Tuesday, 12 September 2017

*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*

*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*

वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत घरातल्या वातावरणात खेळणाऱ्या मुलांची पहिली गुरु ही त्यांची आई असते. ती त्यांना बोलायला, चालायला आणि वागायला शिकविते. त्यानंतर ते मूल शाळेत शिकनण्यासाठी प्रविष्ठ होते. शाळेत शिकणारी चिमुकली मुले हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. म्हणून म्हटले जाते की, देशाला घडविण्याचे सर्वात मोठे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते. ज्ञान देणारे शिक्षक सर्वगुणसंपन्न असावे म्हणजे त्यांचे विद्यार्थी देखील तसेच सर्वगुणसंपन्न तयार होतील. चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील. शिक्षकांनी दुःखी होऊन किंवा शिक्षकांची मानसिक स्थिती चांगली नसेल तर ते चांगले अध्यापन करू शकतात काय ? नाही. त्यामुळे शिक्षकांनी आपला मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आणि आर्थिक त्रास विसरून अध्यापनाचे कार्य करणे अत्यावश्यक आहे. ही जबाबदारी लक्षात घेऊन शिक्षकांनी कार्य केले पाहिजे. हसमुख चेहऱ्याचे शिक्षक सर्वाना हवेहवेसे वाटतात तर रागीट किंवा नेहमी काळजीत असलेल्यां शिक्षकांजवळ जाण्यास विद्यार्थी घाबरतो.
शिक्षक आनंदी राहतील यासाठी शासन स्तरावरुन देखील तसे प्रयत्न व्ह्ययला पाहिजे. पण वास्तविक तसे दिसत नाही. राज्यातील कित्येक शिक्षक आज विविध प्रकारच्या तणावाखाली आपले अध्यापनाचे कार्य करीत आहेत. नुकतेच एक बातमी वाचण्यात आली होती की, शालेय बांधकाम असहय झाल्यामुळे एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केली. असे अनेक मुख्याध्यापक शालेय बांधकामाच्या तणावात काम करीत आहेत. मुख्याध्यापकाना आज विविध प्रकारची ऑनलाइन कामे करावी लागत आहे. त्याचा त्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीच्या शिक्षण पध्दतीमध्ये आणि आत्ताच्या शिक्षण पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. मात्र पूर्वी पेक्षा आत्ताच्या शिक्षकांना अध्यापनाच्या व्यतिरिक्त अन्य कामे जास्त करावी लागत आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षक सदा आनंदी कसा राहू शकेल हा एक प्रश्नच आहे.
यावर्षी शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे सर्व शिक्षक बदली होते की नाही किंवा बदली सोप्या क्षेत्रात होते की अवघड क्षेत्रात यांची काळजी प्रत्येक शिक्षकांना लागली आहे. त्यामुळे ज्यांची सेवा जास्त झाली आहे ते सर्वजण चिंताग्रस्त आहेत. शिक्षकांची सर्व माहिती ऑनलाइन करणे बंधनकारक करण्यात आले. पण सर्वच्या सर्व शिक्षकांची माहिती भरणे आणि ऑनलाइन पध्दतीने बदल्या करण्याचा शासनाचा हा पहिला प्रयत्न कसा असेल ? हे बदली झाल्या शिवाय कळणार नाही. पण एक सत्य आहे की, शिक्षकांना त्यांच्या सोईनुसार शाळा मिळाली तर त्यांचे अध्यापन देखील चांगले होऊ शकते. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या सार्वत्रिक बदल्यामध्ये एका उपक्रमशील शिक्षकांची प्रशासकिय कारणावरुन घरापासून दीडशे किमी दूरच्या शाळेवर बदली झाली. या बदलीमुळे तो आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक आणि मानसिक अश्या सर्व बाजूनी त्रस्त झाला. तेंव्हा शाळेवर खरोखर त्यांचे लक्ष किती असेल ? तो मन लावून अध्यापन करेल काय ? असाच एक दूसरा अनुभव म्हणजे दीडशे किमी दूर असलेला आमचा एक शिक्षक मित्र त्याची घराजवळच्या शाळेत बदली झाली. आज तो आनंदात अध्यापन करीत आहे. यावरून काय बोध घेता येईल. बदली प्रक्रियेतून शैक्षणिक गुणवत्ता कमी होत असेल तर या बदलीबाबत कुठे तरी विचार व्ह्ययलाच हवे. मुलांना ज्याप्रकारे घराजवळील शाळा आकर्षित करते तसे शिक्षक मंडळींना देखील नक्कीच करत नसेल काय ? जर शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवायचे असेल तर शिक्षक मंडळी आनंदी कसे राहतील हे पाहणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावरुन शिक्षकांसाठी दोन तीन महिन्यातून एकदा निदान विभागा तील शिक्षक एकत्र येतील अश्या कार्यक्रमाची आखणी करावी. शिक्षकांना प्रेरीत करतील अश्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे नियोजन सहा महिन्यातून एकदा करण्यात यावे. निदान वर्षा तून एकदा तालुका स्तरावर अगदी छोटे से का होईना कवी संमेलन किंवा शिक्षक साहित्य संमेलन भरवून शिक्षकां च्या आत्मविष्काराला वाव मिळते का याचे निरिक्षण करावे. आज साहित्य निर्माण करणाऱ्या शिक्षकां ची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे शिक्षक अश्या संमेलानास उपस्थित राहणार नाहीत ही विचारधारा चूक ठरत आहे. प्रशासनात काम करणारे काही साहित्य प्रेमी अधिकाऱ्यांनी या गोष्टी चा अभ्यास करून नियोजन केल्यास शिक्षक खरेच आनंदी राहू शकतील आणि आपल्या विद्यार्थ्यामध्ये सुध्दा तेच स्वप्न पाहतील असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...