली. मुलीची खूप काळजी घेऊ लागले. तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आले होते. गावातील शाळा संपली आणि तिला शिकण्यासाठी शेजारच्या गावातील शाळेत जाणे आवश्यक होते. ती सातवीतून आठव्या वर्गात गेली होती. 
" बाबा, मला पुढं शिकायचं आहे. "
" सुधा, तू सातवी पास झालीस, हेच खूप झालं. आता पुढे शाळा बिळा काही नाही."
" नाही बाबा, मला शिकायचं, माझ्यासोबतचे शकू आणि रमा दोघेही शिकणार आहेत. त्यांच्यासोबत जाते ना, मी पण ..."
" हे बघ बाळा, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते श्रीमंत आहेत, आपल्याकडे तेवढा पैसा नाही, आपण नाही शिकू शकत."
" आई, बाबाला सांग ना, मला जाऊ दे ना शाळेला "
" बेटा, बाबा म्हणतात ते बरोबर आहे, तुझं शाळा शिकण खूप झालं, आता जरा घराच्या कामाकडे ही लक्ष दे." 
माधव आणि सविता आपल्या मुलीला खूप समजावून सांगत होते मात्र ती ऐकायला तयार होत नव्हती. शाळा शिकण्याच्या एकाच गोष्टीवर ती ठाम होती. त्या रात्री सर्वचजण चिंताग्रस्त होऊन झोपी गेले. सुधा एकुलती एक लाडाची लेक होती. तिचा हट्ट पूर्ण करणे आवश्यक होते. सर्व सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. रोजच्या जेवणाचे वांदे आहेत,तर तिच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणावं हा प्रश्न माधवच्या समोर पडला होता. तेरा चौदा वर्षाची सुधा शिकण्यासाठी बाहेरगावी जाणार याची काळजी त्यांना लागून होती. पोटाला चिमटा देऊन एकवेळ तिचं शिक्षण पूर्ण करू पण तिची येण्या-जाण्याची काळजी माधवला सतावत होती. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील अत्याचार व बलात्काराच्या बातम्या वाचून ऐकून त्याची काळजी अजून वाढत होती. ही सारी चिंता सुधाला कसं सांगावं ? ती तर अडून बसली होती. शेवटी सुधाला शाळेला जाण्याची परवानगी मिळाली. तिच्या मनाविरुद्ध काही करावं तर ती अजून काही उलटसुलट करून घेईल म्हणून माधवने शेजारच्या शाळेत तिला शिकण्यासाठी पाठवून दिला. ती आता आपल्या मैत्रिणीसह शाळेला पायी ये-जा करू लागली. आजपर्यंत ती कधी ही आई-बाबा शिवाय घराबाहेर पडली नव्हती पण शाळेच्या निमित्ताने ती बाहेर पडली. तिला बाहेरच्या जगाचा अनुभव यायला वेळ लागला नाही. तिला आता लोकांच्या नजरा, लोकांचे बोलणे आणि इतरांचा स्पर्श या सर्व बाबीची जाणीव होऊ लागली. आई-बाबा शाळा शिकण्यासाठी का नकार देत होते याची देखील तिला जाणीव झाली होती. सुधा तशी खूप समजदार आणि तल्लख बुद्धीची होती. त्यामुळे तिने बाहेरील वातावरणाशी फार लवकर जुळून घेतली. बघता बघता एक वर्ष संपले. ती आता धीट बनली होती आणि तिच्या आई-बाबांना देखील जरासा विश्वास वाढला होता. तरी सुधा ची आई अधूनमधून तिच्या लग्नाची गोष्ट काढत होती. 
" अहो, सुधाचे दोनाचे चार हात करायला हवं, लवकर स्थळ शोधायला हवं." 
" हो, मला ही तेच वाटतं, पण सुधा ऐकेल काय ?" 
" तिला मी समजावून सांगते, तुम्ही स्थळ शोधा आता."
" होय, माझ्या नजरेत एक चांगलं स्थळ आहे, शेजारच्या गावातच आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि चांगली जमीन आहे." 
" मग बघा की, उद्याच्या उद्या जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या"
" बरं, सकाळी पाहतो, झोप आता." 
