मुख्यालय
शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला हे वृत्त वाचल्याबरोबर रामराव गुरूजीच्या छातीत धस्सं केल. आज काही तरी अवघड बातमी वाचायला मिळणार याची गुरूजीला खात्री होती. कारण आज जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासाठी फक्त खास बैठक बोलाविण्यात आली होती आणि त्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविता यावी यासाठी विविध उपाय योजनेवर चर्चा अपेक्षित होती. झाले ही तसेच शिक्षक मंडळी मुख्यालयी म्हणजे शाळेच्याच गावात राहिल्याशिवाय शाळा सुधारणार नाही आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता सुद्धा, त्यासाठी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव सर्वांच्या संमतीने पारित करण्यात आला. तीच बातमी प्रत्येक पेपरच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाली होती. शाळा सुरूवात होवून आठवडा सुद्धा उलटला नाही की या बातमीने गावात चर्चेला उधाण भरलं. गावातले काही उडाण पोरान बातमी वाचली होती, त्यांनी गुरूजीला बघून मग, काय मास्तर केव्हा येणार गावात राहायला? अशी उपरोधात्मक बोलू लागली. शाळेला येता येताच ही बातमी वाचल्यामुळे गुरूजी अस्वस्थ मनाने शाळेत आले होते. शाळेची घंटा वाजली, परिपाठ संपला नियमित वर्गाला सुरूवात झाली परंतु गुरूजीचे मन कोठेच लागेना बायको लेकरं याच काय? त्यांना सोबत ठेवू की मी एकटाच गावात राहू? या विचाराच्या तंद्रीत दिवसभर राहिल्यामुळे चेहरा कोमजून गेला होता. चेह-यावरचा रोजचा तेज आज लुप्त झाला होता. दुपारी डब्बा जेवताना सुद्धा त्यांचे लक्ष जेवणावर नव्हते. त्यांच्यासोबत इतर ४-५ सहकारी मंडळी होती. ती मात्र ही बातमी वाचून अजिबात डगमगले नाहीत त्यांना कसलीच काळजी वाटत नव्हती. या त्रासातुन सुद्धा काही तरी नक्की मार्ग काढू असा विश्वास त्यांना वाटत होता. त्यामुळे ते कधीच घाबरत नव्हते. रामराव गुरूजी मात्र छोट्या मोठ्या घटना वाचल्या की, त्यांच्या छातीत धडकी भरे. म्हणूनच त्यांचे मित्र त्यांना विनोदाने भित्रे गुरूजी म्हणत असत. तसे त्यांचे नाव रामराव कात्रे परंतु ते नेहमी भितात त्यामुळे त्यांचे नाव कात्रे च्या ऐवजी भित्रे असे नामकरण करण्यात आले.
रामराव कात्रे गुरूजी हे वडगावचे राहणारे जेमतेम शे पाचशे लोकांच्या वस्तीतील त्या गावात गुरूजीचे एक छोटेसे घर होते आणि त्या घरात आई बाबा सोबत त्याची बायको राधा आणि दोन लेकर आनंदात राहत होती. वडगावच्या जवळ म्हणजे साधारणपणे १२-१५ किमी अंतरावरील बोरगाव येथे गुरूजीला नौकरी मिळाल्यामुळे तो खुश होता. आई बाबा पण आनंदातच होते. घरीच भाकर खावून नौकरी करणे फार सोपे काम असते. चांगले स्थळ बोलून आलं गुरूजींचे लग्न थाटात झाले. वर्षामागून वर्ष सरली आणि गुरूजींना दोन लेकरं ही झाली. राधाच्या मनात राहून राहून वाटत असे की, आपण शहरात जावून राहावं. परंतु गुरूजी आई बाबाचा एकूलता एक मुलगा. त्यामुळे त्यांना एकटे सोडून जाणे गुरूजींना शक्यच नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात नेहमीच धुसफूस चालत असे. परंतु गुरूजी कसे तर समजावून करून राधाला पटवीत असत आणि संसाराचा गाडा चालवित असत.
