Saturday, 14 September 2019

माझे बाबा - सायन्ना गुरुजी येवतीकर

कृतार्थ पालकत्व :- सायन्ना गुरूजी येवतीकर

पहिला भाग
सायन्ना गुरूजी यांचा जन्म आणि नोकरी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येवती ह्या छोट्याश्या गावात रामबाई आणि दशरथ यांच्या पोटी जन्मलेले दूसरे अपत्य म्हणजे सायन्ना गुरूजी. त्यांच्या पेक्षा एक मोठे आणि लहान चार जण असे एकूण सहा भावंडे असलेला त्यांचा परिवार . त्यांचे वडील व्यवसायाने वीणकर होते. कपडे विकण्याचा त्यांचा व्यवसाय. येवती गावाच्या अजुबाजुला असलेल्या लहान-मोठ्या खेड्यात ते कपडे विकून आपला संसार चालवित असे. एक छोटेसे घर शेती बाडी काही नाही. त्यांचा स्वभाव जेवढा शांत होता तेवढाच तापट सुध्दा होता. त्यांची म्हणजे गुरुजीची आई रामबाई एक साधी गृहिणी. घरातील कामे करुन शेतातील कामे करायची आणि आपल्या संसाराला हातभार लावयाची. या दोघांच्या पोटी दिनांक 14 सप्टेंबर 1941 रोजी सायन्ना गुरूजी यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. गावात तर शाळा नव्हतीच मात्र गावाजवळ असलेल्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी मंडळ म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक होते. त्याशिवाय दूसरा मार्गच नव्हता. घरात शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. यापूर्वी शिक्षणासाठी कोणी घराबाहेर राहिले नव्हते. मात्र त्यांना घराबाहेर राहून शिकण्याची परवानगी मिळाली आणि ते आपले कपडे व पुस्तकाची पेटी घेऊन शिकण्यासाठी घराबाहेर पडले. गुरूजी स्वतः तल्लख बुध्दिमत्तेचे होते आणि शिक्षणाची आवड होती म्हणून ते लवकरच आहे त्या परिस्थितिशी जुळवून घेत प्रगती साधली. सातव्या वर्गात शिकत असताना अचानक एके दिवशी त्यांचे वडील शाळेत आले आणि त्यांना परत येवतीला आणण्यासाठी निघाले. एका हाताने डोक्यावरील पेटी धरली होती आणि दुसऱ्या हातात त्यांना धरून निघाले. गुरूजीना काही कळेना की त्यांना कोठे नेले जात आहे आणि का ? शाळेतुन बाहेर जाता जाता मधुकरराव गुरूजीने त्यांच्या वडिलास अडवले आणि मुलाला कोठे नेत असल्याबाबत विचारणा केली तेंव्हा त्यांचा वडिलांनी रागात म्हणाले की 'खुप झाले शिक्षण आत्ता त्याला घरी घेऊन जातो'. वडिलांची आर्थिक समस्या होती, ते पुढील शिक्षण देऊ शकत नव्हते हे त्या मधुकरराव गुरूजीने अचूक हेरले आणि वडिलांच्या हातातील पेटी काढून घेऊन 'आजपासून सायन्ना माझ्या घरी राहिल आणि त्याला मी जेवू घालातो तुम्ही काळजी नका करू, आत्ता घरी जा' असे म्हणत मधुकरराव गुरूजीनी वडिलांना गावी पाठविले. घराकडून आत्ता कसलीच अपेक्षा नव्हती. त्या मधुकरराव गुरूजीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असल्याची आठवण ते आजही काढतात. याच शिक्षणाच्या काळात गंगाधर मुधोळकर नावाचे जीवाभावाचे मित्र त्यांना लाभले ज्यांच्यामुळे त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळले. कारण त्यांचे मित्र गंगाधर मुधोळकर हे ही एका गरीब कुटुंबातील पण हुशार होते. म्हणून त्यांची मैत्री जमली. जीवनाच्या सुख दुःखात आज सुद्धा ते एकमेकास कधीही विसरत नाहीत. दहावीची परीक्षा हैद्राबाद येथे देऊन उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना त्याच पात्रतेवर प्राथमिक शिक्षकांची नोकरी लागली. नोकरी करत करत त्यांनी डी. एड. चा अभ्यास पूर्ण करत पदविका हातात घेतली आणि आपली नोकरी कायम केली. त्यांच्या परिवारत आजपर्यंत कुणीही सरकारी नोकरी केली नव्हती. सरकारी नोकरी म्हणजे काय असते ? याची ओळख गुरूजीमुळे झाली. नोकरी लागल्याचा आनंद घरातील सर्वाना झाला, इवन बायकोला सुध्दा. कारण नोकरी लागण्यापूर्वीच शिक्षण चालू असतानाच सायन्ना गुरूजी यांचे लग्न कृष्णाबाई यांच्याशी झाला.