झोपेचं सोंग घेतलेली सुधा हे सारे ऐकत होती. आई-बाबा माझं शिक्षण बंद करून लग्न लावून देतात. काय करावं ? शाळा शिकावं की लग्नाला होकार द्यावं ? याच विचारात ती झोपी जाते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 2 रा
सुधाची सोयरीक
उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. तिचा मामा त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करत होता त्यामुळे संपूर्ण गाव त्याला किशनमामा या नावाने ओळखत होते. त्याला एक मुलगा आणि मुलगी होती. ज्यांच्यासोबत सुधा हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज शेतात जायचं, आंब्याच्या वनात जाऊन पाडाचे आंबे खायचे, खेळ खेळायचे खूप मजा करायचे. त्याच गावात सखाराम नावाचे एक सावकार राहत होते. ज्यांना एक मुलगा होता दीपक जो की लाडाने खूपच बिघडून गेला होता. त्याचं लग्न लावून दिलं तर त्याच्यात सुधारणा होईल असा विचार सावकारच्या मनात चालत होता. त्याचवेळी सुधाच्या बाबत त्याला कळाले आणि मुलगी गावात त्यांच्या मामाकडे आली आहे हे ही कळाले. त्यांनी दुरूनच सुधाला बघितले, पाहताक्षणी सावकारला सुधा खूप आवडली. काही ही करून आपल्या दिपकचे लग्न सुधासोबत लावण्याचा तो विचार करू लागला. तसा संदेश किशनमामाच्या कानावर गेलं. किशनमामाने तसा संदेश सुधाच्या आई-बाबांना कळविले. त्याबरोबर ते दोघे धावत पळत सीतापूरला आले. 
घरात सुधाच्या लग्नाची तयारी चालू झाली. तिच्या कानावर ही गोष्ट गेली. तशी ती लग्नाला विरोध करू लागली. 
मला आताच लग्न करायचे नाही, दहावी पास झाल्यावर बघू. 
चांगलं स्थळ आहे, अशी संधी वारंवार मिळत नाही 
आईने तिला समजावत बोलत होती. मात्र सुधा आपल्या बोलण्यावर ठाम होती. काय करावं ? हे काही सुचत नव्हतं. सावकार एकसारखे किशनमामाच्या मागे हात धुवून लागला होता. हो नाही करता करता सुधा लग्नाला तयार झाली. सीतापूर गावात सखाराम सावकार एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांच्या घरात सर्व सुख सोयी होत्या. त्यांच्याकडे गायी, म्हशी, अशी जनावरे देखील होती. सुधा ला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही एवढं ऐश्वर्य होतं. मुलाच्या घरूनच मागणी आल्यामुळे मुलीला नापसंद करण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे किशनमामाने सुधाच्या लग्नाची बोलचाली करण्यासाठी गेला. 
" सुधा लग्नाला तयार झाली, तिचे आई-वडील खूप गरीब आहेत, लग्नात वधू पित्याकडून काही ही मिळणार नाही, कन्यादान करून मुलगी तेवढं आपल्या पदरात देतील, हे मान्य असेल तर बोला"
" किशनमामा, आम्हांला सर्व काही मान्य आहे. मुलगी तेवढं पदरात द्या. बाकी सर्व आम्ही करू". सर्वाना मुलगी पसंद होती आणि मुलाच्या बाबतीत काय सांगायचं ? साऱ्या गावाला माहीत होतं दीपक कसा आहे ते ? दीपक हा एक लाडात वाढलेला सावकाराचा एकुलता एक मुलगा. गावात कोणासंगे ही भांडण करायचं, दादागिरी दाखवायची ही त्याची सवय होती. काही दिवसापासून त्याला वाईट सवयी देखील लागल्या होत्या. किशनमामाला हे सारं ठाऊक होतं. त्यामुळे तो सुधाला अगोदरच सर्व काही सांगून ठेवलं होतं. सुधा सुरुवातीला याच गोष्टीमुळे नकार देऊ लागली होती. पण लग्न झाल्यावर दीपक मध्ये सुधारणा होईल म्हणून सर्व विचाराअंती तिने होकार दिला. सुधाची सोयरीक झाली ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला आणि शाळेत देखील कळाले. एवढ्या लहान वयात लग्न करू नये असा सल्ला शिक्षक मंडळींनी तिच्या वडिलांना सांगितला. पण माधव मुलीच्या काळजीत काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याला कायद्याची बाब देखील सांगून बघितलं पण तो काही ऐकत नव्हता. बिचारी सुधा ती काहीच बोलत नव्हती. तिला एवढ्या लहान वयात लग्न करायचं नव्हतं, तिला खूप शिकायची इच्छा होती मात्र वडिलांच्या परिस्थिती चा देखील तिला विचार करणे आवश्यक होते. वडिलांना सुधाची जशी काळजी वाटत होती तशी सुधाला देखील वडिलांची काळजी वाटत होती. आई-वडिलांचा विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. उद्यापासून तिच्या जीवनाची दुसरी पहाट सुरू होणार होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 3
सुधाची पहिली रात्र
दीपक हा श्रीमंत सावकाराचा एकुलता एक मुलगा होता. म्हणून त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार लग्नाची वरात काढण्यात आली. घोड्यावर दीपक बसलेला, त्याच्या समोर खूप मोठा बँड वाजत होता. त्याचे सर्व मित्रमंडळी खूप जोमात आणि बेहोश होऊन ( कारण ते सर्वच दारू प्यालेली होती ) नाचत होती. गावात यापूर्वी अशी कोणाची वरात निघाली नव्हती. लग्नाची वेळ संपून गेली तरी मित्रांचे नाचगणे काही थांबत नव्हते. सारीच मित्रमंडळी बेहोश झाली होती त्यामुळे त्यांना कशाचेही भान राहिले नव्हते. असे तसे करता करता चार पाच उशिराने दीपक आणि सुधाचा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नाचे जेवण म्हणून सावकारांनी लाडू, जिलेबी, शिरापुरी, गुलाबजामून अश्या गोड पदार्थासह वरणभात आणि मसालेदार भाजी देखील केली होती. न भूतो न भविष्यति असा विवाहसोहळा पार पडला. सुधाचे आई-वडील आणि त्याचे नातलग हा सोहळा पाहून धन्य झाले. किती श्रीमंतीचे घर मिळाले म्हणून प्रत्येकजण तिची प्रशंसा करीत होते. सुधा देखील खूप आनंदी होती. लग्नानंतरच्या सर्व पूजा, अर्चा, विधी संपन्न झाले. 
