Wednesday, 13 December 2017

झेल्या

संकलित - *व्यंकटेश माडगुळकर यांची कथा*

*झेल्या*

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विरून जावे. तरीदेखील ते दिवस माण्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या. माझा एक विद्यार्थी.
मी त्या खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली-पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणिते सांगतात, की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगातात, सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे विचार त्या चिमण्या डोक्यांतून उड्या मारीत असावेत.
मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनीमातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, ‘‘हं, हजेरी सांगा रे –’’
‘‘सदाशिव नारायण.’’
आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, ‘‘हजर.’’
‘‘अब्दुल फत्तूभाई.’’ लाल टोपीचा गोंडा हालला आणि चिरका आवाज उठला, ‘‘हजर.’’
होता होता शेवटचे नाव मी वाचले, ‘‘जालंदर एकनाथ.’’
आणि पोरे ओरडली, ‘‘जालंदर न्हाय. झेल्या म्हना. त्यो साळंतच येत न्हाई!’’
‘‘का येत नाही रे ?’’ मी विचारले.
‘‘कुनाला ठावं मास्तर, आनू का बोलावून ?’’ एकजणाने विचारले.
‘‘घरी न्हाई त्यो, वड्यात चिंचा पाडतोय,’’…. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला, तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. मग तीन चांगली दणकट पोरे जालंदरल बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. पंधरा-वीस मिनिटे झाली असतील नसतील, ती जालंदरला घेऊनच आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते.
‘‘सोडा त्याला. कुठं होतास रे?’’
‘‘वड्यात चिंचा पाडत हुता. आमी साळंत चल म्हनल्यावर शिव्या दिल्या मास्तर!’’ पोरांनी माहिती दिली.
बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगाने किरकोळच. वयानेही फारसा नसावा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, बाहीवर ठिगळ लावलेले कुडते, तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिरे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.
सौम्य आवाजात मी विचारले, ‘‘काय रे, शाळेत का येत नाहीस?’’
‘‘काम असतं घरी, ‘‘गुर्मीत बोलाल. त्याचे दात काळे आणि किडलेले होते.
‘‘कसलं?’’
‘‘म्हस हिंडवावी लागती. भाता वडावा लागतो. दादा म्हणतो, साळंत जाऊ नगस !’’
झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला, ‘‘लबाड बोलतोस ! काय सुदीक करीत न्हाई ह्यो घरी – बापाला सांगतो साळंत मास्तर मारत्याती म्हणून, अन् गावात उनाडक्या करत हिंडतो ! काय ऐकत न्हाई बापाचं !’’
त्यावर झेल्याने रागारागाने सदाकडे बघितले आणि तो तोंडतल्या तोंडात पुटपुटला, ‘‘चल की साळंबाहेर, जीवच घितो तुजा !’’
झेल्या उनाड आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली, तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, ‘‘अरे, काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला.’’
झेल्याचा हिशेब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती.
‘‘खिशात काय आहे तुझ्या ?’’
इतका वेळ बटणांच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले, ‘‘काय न्हाई.’’
‘‘चिंचा हायत्या मास्तर !’’ असे ओरडून एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले आणि झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले, तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, ‘‘अग आय आय ग, बोट मुरगाळलं माजं !’’
मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे.
‘‘तू बाजूला हो रे. जागेवर बैस बघू,’’ मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो,
‘‘झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का ? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला.’’
काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला,
‘‘समद्या ?’’
‘‘हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव. मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या !’’
हिरव्यागार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभरं खिशांतून काढून झेल्याने टेबलावर ठेवले.
‘‘शाबास जालंदर ! मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी यांतल्या चिंचा.’’
झेल्या खुशीने हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला.
दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला. पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या  नियमित शाळेत येऊ लागला.
मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे, त्याच्या व्रात्यपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडसी माणसे फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला.
हां हां म्हणता तीन महिने संपून गेले. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, ‘‘मी येतो मास्तर तुमच्यासंगं !’’
कुठे येणार होता तो माझ्याबरोबर ? मी कुठे जाणार होतो हे माझे मलाच माहिती नव्हते, तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो ? मी हसलो आणि म्हणालो, ‘‘अरे, वेडा काय तू ? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं चार इयत्ता शीक आणि तिकडे ये. माझ्या वर्गात ये, सातवी पास हो, इंग्रजी शीक !’’
झेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली.
नंतर सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि पायीपायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता.
गावचा ओढा ओलांडला, हद्द संपली.
‘‘झेल्या, जा ते आता.’’
मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला.
झेल्याने एकाएकी ओंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला, ‘‘मास्तर, मी न्हाई जायचा आता त्या साळंत !’’
त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला.
अंगरख्याच्या बाहीने तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता.
पाऊलवाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो.
त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल ?

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...