Sunday, 19 March 2017

खरी संपत्ती

*खरी संपत्ती*

अमित हा बँकेत कारकून.  त्‍याची पत्‍नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्‍यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्‍यांच्‍या पदरात दिली होती.  त्‍यांच्‍या जीवनात कोणत्‍याच गोष्‍टीची वाणवा नव्‍हती, टुमदार घर, गाडी, कलर टीव्‍ही, फ्रीज आदी सा-या चैनीच्‍या वस्‍तू त्‍यांच्‍या घरात होत्‍या. जशी पगारात वाढ होऊ लागली. तशी चैनीच्‍या वस्‍तूंची गर्दी घरात वाढू लागली; परंतु नयना ही वेगळ्या स्‍वभावाची होती.  ती स्‍वार्थीपणाने विचार करणारी होती. त्‍यामुळे राजा-राणीच्‍या संसारात तिने सासू व सास-याला स्‍थानच दिले नाही. जेव्‍हा अमन जन्‍मला तेव्‍हा तिला एका बाईची गरज भासू लागली.  त्‍यामुळे आता तरी ती आई-वडिलांना बोलविण्‍यास सांगेल हा अमितचा विचार पुरता फोल ठरला.
अमनचा सांभाळ करण्‍यासाठी एका कामवाली बाईला महिना पाचशे रूपयांच्‍या बोलीवर तिने ठेवून घेतले. अमनची जबाबदारी बाईवर सोपवून दोघेही आपापल्‍या नोकरीला जाऊ लागले. त्‍यांचे दिवस तसे मजेत व आनंदात जात होते. सुट्टीच्‍या दिवशीच त्‍यांना मोकळा वेळ मिळायचा, तोही कोणत्‍या ना कोणत्‍या कार्यक्रमाने निघून जायचा. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबात कधी प्रेमाचे संवाद ऐकायला वा बघायला मिळतच नव्‍हते, नेहमी धावपळ असायची.
त्‍यांच्‍या शेजारीच लहानशा घरात मोहन व त्‍याची पत्‍नी सुमन यांचे कुटुंब राहत होते.  मोहन एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता, त्‍याची पत्‍नी सुमन आपले घरकाम सांभाळून शिवण, मेहंदी क्‍लास चालवत होती.  सुमन ही नावाप्रमाणेच चांगल्‍या मनाची होती.  सासू-सासरे वृद्ध झाल्‍यामुळे त्‍यांच्‍याने काही काम करवत नाही म्‍हणून त्‍यांना येथेच बोलावून घेण्‍याचा हट्ट तिने मोहनजवळ धरला होता.  मात्र मोहनचा तुटपुंजा पगार, त्‍यात आपलेच घर नीट चालत नाही, तेव्‍हा त्‍यांची कशी व्‍यवस्‍था करणार? त्‍यापेक्षा ते गावाकडे जास्‍त आनंदी राहतील, अशी धारणा मोहनची होती; पण सुमन ऐकायला तयार नव्‍हती. त्‍यामुळे मोहनला अखेर आपल्‍या आई-वडिलांना बोलावून आणावे लागले.  त्‍यांनीसुद्धा आपल्‍या मुलांची समस्‍या जाणून घेऊन एकाच खोलीतल्‍या त्‍या घरात अॅडजेस्‍ट झाले.  आपल्‍यामुळे मोहनला त्रास होणार नाही. याकडे त्‍यांनी लक्ष ठेवले. त्‍यामुळे त्‍यांचा काडीमात्र त्रास वाटत नव्‍हता, उलट घरातील लहानसहान कामे ते करू लागले. सुमन आणि मोहनला सुधीर आणि सुधा अशी दोन मुलं होती. लहानाचे मोठे होताना त्‍यांचा शिक्षणावरील खर्चही वाढू लागला. त्‍यांनी आपल्‍या मुलांना मराठी माध्‍यमाच्‍या शाळेत टाकलं. सुमन बारावीपर्यंत शिकलेली होती. त्‍यामुळे सायंकाळी त्‍यांचा सराव घेऊ लागली.  सायंकाळी आजोबाच्‍या तोंडून रामरक्षा स्‍त्रोत्र, रामायण, महाभारतातील गोष्‍टी, श्‍लोक ऐकून मुलं शांतपणे झोपू लागली.
सुधीर, सुधा यांच्‍यावर चांगले संस्‍कार घडू लागल्‍याने त्‍यांची प्रगती होऊ लागली. याउलट अमित व नयना यांनी आपल्‍या दोन्‍ही मुलांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत प्रवेश दिला. त्‍यांना पैशाची काळजी नव्‍हती; पण मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्‍यांनी खूप पैसा ओतून प्रसिद्ध असलेल्‍या शाळेत टाकले.  मुलांना काय हवे काय नको हे पाहण्‍यासाठी या दोघांना नोकरीच्‍या धावपळीत वेळच मिळत नव्‍हता. आजी-आजोबांचे प्रेम तर त्‍यांना पुस्‍तकातूनच मिळायचे, त्‍यामुळे दोन्‍ही मुलं मानसिकदृष्‍ट्या खचू लागली. अमन शाळेत कमी व बाहेर जास्‍त राहू लागला.  पॉकेटमनीचे पैसे उडवीत मित्रांसोबत मजा करू लागला. पूजा हट्टी स्‍वभावाची बनत गेली.  त्‍यामुळे तिला कुणी मैत्रीण मिळाली नाही. शालांत परीक्षेचे दिवस जवळ आले तसे अमित व नयनाला मुलांची काळजी वाटू लागली. परीक्षा संपून निकाल लागला, तेव्‍हा अमन अगदी कमी गुण मिळवून उत्‍तीर्ण झाला. पुढे चांगले शिक्षण घेऊन सुधीर डॉक्‍टर होऊन जेव्‍हा मोहन व सुमनच्‍या पाया पडत होता तेव्‍हा त्‍यांची छाती गर्वाने फुलून गेली.  अमन मजा करण्‍यासाठीच कॉलेजला जात  राहिला.  त्‍यांचे पूर्ण जीवन आई-वडिलांच्‍या पैशावरच चालू होते. ते अखेरपर्यंत पैसा या बनावट संपत्‍तीच्‍या मागेच धावत होते; परंतु खरी संपत्‍ती असलेल्‍या आपल्‍या लेकरांकडे कधी पाहिले नाही. त्‍यामुळे आज त्‍यांचा मुलगा बेकार बनून घरी बसला आहे. अर्थात संस्‍कारित मुलं हीच खरी संपत्‍ती आहे.

नागोराव सा. येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...