लग्नानंतर सुधाची पहिली रात्र होती. आज तिच्या मनात वेगवेगळे विचार घुटमळत होते. मनातल्या मनात ती आनंदी होत होती. आजची पहिली रात्र कशी असेल ? याचा विचार करत ती आपल्या खोलीत बसली होती. दीपक सकाळी जेवण करून बाहेर पडला होता. सायंकाळ होत आली तरी त्याचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. सर्वांनी आपापले जेवण उरकून घेतले तरी दीपकचा पत्ता नव्हता. सुधा दाराकडे डोळे लावून बसली होती. दीपक आल्यानंतर जेवण करता येईल या विचारात ती तशीच बसून राहिली. वाट पाहत पाहत तिला डोळा कधी लागला हेच कळाले नाही. मध्यरात्री बारा वाजून गेल्यावर दारावर आवाज ऐकू आला म्हणून ती दचकून जागी झाली. दारात दीपक होता. लुडकत लुडकत चालत होता. त्याचा स्वतःचा तोल त्याला सांभाळता येत नव्हता. सुधा लगेच जागेवरून उठली आणि दीपकला आधार देत आपल्या खोलीत आणली. दीपक खूप प्याला होता. त्याला त्यावेळी कशाचेही भान नव्हते. जेवण करणार का ? सुधाने दीपकला विचारले पण तो काहीच बोलत नव्हता. नुसते काहीतरी इशारे करत होता. त्याला मुळी भानच नव्हते. आज पहिली रात्र आहे हे मात्र त्याला नक्की लक्षात होते म्हणून तो सुधाला आपल्याजवळ ओढू लागला. सुधा त्याच्या या क्रियेला विरोध करीत होती. मात्र नशेत धुंद असलेला दीपक तिच्यावर हावी झाला. आपली भूक शांत करून तो झोपी गेला. पहिल्या रात्रीविषयी सुधाने काय काय स्वप्न पाहिले होते ? काय काय विचार केले होते ? कोणते मनसुबे तिने रचले होते ? सारे काही मातीत मिसळले. एका मिनिटांत तिची पहिली रात्र संपली होती. ती तशीच जळून राहिलेल्या लाकडाचा जसा धूर निघतो तश्या अवस्थेत ती झोपी गेली. 