परंतु आजच्या बातमीने गुरूजी खूपच चिंताग्रस्त होवून शाळा सुटल्यानंतर घरी परतले. घरी आल्यानंतर ही त्यांचे कुठेच मन लागेना शेवटी राधा न राहवून म्हणते की, काय हो, काय झालय? या प्रश्नावर गुरूजी काय उत्तर देणार त्यांनी राधाला पेपर दिला आणि वाचण्यास सांगितले. ज्या बातमीने गुरूजी दु:खी कष्ट व नाराज झाले होते तीच बातमी वाचताना राधाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण या निमित्ताने तरी घर सोडायला मिळेल असे तिला वाटायला लागले परंतु तिने आपल्या चेह-यावरील भाव कोणाला समजू दिले नाही. दिवे लावली आणि रात्री जेवण्याच्या वेळी गुरूजींनी आपल्या आई-बाबासमोर त्या बातमीचा विषय ठेवला. सगळ्यांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह फक्त त्यास राधा अपवाद होती. जेवताना एकदम नीरव शांतता होती. शेवटी बाबांनी दीर्घ श्वास घेत म्हटले, रामा तु तुझ्या बायको लेकरासह बोरगावला जा राहायला. आम्ही राहतो इथे शेती घर बघत. काही काळजी नको. सरकारने नियमच केला तर त्याला कोण काय करणार? यावर गुरूजी काय बोलणार अगदी गुमाण जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला.
झोपण्यापूर्वी राधाने आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी तोंड उघडले, बाबांनी तर परवानगी दिली चला आपण सर्व बोरगावला राहू. राधेला ही बातमी म्हणजे सुवर्णसंधीच वाटत होती आणि ही संधी सोडायची नाही असा ठाम निर्धार केला होता. यावेळी सुद्धा गुरूजींनी राधेची समजूत काढली प्रथम १-२ महिने मी एकटा राहतो त्यानंतर आपण सर्वजण राहू असे बोलून दोघेही गाढ झोपी गेले. सकाळ झाली गुरूजी बोरगावला जाण्याची तयारी करू लागले आज त्यांच्या सोबत फक्त जेवणाचा डबा नव्हता तर निदान चार पाच दिवस त्या गावात मुक्काम करायच्या तयारीने सर्व साहित्याची बांधाबांध केली. आई बाबांचा आशीर्वाद घेऊन गुरूजी निघाले. ते थेट शाळेतच आले आपल्या सर्व सामानासह गावात खोली साठी शोधाशोध केली नाही कारण राहण्यायोग्य घरे त्या ठिकाणी नव्हतीच मग काय करणार शाळेतील एका वर्गाच्या कोप-यात बांधून आणलेले सर्व साहित्य ज्यात अंथरूण, पांघरूण, स्वयंपाकाचे सामान, ड्रेस, अंडरवियर, बनियान, टॉवेल इ. टाकून ठेवले तेथेच शिकवायचे आणि तेथेच रहायचे असा बेत गुरूजींनी आखला तेथे ना लाईटची सोय ना पाण्याची. सकाळी कोणी उठण्याच्या अगोदर पानवाल्याच्या विहीरीवर जायचे दोन बादल्या आपल्या अंगावर टाकायचे एक भांडे पाणी भरायचे आणि परत शाळेवर यायचे. मुले शाळेत येण्यापूर्वीच सकाळचा स्वयंपाक व जेवण आटोपून घ्यायचे. सकाळी काहीच सवड मिळत नव्हती. हे सगळं करेपर्यंत शाळेचीच वेळ व्हायची. सायंकाळी मात्र हमखास वेळ मिळायचा. एक दोन दिवस गुरूजीला सुद्धा याचा कंटाळा आला. सायंकाळची वेळ काही केल्या कटत नव्हती. शाळा सुटल्यावर चार पाच पोरांना शिकवावे असे एका मताने म्हटले परंतु दिवसभराचा कलकलाट ऐकून कंटाळा आलेला असतांना पुन्हा पोरांना शिकविणे नको रे बाबा वाटले. शनिवारच्या दिवशी दुपारच्या शाळेला सुट्टी असत म्हणून शाळा संपल्यावर गावी जाण्याचे नियोजन केले. सायंकाळी पर्यंत गावी आल्यानंतर पोर बाबा आले बाबा आले म्हणत पळत गुरूजीला बिलगली आई बाबांना पण आनंद वाटला अन् राधेची तर कळी खुलली होती. गावात खोली भेटली असेल आणि रविवार नंतर सोमवारी बोरगावला जाण्याचा योग येईल या विचाराने राधा खुश होती परंतु गुरूजींनी जेवण झाल्यानंतर राधेला सांगितले की, गावात खोली मिळाली नाही आणि ते शाळेच्या एका खोलीत बस्तान मांडले आहेत. राधा ते ऐकून निराश झाली आणि काही न बोलता झोपी गेली.