दूसरा भाग

त्यांचे पहिले अपत्य डॉ. सुरेश

सायन्ना गुरूजी आणि कृष्णाबाई यांना एकूण चार अपत्य, डॉ. सुरेश हे पहिले अपत्य तर शोभाबाई आणि गंगूबाई हे अनुक्रमे दूसरे आणि तिसरे अपत्य होय. शेंडेफळ अपत्य म्हणजे साद माणुसकी सामाजिकता अभियानचे लातूर विभाग प्रमुख, स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक नासा येवतीकर. आज सर्वच जण आपापल्या जागेवर यशस्वी जीवन जगत आहेत. मात्र त्यांच्या या यशामागे लपलेला आहे तो या आई-बाबाचे कष्ट. वेळी पोटाला चिमटा देऊन त्यांनी लेकराला शिक्षण दिले म्हणून आज ते या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यात मुलांचे ही श्रम आणि कष्ट आहेत पण संस्कार मात्र त्यांचे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहे.
गुरुजीचे पहिले अपत्य म्हणजे डॉ. सुरेश, घरात कोणी तरी डॉक्टर होणार याचे आनंद सर्वानाच होता जेंव्हा 1984 च्या मुसळधार पावसात गुरुजींनी त्यांच्या मुलाला घेऊन परभणीचे पशुवैद्यकीय महाविद्यालय गाठले आणि तेथे प्रवेश मिळविला. त्यांनी त्या ठिकाणी खुप मेहनत घेऊन अभ्यास केला. एम व्ही एसस्सी चे शिक्षण पूर्ण केले. साधे प्राथमिक शिक्षक असलेले गुरुजींनी त्यांना ते शिक्षण कसे दिले ? हे त्यांचे त्यांना ठाऊक. त्याकाळी टेलीफोन किंवा मोबाईलची व्यवस्था नव्हती तर पोस्टाने पंधरा दिवसातुन एकदा पत्राच्या माध्यमातून त्यांची भेट व्हायची आणि खुशाली कळायची. शिक्षण पूर्ण करीत असताना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी सुध्दा सुरुच होती. डॉ. रमेश भूमे आणि डॉ. हृदय कुमार कौरवार सारखे हुशार मित्र भेटल्यामुळे अभ्यासाची दिशा मिळाली आणि गतीही मिळाली. रात्रंदिवस केलेल्या अभ्यासचे फळ म्हणजे त्यांची बँकेत ऑफिसर म्हणून निवड झाली. घरात सर्वाना आनंद झाला. आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ते औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी म्हणून काम पाहतात. आजही ते आपल्या वडिलांना फोन केल्याशिवाय झोपत नाहीत. ज्यादिवशी दोघांचे बोलणे होत नाही त्यादिवशी दोघांना सुध्दा रुखरुख वाटते. मुलगा म्हणजे कसा असावा याची प्रचिती डॉ. सुरेश यांच्या वागणुकीतुन स्पष्टपणे झळकते. स्वतः खुप हुशार होते मात्र त्याचा गर्व त्यांना कधीच नव्हता. त्यामुळेच त्यांच्या अंगी विद्या टिकली. शालेय जीवनापासून गणित विषयाची त्यांना खुप आवड. कोणतेही गणित चुटकी सरशी सोडविण्यात त्यांचा हात कुणीच धरत नसे. पुस्तक वाचत राहणे ही एक चांगली सवय होती. नेहमी काही ना काही वाचन करण्याची सवय आज ही कायम आहे. मोत्यांसारखे अक्षर काढण्याची ईश्वरदत्त देणगी त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण गुरुजींचे अक्षर सुंदर आणि वळणदार असल्यामुळेच त्यांच्या दोन्ही मुलांचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहेच शिवाय त्यांच्या नातवंडाची अक्षर देखील सुंदर आहेत. गावात त्यांच्या एवढा हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा आजपर्यंत जन्माला नाही आणि पुढेल जन्मेल की नाही माहित नाही असे डॉ. सुरेश यांच्या बाबतीत आज ही बोलले जाते. शांत स्वभाव, इतराना मदत करण्याची वृत्ती आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सुरेश चा सर्व गावाला अभिमान आहे. आज जेंव्हा गुरुजींची हे डॉ. सुरेश यांचे वडील आहेत अशी ओळख दिले जाते किंवा त्यांच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी जेंव्हा त्यांच्या वडिलांसमोर बोलले जाते तेंव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद वाटतो.