कोंबडा आरवला. सकाळ झाली. घरातल्या लोकांना हे काही कळू नये या अविर्भावात सुधा सकाळी लवकर उठली. बाहेरची सर्व कामे करून डोक्यावरून अंघोळ केली. देवपूजा करतांना तेंव्हा दीपकला जाग आली ते ही आरतीच्या घंटीच्या आवाजाने. रात्री दारू जरा जास्त झाली होती. लग्नाची पार्टी दिली होती मित्रांना. लग्नात मित्रमंडळी खूप नाचले होते म्हणून आभार प्रदर्शनासाठी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री एक एक मित्र जोडल्या जात होते त्यामुळे सर्व मित्रांची विनंती पूर्ण करता करता त्याला जरा जास्तच झाले होते. पार्टी संपायला रात्रीचे बारा वाजले. दीपकची पहिली रात्र होती म्हणून बाराच्या अगोदर तो तिथून सुटला अन्यथा ही मंडळी रात्रभर पीत बसले तरी कोणी यांची वाट पाहत नाहीत. अशी मित्रमंडळी जमा झाली होती. सुधाला पहिल्या रात्री जो अनुभव आला ते प्रत्येक रात्री येऊ लागला.   तिची प्रत्येक रात्र पहिली रात्र ठरू लागली. दीपक बेहोश बेधुंद अवस्थेत घरी यायचा. तिच्यावर जोर जबरदस्ती करायचा. तिने कधी नकार दिला तर एक-दोनदा मार देखील दिला होता. दीपकचे वागणे तिला सहन होत नव्हते. घरात खुप श्रीमंती आहे पण मनाला समाधान नसेल तर ही श्रीमंती काय कामाची ? सासू-सासरे यांना दीपक विषयी काही बोलले तर ते काहीच ऐकून घेत नव्हते. लाडात वाढलेलं लेकरू आहे, तूच त्याच्यात काही सुधारणा करशील म्हणून तुझ्यासोबत लग्न लावून दिलंय असे ते अधूनमधून बोलत. मी बळीचा बकरा बनले की काय असे कधी कधी सुधाला वाटायचे. लग्न होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असेल सुधाला दिवस गेल्याची बातमी सासरच्या आणि माहेरच्या लोकांना कळाले. सर्वाना खूप आनंद झाला. सासूने तर फर्मान सोडले सुनबाई, मुलगाच जन्मायला हवा. सासरे देखील तसेच बोलू लागले. सुधा मात्र विचार करू लागली मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे आपल्या हातात थोडेच आहे ? ते तर ईश्वराच्या हातात आहे. ती याच विचारात गाढ झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - चौथा
वांझोटी सुधा
पाचव्या महिन्यात सुधाची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देखील सावकाराने गावजेवणाची खूप मोठी मेजवानी दिली. सर्वांनी सुधाला भरभरून आशीर्वाद दिले. दीपक आता बापबनणार होता. तरी त्यांच्यामध्ये तीळभर देखील सुधारणा झाली नाही. त्याला दारू पिल्याशिवाय रात्री झोप येत नसे आणि सकाळी दारू पिल्याशिवाय चालता येत नसे एवढी वाईट स्थिती झाली होती. दीपकमध्ये सुधारणा कशी करावी ? याविषयी ती नेहमी विचार करीत असे. मात्र तिला काही उपाय सापडत नव्हता. तिला दिवस गेले होते. तरी ही दीपक रोज रात्री पिऊन यायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करायाचा. सुधाने अनेकदा समजवून सांगितले असे केल्याने आपल्या येणाऱ्या बाळाला धोका होऊ शकतो मात्र तो होशमध्ये असेल तर समजेल ना ! त्याला ते कधीच कळत नव्हते. एके दिवशी रात्री सुधाच्या पोटात दुखाण्यास सुरुवात झाली. बेहोश दीपक बाजूला मेल्यागत पडून होता. किती ही हलवले तरी तो जागा होत नव्हता. सुधाचे रडणे ऐकून सासू-सासरे बाहेर आले. त्यांनी तिला एका गाडीत टाकून त्याच रात्री दवाखान्यात घेऊन गेले. सावकाराचे वजन शहरात देखील होते म्हणून लगेच एक महिला डॉक्टर मिळाली. सुधाला दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टर मॅडमने सर्व तापसणी केल्या व ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली. काही तासानंतर ती डॉक्टर मॅडम बाहेर आली आणि म्हणाली, ' माफ करा, मी बाळाला वाचवू शकले नाही, गर्भातच ते मृत्युमुखी पडले होते, पण एक बरे झाले, तुम्ही लवकर घेऊन आलात त्यामुळे बाळाची आईला वाचवू शकले.' एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. ते दोघे सुधाला पाहण्यासाठी मध्ये गेले. सुधाला अजून होश आला नव्हता आणि तिचे बाळ, बाजूला मृत्युमुखी पडलेले होते. सासू-सासऱ्यांच्या इच्छेनुसार तो बाळ मुलगाच होता, दिसायला सुंदर, गोंडस आणि गुटगुटीत होता मात्र मेलेला होता. तेथील नर्सने त्या बाळाला उचलले आणि त्यांच्या स्वाधीन केले. बाळाच्या आईला होश येण्याच्या अगोदर या बाळाला घेऊन जा आणि त्याचे अंतिम संस्कार करून टाका. ज्याचे प्रथम संस्कारच झाले नाही त्याचे काय अंतिम संस्कार करणार ? पण लगेच त्यांनी त्या बाळाला आपल्या हातावर घेतले आणि पुढील क्रियाकर्म पूर्ण केले. काही तासानंतर सुधाला जाग