थोडा वेळ वाट पाहावं ...!
कोरोना विषाणूने जगभर जसा धुमाकूळ घातला तसा भारतात देखील त्याने मार्च महिन्यापासून सर्वाना त्रस्त केले आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही जेथे कोरोना विषाणूचा परिणाम जाणवला नाही. अनेकांचे रोजगार बुडाले, कित्येक उद्योगधंदे डबघाईला आले, कित्येकजण स्थलांतर झाले तर काहीजण आपल्या जीवाला देखील मुकले. संसर्गजन्य प्रकारातील हा रोग नकळत शरीरात घुसतो आणि आपले आस्तित्व दाखवायला सुरुवात करतो. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनता कर्फ्यु लागू करून लॉकडाऊनला सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा परिणाम शैक्षणिक बाबीवर देखील झाला. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये ताबडतोब बंद करण्यात आले. खाजगी ट्युशन क्लास देखील बंद करण्यात आले. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदा करावी लागली. परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कळत नाही, त्यांना त्यांचे कौशल्य कळत नाही. आपण किती पाण्यात आहोत हे पाहण्याची कसोटी म्हणजे परीक्षा असते. पण यावर्षी परीक्षा न घेता वर्षभरातील कामावर त्यांचे गुणांकन करावे लागले. जून महिन्यापर्यंत हे संकट टळेल आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात तरी होईल असे वाटत असतांना कोरोनाने अजून घट्ट पाय रोवून बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रवक्त्याने तर कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे, जे की खरे वाटत आहे. आज मूळात खरी समस्या निर्माण झाली ती म्हणजे हे शैक्षणिक वर्ष कसे असेल ? शाळकरी मुलांचे वय सहा ते सोळा वयाचे असते. कोरोनाच्या भीतीमुळे आजपर्यंत आपण या मुलांना घराबाहेर जाऊ दिले नाही. पण शाळा सुरू झाल्यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही असा यक्ष प्रश्न आज पालकांसमोर उभे राहिले आहे. शाळेत कश्याप्रकारची काळजी घेतल्या जाईल ? विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था कशी असेल ? विद्यार्थी शाळेत ये-जा कसे करतील ? त्यांचा शाळेत कुणाकुणाशी संपर्क येऊ शकतो ? सर्व मुलांसाठी शाळेत स्वच्छतेची सोय होईल का ? मुले तोंडाला मास्क लावून येतील का ? मुले शारीरिक अंतर ठेवतील का ? हात धुण्यासाठी सॅनीटायझर किंवा साबणाची व्यवस्था होईल का ? बहुतांश शिक्षक जिल्हा, तालुका किंवा शहरातून ये-जा करतात. त्यामुळे अश्या सर्व शिक्षकांची कोविड चाचणी केली जाणे आवश्यक आहे. सध्या तरी ग्रामीण भाग शहरी भागापेक्षा कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षित आहे. मात्र शिक्षकांमुळे एखादा विद्यार्थी कोरोना बाधित झाल्यास पूर्ण शाळा आणि गाव धोक्यात येऊ शकते. ही भीती देखील मनात अधून मधून पडत आहे. नुकतेच इस्त्रायल देशात शाळेमधून कोरोना रोगाचा प्रसार मोठया प्रमाणात झाले असल्याची तेथील आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. जवळपास सात हजार शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विलगिकरण करावे लागले, ही बातमी विचार करण्यासारखी आहे. कित्येक शाळा स्थलांतरित लोकांच्या विलगिकरणासाठी अधिग्रहण करण्यात आले होते त्याची स्वछता कोणामार्फत होईल ? असे एक नाही कित्येक प्रश्न आज पालकांच्या डोक्यात चालू आहेत. ज्याची उत्तरे सध्या तरी कोणीही देऊ शकणार नाही. काही देशात तर शाळेला वर्षभर सुट्टी दिल्याची बातमी देखील वाचण्यात आली. शिक्षण महत्वाचे की जीव या कोंडीत सध्या सर्वजण पडले आहेत. पालकांची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ज्या पालकांची मुले दहावी आणि बारावीच्या वर्गात आहेत त्यांना फार काळजी लागली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी या वर्गातील मुलांचे उन्हाळी वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास झाला असता. मात्र यावर्षी तर सुरुवात देखील झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल ? असा प्रश्न त्यांच्या मनात कायम घर करून आहे. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने काही अभ्यास उपलब्ध करून देऊ शकतील पण गरिब पालकांच्या विद्यार्थ्यांचे काय ? त्यांना कसे शिक्षण देता येईल ? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात जी आंतरक्रिया होते ते ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. कमीतकमी दिवसातून एखादा तास तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात संवाद होणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर आहे तेथे दोन सत्रात शाळा भरविणे आवश्यक आहे. लहान वर्गांना सकाळच्या सत्रात आणि मोठ्या वर्गांना दुपारच्या सत्रात शाळा भरविण्याचे नियोजन फायदेशीर ठरू शकते. खाजगी ट्युशनसाठी देखील विद्यार्थी प्रवेश मर्यादित करून त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आजकाल पालक शाळेपेक्षा खाजगी ट्युशनवर जास्त विश्वास दाखवितात, त्यामुळे मोठ्या शहरात ही स्थळे जास्त धोकादायक बनू शकतात असे पालकांना वाटते. यावर्षी परीक्षेच्या पद्धतीमध्ये ही बदल करणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांशिवाय मुलांना विषयांचे अध्ययन अनुभव मिळणे अवघड आहे. ऑनलाइनचा कितीही बोलबाला असेल तरी ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. कोरोना विषाणूचा प्रसार पाहता अजून थोडा वेळ वाट पाहण्यात खरा शहाणपणा आहे. तरी ही शाळा सुरूच करण्याची वेळ आली तर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी शाळाप्रमुख, शिक्षक आणि पालकांनी घेतली तर शैक्षणिक वर्षातील ह्या कठीण आव्हानावर मात करणे शक्य आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment