Saturday, 6 January 2018

एकच ध्यास ; वाचन विकास

एकच ध्यास ; वाचन विकास

शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही , याकडे सुद्धा लक्ष ठेवावे. कारण जी मुले अवांतर पुस्तकांचे वाचन करतात त्यांचाच अभ्यास पक्का असतो असा आजपर्यंतचा अनुभव सांगतो. परंतु आपण तसे न करता मुलांवर नेहमी अभ्यासाचे ओझे टाकीत असतो. फालतू वाचन करण्यात वेळ घालविण्यापेक्षा तेवढाच वेळ शाळेचा अभ्यास केलास तर चार-पाच मार्क जास्त पडतील ! असा उपदेश मुलांना प्रत्येक घरातून मिळत असतो. यातून आपण आपल्या मुलांना फक्त परीक्षार्थी बनवित नाही काय ? याशिवाय मुले जास्तीत जास्त वेळ वाचनात कसा घालावतील या दृष्टिकोनातून आपण कधी विचार केलाय का ? मुलांना अवांतर वाचन करता यावे यासाठी घरात वाचनासाठी उपयुक्त असा पुस्तकांचा साठा करावा. मुलांना पुस्तकालयाच्या ठिकाणी नेऊन त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडण्यास मदत करावी. लहान मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिक किंवा साप्ताहिक वृत्तपत्राचे वर्गणीदार व्हावे. यातून मुलांवर हळूहळू वाचन संस्कार होऊ शकतात. टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे पाहण्यापेक्षा पुस्तकातील रंगीत चित्रे पाहणे कधी ही चांगले. कारण टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे मुलांना निर्बुद्ध, आळशी व अकार्यक्षम बनवू शकतात. तर पुस्तकातील चित्रे मुलांना नवप्रेरणा देतात, चेतना निर्माण करतात. त्यातून त्यांना काही तरी नवनिर्मिती करण्याची स्फूर्ती मिळते. वाचनातून मग मुलांच्या बुद्धीचा विकास होतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जर वाचनाचे वेड राहिले नसते तर ते महामानव बनूच शकले नसते आणि त्यांच्या हातून घटना निर्मितीचे एवढे महान कार्य घडले नसते. तासनतास ते ग्रंथालयात बसून वाचन करीत असत. त्यातूनच त्यांना नवीन ज्ञान मिळत होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे दिवसातून अठरा तास वाचन करीत असत. परंतु आज सर्वाना वाचन म्हटले की कंटाळा येतो. घरात मुलांना पुस्तकांचे वाचन करा असे म्हणण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळीनी वाचन करणे आवश्यक आहे. रोज सकाळी आपल्या घरात येणाऱ्या वृत्तपत्राने मुले वाचनाकडे वळू शकतात. आपल्या घरी कमीतकमी दोन वृत्तपत्र नियमित यायला हवे. यामुळे नकळत मुले अवांतर वाचनाकडे जाऊ शकतात. अगदी सुरुवातीला तो चित्रेच पाहिल परंतु कालांतराने त्याला त्यातील मजकूर वाचण्याची आवड लागते. जो चांगल्या प्रकारे वाचन करतो त्याचीच प्रगती उत्तमप्रकारे होत असते. शाळेत आज अशी स्थिती बघायला मिळते की पाचव्या वर्गातील मुले दुसऱ्या वर्गातील पुस्तकांचे अस्खलित वाचन करू शकत नाहीत. याचे करणे अनेक असू शकतात. मात्र खरे कारण म्हणजे त्याच्या वाचनाकडे आजपर्यंत कोणी लक्षच दिले नाही. चांगल्या प्रकारे लिहू शकतो मात्र वाचताना अडखळतो, असे का ? याचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय काय ? अर्थात याचे उत्तर नाही असे येते. वाचन करता येत नसल्यामुळे मुलांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते आणि कालांतराने तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जातो. प्राथमिक शिक्षण चालू असतानाच त्या मुलांवर वेळीच उपचार झाल्यास मुलांची प्रगती शक्य आहे. प्रत्येक मूल शिकू शकते, वाचू शकते असा विश्वास जोपर्यंत शिक्षकांमध्ये तयार होत नाही तोपर्यंत त्या मुलांची प्रगती होऊ शकत नाही. शिक्षकांचा मुलांविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोनच मुलांना पुढे नेऊ शकते आणि नकारात्मक दृष्टिकोन आपणास प्रयत्न करायला सुरुवात करू देत नाही. एखाद्या मुलांना काय येते आणि काय येत नाही हे आपण आत्ताच ठरविता येत नाही. पण त्या मुलांना तो भाग समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीने सांगावे लागते. आजपर्यंत आपण प्राथमिक वर्गात महाविद्यालयाच्या व्याख्यान पद्धतीने सांगत आलो. गरज असणाऱ्या मुलांना आणि गरज नसणाऱ्या मुलांना सुद्धा तेच शिकवीत आलोत म्हणजे समानतेने शिकविलो. पण ज्याला अजून शिकविण्याची गरज आहे, ती त्याची गरज पूर्ण न करता पुढे जात राहिलो त्यामुळे तो मागे पडला, त्याला कधी तरी समतेने शिकविलो काय ? प्रत्येक शिक्षकांनी याचे स्वतः शी आत्मपरीक्षण करणे आज गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने यावर्षी इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील सर्व मुलांना अस्खलित वाचन करता यावे म्हणून साठ दिवसाचा मूलभूत वाचन विकास कार्यक्रम आणित आहे. ज्यात प्रत्येक मुलांची वाचन विकासाच्या आठ टप्प्यात विचार केला जाणार आहे. विद्यार्थी ज्या टप्प्यावर आहे तेथून त्या विद्यार्थ्यांचा वाचन कौशल्य विकसित करता येणार आहे. डॉक्टर ज्या प्रकारे एखाद्या रुग्णाची केस स्टडी करतो त्याचा धर्तीवर शिक्षक आत्ता मुलांची केस स्टडी करणार आहेत. सर्व शिक्षकांचा आत्ता एकच ध्यास लागलेला आहे ते म्हणजे वाचन विकास. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणूनच म्हटले आहे " वाचाल तर वाचाल "

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

4 comments:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...