आली. ती आता मोकळी झाली होती. त्यामुळे तिचे डोळे आपल्या बाळाला शोधत होती. मात्र बाळाच्या रडण्याचा आवाज कुठेही ऐकू येत नव्हता. प्रत्येक स्त्री तेंव्हाच पूर्ण होते जेंव्हा ती माता बनते. ती माता बनणार होती पण काळाने तिच्यावर असा झडप घातला की, शेवटच्या क्षणी हिरावून नेलं. तुला मेलेलं लेकरू जन्माला आले हे मोठ्या जड अंतकरणाने तिला सांगण्यात आलं. हे कळतच ती धाय मोकलून रडू लागली. ते लेकरू का मेलं हे तिला माहीत होतं, त्याचं कारण तिचा नवरा होता हे जाणून होती पण सांगावं कुणाला ? हा तिच्या समोर फार मोठा प्रश्न होता. तिच्या बोलण्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार ? हा ही एक प्रश्न होता. इकडे दीपकला याचे काही सोयरसुतक नव्हते. तो रोजच आपल्या मित्रांसंगे दारू पिण्यात मश्गुल होता. सुधाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तशी ती सासरी जाण्याच्या ऐवजी माहेरी जाणे पसंत केले. दवाखान्यातून आल्यापासून सुधा उदास राहत होती. पोटचा लेकरू स्वतःच्या चुकीमुळे घालविल्याने तिला खूप पश्चाताप होत होता. एकवेळ जर दीपकचा विरोध केला असता तर बाळ सुखरूप या जगात आला असता. मी का विरोध केला नाही म्हणून ती स्वतः वर संताप करत होती. सुधाची आई तिला समजावून सांगत होती, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. महिना दीड महिन्याचा काळ उलटला. आईने सुधाला सासरी जाण्याविषयी विचारू लागली. तेंव्हा सुधा सासरी जाण्यास नकार देऊ लागली. त्या नरकात मी जाणार नाही. बाहेरून खूप ऐश्वर्यसंपन्न दिसते मात्र मधून सारं पोखरलेलं आहे. तिथं सुख नावाची वस्तूच नाही. तो नवरा नाही, तो हैवान आहे, राक्षस आहे. त्याला फक्त शरीराची भूक मिटविण्यासाठी बाई पाहिजे असते, बायको नाही. मी जाणार नाही. सर्वांनी खूप समजूत काढल्यावर सुधा सासरी जाण्यास तयार झाली. ती यावेळी मात्र मन कठोर आणि खंबीर बनून आली होती. रोजच्याप्रमाणे दीपक रात्री उशिरा दारू पिऊन आला होता. आल्या आल्या त्याने जबरदस्ती करू पाहत होता. पण तिने थोडा विरोध केला तसा त्याला खूप राग आला. पण तिने जरा समजूत काढली आणि त्याला तसेच झोपू घातले. तिला हे तंत्र आता बऱ्यापैकी जमू लागले होते. म्हणून पूर्वीप्रमाणे तिला त्याचा त्रास वाटत नव्हता. असेच एक दोन वर्षे निघून गेली. सासू रोजच तिला बाळाच्या बाबतीत काही गोड बातमी आहे का म्हणून विचारत असे. पण काही गोड बातमी मिळत नव्हती. म्हणून एके दिवशी सासूने सुधाला दवाखान्यात चेकअप करण्यासाठी नेले. डॉक्टर मॅडमने संपूर्ण तपासणी केली आणि सांगितलं की, सुधा कधीच आई होऊ शकत नाही. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पाचवा
नवऱ्याचे दुसरे लग्न
पहिल्या प्रसूतीच्या वेळी सुधाच्या गर्भपिशवीला धक्का बसला होता त्यामुळे ती यापुढे कधीच माता बनू शकत नाही असे डॉक्टर मॅडमनी सांगितल्यापासून सुधा अजून चिंताग्रस्त झाली. तिचे कशातही मन लागत नव्हते. सासूचे तर आता तिच्यावरून मन देखील उठले होते. आपल्या वंशाला आता दिवा मिळणार नाही याच काळजीत ती रात्रंदिवस विचार करू लागली. दीपकला तर याचे काही देणे घेणे नव्हते. सुधा आपल्या खोलीतून बाहेर पडत नव्हती. कोणासोबत बोलत देखील नव्हती. उन्हाळ्यात जीर्ण झालेल्या झाडासारखी ती वाळून चालली होती. त्या झाडाला पावसाळ्यात पुन्हा हिरवीगार पाने फुटून ते झाड बहरू शकते मात्र सुधा आता कधीच माता होऊ शकणार नाही याच विचाराने अजून कोमेजून चालली होती. दिवसामागून दिवस सरत होते. दीपक मध्ये काही फरक पडत नव्हता. सासूबाई तिला टाकून बोलत होती. शेजारापाजाऱ्याकडे ती सुधा विषयी काहीबाही बोलू लागली. सुधा आता कधीच आई बनू शकणार नाही हे जवळपास सर्वाना कळाले होते. त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. घरात आता दिपकच्या दुसऱ्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली होती. सावकार देखील याविषयी विचार करू लागले. दिपकच्या कानावर देखील ही गोष्ट गेली. त्याला तर ही आयती संधीच मिळाली होती. आजकाल सुधा त्याला जवळ देखील येऊ देत नव्हती त्यामुळे त्याने आपले लक्ष घरापेक्षा बाहेर जास्त ठेऊ लागला होता. दीपकचे लक्ष्मी नावाच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ती एक चतुर आणि धूर्त बाई होती. दीपक जेव्हा जेव्हा तिच्याजवळ जात असे तेव्हा तेव्हा ती त्याला गोड बोलून त्याच्याकडून पैसे तर उकळत होतीच शिवाय त्याच्याकडे लग्न करण्याचा देखील हट्ट धरत होती. ती एक विवाहित महिला होती. मात्र तिचा नवरा तिच्या वागण्यामुळे तिच्यापासून दूर झाला होता. ती एकटीच राहत होती. तिला देखील एका पुरुषाची आणि पैश्याची गरज होती जे की दीपककडून पूर्ण होत होते. अचानक एके दिवशी दीपक लक्ष्मीला घेऊन घरी आला. ' आजपासून लक्ष्मी आपल्याच घरी राहील, मी तिच्यासोबत लग्न केलं असून ती आता माझी बायको आहे.' असे सांगून दीपक मोकळा झाला. सुधा समोरच उभे राहून हे सारे पाहत होती. पण काहीच करू शकत नव्हती. सासू-सासऱ्याची त्याला मूक संमती होती, त्यामुळे ती मूग गिळून गप्प होती. लक्ष्मी घरात आल्यापासून त्या दोघीचे धुसफूस चालू झाले. ती महाराणी सारखी बसून खात होती तर सुधा मोलकरीणसारखी काम करून दिवस काढत होती. ती वारंवार आपल्या संसाराविषयी आणि भविष्याविषयी विचार करत होती. काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या सापडत नव्हते. लक्ष्मी तरी आपल्या वंशासाठी कुळदीपक देईल म्हणून तिचे घरात खूप लाड केल्या जाऊ लागले. दीपक आता रात्री बेरात्री घरात येण्याच्या ऐवजी घरातच राहू लागला. सोबतीला लक्ष्मी होतीच. ती त्याला दारू पिण्याला विरोध करत नव्हती तर उलट त्याला खूप दारू पाजत होती. तिच्या मनात काही वेगळेच विचार चालत होते, जे की कुणालाही कळू देत नव्हती. दारू पिऊन दारू पिऊन दीपक खंगुण चालला होता. आता या घरात आपले काही स्थान नाही. आपण हे घर सोडलेले बरे याचा विचार करत सुधा आपल्या खोलीत झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग सहावा
सुधाच्या स्वप्नात आली सुधा

लक्ष्मीचे पाऊल घरात पडल्यापासून सुधाचे महत्व कमी झाले. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. ती आपल्याच विचारात गुंग राहू लागली. याच विचारात ती झोपी गेली. त्या रात्री तिच्या स्वप्नात एक तिच्यासारखीच दिसणारी महिला आली. ती म्हणाली, ' सुधा, हे तू काय करतेस ? तू एक हुशार आणि धाडसी मुलगी होतीस. आपलं आयुष्य असं का वाया घालवत आहेस. उठ, स्वतःच्या पायावर उभे राहा. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आत्मनिर्भर हो, तुला काय शक्य नाही. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्याचा तू वापर कर. तुझं उर्वरित शिक्षण पूर्ण कर आणि काही तरी करून दाखव. तुझी ही खरी परीक्षेची वेळ आहे.' एवढं बोलून ती स्वप्नातली महिला अदृश्य झाली. ती खडबडून जागी झाली. सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. तिने पुढील शिक्षण घेण्याचा निर्धार केला. तिचे असे काही वय उलटून गेले नव्हते. ती जेमतेम वीस-पंचवीस वर्षाची होती. तिने आपला निर्णय घरात सांगितला. तेंव्हा सासूने या गोष्टीला विरोध दर्शविला. कुठे ही जायचं नाही आणि काही शिकायचं नाही. घरात बसून राहायचं.' पण सुधा काही एक ऐकायला तयार नव्हती. पुढील शिक्षण घेण्यासाठी पक्का निश्चय केला होता. त्यासाठी तिने आपल्या शाळेतील काही मैत्रिणीचा आधार घेतला आणि आपले शिक्षण तिने चालू केली. घराचा उंबरठा ओलांडून ती बाहेरच्या जगात प्रवेश केला होता. ती मुळात हुशार होती. फारच लवकर तिने आपल्या कौशल्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. सुधाचे घराबाहेर जाणे सासूला तर पटलेच नव्हते आणि लक्ष्मीला देखील ते पसंत नव्हते. कारण सुधा घराबाहेर पडू लागली तसे तिच्यावर काम करण्याची वेळ येऊ लागली होती. त्यामुळे तिने देखील सुधाच्या बाहेर पडण्यावर विरोध करू लागली. त्या दोघींचा विरोध एवढ्या टोकाला गेलं की तिच्यावर घर सोडण्याची पाळी आली होती. तरी तिने आपल्या निर्णयावर ठाम होती, तिने दीपकचे घर सोडण्याचा निर्धार केला. तिची एक मैत्रीण तिला आधार देण्यासाठी पुढे आली. ती टेलरिंगचे काम करत होती आपले पोट भरत होती. सुधा तिच्या घरी येऊन राहू लागली. तिच्या टेलरिंगच्या कामात सुधा देखील मदत करू लागली. पाहता पाहता ती देखील टेलरिंगचे काम शिकून घेतली. दोघांचे पोट भरेल एवढा पैसा त्यांच्या हातात येत होता. दीपकच्या ऐश्वर्यसंपन्न घरात ती जेवढी सुखी नव्हती तेवढी सुखी या घरात होती, याचे तिला समाधान वाटत होते. स्वतः चार पैसे कमावून ती स्वतःच्या पायावर उभी होती, ती आत्मनिर्भर झाली होती, याचे ही तिला अभिमान वाटत होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - सातवा
प्रगती बचतगट
तिचा टेलरिंगचा व्यवसाय चांगला जोमात चालू झाला होता. तिच्या हाताखाली आता चार पाच मुली टेलरिंगचे काम शिकून तिथेच काम करू लागली.  