तिसरा भाग

शेंडेफळ अपत्य नासा येवतीकर यांचा यशस्वी प्रवास

आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न पाऊलवाटच्या माध्यामातुन त्यांचे चौथे अपत्य नागोराव यांनी केले. तसे तर शेवटचे अपत्य शेंडेफळ म्हणजे खुपच लाडाचे असतो. त्यामुळे बिघडून जाण्याची शक्यता सुद्धा जास्तच असते. त्यातल्या त्यात आईचा जीव जरा जास्तच. लहानसहान चूका तिच्या पदरामागे लपून चुकविल्या जायच्या. त्यावेळी सहज बोलल्या जायचे हा काय दिवा लावतो देव जाणे ! भविष्यात याचे काय होईल ? अशी चिंता केली जायची. कारण परिस्थितीच तशी होती. सातव्या वर्गापर्यंत त्यांचा अभ्यास जेमतेम असा होता. घरात कोणी प्रश्न विचारले की त्याचे उत्तर हमखास चुकायचे त्यामुळे सर्वांच्या बोलणी खाणे ठरलेले असायचे. आठवीच्या वर्गात धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे शाळेत प्रवेश त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरले. येथून अभ्यासला जी सुरुवात झाली ती थांबलीच नाही. अभ्यास करण्याची गोडी लागली आणि प्रगतीलाही सुरुवात झाली. खास करून त्यांच्या लेखन शैलीत सुधारणा झाली. वर्तमानपत्राचे आकर्षण येथेच निर्माण झाले. परिक्षेतील निबंध लेखनाच्या प्रश्नातुन त्यांना लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. स्थानिक वर्तमानपत्रातुन त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले. स्थानिक प्रश्न पेपरमध्ये लिहिल्यामुळे लोक त्यांना पत्रकार , वार्ताहर किंवा पेपरवाला म्हणू लागले. वास्तविक त्यातले ते काहीही नव्हते. या काळात त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता आपला छंद जोपासत राहिले. बारावीच्या परीक्षेत अपेक्षेएवढे मार्क मिळाले नाहीत पण समाधान कारक होते. ज्यावेळी डी. एड. ला प्रवेश मिळाला त्या वेळी त्यांची घरात पत वाढली कारण डी. एड.ला प्रवेश म्हणजे हमखास नोकरी असा विश्वास होता. तोपर्यंत काय दिवे लावतो ? असेच प्रत्येकाना वाटायचे. अखेर ते प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद नांदेड मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या एका वर्षानंतर त्यांचे वडील शिक्षकी पेशेतून यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले. घरातील संस्कारी वागणुकीमुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत हे त्यांच्या चालण्या, बोलण्या, आणि वागण्यावरुन लक्षात येते. इतराचे मन दुखावेल असे कधीच बोलत नाहीत, सर्वांशी प्रेमळ व मैत्रीने वागणे, मोठ्याचा आदर करणे, कधीही कामाचा आळस न करणे, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे समाजातील लोकांना लेखनाच्या माध्यमातून जन जागृती करण्याचा सतत ते प्रयत्न करतात. गेल्या 18 वर्षापासून ते वृत्तपत्रात स्फूटलेखन व स्तंभलेखन करतात. याच माध्यमातुन त्यांनी जानेवारी 2016 मध्ये पाऊलवाट नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. सोशल मीडिया च्या माध्यमातील whatsapp चा सुयोग्य वापर