सावधान ! पुन्हा लॉकडाऊन
संपूर्ण भारतात 75 दिवसाचे लॉकडाऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र रविवारपासून काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेत चिंतेचे आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, भारतात 12 हजार 340 कोरोना बाधित होण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी लागला होता आणि आज मात्र चोवीस तासात चोवीस हजार रुग्ण आढळून येत आहेत. खरोखरच खूपच चिंतनीय बाब आहे. शासनाने घेतलेले निर्णय काही चुकीचे आहेत असे जनमानसांत आज चर्चिले जात आहेत. ज्यावेळेस कोरोना रुग्णाची संख्या कमी होती त्यावेळी जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढू लागली होती त्यावेळी मात्र रोजगाराचे स्थलांतर करून एकप्रकारे कोरोनाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्याची परवानगी दिल्यासारखे झाले. सुरुवातीच्या पाच टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये भारतात सव्वा लाख लोकं बाधित झाली होती आज तोच आकडा किती वाढला आहे, हे आपण पाहू शकतो. हे असेच चालू राहिले तर भारतात एका दिवसात एक लाख रुग्ण आढळून येण्याची शक्यता एका तज्ञाने व्यक्त केली, ते चुकीचे वाटत नाही. कोरोना आजारातून बरे होण्याची संख्या खूप आहे. पण रुग्णांची संख्या वाढू लागली तर सर्वांना वैद्यकीय सेवा मिळणार नाही, तसे आज ही काही ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नाही अशी ओरड होत आहे. त्याला शासन किंवा प्रशासन जबाबदार नाही. लाडक्या लेकरांचे सर्व हट्ट पुरविल्या जातात आणि दहा लेकरं असल्यावर कोणाचीही मागणी पुर्ण होत नाही, हे वास्तविक आहे. त्यामुळे लोकांनी या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात समजदार नागरिक होऊन सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यावर लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली हे खरोखरच चिंतनीय बाब आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेवर ताण येणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ या. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. एक-दोन सामान खरेदीसाठी बाजारात जाणे टाळावे. आवश्यक सामानाची यादी करावी ज्या दिवशी यादी खूप लांबली असे वाटते त्या दिवशी सवलतीच्या वेळात जाऊन खरेदी करावी. घराबाहेर पडतांना नेहमी तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स हा नियम लक्षात ठेवूनच काम करावे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच आणून घ्यावं. रोजच्या रोज ताजा भाजीपाला विकत घेण्याचा आपला नाद यापुढे सोडून द्यावे. घरातील लहान मुलांना शक्यतो कुठे ही बाहेर पाठवू नका. काही पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान वाचावं म्हणून घरच्या घरी किंवा मित्रांच्या घरात चार-पाच जणांना एकत्र करीत शिकवणी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. ती चांगली गोष्ट आहे, मात्र त्यात कोणी बाधित रुग्णांशी संपर्क झालेला असू नये म्हणजे झाले. अन्यथा लहान मुलांना 14 दिवस आई-वडिलांपासून दूर कोविड सेंटर किंवा क्वारनटाईन करून ठेवणे खूपच अवघड बाब आहे. पालकांनी एकवेळ यावर विचार करणे आवश्यक आहे. सॅनिटायझर आपल्या सोबत असू द्यावे, दर काही मिनिटांनी हात सॅनिटायझरने स्वच्छ करत राहावे. जेवढे आपण स्वतः सुरक्षित राहू तेवढे आपला परिवार, आपले शेजारी आणि आपले मित्रमंडळी सुरक्षित राहू शकतात याचा वेळोवेळी विचार करावा. खबरदरी हीच आपली जबाबदारी आहे, म्हणून प्रत्येक पाऊल ठेवत असतांना अगदी जागरूकपणे ठेवणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची मजबूत साखळी कमकुवत करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूकतेने वागणे आवश्यक आहे. एकाची चूक देखील इतरांना त्रासदायक ठरू शकते. म्हणून चला स्वयंशिस्तीने वागू या.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769
वास्तविक लिखाण
ReplyDelete