प्रगती शिवणक्लास या नावाने तिने एक छोटीशी शाळा देखील सुरू केली. अनेक मुली आणि स्त्रिया तिच्याकडे टेलरिंगचा व्यवसाय शिकण्यासाठी येऊ लागली. तिचे नाव सर्वदूर पोहोचले होते. एक उत्तम उद्योजिका म्हणून तिला एका स्वयंसेवी संस्थेने पुरस्कार दिला. वृतपत्रात तिचे नाव झळकले. सर्व महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हायला हवे असा संदेश तिने आपल्या बोलण्यातून देत होती. शासनाच्या मदतीने तिने प्रगती नावाची बचतगट तयार केली. त्यात वीस होतकरू आणि गरजू महिलांना सहभागी करून घेतली. प्रगती बचतगटाचा आलेख देखील वरवर चढत होता. पाहता पाहता गावातील शे-दोनशे महिला तिच्या बचतगटामध्ये समाविष्ट झाले. प्रगती फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था ही निर्माण केली. ज्या कोणा महिलांवर अत्याचार, जुलूम किंवा त्रास होत असत अश्या असहाय महिलांना या संस्थेने आधार देण्याचे काम करू लागली. याच फाउंडेशनने प्रगती महिलाश्रमाची निर्मिती केली. ज्यात अनेक गरीब आणि ज्यांना या समाजात कोणी ही वाली नाही अश्या महिलांची राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था केली. नुसती त्यांची सोयच केली नाही तर त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन दिले. टेलरिंगच्या व्यवसायासोबत अनेक छोटे छोटे काम त्यांना देऊ केली. त्यामुळे प्रगती महिलाश्रमातील बेसहारा असलेल्या महिला देखील उद्योगी बनल्या. त्यांच्या हातात देखील चार पैसे पडू लागले. आज त्यांना आपण असहाय किंवा गरीब आहोत ही कल्पना देखील करवत नव्हती. आम्ही काही तरी करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. दररोज सायंकाळी सुधा त्या महिलाश्रमाला भेट देऊन सर्वांच्या खुशाली विचारीत होती. त्या सर्व महिलांसाठी सुधा एक कल्पतरू बनून आली होती. इकडे गावातील सावकारच्या प्रगतीला अधोगती लागली होती. दीपक आता अंथरुणावर खिळून पडला होता. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती तर लक्ष्मीला त्याची काही काळजी वाटत नव्हती. मुलाच्या काळजीपोटी सावकार एके दिवशी जगाचा निरोप घेतला. दीपकच्या आईचे देखील हाल बेहाल होऊ लागले. सुधा जेवढी काळजी घेत होती तेवढी काळजी लक्ष्मी घेत नव्हती. राहून राहून तिला सुधाची आठवण येत होती. दीपक आता काही दिवसाचा साथीदार होता. सुधाला हे सारे कळाले तेंव्हा ती त्याला भेटायला जाऊ की नको या विचारात होती. सकाळी उठून दीपकला भेटायला जावं असा विचार करून ती सकाळी तयार होऊ लागली. तोच बातमी कानावर येऊन धडकली की, दीपक जग सोडून गेला. किती झाला तरी तो तिचा नवरा होता म्हणून ती या बातमीने खूप दुःखी झाली. दीपकच्या जाण्याने त्याच्या आईला अपार दुःख झाले तर लक्ष्मीला असीम आनंद झाला. आता साऱ्या संपत्तीची एक एकटी मालकीण होणार या विचाराने तिच्या मनात आनंदाचे फटाके फुटत होते. दीपकच्या आईला मात्र काळजी लागली होती. काही करून लक्ष्मीच्या हातात एक फुटी कवडी पडू द्यायचे नाही असा ती मनोमन विचार करू लागली. यासाठी तिला शेवटी सुधा हीच एकमेव आधार होती. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - आठवा 
सुधा जिंकली