करीत असताना त्यांनी कुणाल पवारे यांच्या मदतीने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दररोज सकाळी 07 वाजता न चुकता पोस्ट करतात त्यामुळे नासा येवतीकर हे नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरात पोहोचले आहे. वृत्तपत्रातील लेख वाचून त्यांच्या वडिलांना कधी कधी त्यांच्या ओळखीचे लोक विचारत की हे तुमच्या गावातील नागोराव सा. येवतीकर कोण आहेत ? खुप छान लेख लिहितात, मला एकदा त्यांना भेटायचे आहे. असे विचारले असता त्याचे उत्तर देताना त्यांची छाती भरून यायची आणि मोठ्या अभिमानाने सांगतात की तो माझा छोटा मुलगा आहे. यांच्या प्रत्येक लेखाचे पहिले वाचक म्हणजे त्यांचे वडील. मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे नियंत्रण असते, आज ही दोन्ही मुले वडिलांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करत नाही. आई-बाबांच्या भावना दुखावतील असे एकही काम ते करत नाहीत. म्हणूनच आज त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृध्दी दिसून येत आहे. पैसा आज आहे उद्या नाही त्यामुळे आपली गुणवान लेकरे हीच खरी संपत्ती आहे असे ते मानतात. त्यांच्या या प्रवृत्ती मुळे आज त्यांना आपले पालकत्व कृतार्थ झाले असे वाटते.
आज घरोघरी जो कलह किंवा वाद दिसतो ते या परिवार मध्ये दिसत नाही. अनेक घरात भाऊ-भाऊ मध्ये वाद आणि भांडण होताना दिसतात. इतकेच नाही तर न्यायालय मध्ये सुध्दा धाव घेतात. मात्र गुरुजींचे परिवार त्यास अपवाद आहे. ते सर्व एकाच छताखाली गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे सर्व शक्य झाले हे पालकांच्या संस्कारामुळे.

दीर्घ आयुष्य

गुरुजींना खरोखर दीर्घायुष्य आहे. फेब्रुवारी 2014 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांना रात्री 12 वाजता मण्यार जातीच्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला होता. त्यांना ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेल्यामुळे फार मोठ्या अपघातातुन बचावले. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरविले की बाबांची पंच्याहत्तरी अमृत महोत्सव साजरा करायचा. ठरविलेल्या वेळापत्रकानुसार 14 सप्टेंबर 2016 रोजी गुरुजींचा अमृत महोत्सवी सोहळा दोन्ही मुलांनी मिळून आयोजित केला आणि त्यांच्या जिवाभावाच्या सर्व मित्रांची, नातलग आणि सगेसोयऱ्याची या निमित्ताने परत एकदा भेट घडवून आणता आली. आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ही ते अगदी ठणठणीत आहेत. त्यांना कोणतेही आजार नाही. मधुमेह किंवा बी पी ची शिकायत नाही. या वयात सुद्धा त्याचे दात अजुन ही मजबूत आहेत. सडसड़ित, अंगकाठीचे पण आजही काटक विचारांचे गुरूजी स्वतः ला भाग्यवान समजतात की त्यांच्या पोटी एवढी सुंदर रत्न जन्मास आली. त्यांच्या भावी निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना.

शब्दांकन :- आप्पासाहेब काशीनाथ सुरवसे

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...