रविवार सुट्टीचा दिवस अगदी मजेत गेला. दुस-या दिवशी सकाळी लगबगीने तयार होऊन गुरूजी शाळेच्या रस्त्याला निघाले. गावी दीड दिवस कधी संपला हे कळालेच नाही. स्वयंपाक करून खाण्याचा कंटाळा येऊ लागला सायंकाळी खुप कंटाळवाणे वाटू लागले. शाळेतल्या गावात कोणी मित्र नाही ना नातलग ज्याच्या सोबत गप्पा गोष्टी करता येईल. कादंबरी वा गोष्टीचे पुस्तक वाचून सुद्धा कंटाळा येऊ लागला. त्यातच एके दिवशी गावातील चांडाळ चौकडी गुरूजी जवळ आले, काय गुरूजी काय चाललय? गुरूजी आपल्या नेहमीच्या सुरात काही नाही, बोअर होतय वाटत मध्येच नानाने आपल्या तोंडात तंबाखुची मसाला कोंबून म्हणाला. गुरूजी पत्ते खेळता येतात का? लंगड्या माधवने विचारले. गुरूजींना पत्ते खेळता येत असूनही त्यांनी नाही असे उत्तर दिले. गावात दिवाळी, नागपंचमी, होळी या सणाच्या दिवशी मित्रासोबत गुरूजी रम्मी खेळत असे. त्यामुळे पत्ते खेळणे त्याला नवीन नव्हते मात्र नौकरीच्या गावात मुळीच खेळायचे नाही असे त्यांनी पक्के ठरविले होते. रिकामा वेळ कसा घालावयाचा यावर उपाय काही सुचना आणि चांडाळ चौकडी रोज येऊन गुरूजींना तंग करू लागले. अन् एके दिवशी गुरूजींचा पाय घसरला आणि चांडाळ चौकडी सोबत पत्याचा डाव सुरू झाला. एक वा दोन तासावरचा डाव आता रात्रभर चालू लागला. पानवाल्याच्या विहीरीवर स्नान करणे हळूहळू कमी होऊ लागले. शाळेत मुलांना काही तरी काम देवून वामकुक्षी घेण्याच्या प्रकारात वाढ झाली. मित्रासोबत अधूनमधून झिंग व्हायची सवय या चांडाळ चौकटमुळे खूपच वाढली. आता सकाळी उठल्यावर चहाची जागा देशीने घेतली. दर शनिवारी गावी जाणारे गुरूजी महिना महिना घरी जाणे बंद झाले. पगार तर उरतच नव्हती शिवाय गावात उधारी वाढली. जेवण्याचे वांदे झाले. लोक कोणी जवळ येऊन देईनात शाळेतील मुले सुद्धा दूर राहू लागले. आता राधाच फक्त मला समजून घेऊ शकते म्हणून राधा, मला माफ कर असे म्हणू लागले. बाजुलाच झोपलेली राधा गुरूजीला उठवते, अहो, उठा काय झालं काही स्वप्न बघितलात काय? गुरूजी उठून बघतात तर काय हे आपल्या घरी आहेत. तेव्हाच पेपर हातात पडते. बातमी वाचून गुरूजी खदाखदा हसतात. बातमीमध्ये सभा बारगळली असा मथळा असतो.
- नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
No comments:
Post a Comment