एक दिवस मन घट्ट करून दीपकच्या आईने सुधाचे घर गाठले. त्यावेळी सुधा आपल्या कामात गर्क होती. ती आपल्या शिवणक्लास मधील मुलींना शिवणकामाचे धडे शिकवीत होती. तिचा तो हुरूप आणि उत्साह पाहून दीपकच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सुधा आई होणार नाही म्हणून तिचा खूप अपमान केली, तिला खूप त्रास दिला याचे तिला मनोमन दुःख वाटत होते. सुधा मुलांना सुद्धा लाजवेल आशा रीतीने काम करत होती. स्वतः च्या पायावर तिने प्रगती केली होती, स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. तिला आता स्वतः चे एक घर होते, ज्या घरात अनेक मुली आणि महिला आत्मनिर्भरतेचे धडे गिरवत होते. आयुष्यभर दुसऱ्याच्या पैशावर जगणाऱ्या दीपकच्या आईला स्वतःची लाज वाटत होती. बाहेर कुणी तरी बाई आली आहे म्हणून एका मुलीने सुधाला कळविले. त्याबरोबर सुधा बाहेर येऊन पाहिली असता दीपकची आई म्हणजे सासूबाई बाहेर उभ्या होत्या. तिने लगेच बाहेर येऊन तिला दंडवत घातली आणि घरात घेऊन आली. चहापाणी झाल्यावर तिने येण्याचे कारण विचारली. तेव्हा सासूबाईनी घडलेली सर्व कहाणी कथन केली. लक्ष्मी आता सर्व संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तू काही तरी मदत कर, तिच्या हातात फुटी कवडी पडू देऊ नको अशी विनवणी करू लागली. सुधाने यावर खूप विचार केली आणि सासूबाईला मदत करण्याचे वचन दिले. 
सुधाच्या बोलण्याने सासूबाईला हायसे वाटले. ती आनंदात घरी गेली. लक्ष्मीला ही गोष्ट कळाली तसे ती आपल्या सासूबाईवर खेकसली. रागात तिने काहीबाही शिव्याशाप देऊ लागली. पण सासूबाई काही बोलली नाही. सुधाने एका वकिलाची भेट घेतली. तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि लक्ष्मी ही दीपकची लग्नाची बायको नसून कायदेशीर पत्नी मीच आहे हे पुराव्यासह दाखवून दिली. लक्ष्मीच्या विरोधात तिने कोर्टात केस दाखल केली. सर्व पुरावे पाहून कोर्टाने लक्ष्मीला त्या घरातून नुसते हाकलून लावले नाही तर दीपकच्या संपत्तीवर तिचा काही एक हक्क नाही असा निर्वाळा देखील दिला. कोर्टात सुधा जिंकली आणि लक्ष्मी घराबाहेर झाली. निकाल ऐकून सासूबाईला अत्यानंद झाला. सुधा देखील या निर्णयाने आनंदी झाल्या. सासूबाईने सुधाला आपल्या घरी परतण्याची येण्याची विनंती केली. पण सुधाने स्पष्ट नकार दिला, आहे त्याठिकाणी मी खूप सुखी आणि आनंदी आहे असे म्हणून तिने आपल्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. सासूबाईला आपल्या केलेल्या कृत्यविषयी पश्चाताप होत होता आणि ती या पापातून मुक्त होण्यासाठी काही तरी सत्कार्य करावे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आपली सर्व संपत्ती, घर आणि पैसा अडका सुधाच्या प्रगती फाउंडेशनच्या नावे करून टाकली. तेव्हा कुठे सासूबाईला समाधान वाटले. प्रगती फाउंडेशनने अनेक गरजू आणि गरीब महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अजून एक सुधा निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ लागले. सुधाच्या प्रगती फाउंडेशनचा डंका संपूर्ण देशात पसरला. कठीण परिस्थितीत सुधाने ज्या पद्धतीने आपले शिक्षण पूर्ण केले, टेलरिंगचे काम शिकून स्वतः आत्मनिर्भर झाली आणि आपल्यासोबत इतर महिलांना देखील आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना मदत केली या कामासाठी देशाचे पंतप्रधानानी प्रजासत्ताक दिनी सुधाचे जाहीर सत्कार केले आणि सर्व महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा मोलाचा सल्ला दिला. 

------ संपूर्ण ------
लेखक - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...